उत्तर कोरिया: ‘ती आई आजारी पडली, मुलांनी भीक मागून आईला जिवंत ठेवलं, पण शेवटी आईसह 2 मुलांनीही प्राण सोडले’

- Author, जीन मॅकेन्झी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून BBC अत्यंत गोपनीयरीत्या उत्तर कोरियातल्या तीन जणांच्या संपर्कात आहे. तीन वर्षांपूर्वी तिथल्या सरकारने सगळ्या सीमा बंद केल्यानंतर या देशात नेमकी काय परिस्थिती आहे याविषयी जग अनभिज्ञ आहे.
उत्तर कोरियातल्या भयंकर घडामोडी या रिपोर्टच्या माध्यमातून पहिल्यांदाच जगापुढे उघड होत आहेत. उपासमार, क्रूर धरपकड आणि सुटकेचा कुठलाही मार्ग नाही अशा परिस्थितीत तिथे माणसं जगत असल्याचं उघड झालं आहे. अर्थातच त्या तीन जणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही त्यांची नावं बदलली आहेत.
म्याँग सुक तिच्या फोनला चिकटून आहे आणि आणखी थोडा तरी माल विकला जावा म्हणून चिवटपणे प्रयत्न करते आहे.
एक चाणाक्ष व्यावसायिक असणारी म्याँग तस्करी करून आणलेली थोडीशी औषधं अत्यंत आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना गुपचूप विकत आहे.
त्या दिवसाची गुजराण होण्यासाठी तिला ही थोडीशी औषधं विकायलाच लागतील. या धंद्यात ती एकदा पकडली गेली होती. आता पुन्हा तशी वेळ आली तर तुरुंगाबाहेर पडायला लागणारी लाच देण्यासारखी तिची परिस्थिती राहिलेली नाही.
म्हणूनच पकडलं जाणं तिला आता परवडणारं नाही. कुठल्याही क्षणी दारावर ठकठक वाजेल आणि... फक्त पोलीसच दरवाजा ठोठावतील असं नाही. कदाचित तिचे शेजारी येतील.
आता तिला कुणावरच विश्वास ठेवता येत नाही. खरंतर परिस्थिती पूर्वी अशी नव्हती, ती सांगते. म्याँग सुकचा औषधविक्रीचा व्यवसाय एके काळी जोमात होता.
पण 27 जानेवारी 2020 रोजी उत्तर कोरियाने कोरोनाच्या साथीचं निमित्त करत आपल्या सीमा बंद केल्या. केवळ परदेशी माणसंच नव्हे तर अन्नपदार्थ आणि इतर मालही देशात येईनासा झाला.
उत्तर कोरियातल्या माणसांनाही देशाबाहेर पडायला बंदी घातली गेली. त्यामुळे नागरिकांना आहे त्याच शहरात अडकून पडायला झालं.
मदतकार्य करणारे स्वयंसेवक आणि राजनैतिक अधिकारी आपला गाशा गुंडाळून तेव्हाच देशातून निघून गेले आहेत.
कुणी सीमेच्या आसपास जरी फिरताना आढळलं तर थेट गोळ्या घालण्याचे आदेश सैनिकांना दिले गेले आहेत. जगापासून पूर्णपणे तुटलेला हा देश आता माहितीचं कृष्णविवर झाल्यासारखी परिस्थिती आहे.
हुकूमशहा किम जोंग उनच्या अंमलाखाली असणाऱ्या उत्तर कोरियाच्या जनतेला देशाबाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यास मनाई आहे.
या देशात काही माहितीस्रोतांचं जाळं जपून ठेवलेल्या Daily NK या संस्थेच्या मदतीने बीबीसाने तिथल्या सामान्य जनांशी संपर्क साधला आहे.
सीमा बंद झाल्यानंतर आपल्यावर काय भीषण परिस्थिती ओढवलेली आहे हे जगासमोर आणण्यास हे तिघे उतावीळ झाले आहेत.
पण ते आमच्याशी बोलले याचा सुगावा जरी सरकारला लागला तरी थेट जीव जाऊ शकतो हे त्यांना माहीत आहे.
त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही त्यांनी सांगिल्यापैकी मोजक्याच गोष्टी उघड करू शकतो. पण त्यांनी सांगितलेले हादरवून टाकणारे अनुभव त्या देशात नेमकं काय सुरू आहे याची झलक जगापुढे नक्की आणतील.
म्याँग सुक
"आमच्या अन्नाची, जेवणाची परिस्थिती एवढी वाईट कधीच नव्हती", म्याँग सुक सांगते.
उत्तर कोरियातल्या अनेक घरांमध्ये स्त्रीच कुटुंबातली प्रमुख कमावती व्यक्ती असते, तशी म्याँग सुकसुद्धा आहे.
स्टेट जॉब म्हणून कराव्या लागणाऱ्या अनिवार्य सरकारी सेवेतून पुरुषांना मिळणारा पगार हा इतका तुटपुंजा असतो की त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांना पैसे कमावण्याचे इतर मार्ग शोधावेच लागतात.

सीमा बंद होण्यापूर्वी म्याँग सुक स्थानिक बाजारात अत्यावश्यक औषधं विकण्याचा व्यवसाय करायची. अँटिबायोटिक्स आणि इतर बहुतेक औषधं चीनमधून तस्करी करून आणली जायची. यासाठी तिला सीमेवरच्या चौकीदारांना लाच द्यावी लागायची.
औषध विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यापैकी अर्ध्याहून जास्त हिस्सा तर असे खिसे भरण्यातच जायचा. पण तरीही तिच्या व्यवसायासाठी तिने ही तडजोड मान्य केली होती.
उरलेल्या मोजक्या उत्पन्नातून ती आणि तिचं कुटुंब तसं व्यवस्थित जगू शकायचं. देशाच्या उत्तरेला असणाऱ्या तिचं शहर चीनच्या विस्तीर्ण सीमेलगतच आहे.
आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तिची नेहमीच ओढाताण व्हायची. पण आता मात्र सध्याच्या परिस्थितीत या ताणापायी तिचा जीव पुरता मेटाकुटीला आला आहे.
आता तिला विक्रीसाठी हवा तो माल मिळवणं हे जवळपास अशक्य झालं आहे. एकदा असंच निराशेपोटी तिने औषधं स्वतःच स्मगल करायचा प्रयत्न केला आणि पकडली गेली.
आता तिच्यावर करडी नजर असते. मग तिने उत्तर कोरियन औषधंच विकायचा प्रयत्न केला. पण ही औषधंसुद्धा मिळवणं मुश्कील झालं आहे. म्हणजे तिची कमाई निम्म्यावर आली आहे.
आता तिचा नवरा आणि मुलं झोपेतून उठतील तेव्हा त्यांच्यासाठी तिला मक्याचाच नाश्ता करून द्यावा लागेल. भात खायचे दिवस सरले, असं ती सांगते.
तिचे उपाशी शेजारी थोड्याफार शिध्यासाठी दार ठोठावण्याची शक्यतासुद्धा आहेच. "पण त्यांना मला परत पाठवावं लागेल. आम्ही जगण्याची लढाई लढतोय", ती सांगते.
चॅन हो
सीमेवरच दुसऱ्या एका शहरात राहणारा चॅन हो एक बांधकाम मजूर आहे. डोक्याने जरा तापट किंवा हट्टी आहे. अगदी उद्वेगाने एका सकाळी तो सांगतो, "जगाला हे कळायला हवं की, मला या देशात जन्माला आलो याचा पश्चाताप होतोय."
त्याला आजही पहाटे लवकर उठावं लागलं आहे. कारण आपल्या कामावर जाण्यापूर्वी बाजारात जाण्यासाठी तयारी करणाऱ्या बायकोला त्याला मदत करायची आहे.
बायकोच्या टपरीसाठी लागणारा माल तो व्यवस्थित उचलून जागी पोहोचवतो, कारण त्याला ही जाणीव आहे की आपण आज जिवंत आहोत ते केवळ बायकोच्या या व्यवसायामुळे.
त्याला मिळणाऱ्या 4000 वन (म्हणजे साधारण 4 अमेरिकन डॉलर किंवा 328 रुपये)एवढ्या रोजंदारीत साधा किलोभर तांदूळसुद्धा येणार नाही. सरकारकडून मिळणाऱ्या रेशनच्या धान्याला तर त्याला विसर पडावा एवढे दिवस लोटले आहेत.

उत्तर कोरियातली जनता जिथून अन्नधान्य खरेदी करते त्या बाजारपेठा जवळपास रिकाम्या झाल्या आहेत.
तांदूळ, मका आणि इतर माल-मसाला यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
सीमा बंद करण्याच्या नादात सरकराने अन्नधान्याचा पुरवठाही बंद केला आहे. कारण बाहेरून येणारं धान्य, खतं आणि शेतीची अवजारं येणंही बंद झालं आहे. त्यामुळे शेतकरीही फार काही पिकवू शकत नाहीत.
सुरुवातीला चॅन हो याला भीती वाटत होती की, आपल्याला कोरोना होईल आणि आपण मरून जाऊ. पण जसजसा काळ पुढे जात आहे, तशी त्याची ती भीती तर गेली, पण आपण उपासमारीने मरू की काय असं त्याला वाटू लागलं आहे.
आसपासची माणसं मरताना तो पाहात आहे. त्याच्या गावात त्याने पाहिलेले पहिले भूकबळी ठरलेले कुटुंब म्हणजे एक आई आणि तिची मुलं.
ती आई आजारी पडली आणि तिच्याकडून काम होईना. आईचा रोजगार बंद झाला तेव्हा मुलांनी शक्य होईल तसं कसं तरी, भीक मागून आईला जिवंत ठेवलं. पण शेवटी सगळंच कठीण झालं आणि आईसह त्या दोन मुलांनीही प्राण सोडले.
कोरोना काळात क्वारंटाइन किंवा विलगीकरणाचा नियम मोडला म्हणून एका आईला श्रमदानाची शिक्षा दिली गेली. ती बाई तिच्या मुलासह भुकेने व्याकूळ होत मरण पावली.
अगदी अलिकडच्या काळात चॅनच्या ओळखीतल्या एकाच्या मुलाबाबत भयंकर गोष्ट घडली. त्याला लष्करीसेवेतून मुक्त करण्यात आलं कारण तो कुपोषित होता.
चॅन होला त्याचा सुजलेला चेहरा अजून आठवतो आहे. लष्करी सेवेतून परतल्यानंतर आठवड्याभरात त्याचा मृत्यू झाला. "माझ्या मुलांनाही याच नरकात कायमचं राहावं लाहणार या विचाराने मी हल्ली झोपू शकत नाही", चॅन सांगतो.
जी येऑन
या दोन्ही शहरांपासून शेकडो मैल लांब तुलनेने समृद्ध समजल्या जाणाऱ्या आणि राजधानीचं शहर असलेल्या प्याँगयांग शहरात नदीकाठाने उंच इमारतींच्या रांगा आहेत.
जी येऑन तिथल्याच एका सबवेमध्ये काम करते. जवळपास दररोजच्या प्रमाणेच ती आजही रात्रीची झोप न झाल्याने थकून भागून गेलेली आहे.
तिच्या घरी तिचा नवरा आणि दोन मुलं आहेत. ती कमावते त्या चार पैशांवर या कुटुंबाची कशीबशी गुजराण होते. पूर्वी ज्या दुकानात ती काम करायची तिथून फळं आणि भाज्या गुपचूप उचलायची आणि नंतर त्या बाजारात विकून थोडेफार जास्तीचे पैसे कमवायची.
तसंच तिच्या नवऱ्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याच्याच सहकाऱ्यांकडून लाच म्हणूनच कधी सिगरेट्स मिळायच्या. त्याही ती बाजारात विकायची. त्यातून त्यांना घरच्यासाठी तांदूळ खरेदी करता यायचा.
आता मात्र तिच्या कामाच्या ठिकाणाहून घरी निघताना तिची बॅग काटेकोरपणे तपासली जाते. तिच्या नवऱ्याला मिळणारी लाच पण बंद झाल आहे. आता खरं तर कुणालाच काही देणं परवडत नाही, हे कारण आहे.

"थोडी वरकमाई करून चार पैसे मिळवणं त्यांनी आता अशक्य करून टाकलंय", जी येऑन वैतागून सांगते.
ती दररोज कामावर जाताना आता भूकेची भावनाच मारून टाकण्यासाठी आपण तीन वेळचं व्यवस्थित खाऊन निघालोय असं मनातल्या मनात घोळवते आणि मग बाहेर पडते.
प्रत्यक्षात तिचं एका वेळचंच जेवण झालेलं असतं. मी गरीब आहे हे लोकांना कळण्यापेक्षा ते बरं. भूक ती सहन करू शकते, असं तिचं म्हणणं आहे.
ज्या दिवशी तिला पुलजुक खायला घातलं गेलं त्यानंतर आठवडाभर तिला त्यानेच पछाडलं होतं. पुलजुक म्हणजे भाज्या, पाला आणि गवत यांचं लापशीसारखं केलेलं गिळगिळीत मिश्रण.
उत्तर कोरियाच्या इतिहासातल्या सर्वांत कर्दनकाळाची आठवण या पुलजुकमुळे येते. 1990 च्या दशकात देशात अभूतपूर्व दुष्काळ पडला होता. या अवर्षणकाळात 30 लाखांहून अधिक माणसांचे जीव गेले.
"आम्ही पुढच्या केवळ 10 दिवसांचा विचार करून दिवस ढकलतो. मग पुढचे 10 दिवस... एक वेळ मी आणि माझा नवरा उपाशी राहू पण आमच्या मुलांच्या पोटात तर अन्न जाईल," जी येऑन सांगते.
अलिकडेच तिला संपूर्ण दोन दिवस उपवास घडला. अन्नच मिळालं नाही. "मला वाटलं, मी झोपेतच मरून जाईन. सकाळी मला जागच येणार नाही..." ती सांगते.
जी येऑन स्वतः इतक्या हालअपेष्टांमध्ये जगत आहे ते तिच्यापेक्षा बेकार अवस्था असणाऱ्या इतरांकडे बघून. आता शहरातले भिकारी वाढले आहेत. एखाद्या आडव्या पडलेल्या भिकाऱ्याला ती स्पर्श करून बघते तेव्हा बहुधा तो किंवा ती मेलेले असतात.
एकेदिवशी ती शेजाऱ्यांना पाणी देण्यासाठी म्हणून दरवाजा ठोठावत होती. पण आतून कुणाचाच आवाज येईना. काहीच हालचाल दिसेना. तीन दिवसांनंतर जेव्हा प्रशासनाचे लोक आत गेले तेव्हा समजलं. कुटुंबच्या कुटुंब भूकेमुळे मृतावस्थेत होतं.
"भीषण आहे परिस्थिती..." ती सांगते, "सीमेपलिकडून होणारा अन्नपुरवठाच थांबला आहे. जगायचं कसं हेच लोकांना आता समजत नाहीये."
काही दिवसांपूर्वी तिने बातमी ऐकली की, काही लोकांनी घरातच स्वतःला मारून टाकलं आणि काही जण जिवाचा अंत करण्यासाठी डोंगराकडे अदृश्य झाले. शहरात फोफावलेली ही निर्दयी मानसिकता तिला अस्वस्थ करते.
"तुमच्या शेजारच्या घरात कुणी मरण पावलं तरी तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता. हे निष्ठूर आहे सगळं."
अनेक महिन्यांपासून अफवा उठत आहेत की लोक भुकेने तडफडून मरायला लागले आहेत. उत्तर कोरिया आता पुन्हा एकदा भीषण दुर्भिक्षाच्या उंबरठ्याशी आहे. उत्तर कोरियाचा अभ्यास करणारे अर्थतज्ज्ञ पीटर वॉर्ड याचं वर्णन "चिंताजनक" असं करतात.
"भुकेने लोकांचा जीव जातोय हे लांबून ऐकायला ठीक वाटतं. पण तुम्ही खरोखर तुमच्या आसपासचे लोक भुकेने व्याकूळ झालेले पाहता त्या वेळी तिथली अन्नपरिस्थिती खूप गंभीर आहे असा त्याचा अर्थ असतो. आपल्याला वाटतेय त्याहून अधिक गंभीर आणि कदाचित 1990च्या दशकाच्या शेवटी पडलेल्या भीषण दुष्काळाहूनही वाईट," वॉर्ड नोंदवतात.
उत्तर कोरियाच्या आतापर्यंतच्या छोटाशा इतिहासात 90च्या दशकातला दुष्काळ तिथे घट्ट रुजलेली सामाजिक उतरंड तोडून टाकण्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला होता.
सरकार लोकांना अन्न पुरवायला पुरं पडत नव्हतं. तेव्हा त्यांना जगण्यासाठी आवश्यक ते सगळं करण्याची मुभा त्यांनी जनतेलादिली. त्या वेळी अनेकांनी देश सोडला आणि दक्षिण कोरिया, युरोप किंवा अमेरिकेत आश्रय मिळवला.

फोटो स्रोत, NK News
दरम्यान, खासगी बाजारपेठा मात्र फुलल्या कारण सोयाबीन, वापरलेले कपडे, चायनीज इलेक्ट्रॉनिक्स काय वाटेल ते विकायला स्त्रिया सरसावल्या. त्यातून एका अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा जन्म झालाय.
किमान सरकारी मदतीवर जगायला शिकलेली उत्तर कोरियन जनतेची एक अख्खी पिढी निर्माण झाली. दडपशाही कम्युनिस्ट राजवटीत भांडवलवाद फळफळू लागला.
दिवसभराचा बाजार संपल्यावर म्याँग सुक तिची दिवसभराची अपेक्षेपेक्षा कमी झालेली कमाई मोजते. सरकार तिच्या आणि भांडवलवादी पिढीच्या मागावर आहे की काय ही चिंता तिला सतावत राहते.
तिच्या मते, कोरोनाची साथ हे केवळ प्रशासनाला आपली सैल झालेली पकड घट्ट करायचं निमित्त होतं. लोकांच्या आयुष्यावर असलेलं सरकारचं नियंत्रण कमी झालेलंच होतं. "तस्करी थांववण्यासाठी आणि लोक निसटून जाऊ नयेत यासाठी त्यांचा अट्टाहास आहे. आता कुणी चीनजवळच्या नदीपाशी जरी कुणी गेलं तरी कडक शिक्षा केली जाते."
बांधकाम मजूर म्हणून काम करणारा चॅन होसुद्धा आता अगदी मेटाकुटीला आला आहे. आतापर्यंतच्या आयुष्यातला हा सगळ्यांत कठीण काळ असल्याचं तो सांगतो. अवर्षणकाळ कठीण होता.
"पण आता आहेत तशा अघोरी शिक्षा आणि धरपकड तर नव्हती तेव्हा... ज्यांना इथून निसटायचं होतं ते निघून जाऊ शकले. सरकार फार काही करू शकलं नाही त्या वेळी. पण आता एक चुकीचं पाऊल आणि थेट तुम्हाला मृत्युदंड ठरलेला."
शासनाने दिलेली मृत्युदंडाची शिक्षा डोळ्यापुढे पाहणारे चॅनचे काही मित्र आहेत. प्रत्येक घटनेत किमान तीन-चार लोकांचा प्राण गेला होता. त्यांचा गुन्हा एकच. देशाबाहेर पळून जायचा... सुटकेचा प्रयत्न.
"नियमाला धरून प्रामाणिकपणाने जगलो तर कदाचित भुकेने मरून जाईन. पण फक्त जिवंत राहण्यासाठी जे करतोय त्यातून अटक होण्याची भीती आहे. मला देशद्रोही ठरवलं जाईल आणि ठार मारलं जाईल." चॅन हो म्हणतो, "आम्ही इथे अडकून पडलोय. मरणाची वाट पाहात..."
सीमा बंद होण्याअगोदर दरवर्षी किमान 1000 माणसं दक्षिण कोरियात सुरक्षित आश्रयासाठी पळून जायची. पण आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
ह्युमन राइट्स वॉच या स्वयंसेवी संस्थेने उपग्रह छायाचित्रांच्या अभ्यासातून असं मांडलं आहे की, उत्तर कोरियाच्या प्रशासनाने गेल्या तीन वर्षांत सीमेवर अनेक ठिकाणी भिंती बांधल्यात, कुंपण घातलं आहे आणि सीमा बंद करण्यासाठी पहारा ठेवला आहे. त्यामुळे या देशातून सुटका होणं जवळपास अशक्य झालं आहे.

फोटो स्रोत, NK News
देशाबाहेरच्या कुठल्या व्यक्तीशी संपर्क साधणं हेसुद्धा आता खूप धोक्याचं झालं आहे. यापूर्वी सीमेजवळच्या शहरांमध्ये राहणारे नागरिक चीनमधून तस्करीतून आणलेल्या मोबाईलवरून चिनी नेटवर्क वापरूनच गोपनीय रीतीने परदेशी कॉल करू शकायचे.
आता प्रत्येक कम्युनिटी मीटिंगमध्ये कुणाकडेही चिनी फोन असेल तर त्यांना आधी तसं पुढे येऊन जाहीर करायला सांगतात, असं चॅन हो सांगतो.
म्योंग सुकच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या बाबतीत नुकताच एक प्रसंग घडला. तो चीनमधल्या कुणाशी तरी फोनवर बोलताना पकडला गेला आणि रिएज्युकेशन प्रिझनच्या नावाने त्याला अनेक वर्षांचा तुरुंगवास झाला.
स्मगलिंग किंवा तस्करी आणि नागरिकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क यावरच कडक कारवाई होत असल्याने प्रशासन इथल्या नागरिकांची स्वतःला वाचवण्याची क्षमताच हिरावून घेत आहे, असं हाना साँग सांगतात.
त्या नॉर्थ कोरियन डेटाबेस फॉर ह्युमन राइट्ससाठी(NKDB)काम करतात. "एक तर देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे आणि असा प्रतिबंध करून नागरिकांसाठी काय वाढून ठेवलंय याची पूर्ण कल्पना त्यांना आहे."
एवढा सगळा कडक बंदोबस्त असूनही ते कोरोनाव्हायरसला रोखू शकले नाहीत. 12 मे 2022 रोजी या महासाथीच्या फैलावाला अडीच वर्षं होऊन गेल्यानंतर उत्तर कोरियाने प्रथमच कोरोनाची पहिलीवहिली केस अधिकृतपणे जाहीर केली.
लोकांना चाचणी करायची सोयच नव्हती. कुणालाही ताप आला की त्या व्यक्तीला आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांना किमान 10 दिवसांसाठी घरातच कोंडून घ्यावं लागायचं.
घरातल्या कुणीही घराबाहेर पाऊलही टाकायला मनाई होती. जसजशी साथ फैलावली तसतशी या देशातली गावंच्या गावं, शहरंच्या शहरं कुलुपबंद झाली. कधीकधी तर दोन-दोन आठवडे त्यांना टाळं लावून घरी थांबावं लागलं.

प्याँगयांगमध्ये राहणाऱ्या जी येऑन सांगते, लॉकडाउनमध्ये जेव्हा तिच्या शेजारच्या घरातलं अन्नधान्य संपलं तेव्हा भाज्या वगैरे साहित्य दाराच्या बाहेर ठेवून दिलेलं तिने पाहिलं. पण राजधानीबाहेर जसे तुम्ही सीमेजवळच्या शहरांमध्ये जाल तसं अशी कुठलीही मदत बंद घरांतल्या जनतेला मिळाली नाही.
म्याँग सुक लॉकडाउनच्या काळात भयंकर घाबरली होती. कारण तिचा रोजचाच दिवस ढकलायला कठीण अशी अवस्था असताना घरात किराणा वगैरे सामान भरून ठेवण्याची परिस्थितीच नव्हती.
मग गुपचूप औषधं विकायचं तिने सरू केलं. पैसे कमावण्यासाठी बाहेर पडून व्हायरसची लागण व्हायचा धोका परवडला पण भुकेने तडफडून मरणं नको, असं तिला वाटलं.
चॅन हो सांगतो की, लॉकडाउन संपेपर्यंत अर्धमेल्या अवस्थेत पोहोचलेली पाच कुटुंब त्याने पाहिली. तेही अन्नपदार्थांच्या शोधात रात्रीच्या सामसुमीत गुपचूप बाहेर पडत होते म्हणून हे लोक वाचले.
नाकासमोर चालणारी मंडळी लॉकडाउनच्या काळात बंद घरातच बसून राहिली ती जगूच शकली नाहीत, चॅन सांगतो.
"आम्ही भुकेने मरून जाऊ असं म्हणत लोकांनी आक्रोश सुरू केला तेव्हा प्रशासनातर्फे आणीबाणीसाठी ठेवलेला कोठारातला थोडा तांदूळ बाहेर आला", चॅन म्हणतो.
काही ठिकाणी लॉकडाउन ठरलेल्या वेळेपूर्वीच मागे घ्यावे लागले कारण तिथले लोक नाहीतर वाचू शकले नसते, असं सांगतात.
त्यातून ज्या कोणाला कोरोना व्हायरसची लागण झाली त्यांना देशातल्या जीर्णावस्थेत पोहोचलेल्या सरकारी रुग्णालयातून काही चांगले उपचार मिळतील अशी आशा ठेवणं शक्यच नव्हतं. अगदी नेहमीची औषधंही त्या वेळी संपली होती.
त्याऐवजी लोकांनी लक्षणं दिसताच घरगुती पारंपरिक उपाय करावेत अशी सूचना सरकारने अधिकृतरीत्या केली होती.
जी येऑन स्वतःच जेव्हा आजारी पडली तेव्हा तिने मित्रमंडळींना धडाधड फोन करून त्यांच्याकडून अनुभव आणि सल्ले विचारले. पातीच्या कांद्याची मुळं पाण्यात उकळून ते उकळतं पाणी पिण्याचा सल्ला तिला अनेकांनी दिला.
जी येऑनच्या मते, कोव्हिड19 मुळे अनेक वृद्ध आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्या देशात UN च्या आकडेवारीनुसार, 40 टक्के जनता कुपोषित आहे, तिथली लहान मुलं इतर देशांच्या तुलनेत या विषाणूला बळी पडण्याची शक्यता जास्तच आहे.
शहरातल्या एका डॉक्टरने जी येऑनला सांगितलेल्या आकड्यांनुसार, प्याँगयांगच्या प्रत्येक वस्तीतल्या 550 पैकी किमान एक माणूस साथीत दगावला आहे. ही आकडेवारी देशातल्या इतर शहरात तर आणखी होती.
म्हणजे महासाथीने किमान 45000 लोकांचे बळी घेतले. पण उत्तर कोरियाची कोरोना बळींची अधिकृत संख्या फक्त 74 आहे. कारण बहुतेकांना त्यांच्या मृत्यूचं कारण इतर काही दिलं गेलं. कुणाला टीबी तर कुणाला लिव्हर सिरॉसिसने मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र दिलं गेल्याचं ती सांगते.
ऑगस्ट 2022 मध्ये साथीचा रोग पसरल्यानंतर तीन महिन्यांनी आपण कोरोनावर विजय मिळवल्याचं सरकारने जाहीर केलं. कोरोना देशातून हद्दपार झाल्याचा दावाही सरकारने केला. पण तरी क्वारंटाइन नियम आणि इतर निर्बंध मात्र आजही कायम ठेवले आहेत.
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी अचानक सीमा बंद केल्याने आंतरराष्ट्रीय समुदायसुद्धा चकित झाला होता.
अण्वस्त्रांच्या साठ्यामुळे उत्तर कोरिया हा जगातला सर्वाधिक निर्बंध घातलेला देश आहे. या देशातला माल बाहेरच्या देशांमध्ये निर्यातीला बंदी आहे. शिवाय ते इतरांकडून आवश्यक तेवढं इंधनही आयात करू शकत नाहीत.
आता एवढे निर्बंध असतानाही कुठला देश स्वखुशीने आणखी अलिप्त राहून स्वतःचं आर्थिक नुकसान का करून घेईल? असा प्रश्न अनेकांना पडला.
पीटर वॉर्ड सांगतात, "मला वाटतं, कोविडमुळे अनेक चुकीच्या व्यक्तीही मरू शकतील. त्यांच्या मरणाची भीती शासकांना वाटत असावी."
पीटर वॉर्ड यांचा इशारा किम यांना सत्तेत ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या उमराव व्यक्ती आणि लष्करी अधिकाऱ्यांकडे आहे. जगातल्या सर्वाधिक कुपोषित देशात जिथे आरोग्यसुविधेची पुरती आबाळ झालेली आहे, लोकांचं लसीकरण झालेलं नाही तिथे महासाथीत अनेक जणांचा बळी जाणं सहाजिक आहे.
पण NKDB च्या हाना साँग वेगळा मुद्दा मांडतात. कोविडच्या साथीत किम जोंग उन यांना लोकांच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची नामी संधी मिळाली.
"बऱ्याच काळापासून किमची ही सुप्त इच्छा होतीच. आपल्या जनतेला शक्य तेवढं जगापासून तोडून विलग करावं म्हणजे नियंत्रण मिळवणं शक्य होईल, हे त्यांना माहीत होतं," त्या सांगतात.
स्वतःचं थोडंफार जेवण तयार करून लवकर जेवून भांडी घासून पुसून घर एकदा ओल्या फडक्याने पुसून काढलं की कधी एकदा आडवं होऊ असं जी येऑनला वाटतं.
लवकर झोपलं म्हणजे पुरेशी विश्रांती मिळेल या विचाराने ती लवकर अंथरुणावर पडते.
चॅन होपेक्षा तिला काचित अधिक झोप मिळू शकते. चॅन होकडे सध्या इतकं काम आहे की, त्याला विश्रांतीच मिळत नाही. बऱ्याचदा तो बांधकामाच्या साइटवरच झोपतो.
तिकडे सीमेजवळच्या गावात राहणारी म्याँग सुकमात्र तुलनेने शांतपणे जगते. दिवसभराच्या कामानंतर कुटुंबाबरोबर थोडा वेळ निवांत बसायला तिला वेळ असतो. ते सगळे मग दिवसभर चार्ज केलेल्या बॅटरीच्या जोरावर टीव्ही लावून बघतात.
साउथ कोरियन ड्रामा म्याँगला जास्त आवडतात. खरंतर त्यावरही बंदी आहे. पण सीमेपलीकडून मायक्रो एसडीकार्डवर कॉपी करून हे शो गुपचूप उत्तर कोरियात विकले जातात.
एक K-Pop स्टार अचानक त्यांच्या पूर्वजांच्या घरात परत येतो आणि तो त्यांचा खूप पूर्वी हरवलेला मुलगा असतो याविषयीचा शो नुकताच रीलिज झाला, तो म्याँग सुकने पाहिला.
सीमा बंद झाल्यानंतर कुठली नवी मालिका किंवा शो देशात दिसणं बंद झालं आहे, ती सांगते. त्यातून आता निर्बंध आणि नियमांची अंमलबजावणी एवढी कडक केली आहे की लोकसुद्धा अधिक काळजी घेत आहेत.
Reactionary Ideology and Culture Rejection Act म्हणजे प्रतिक्रियावादी विचारधारा आणि संस्कृती नाकारण्याचा कायदा उत्तर कोरियात डिसेंबर 2020 मध्ये संमत झाला.
या कायद्याअंतर्गत जो माणूस परदेशातून व्हिडीओ आणून त्याचं वितरण करेल त्याला कडक शिक्षा केली जाईल.
चॅन हो या कायद्याला सर्वांत भीतीदायक नवीन कायदा असं म्हणतो. नुसता परकीय व्हिडिओ पाहिला तरी 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
Daily NK या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या या कायद्याविषयीच्या माहितीच्या मजकुरानुसार या कायद्याचा उद्देश आपल्या समाजाला बिघडवणाऱ्या 'कुजलेल्या विचारसरणी'चा प्रसार रोखणे हा आहे.
किम जोंग उनला सगळ्यांत जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती ही -
बाहेरच्या मुक्त जगाची, तिथल्या भरभराटीची कल्पना आपल्या जनतेला झाली तर सीमेपलीकडे कशी परिस्थिती आहे याच्या जाणीवेने त्यांना जाग येईल आणि मग आपलं खोटं चित्र त्यांच्या पचनी पडणार नाही.
चॅन हो म्हणतो की, हा कायदा आल्यापासून परदेशी व्हीडिओ अदृश्यच झाले आहेत. फक्त तरुण मंडळींकडे ते पाहायची हिंमत असते, त्यामुळे त्यांचे पालक मात्र भयंकर चिंतेत असतात.
जी येऑनला प्याँगयोंगमध्ये झालेल्या एका जाहीर सुनावणीची आठवण येते. एका 22 वर्षीय तरुणाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी स्थानिक नेते जमले होते.
साउथ कोरियन सिनेमा आणि गाणी शेअर केली म्हणून त्या तरुणावर खटला भरला होता आणि जाहीर सुनावणीअंती त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
त्यामधले तीन महिने लेबर कँपमध्ये सक्तमजुरीची शिक्षाही होती. जी येऑन सांगते की, 2020 पूर्वी अशा प्रकारचा खटला जाहीरपणे चालवला गेला नसता. तो शांतपणे उरकून जास्तीत जास्त वर्षभराचा तुरुंगवास झाला असता.
"किती कडक शिक्षा दिली जाऊ शकते हे पाहून लोक चकित झाले. तरुणांना लक्ष्य करणं हे किती भीतीदायक आहे!"
ऱ्यू ह्यून वू हे नॉर्थ कोरियाचे मुत्सद्दी 2019 मध्ये सरकारपासून वेगळे झाले.
ते सांगतात, "तरुणांची निष्ठा अबाधित राहावी, या उद्देशाने हा कायदा केला गेला. कारण ही पिढी त्यांच्या पालकांपेक्षा खूप वेगळ्या विचारांत वाढली आहे. आम्ही सरकारकडून मिळणाऱ्या भेटी घेत मोठे झालो. पण आता किम जोंग उम यांच्या एकछत्री अंमलात लोकांना काहीच मिळालेलं नाही."
त्यामुळे आता तरुण पिढी प्रश्न विचारू लागली आहे की, देशाने आमच्यासाठी काय केलं?
या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने काही गट तयार केले आहेत. ते रस्तोरस्ती फिरून काहीही 'असामाजिक' गोष्ट सुरू आहे, अशी शंका जरी आली तरी अत्यंत निर्दयपणे धरपकड करतात, असं जी येऑन सांगते. "लोकांचा आता एकमेकांवर विश्वासच राहिलेला नाही. हे खूप भयावह आहे."
जी येऑनला स्वतःला एकदा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. तिच्या त्या चौकशीनंतर तिच्या मनात नेमकं काय चाललंय याची ती अजिबात बाहेर वाच्यता करत नाही. तिला आता आसपासच्या लोकांचीच जास्त भीती वाटते.
उत्तर कोरियाचा गेली 40 वर्षं अभ्यास करणाऱ्या प्रोफेसर आंद्रे लॅनकोव्ह यांना या अविश्वासाच्या वातावरणाबद्दल चिंता वाटते.
"लोकांचा जर आता एकमेकांवरच विश्वास राहिलेला नाही तर प्रतिकारासाठी एकत्र यायची संधीच नाही. एकत्र यायला सुरुवातच होऊ शकत नाही. याचा अर्थ उत्तर कोरियात आता आहे तीच परिस्थिती स्थिरावणार. पुढची कदाचित कित्येक वर्षं ही परिस्थिती पालटणार नाही", ते मांडतात. --
जानेवारी 2023 मध्ये सरकारने आणखी एक कायदा संमत केला. दक्षिण कोरियन बोलीशी संबंधित शब्द वापरण्यावर बंदी घातली. काही टोकाच्या प्रकरणांत या कायद्याविरोधी वागणाऱ्याला कडक शिक्षा होऊ शकते.
जी येऑन सांगते की, आता इतके कायदे झालेत की लक्षात राहणं कठीण झालं आहे. लोकांना उचललं तर नेमकं कोणत्या कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे शिक्षा आहे हेच कळत नाही. त्यांनी सुनावणीच्या वेळी विचारलं तर "तुम्ही कुठला कायदा मोडलाय हे जाणून घ्यायची गरज नाही", असं त्यांना ऐकवलं जातं.
"या तीन उत्तर कोरियन लोकांनी जे जे सांगितलंय त्यावरून हा देश यापूर्वी कधीच नव्हता असा दडपशाहीच्या आणि निरंकुश सत्तेच्या गर्तेत बुडाला आहे, या भयंकर कल्पनेलाच पुष्टी मिळते," लिबर्टी इन नॉर्थ कोरिया या संस्थेसाठी काम करणारे सोकील पार्क नोंदवतात.
त्यांची संस्था उत्तर कोरियातून पळून आलेल्या आश्रितांना मदत करते. "एक भयाण उलथापालथ आपल्यासमोर उलगडते आहे", ते म्हणतात.
सीमा पुन्हा मुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चिन्हं अलिकडच्या काळात दिसू लागली आहेत. म्याँग सुक आणि चॅन हो या दोघांची गावं सीमेजवळ आहेत.
ते सांगतात की, त्यांच्या गावात आता बहुतेकांनी कोविडची लस घेतली आहे. ती चायनीज लस असल्याचं आम्हाला वाटतं. प्याँगयांगमध्ये राहणारी जी येऑन सांगते की राजधानीच्या शहरात आता लोकांना लशीचे दोन डोस मिळालेले आहेत.
कस्टमची आकडेवारी सांगते की, आता या देशाने अन्नधान्य आणि पिठं यासाठी चीनची सीमा मोकळी केली आहे. अन्नधान्याची टंचाई आणि भयावह दुर्भीक्ष्य याच्या भीतीने सरकारने हा प्रयत्न केल्याचं बोललं जातं.
पण उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मुक्ततेची वाट चोखाळायचं ठरवलं तरी यापूर्वीच्या लोकांच्या मनातल्या मुक्ततेच्या भावनेपेक्षा ती वेगळी असेल हे निश्चित, असं चॅड ओकॅरोल सांगतात. NK Pro नावाचा उत्तर कोरियाचं निरीक्षण करणारा मंच ते चालवतात.
"साथीच्या काळात सुरू झालेली नियंत्रणाची आणि दडपशाहीची पद्धत कायम राहील. आपल्याला त्या देशात काय चालू आहे हे समजणं आणि त्या देशाच्या लोकांना त्यांना सांगितलं जातंय त्यापेक्षा बाहेर काय सुरू आहे याचा सुगावा लागणं दोन्ही कठीणच असेल", ओकॅरोल सांगतात.
सध्याच्या राजवटीने गेल्या तीन वर्षांत जनतेला एवढं छळलं आहे की, ते सहीसलामत विसरून त्यातून बाहेर पडतील अशी शक्यता नाही.
चॅन हो सांगतो की, लोकांना इथे आपल्या एका वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते काय व्यवस्था बदलण्याचा विचार करणार! समोर भरलेलं ताट दिसलं तर दिवस आपला म्हणून खूश व्हायचं. पण वीकएंडला मात्र चॅन हो आणि म्याँग सुक, जी येऑन यांनासुद्धा थोडी मोकळीक मिळते विचार करायला.
सगळ्या नागरिकांसाठी अनिवार्य असणारा कार्यक्रम म्हणजे लाइफ रिव्ह्यू सेशन. दर आठवड्याला होणाऱ्या या कार्यक्रमाला त्यांना उपस्थित राहावंच लागतं.
इथे ते त्यांच्या चुका आणि अपयशाची कबुली देतात आणि शेजाऱ्यांच्या तक्रारीही मोकळेपणाने सांगतात. चांगली वर्तणुक आणि असंतोषाचं मूळ उखडून टाकण्याच्या उद्देशाने ही सत्र आयोजित केली जातात.
चॅन हो सांगतो की, या सत्रांमध्ये कधी कुणी कबुल करणार नाही पण टीव्हीवरून सुरू असणाऱ्या प्रचारावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही.

"आम्हाला देश असं सांगतो की, तुम्ही इथे तुमच्या आईच्या कुशीत घरट्यात सुरक्षित आहात. पण भुकेने कळवळल्यामुळे कुणी चीनकडे पळून जात असेल तर कुठली आई अशा मुलाला भरदिवसा शिक्षा करेल?" चॅन विचारतो.
"कोव्हिडच्या पूर्वी जनता किम जोंग उनकडे सकारात्मक दृष्टीने बघत होती हे खरंय. पण आता बहुतेक सगळ्यांच्या मनात असंतोष खदखदतो आहे", म्याँग सुक सांगते.
2018 मध्ये किम जोंग उन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना भेटले होते, ते जी येऑनला आठवतं. उत्तर कोरियातली अण्वस्त्र नष्ट करण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली तेव्हा तिला आशा वाटली होती.
आपल्याला लवकरच परदेशात फिरायला मोकळीक मिळणार या विचाराने तिला हसू आलं होतं. ती चर्चा फिसकटली आणि तेव्हापासून किम यांनी त्यांच्याकडचा उरलासुरला निधी आहे ती अण्वस्त्र आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू केला.
आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुरू असलेले मुत्सद्देगिरीचे सगळे प्रस्ताव त्यांनी फेटाळले. 2022 मध्ये तर त्यांनी विक्रमी संख्येने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या.
"आमची फसवणूक झाली", जी येऑन म्हणते. "सीमा बंद झाल्याने आमची आयुष्य 20 वर्षं मागच्या काळात गेली. आमचा मोठा विश्वासघात झालाय."
"हा अनंत काळ चालणारा शस्त्रास्त्रं विकास लोकांना कधीच नको होता. याच्यामुळेच तर पिढ्यान पिढ्यांना यातना भोगाव्या लागल्या", ती उद्वेगाने सांगते.
चॅन हो आंतरराष्ट्रीय समुदायाला दोषी ठरवतो. "US आणि UN दोन्ही मूर्खासारखे वागतायत", तो म्हणतो.
"किम जोंग उन कधीच अण्वस्त्र सोडणार नाही हे माहीत असूनही ते किमसमोर अजूनही चर्चेचा प्रस्ताव कसा काय ठेवू शकतात?" तो वैतागून प्रश्न करतो.
त्यापेक्षा अमेरिकेने आपल्या देशावर सरळ हल्ला करावा, असं त्याला वाटतं.

"युद्ध झालं आणि संपूर्ण नेतृत्वबदल झाला तरच आम्ही जिवंत राहू शकू", तो म्हणतो, "या नाहीतर त्या मार्गाने आता हे संपवलंच पाहिजे."
म्याँग सुकलाही हेच मान्य आहे. "युद्ध झालं तर जनता आपल्या सरकारकडे सरळ पाठ फिरवतील. हेच सत्य आहे", ती ठामपणे सांगते.
जी येऑनला मात्र यापेक्षा साधंसरळ काही अपेक्षित आहे. तिला अशा समाजात राहायचं आहे जिथे लोक भुकेने कासावीस होत नाहीत, जिथले शेजारी जिवंत राहतात आणि त्यांना एकमेकांवर हेरगिरी करण्याची वेळ येत नाही.... आणि तिला दिवसाच्या तीनही भरपेट जेवणात भात हवा आहे.
आम्ही तिच्याशी शेवटचा संवाद साधला त्या दिवशी तिच्या मुलाला भरवायला तिच्याकडे पुरेसं अन्न नव्हतं.
आम्ही आमची निरीक्षणं उत्तर कोरियाच्या सरकारपुढे(DPRK)ठेवली. त्यांच्या लंडनमधल्या उच्चायुक्तालयातले प्रतिनिधी त्यावर म्हणाले, "तुम्ही मिळवलेली माहिती हे संपूर्ण सत्य नाही. त्यात तथ्य नाही. कारण ती DPRK विरोधी शक्तींच्या अनुभवातूनच संकलित केलेली आहे. DPRK ने अगदी संकटकाळातसुद्धा जनतेच्याच भल्याचा विचार करून निर्णय घेतले आहेत. या सरकारची जनतेच्या कल्याणाप्रती असलेली बांधिलकी निर्विवाद आहे. "
"खटले, चाचण्या आणि आव्हानं यामध्येही लोककल्याण आणि जनतेचं हित हे आमचं प्राधान्य राहिलं आहे."
या मुलाखती संकलित करायला मदत केल्याबद्दल बीबीसी Daily NK ची टीम आणि ली सँग-याँग यांची ऋणी आहे. NK News चे चुंग सेउंग-येऑन आणि तिथली टीम यांनी आमचे निष्कर्ष पडताळून पाहण्यास मदत केली आणि त्यासाठी आम्हाला उत्तर कोरियात काढलेले काही फोटोही पाठवले. त्याबद्दल त्यांचेही आभार.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








