You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सायशा शिंदेः 'मी दाढी करायचे, एकदम पुरुषी होते पण मी सायशा शिंदे झालेय'
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
भारताची हरनाज संधू 70 वी 'मिस युनिव्हर्स' ठरली आहे. 21 वर्षानंतर हरनाज संधूच्या रुपात 'मिस युनिव्हर्स'चा किताब भारताला मिळाला आहे.
हरनाजनं या स्पर्धेत परिधान केलेला गाऊन डिझाइन केला होता- साइशा शिंदे यांनी. साइशा या ट्रान्स वुमन आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली आणि आपली नवीन ओळख जगासमोर आणली होती.
स्वतःला स्वीकारण्याचा हा त्यांचा प्रवास कसा होता, यासंबंधी त्यांनी बीबीसीशी संवाद साधला होता. तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
सायशाने सांगितलं की, लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय सोपा नव्हता. सहा वर्षांपासून मी द्विधा मनस्थितीतलं जिणं जगत होते. मी महिला आहे का पुरुष मला कळत नव्हतं. खूप अस्वस्थ वाटत असे. लॉकडाऊन काळात मी नक्की कोण आहे याची जाणीव झाली.
मित्र आणि कुटुंबीयांना समजून घ्यायला वेळ लागेल
बॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, करिना कपूर, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, सनी लियोनी यांच्याबरोबर स्वप्नील यांनी काम केलं होतं. काही दिवसांपूर्वीच स्वप्नीलचा सायशा झालेल्या तिने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली होती. या पोस्टद्वारे त्यांनी जगाला या बदलाविषयी माहिती दिली.
बीबीसी हिंदीशी बोलताना सायशाने सांगितलं की, "मी आता ट्रान्सवूमन आहे. खरं सांगायचं तर मला अजूनही विश्वास बसत नाहीये की मी आता सायशा शिंदे झाली आहे. लोकांना माझ्या या नावाची सवय झालेली नाही. मलाही नव्या व्यक्तिमत्वाशी ओळख व्हायला वेळ लागेल.
घरचे आणि मित्रमंडळी वर्षानुवर्षे स्वप्नील याच नावाने हाक मारायचे. त्यामुळे आता मला कुणी सायशा नावाने हाक मारली तर ती आपल्यासाठी आहे हे मी विसरून जाते. माझी ही नवी ओळख लक्षात यायला सगळ्यांनाच थोडा वेळ लागेल. खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला आहे".
मी गे पुरुष नाही हे माझ्या लक्षात आलं
स्वप्नील शिंदे यांचा 39व्या वर्षी सायशा शिंदे असा जणू पुनर्जन्मच झाला आहे.
सायशा सांगतात की, "सहा वर्षांपूर्वी मला जनरल आयडेंटिटी डिस्फोरिया असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. त्याआधी बंद खोलीत मी जे करत असे ते बाहेर कधीच सांगू शकत नसे. लहानपणी हे जराही जाणवलं नाही. याला काय म्हणतात हेही मला ठाऊक नव्हतं. कोणी सांगणारंही नव्हतं. घरच्यांबरोबर आपण या विषयावर बोलू शकत नाही. मी मोठी होऊ लागले तसं गे समलैंगिक पुरुषांकडे माझा ओढा होता. मला गे असल्यासारखं वाटू लागलं. मात्र आणखी मोठी झाल्यानंतर गे नसल्याचं लक्षात आलं. तेव्हा ठरवलं मी जशी आहे तशी लोकांसमोर येईन, कुठल्याही भीतीविना, कोणालाही न घाबरता".
माझं बालपण त्रासदायक
लहानपणीच्या आठवणींबद्दल सायशा सांगतात, "माझं बालपण त्रासदायक होतं. शाळेत मला चिडवण्यात येत असे. ते चिडवणं टोकाचं होतं. 5 ते 17 वर्षांपर्यंतचा काळ माझ्यासाठी भयंकर असा होता. माझ्या नव्या नावाविषयी सांगायचं तर मला हे आधीच माहिती होतं. कारण माझ्या पुतणीचं हे नाव आहे. या नावाचा अर्थ मला चांगल्याप्रकारे माहिती आहे. म्हणूनच सायशा नाव ठेवलं. मस्तानी हे नाव असावं असंही मला वाटलेलं. पण मग वाटलं, नाव असं असायला हवं जे माझ्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक असेल. म्हणून सायशा ठेवलं".
घाई धोकादायक ठरू शकते
स्वत:च्या शरीराचं अशा पद्धतीने परिवर्तन करणं सोपं आहे का? यावर सायशा सांगतात की, "हे खूप कठीण आहे. माझी उंची 6.2 आहे. मी दाढी ठेवत असे. माझं व्यक्तिमत्व पुरुषी होतं. आज जो चेहरा मला मिळाला आहे, त्यामागे खूप मेहनत आहे. त्याच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. खूप धीराने वागावं लागतं. स्रव औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी लागतात.
कोणत्याही व्यक्तीला स्वत:मध्ये असे बदल करायचे असतील तर योग्य पद्धतीने करायला हवेत. कुठल्याही प्रकारची घाई करू नये. स्वत:च्या शरीरावर प्रेम करा. कोणत्याही प्रकाराची घाई धोकादायक ठरू शकते".
मी स्वत: डिझाईन केलेले कपडे घालून बाहेर पडते
नवं नाव आणि नव्या व्यक्तिमत्वासह जगासमोर आल्यानंतर मनोरंजन आणि फॅशन जगतात काय प्रतिक्रिया आहे यावर सायशा सांगतात, "मला खूप सारं प्रेम आणि सहकार्य मिळतं आहे. कमी प्रमाणात मिळतं आहे असं मी म्हणणार नाही कारण कोणाचं प्रेम आणि सहकार्य मिळवण्यासाठी हा बदल मी घडवून आणलेला नाही.
कामाविषयी बोलायचं तर माझ्या कामात आता आणखी सुधारणा होईल. कारण माझी विचार करण्याची पद्धत बदलली आहे. कारण आधी माझे कपडे महिलांसाठी आणि स्वप्नीलसाठी असत. मात्र आता हे कपडे महिला आणि सायशासाठी तयार होतील. आता मी डिझाईन केलेले कपडे घालूनच मी बाहेर पडते. स्त्रियांना कशा प्रकारचे कपडे हवे आहेत हे मला डिझायनर म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने कळू लागलं आहे".
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)