You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ललिता साळवेचा झाला ललित : लिंगबदल शस्त्रक्रिया केलेला कॉन्स्टेबल बनला पिता
महाराष्ट्र पोलिस दलातील लिंगबदल शस्त्रक्रिया केलेले कॉन्स्टेबल ललित साळवे यांच्या पत्नीने 2024 च्या मकर संक्रांतीच्या दिवशी मुलाला जन्म दिलाय.
36 वर्षीय ललित साळवे यांनी लिंग बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर 2020 मध्ये लग्न केलं होतं.
आता 15 जानेवारी रोजी ललित साळवे वडील झाल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्स या संकेतस्थळाने दिली आहे.
या जोडप्याने त्यांच्या मुलाचं नाव आरुष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहेत ललित साळवे?
'ललिता साळवे' यांचा 'ललित' होण्याचा प्रवास खूपच संघर्षमय होता.
लहानपणापासून ललिताला आपल्या शरीरात काहीतरी गडबड आहे, असं वाटायचं. पण नेमकी काय समस्या आहे हे स्पष्ट व्हायला बरीच वर्ष गेली.
ललिताचं बालपण अतिशय कष्टात गेलं. तिचे आईवडील शेतमजुरी करायचे. मामाकडे राहून ललितानं शिक्षण पूर्ण केलं आणि विसाव्या वर्षी कॉन्स्टेबल म्हणून ती पोलीस खात्यात रुजू झाली.
आयुष्यात एका नव्या सुरुवातीकडे उमेदीनं ती पाहात होती, पण तीन-चार वर्षांत चित्र बदललं.
जननेंद्रियाजवळ काही गाठीसारखं जाणवल्यानं ललिता डॉक्टरांकडे गेली होती आणि ती स्त्री नसून पुरुष असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. तिच्या शरीरात पुरुष हार्मोन्स असल्याचं स्पष्टही झालं.
डॉक्टरांचं निदान आणि शस्त्रक्रियेविषयी ऐकून ललिताही संभ्रमात पडली होती.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ललितानं आपली व्यथा मांडली होती. "मी माझं सगळं आयुष्य मुलगी म्हणूनच जगले होते. जग मला मुलगी म्हणून ओळखत होतं आणि अचानक मला मुलगा बनण्याचा सल्ला देण्यात आला. मला काही समजतच नव्हतं."
पण तिची तगमग पाहून घरचे कुटुंबीय तिच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले.
"जगावं की मरावं असा विचार मनात यायचा. खूप भयानक काळ होता तो. घुसमट खूप झाली. प्रचंड, भयानक संघर्षातून मी बाहेर आलोय. माझा लढा सफल झाला असं वाटलं."
लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्यामुळं झालेली घुसमट ललितने शब्दांत मांडली होती.
व्यवस्थेशी लढा
काही तपासण्या करण्यासाठी ललिताला मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. पण तिला त्या वेळेस सुट्टी मिळू शकली नाही.
लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी कुणी सुट्टी मागितली तर काय करायचं हे तिच्या वरिष्ठांना ठरवता येत नव्हतं. पोलीस खात्यासमोर याआधी कधीच असा प्रश्न उभा राहिला नव्हता. तसंच ललिताची भर्ती महिला पोलिसांत झाली होती, शस्त्रक्रियेनंतर तिला कुठल्या विभागात ठेवायचं, हाही एक प्रश्न समोर होता.
ऑपरेशनसाठी नोकरी सोडणं ललिताला शक्य नव्हतं. तिनं मुंबई हाय कोर्टात धाव घेतली. पण हा प्रशासकीय सेवेसंदर्भातला प्रश्न असल्यानं मुंबई हायकोर्टानं ती जबाबदारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे सोपवली.
दरम्यान, ललिताच्या संघर्षाविषयी बातम्या मीडियात प्रसारीत झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आणि गृहखात्याला संवेदनशीलतेनं विचार करण्यास सांगितलं. तसंच नियमांत अपवाद करून ललिताला सेवेत कायम ठेवण्याचा सल्लाही दिला.
मग गृहखात्यानं ललिताला सुट्टी मंजूर केली. परवानगी मिळाल्यावर ललिता 25 मे 2018 रोजी शस्त्रक्रियेला सामोरी गेली आणि ललित ही नवी ओळख धारण करूनच हॉस्पिटलमधून बाहेर पडली.
ललितवर करण्यात आलेली लिंगबदल शस्त्रक्रिया नेमकी काय होती?
ललितवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही लिंगबदल शस्त्रक्रिया नाही तर genital reconstruction surgery आहे, असं ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. रजत कपूर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
तसंच ललितला Gender Dysphoria (म्हणजे आपल्या लैंगिकतेविषयी अस्वस्थता) झालेला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ते म्हणाले होते, "Gender Dysphoria मध्ये एखाद्या पुरुषाला स्त्री व्हावंसं किंवा स्त्रीला पुरुष व्हावंसं वाटत असतं. पण ललितच्या बाबतीत समस्या वेगळी होती. त्याच्या गुप्तांगांच्या बाह्यभागाचा पूर्णपणे विकास झालेला नसल्यानं ते स्त्रीच्या इंद्रियासारखं वाटत होतं. त्यामुळंच ती मुलगी असल्याचा समज झाला आणि मुलगी म्हणूनच तिला वाढवण्यात आलं."
सीमा आणि ललितचं लग्न
लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे यांना पुरुष म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात पुन्हा रुजू करून घेण्यात आलं.
14 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील सीमा बनसोडे या तरुणीशी ललित यांचा विवाह झाला.
वडील झालेल्या ललित साळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "माझा महिला ते पुरूष असा प्रवास हा खूपच संघर्षमय होता. या काळात अनेकांनी मला सहकार्य केलं. आम्हाला बाळ व्हावं, ही पत्नी सीमाची इच्छा होती. आता आम्ही एका गोंडस मुलाचे माता-पिता झालो आहोत, याचा मला आणि आमच्या कुटुंबियांना आत्यंतिक आनंद आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)