मिथुन चक्रवर्तींना जेव्हा अमिताभच्या सिनेमात 49 सेकंदांचा रोल करावा लागलेला

    • Author, वंदना
    • Role, एशिया डिजिटल हब एडिटर

80 च्या दशकात जगभरात 100 कोटी कमावणारा अभिनेता कोण? असा प्रश्न विचारला की, उत्तर मिळतं ‘गरिबांचा अमिताभ बच्चन’ म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मिथुन चक्रवर्ती.

आता हे वाचून धक्का बसला असेल पण 100 कोटी क्लबमधला पहिला सिनेमा हा मिथुनदा यांचाच होता. आणि विशेष म्हणजे आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता अशी त्यांची ओळख होती.

एवढं सगळं असूनही त्यांचा कामाचा शोध काही थांबला नव्हता. आता तुमचा विश्वास बसणार नाही. पण राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांना अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात अवघ्या 49 सेकंदांची भूमिका करावी लागली होती.

पुढे जाऊन मिथुनदा इतके यशस्वी झाले की 'अग्निपथ'मध्ये त्यांना बच्चन साहेबांच्या तोडीस तोड भूमिका मिळाली. तिथूनच निर्मात्यांसाठी ते ‘गरिबांचे अमिताभ बच्चन’ बनले. या नावानेच त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

त्यांचं आयुष्य म्हणजे विरोधाभासाची कथा असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

कट्टर डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता, रस्त्यावरचा संघर्ष करणारा अभिनेता, आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती कमावलेला अभिनेता, यशस्वी उद्योगपती, बी-ग्रेड चित्रपटांमध्ये दबदबा, राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान आणि 'में कोब्रा हूँ' असं म्हणणारा वादग्रस्त राजकारणी... मिथुन चक्रवर्ती नामक रसायन एका साच्यात बसवणं निव्वळ कठीण काम.

नक्षलवादी चळवळ ते चित्रपटांपर्यंतचा प्रवास

16 जून 1950 रोजी जन्मलेले मिथुनदा तरुणपणी कोलकात्यामधील अति-डाव्या विचारसरणीशी, नक्षलवादी विचारधारांशी संबंधित होते. पण हे सगळं सोडून वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली.

11 सप्टेंबर 1969 रोजी मुंबईत पाऊल ठेवलं आणि भूतकाळ मागे सोडण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने एफटीटीआय मध्ये प्रवेश घेतला. त्याच वर्षी दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेनही आले होते.

मृणाल सेन यांची नजर एका उंच सडपातळ अंगकाठीच्या सावळ्या मुलावर पडली.

वाइल्ड फिल्म्स इंडियाच्या संग्रहित मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, "तिथे हृषिकेश मुखर्जीही आले होते. पण आम्ही आजूबाजूला आहोत याचा विचार न करता हा मुलगा बिनधास्तपणे आपल्या मैत्रिणींसोबत टिंगलटवाळी करत बसला होता. ही गोष्ट माझ्या डोक्यात राहिली. एक चांगला कलाकार व्हायचं असेल तर तुम्ही संकोच बाळगून चालत नाही."

"मी हृषीकेश मुखर्जीला विचारलं की हा मुलगा कोण आहे? त्यावर त्यांनी सांगितलं हा बंगाली मुलगा चांगला अभिनेता आहे. दोन वर्षांनंतर मी ‘मृगया’ हा बंगाली चित्रपट बनवत होतो. यात एका तरुण आदिवासी पात्र होतं.

मी चांगल्या अभिनेत्याच्या शोधात असताना मला त्या मुलाचा चेहरा आठवला. मी माझ्या कॅमेरापर्सनला सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी एफटीटीआयमध्ये एक उंच सडपातळ अंगकाठीचा सावळा मुलगा होता. त्याचा शोध घे आणि मला लगेच फोटो पाठव."

हेलन यांच्या ग्रुपमधला डान्सर

त्या काळात मिथुनचा मुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता. चित्रपटात काम मिळत नसल्याने हेलन यांच्या डान्स ग्रुपमध्ये सामील होऊन ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये डान्स करायचे.

त्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून ‘राणा रेज’ ठेवलं.

त्याच दरम्यान मृणाल सेनच्या कॅमेरामनने राणा रेज म्हणजेच मिथुनला शोधलं आणि त्यांचे फोटो मृणाल सेन यांना पाठवून दिले.

काही दिवसांनी मृणाल सेन यांची वेळ न मागताच मिथुनदा त्यांच्याकडे गेले.

मृणाल सेन यांची नजर तशी पारखी होती. त्यांनी मिथुनला एका गरीब आदिवासी तरुणाची भूमिका देऊ केली. अशा प्रकारे मिथुनचा सिनेपटसृष्टीत प्रवेश झाला आणि 'मृगया' या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

अमिताभच्या चित्रपटात 49 सेकंदाची भूमिका

या चित्रपटासाठी मिथुनदाचं खूप कौतुक झालं. पण 'मृगया' नंतर त्यांना एकही चित्रपट मिळत नव्हता. 2010 मध्ये बीबीसीच्या पी एम तिवारी यांना दिलेल्या मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितलं होतं की, "तो काळ संघर्षाचा होता. कामाचं कौतुक तर सगळेजण करायचे, आश्वासनही द्यायचे, पण काम कोणी द्यायचं नाही."

1976 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या 'दो अंजाने' चित्रपटात एक दृश्य होतं. या दृश्यात अमिताभ बच्चन दारू पिऊन घरी परतत असताना रस्त्यावर त्यांची एका सडकछाप मवाल्यासोबत बाचाबाची होते. केवळ 49 सेकंदांचं हे दृश्य आहे. अगदी बारकाईनं ते दृश्य पाहिलं तरच तुमच्या लक्षात येईल की, तो मवाली दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्षात मिथुन चक्रवर्ती आहेत.

1977 ते 78 या काळात मिथुनदा छोट्या मोठ्या भूमिका करतच होते. 1978 मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या 'अमरदीप' मध्येही त्यांनी छोटी भूमिका केली होती.

डिस्को डान्सरचं यश

सुमारे 12 वर्षांपूर्वी ईटीसीला दिलेल्या मुलाखतीत मिथुनदांनी सांगितलं होतं, "एक वेळ अशी आली होती की, मला आत्महत्या करावी लागेल की काय असं वाटू लागलं होतं. माझा रंग सावळा होता, त्याचा मला कॉम्पलेक्स होता. असं काहीतरी करावं ज्याने लोकांचं लक्ष माझ्या रंगावर जाणार नाही असं माझ्या डोक्यात आलं."

"दरम्यान 1979 साली 'सुरक्षा' हा चित्रपट हिट झाला. लोकांना माझा डान्स आणि अॅक्शन आवडली. पण सावळ्या रंगाचा कॉम्पलेक्स जायला थोडा वेळ लागला. लोक सुरुवातीला म्हणायचे की हा काय हिरो बनणार? नंतर तेच लोक मला 'सेक्सी डस्की बंगाली हीरो' म्हणू लागले."

दरम्यान, मिथुनदाने स्वतःची शैली विकसित केली होती ज्यात डान्स आणि मार्शल आर्ट अॅक्शनचा समावेश होता.

रंजितासोबत आलेला 'सुरक्षा' हा चित्रपट हिट ठरला होता. यात मिथुनदाने गनमास्टर जी-8 ची भूमिका साकारली होती. आजही हे पात्र प्रसिद्ध आहे. त्यानंतर 1982 मध्ये 'डिस्को डान्सर' आला. यातल्या जिमीच्या भूमिकेने मिथुनदाला इंटरनॅशनल स्टार बनवलं. सोव्हिएत युनियन, चीनसह अनेक देशांमध्ये जिमीचे फॅन होते.

आजही अनेक देशांच्या क्लबमध्ये 'डिस्को डान्सर'ची गाणी वाजवली जातात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला जिमी नावाचं एखादं बार मिळेल किंवा एखादं रेस्टॉरंट तर दिसेलच दिसेल. मागच्या वर्षी तर चीनमध्ये आंदोलनात जिमी जिमी हे गाणं गायलं जात होतं.

'प्यार झुकता नहीं' सारख्या चित्रपटांमुळे अॅक्शनस्टार मिथुनला भावनिक भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

पुढे तर अशी वेळ आली की, मिथुनदाचे कमी बजेटवाले चित्रपट अमिताभ बच्चनच्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांइतकीच भरघोस कमाई करू लागले. त्यामुळे मिथुनदा गरीब निर्मात्यांचा अमिताभ बच्चन ठरले.

अमिताभ बच्चन यांच्याशी खास नातं

लेखक राम कमल मुखर्जी त्यांच्या मिथुन चक्रवर्ती 'द दादा ऑफ बॉलिवूड - कोई शक' या पुस्तकात लिहितात, "80 चा काळ तसा स्वस्तातला काळ होता. म्हणजे त्या काळात लोकांनी लालित्य आणि सुसंस्कृतपणाची काळजी करणं सोडून दिलं होतं. याच काळात मिथुनदा स्टार बनले. लोकांना ओव्हर द टॉप, नाट्यमय आणि भावनिक कंटेंट हवा होता आणि मिथुनदा तर याचे त्याचे चॅम्पियन होते."

आता काळ सरला होता. एके काळी मिथुनदाने राजेश खन्नाच्या ‘अमरदीप’ चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. आता याच मिथुनच्या 'डिस्को डान्सर' चित्रपटात राजेश खन्ना यांनी विशेष भूमिका केली होती.

कधीकाळी अमिताभ यांच्या 'दो अंजाने' चित्रपटात 49 सेकंद काम करणाऱ्या मिथुनने 'अग्निपथ'मध्ये अमिताभ यांच्या तोडीस तोड भूमिका केली होती. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

मिथुनदाने एका बाजूला 'डिस्को डान्सर' केला, पण दुसऱ्या बाजूला 1992 मध्ये 'ताहेदर कथा' सारखा बंगाली चित्रपटही केला. त्यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

1995 मध्ये 'जल्लाद' या व्यावसायिक चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला, तर 1999 मध्ये 'स्वामी विवेकानंद'साठी त्यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हे सगळं सोडून मिथुनदा उटीला गेले. तिथे त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. यातही त्यांची एक यशस्वी हॉटेल व्यवसायिक म्हणून गणना होते.

बी ग्रेड चित्रपटांची चलती

मिथुनदा बी ग्रेड चित्रपटांचे बादशाह होते. त्यांचे 'दादागिरी', 'चंडाल', 'शेरे हिंदुस्तानी', 'चीता', 'मिलिटरी राज', 'रावण राज' सारखे चित्रपट पहावे लागतील.

या चित्रपटांमुळे त्यांचा एक वेगळा फॅनबेस तयार झाला. पण सोबतच चित्रपटांचा दर्जा खालावल्याच्या आरोपामुळे त्यांचे कट्टर चाहतेही निराश झाले.

यावर मिथुनदांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, "मी कमी बजेटचे चित्रपट केले होते यात काही वाद नाही. पण त्यांच्या बजेटच्या आधारावर त्यांना ए ग्रेड किंवा बी ग्रेड दर्जा देता येणार नाही. चित्रपट निर्मितीचे अर्थशास्त्र न समजणारा अभिनेता फ्लॉप ठरतो. मी माझ्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी हे चित्रपट केले. पण त्या सगळ्या छोट्या, मोठ्या किंवा फ्लॉप चित्रपटांमुळे मी आज इथवर पोहोचलोय."

बीबीसीशी बोलताना मिथुनदांचा मुलगा नमाशी सांगतो, "नव्वदच्या दशकात मी शाळेत असताना आम्ही उटीमध्ये राहायचो. सकाळी माझे वडील पोलिसांच्या वेशात असायचे, मग मला वाटायचं ते पोलिसात आहेत. रात्री ते नेत्याच्या वेशात असायचे."

"एकदा तर ते रामकृष्ण परमहंसांच्या वेशात होते. मला वाटायचं की माझे वडील एकही नोकरी नीट करू शकत नाहीत. पुढे जाऊन मला समजलं की, ते अभिनेता आहेत आणि एका दिवसात ते चार चार शिफ्ट करतात. ते जिथे कुठे जायचे, त्यांना बघायला लोक गोळा व्हायचे."

तुम्हाला एकाच व्यक्तीमध्ये मिथुनदांचा चाहताही मिळेल आणि टीकाकारही पाहायला मिळेल. त्यांनी एकीकडे गौतम घोषसोबत ‘गुडिया’ हा चित्रपट केला, तर दुसऱ्या बाजूला नसीर-शबानासोबत 'हम पांच' सारखा चित्रपट केला.

एकीकडे 'दिया' आणि 'तुफान' सारखे चित्रपट आहेत ज्यात मृत मिथुनचा मेंदू डीप फ्रीझमधून बाहेर काढून ब्रेन डेड नायिकेला दिला जातो. जेणेकरून मिथुनच्या मागील आयुष्यातील सर्व गोष्टी आणि रहस्य नायिकेला समजतील आणि खून्याचा शोध लागेल.

डाव्या विचारसरणीकडून भाजपकडे प्रवास

मिथुन चक्रवर्तींनी अभिनेत्यासोबत राजकीय नेता म्हणूनही काम केलंय.

बंगालमध्ये राहत असताना मिथुनला कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार पी एम तिवारी सांगतात, "पूर्वी मिथुन डाव्या पक्षांच्या जवळ होते. 1986 मध्ये तत्कालीन ज्योती बसू सरकारच्या काळात त्यांनी कोलकाता येथील पूरग्रस्तांसाठी ‘होप 86’ नामक कार्यक्रम राबविला होता. या कार्यक्रमात त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही आणलं होतं. त्यांनी 2009 साली प्रणव मुखर्जी यांच्यासाठी प्रचार केला होता. पुढे ते तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार झाले. पण संसदेत क्वचितच दिसायचे.

"पुढे 2016 मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला. मिथुन चक्रवर्ती शारदा कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली होती. यानंतर त्यांनी कंपनीकडून ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घेतलेले 1.20 कोटी परत केले."

2021 मध्ये मात्र बरच काही बदलंल. बंगालमध्ये ते भारतीय जनता पक्षाचा चेहरा बनले. त्यावेळची त्यांची वादग्रस्त विधानं खूप गाजली. एकेठिकाणी ते म्हटले होते, "मैं सांप नहीं, कोब्रा हूँ. डसूंगा तो फोटो बन जाओगे."

मिथुन कल्ट

राजकारण्याच्या या खेळात देखील त्यांचं अभिनेता म्हणून काम सुरूच आहे.

2022 मध्ये त्यांनी 'काश्मीर फाइल्स'मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती.

मिथुनदांच्या लोकप्रियतेत चढ-उतार आलेत, पण त्यांची 'सामान्यांचा हिरो' अशी प्रतिमा कायमच लोकांच्या मनात घर करून राहिली आहे.

मग आता मिथुन चक्रवर्ती नामक रसायनाची व्याख्या करायची तरी कशी?

याची व्याख्या मिळेल एका मध्यमवर्गीय मुलाच्या गोष्टीत. हा मुलगा फुटपाथवरून चित्रपटांमध्ये आला, त्याच्या सावळ्या रंगावरून लोकांनी त्याला हिणवलं, त्याने सामान्य तरुणाचं पात्र साकारून मोठ्या पडदयावर स्वतःला सिद्ध केलं आणि तेही कोणत्याही गॉडफादरच्या पाठिंब्याशिवाय.

मिथुनदा स्वत: म्हणतात की, 'मी अ‍ॅक्टर बाय कम्पलशन होतो, नॉट एक्टर बाय चॉईस.. म्हणजे माझ्या मर्जीने नाही तर माझ्या असहाय्यतेमुळे मला अभिनेता बनावं लागलं'

पण नंतर अशा भूमिका वठवल्या की लोक त्यांना 'देसी ब्रूस ली' आणि अगदी 'देसी जेम्स बाँड' म्हणू लागले.

मुंबईहून सुप्रिया सोगळे यांच्या इनपुट्ससह.

हेही वाचलंत का?