हातात चाव्या, सोने-चांदीची नाणी; 2000 वर्षांपूर्वीच्या विनाशकारी ज्वालामुखीत गाडलं होतं अख्खं शहर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेबेका मोरेले
प्राचीन शहर, संस्कृतींबाबत उत्खनन जगभरात अनेक ठिकाणी होत असतं. काळाच्या ओघात ही शहरं, संस्कृती मातीखाली गाडली गेलेली असते. मात्र हजारो वर्षांपूर्वी एक संपूर्ण प्राचीन शहर एका महाभयंकर ज्वालामुखीच्या उद्रेकाखाली गाडलं गेलं.
त्यावेळची परिस्थिती इतकी भयानक होती की, त्या शहरातील लोकांना स्वत:चा बचाव करण्याचीही फारशी संधी मिळाली नव्हती. ते लोक त्यावेळी ज्या स्थितीत होते त्याच स्थितीत ज्वालामुखीच्या राखेखाली गाडले गेले.
अलीकडच्या काळात झालेल्या उत्खननातून हे अद्भूत शहर पुरातत्वशास्त्रज्ञांनी जगासमोर आणलं आहे. हे उत्खनन आणि त्या प्राचीन शहराविषयी.
पोम्पेई (Pompeii) हे इटलीतील प्राचीन रोमन शहर आहे. या शहरात ज्वालामुखीच्या खडक आणि राखेखाली 2000 वर्षांपासून लपलेली एक इमारत सापडली आहे.
असे शोध 'शतकातून एकदाच' लागत असल्याचं म्हटलं जातं. पुरातत्व शास्त्रज्ञांनी एक खासगी स्नानगृह शोधलं आहे. त्यात गरम, उबदार आणि थंड पाण्याची व्यवस्था आणि एक मोठा तलाव सापडला आहे.
तिथे सापडलेली कदाचित ही सर्वात मोठी वास्तू असेल.
याची रचना एखाद्या स्पासारखी असून ती एका मोठ्या घराच्या मध्यभागी आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू होतं, तिथे ही रचना सापडली आहे.
"या जागा, खरोखरंच पोम्पेई इफेक्ट (Pompeii effect) नावानं ओळखल्या जात असलेल्या गोष्टीचा भाग आहेत. या रचना किंवा घरांमधील स्थिती अशी आहे की जणूकाही काही मिनिटांपूर्वीच तिथून लोक निघून गेले आहेत," असं ग्रॅबिएल झोक्रेगल म्हणतात. ते पोम्पेई पुरातत्व विभागाचे संचालक आहेत.
व्हेसुव्हियसचा भयंकर उद्रेक
उत्खननात सापडलेल्या घरात दोन सांगाडे सापडले होते. त्या सांगाड्यांच्या तपासणीतून ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर पोम्पेईमधील लोकांना किती भयावह परिस्थितीला तोंड द्यावं लागलं होतं, हे स्पष्ट होतं.
इसवीसन 79 मध्ये पोम्पेई शहराजवळ असलेल्या माउंट व्हेसुव्हियस (Mount Vesuvius) ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.
उत्खननात सापडलेल्या या दोन सांगाड्यांपैकी एक सांगाडा 35 ते 50 वर्षे वयोगटातील एका महिलेचा आहे. त्या महिलेच्या हातात दागिने आणि नाणी आहेत. तर दुसरा सांगाडा एका किशोरवयीन किंवा विशीतील तरुणाचा आहे.
हे सांगाडे घराच्या आतील एका खोलीत सापडले आहेत. मात्र त्यांचा मृत्यू पायरोक्लास्टिक प्रवाहामुळे (pyroclastic flow) झाला होता. पायरोक्लास्टिक प्रवाह म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडलेले अती उष्ण वायू आणि राख यांचा प्रवाह. वायू आणि राखेचा हा अतिप्रचंड उष्ण प्रवाह पोम्पेई शहरातून वाहिला होता.

फोटो स्रोत, Tony Jolliffe/BBC
"हे एक अद्भूत ठिकाण आहे. इथे दिसणारी प्रत्येक गोष्ट त्यावेळेस या ठिकाणी घडलेल्या घटनांचं वर्णन करते," असं डॉ. लुडोविका अलिझे सांगतात. त्या पोम्पेई संग्रहालयाच्या संचालक आहेत.
या प्राचीन शहराचा एक तृतीयांश भाग अजूनही त्या भयानक ज्वालामुखीच्या अवशेषाखाली गाडलेला आहे. मात्र सध्या होत असलेल्या प्रचंड उत्खननातून प्राचीन रोमन लोकांच्या आयुष्यावर प्रकाश पडतो आहे.
पोम्पेई शहराचा एक संपूर्ण रस्ता या उत्खननातून समोर आला आहे. त्या रस्त्यावर धोब्याचं दुकान आहे, बेकरी आणि एक मोठं घर आहे. हे सर्व एका धनाढ्य माणसाच्या मालकीचं असावं, असं मानलं जातं.
ती व्यक्ती म्हणजे कदाचित ऑलस रस्टियस व्हेरस असावी. त्या काळचा पोम्पेईमधील एक प्रभावशाली राजकारणी.
डॉ. जोक्रिगल म्हणतात की स्नागगृहाचा किंवा स्पासदृश्य रचनेच्या शोधातून त्या व्यक्तीच्या संपत्तीची कल्पना येते.
"तिथे खासगी स्नानगृह असलेली फार थोडी घरं आहेत. त्यामुळेच ती घरं फक्त श्रीमंत आणि श्रीमंत लोकांचीच होती. म्हणूनच ती घरं, स्नानगृह भव्य आहेत. शहरातील खासगी घरात बांधलेलं कदाचित ते सर्वात मोठे स्नानगृह असेल," असं ते सांगतात.


पोम्पेईमधील प्रचंड स्नानगृहं
या स्नानगृहांचा थाट काही औरच होता. त्या स्नानगृहांचा वापर करण्याची संधी मिळालेले लोक लाल रंगाच्या भिंती आणि रोमन साम्राज्याच्या विविध भागातून आणलेल्या छोट्या रंगीत संगमरवरी तुकड्यांचं नक्षीकाम असलेल्या फरशा असलेल्या खोल्यांमध्ये कपडे काढायचे.
त्यानंतर ते गरम पाण्याच्या टबमध्ये जायचे आणि उबदारपणा देणाऱ्या फरशा आणि उष्णता टिकवून ठेवण्यासाठी बांधलेल्या भिंतीमध्ये गरम पाण्याचा आनंद घ्यायचे. भिंती आणि फरशांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे तिथे जमिनीवरून गरम हवा वाहत असे.
त्यानंतर ते चमकदार रंगांनी रंगवलेल्या उबदार खोलीत जायचे. तिथे त्यांना तेल लावलं जायचं आणि 'स्ट्रिगिल' (strigil) नावाच्या विशिष्ट उपकरणानं त्यांचं अंग घासलं जायचं.

फोटो स्रोत, Tony Jolliffe/BBC
शेवटी ते सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक भव्य अशा थंड खोलीत जायचे. त्या खोलीला 'फ्रिजिडेरियम' (Frigidarium) म्हणायचे. तिथे लाल स्तंभ आणि योद्ध्यांची भित्तीचित्रांनी वेढलेला पाण्याचा हौद किंवा छोटा तलाव असायचा.
त्यात ते थंड पाण्याचा आनंद घ्यायचे. या तलावात एकावेळी 20 ते 30 लोक उतरू शकतील इतका तो मोठा असायचा.
"तेथे उन्हाळ्यातील उकाड्याच्या आणि उष्णतेच्या महिन्यांमध्ये, पाण्यात पाय टाकून बसता यायचं. वाईनचे घोट रिचवत आणि मित्रमंडळींबरोबर गप्पा मारण्याचा आनंदही घेता यायचा," असं डॉ. जोक्रिगल सांगतात.
या असामान्य आणि भव्य घरात या स्नानगृहाची भर अलीकडेच पडली असेल.
गडद रंगाच्या भिंती आणि पांरपारिक चित्रं असलेली एक मोठी जेवणाची खोली गेल्यावर्षी सापडली होती. त्याचबरोबर फिकट निळ्या रंगानं रंगवलेली आकारानं छोटी, अधिक खासगी खोली देखील सापडली होती. या घरात राहणारे लोक देवाची प्रार्थना करण्यासाठी या खोलीत जात असत.
व्हेसुव्हियसची विनाशकारी घटना घडली तेव्हा या घराचं नूतनीकरण सुरू होतं. बांधकाम साहित्य आणि त्यासाठी लागणारी उपकरणं संपूर्ण घरभर विखुरलेली होती. निळ्या खोलीत फरशीवर शिंपल्याचा ढिग होता.
त्यापासून पावडर तयार करून ती भिंतीवर लावली जाणार होती. भिंतींना चमकदार करण्यासाठी असं केलं जायचं.

फोटो स्रोत, Tony Jolliffe/BBC
या ठिकाणाजवळ एका अरुंद, सजावट न केलेल्या खोलीत, शहरातील दोन रहिवाशांचे अवशेष सापडले. ते रहिवासी ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या विनाशातून वाचले नव्हते.
एका महिलेचा सांगाडा पलंगावर हातपाय जवळ घेऊन झोपलेल्या स्थितीत सापडला. या छोट्या खोलीच्या एका कोपऱ्यात एका पुरुषाचा सांगाडा सापडला.
"माउंट व्हेसुव्हियसवरून वाहत आलेला तप्त वायू, लाव्हारस आणि राखेचा प्रवाह या खोलीच्या बाहेरील रस्त्यावरून वाहत गेला होता. त्यामुळे त्या खोलीची एक भिंत कोसळली आणि त्याखाली चिरडून तो माणूस मृत्यूमुखी पडला असावा," असं डॉ. सोफी हे सांगतात. त्या पोम्पेईमधील एक पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत.
"तो पुरुष मृत्यूमुखी पडला तेव्हा ती महिला अजूनही जिवंत होती. त्यावेळच्या भयावह स्थितीची कल्पना करा. त्यानंतर ती खोली ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या तप्त वायू, लाव्हारस आणि राखेनं भरून गेली. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला असावा," असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Archaeological Park of Pompeii/Sophie Hay
त्या पुरुषाच्या सांगाड्याची तपासणी केल्यावर त्यातून दिसून आलं की, तो तरुण असूनदेखील त्याची हाडं खूपच जीर्ण झाली होती, त्यांची झीज झाली होती. त्यावरून असं दिसतं की, त्यावेळच्या समाजात त्याचं स्थान खालचं असलं पाहिजे. कदाचित तो गुलाम असावा.
ती महिला म्हातारी होती. मात्र तिची हाडं आणि तिचे दात चांगल्या स्थितीत होते.
"त्यावरून कदाचित ती समाजातील उच्चभ्रू वर्गातील असावी, असं दिसतं," असं डॉ. सोफी सांगतात.
"ती महिला कदाचित त्या घराच्या मालकाची पत्नी असू शकते किंवा घरमालकाच्या पत्नीची काळजी घेणारी सहाय्यिका देखील असू शकते. नक्की काय ते आम्हाला माहिती नाही," असं त्या पुढे नमूद करतात.
त्या पुरुष आणि महिलेच्या हातात काय होतं?
त्या खोलीतील संगमरवरी टेबलावर काचेच्या वस्तू, कांस्याची गोल आकाराची विशिष्ट भांडी आणि मातीची भांडी सापडली. ज्वालामुखीचा उद्रेक थांबवण्याची वाट पाहणाऱ्या दोघांनी या वस्तू कदाचित आणल्या असतील.
मात्र त्या दोघांच्या हातात असलेल्या वस्तू मात्र सर्वाधिक लक्षवेधी आहेत. त्या तरुण पुरुषाच्या हातात काही चाव्या होत्या. तर त्या महिलेच्या हातात सोने आणि चांदीची नाणी तसंच दागिने होते.
पोम्पेईमधील उत्खननात सापडलेल्या इतर मौल्यवान वस्तूंसह या वस्तूदेखील सांभाळून ठेवण्यात आल्या आहेत. डॉ. अॅलेसांड्रो रुसो यांच्यासोबत आम्हाला त्या वस्तू पाहण्याची संधी मिळाली.

फोटो स्रोत, Tony Jolliffe/BBC
अजूनही ती सोन्याची नाणी नव्याकोऱ्या नाण्यांसारखी चमकत आहेत. डॉ. रुसो यांनी आम्हाला सोने आणि मोत्यांचे हार, पेंडंट आणि मौल्यवान रत्नं दाखवली.
"जेव्हा तुम्हाला असं काहीतरी सापडतं, तेव्हा प्राचीन आणि आधुनिक काळातील अंतर नाहीसं होतं," असं डॉ. रुसो म्हणतात.
"या वस्तूंच्या माध्यमातून आपण त्या ज्वालामुखीच्या विनाशकारी उद्रेकात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या आयुष्याच्या छोट्याशा भागाला स्पर्श करू शकतो."

फोटो स्रोत, Tony Jolliffe/BBC
डॉ. सोफी हे, त्या खासगी भव्य स्नानगृहाचं वर्णन शतकातून एकदा लागणारा शोध असं करतात. त्या म्हणतात, रोमन समाजातील काळ्या पैलूंवरदेखील त्यातून प्रकाश पडतो.
त्या गरम खोलीच्या मागच्या बाजूस बॉयलर रुम आहे. त्या खोलीत रस्त्यावरून पाईपद्वारे पाणी आणलं जात असे. त्यातील काही पाणी थंड पाण्याच्या तलावात नेलं जात असे. उरलेलं पाणी बॉयलरमध्ये गरम केलं जात असे आणि तिथून ते गरम पाण्याच्या खोलीत जायचं.
पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे व्हॅाल्व्ह इतके आधुनिक आहेत की, आजदेखील तसे व्हाॅल्व्ह वापरात आहेत की नाही याबद्दल शंकाच आहे.
पाणी गरम करण्यासाठीचे बॉयलर जमिनीत खाली असल्यानं त्यात काम करणाऱ्या गुलामांना देखील या खोलीतच राहावं लागत होतं. परिणामी त्यांना असह्य होणाऱ्या उष्णतेला तोंड द्यावं लागत असेल.
"पोम्पेईच्या उत्खननातून सर्वात स्पष्टपणे समोर येणारी बाब म्हणजे अतिशय श्रीमंत लोक आणि गुलाम यांच्या आयुष्यातील विरोधाभास. त्यावेळच्या या दोन वर्गातील फरक आपल्याला इथे दिसतो," असं डॉ. सोफी हे म्हणतात.

फोटो स्रोत, Tony Jolliffe/BBC
"स्नानगृहातील श्रीमंतांचं ऐषारामी जीवन आणि बॉयलर रुममधील अती उष्णतेत भाजून निघणाऱ्या गुलामांचं जीवन यात जमीन आसमानचा फरक होता. महत्त्वाचं म्हणजे या पूर्णपणे टोकाच्या दोन जगांना एका भिंतींनं वेगळं केलेलं होतं."
पोम्पेईतील उत्खनन आता शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र तरीदेखील राखेतून नवनवीन शोध लागत आहेत. या भागात उत्खनन सुरू असल्यामुळे मर्यादित लोकांनाच इथे प्रवेश दिला जातो. मात्र उत्खनन संपल्यानंतर आगामी काळात हा भाग सर्व लोकांसाठी पूर्णपणे खुला केला जाईल.
"इथे प्रत्येक दिवस आश्चर्यचकित करणारा असतो," असं अॅना ओन्स्टी म्हणतात. पोम्पेईत होत असलेल्या उत्खननाच्या त्या संचालक आहेत.
"एके दिवशी मी रोजच्या सारखा कामाचा दिवस आहे, असं समजून कामावर येते आणि काहीतरी विस्मयकारक सापडलं आहे याची जाणीव होते," असं अॅना म्हणतात.
"पोम्पेईच्या आयुष्यातील हा एक अद्भूत क्षण आहे. या उत्खननाच्या माध्यमातून या सर्व विस्मयकारक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची आम्हाला संधी मिळते," असं अॅना ओन्स्टी म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











