रानगव्यांच्या कवट्यांच्या 'या' डोंगराखाली दडलंय अमेरिकेच्या इतिहासातील एक भयानक कारस्थान

फोटो स्रोत, Detroit Public Library
- Author, लुसी शेरीफ
दोन माणसं बायसनच्या (रानगवे) कवटीच्या डोंगरावर उभे असल्याचा फोटो हे अमेरिकेच्या वसाहतीकरणाच्या वेळेस करण्यास आलेल्या शिकारीचं परिचित प्रतीक आहे. मात्र, यामागे आश्चर्यकारक आधुनिक संदेश देणारी आणखी भयावह कथा आहे.
(बायसन हा जंगली म्हैस, रेडा किंवा रानगव्यासारखा एक बलदंड प्राणी असतो.)
काळा सूट आणि गोल हॅट घातलेले दोन पुरुष बायसनच्या कवटीच्या प्रचंड ढिगाऱ्यावर पोज देत आहेत.
19 व्या शतकातील हे विचलित करणारं दृश्य आहे. बायसनच्या हजारो कवट्या नीटनेटकेपणानं रचलेल्या असून त्यांचा डोंगर तयार झाला आहे.
मात्र, या भयंकर दृश्याबाबत निर्माण झालेल्या पहिल्या प्रतिमेखाली एक गूढ, भयावह रहस्य दडलेलं आहे.
बायसनच्या कवट्यांचा हा डोंगर हे काही फक्त अमेरिकेत अतिउत्साहीपणानं केलेल्या शिकारीचा परिणाम नाही. शिवाय, फोटोत दिसणारे ते पुरुष देखील शिकारी नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, कवट्यांचा हा ढिगारा म्हणजे संघटितपणे, विचारपूर्वक आखणी करून अमेरिकेतून बायसनचं अस्तित्व संपवण्यासाठी चालवण्यात आलेली मोहीम आहे. ही मोहीम काय होती?


तर स्थानिक किंवा मूळ अमेरिकन लोकांना त्यांच्या महत्त्वाच्या संसाधनापासून वंचित ठेवण्यासाठी आणि काही समुदायांना जे थोड्याफार सवलतींवर तग धरू शकतात आणि ज्यांच्यावर अमेरिकेत नव्यानंच आलेले श्वेतवर्णीय घुसखोर (सेटलर्स) नियंत्रण ठेवू शकतात, अशा समुदायांना पुढे आणण्यासाठी नियोजनपूर्वक आखलेली ही मोहीम होती.
बायसनच्या कवट्यांचा हा डोंगर म्हणजे त्या मोहिमेचाच एक पुरावा आहे.
अमेरिकेतील वसाहतीच्या विस्ताराची रणनीती
"हा फोटो म्हणजे विनाशाच्या वसाहतवादी उत्सवाचं उदाहरण आहे," असं ताशा हबर्ड म्हणतात. त्या एक फिल्ममेकर असून मूळ अमेरिकन आहेत. कॅनडातील अलबर्टा विद्यापाठीत त्या नेटिव्ह स्टडीज विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत.
हबर्ड यांनी अमेरिकेतील बायसनच्या संहाराचं वर्णन अमेरिकेच्या वसाहतीकरणाचा किंवा अमेरिकेतील वसाहतीचा विस्तार करण्याच्या "व्यूहरचनेचा" एक भाग म्हणून करतात.
बायसनचं निर्मूलन करण्याकडे "अमेरिकेतील वस्तींचा विस्तार करण्यासाठी जंगली भूभागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिलं गेलं."
कारण युरोपियन लोक सुरुवातीच्या काळात अमेरिकेत आले, तेव्हा इथं जंगलं आणि जंगली पशू मोठ्या प्रमाणात होते. तसंच मूळ अमेरिकन लोकांच्या वस्त्या होत्या.

फोटो स्रोत, DETROIT PUBLIC LIBRARY
बायसनच्या या वसाहतवादी सामूहिक कत्तलीचा अमेरिकेतील स्थानिक जमातींना कायमस्वरुपी धक्का बसला. कारण या जमाती त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, जगण्यासाठी, दैनंदिन गरजांसाठी बायसन वर अवलंबून होत्या.
जी राष्ट्रं किंवा समुदाय बायसनवर अवलंबून नव्हते, अशा राष्ट्रांपेक्षा जी राष्ट्रं बायसन अवलंबून होते त्यांची अवस्था कायमस्वरुपी वाईट झाली.
उदाहरणार्थ, तुलनात्मक अभ्यासानुसार, बायसनवर अवलंबून असलेल्या राष्ट्र किंवा समुदायांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण इतर राष्ट्रांपेक्षा अधिक आहे.
या अभ्यासात निष्कर्ष काढण्यात आला आहे की या विनाशामुळे बायसनवर अवलंबून असलेल्या राष्ट्रांना किंवा समुदायांना मूलतभूतरित्या वेगळ्या मार्गावर नेलं, जे आजतागायत सुरू आहे. या समुदायांचं आयुष्य कायमचं बदललं.
मूळ अमेरिकन आणि बायसनचं नातं
मूळ किंवा स्थानिक अमेरिकन लोक शेकडो वर्षांपासून बायसनची शिकार करत आले होते. बायसन असलेल्या राष्ट्रांमध्ये, तो मुख्यत: त्यांच्या भटक्या संस्कृतीचा एक भाग होता. या प्राण्यांपासून त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळत असत. त्यांना बायसनपासून अन्न, कातडं आणि कातडीपासून कपडे या गोष्टी मिळत असत. अवजारं किंवा साधनांसाठी बायसनच्या हाडांचा वापर होत असे.
(सामान्य भाषेत आणि ऐतिहासिक साधनांमध्ये, बायसनना म्हैस म्हणून संबोधलं जातं. कारण अमेरिकेत सुरूवातीच्या काळात आलेले सेटलर्स किंवा युरोपियन वसाहतवादी लोक त्यांना याच नावाचं संबोधत. मात्र असं जरी असलं तरी प्रत्यक्षात बायसन आणि जंगली म्हैस या दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत.)
उत्तर अमेरिका खंडातील स्थानिक लोक बायसनवर अवलंबून होते असं हबर्ड सांगतात.

त्या पुढे म्हणतात, "त्यामुळे बायसनचं उच्चाटन करणं म्हणजे अमेरिकेतील स्थानिक लोकांविरोधात उपासमारीचं शस्त्र वापरण्यासारखं होतं. आमच्यावर नियंत्रण ठेवता यावं आणि आम्हाला आमच्याच प्रदेशातून हाकलून लावता यावं यासाठी आम्हाला कमकुवत करण्यासाठी हे करण्यात आलं होतं."
दैनंदिन जीवनात बायसन उपयुक्त असूनदेखील, एका अंदाजानुसार स्थानिक अमेरिकन लोकांनी वर्षाकाठी 1,00,000 पेक्षा कमी बायसनची शिकार करत होते.
1800 च्या सुरूवातीच्या वर्षांमध्ये अमेरिकेतील बायसनची संख्या 3 ते 6 कोटी दरम्यान इतकी प्रचंड होती. त्यामुळे स्थानिक अमेरिकनांनी केलेल्या बायसनच्या शिकारीचा त्यांच्या एकूण संख्येवर फारसा परिणाम होत नव्हता.
1 जानेवारी 1889 पर्यंत अमेरिकेत फक्त 456 शुद्ध जातीचे बायसन शिल्लक राहिले होते. त्यातील 256 बायसन बंदिस्त अधिवासात होते. यलोस्टोन नॅशनल पार्क आणि इतर मूठभर अभयारण्यांमध्ये ते संरक्षित होते. यावरून बायसनचा किती प्रचंड संहार झाला याची कल्पना येते.
बायसनच्या कत्तलीमागची कारणं
बायसन च्या सामूहिक कत्तलींमागे अनेक कारणं आहेत. बायसनची सर्वाधिक संख्या असलेल्या भागातून तीन रेल्वेमार्गांची बांधणी करणं, ज्यामुळे बायसनचा अधिवास आणि मांसाला नव्यानं मागणी आली.
आधुनिक रायफलींमुळे बायसनची शिकार करणं तुलनात्मकरित्या सोपं झालं. शिकारीला आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा अभाव यासारखी विविध कारणं बायसनच्या कत्तलींमागे होती.
मात्र त्यामागे आणखी भयावह कारणं होती. बायसनपासून मिळणाऱ्या वस्तू किंवा उत्पादनांच्या वाढलेल्या मागणीपेक्षा काही उद्दिष्टांवर आधारित कारणं देखील होती. सेटलर्स किंवा वसाहतवाद्यांची बायसनच्या मांसाची वरवरची व्यावहारिक गरज देखील शेवटी वसाहतवाद आणि भूप्रदेशावर मिळवलेला विजय यांच्यात गुंतलेली होती, असं इतिहासकार म्हणतात.
"जमिनीच्या मालकीतून संपत्ती आणि सत्तेची इच्छा-आकांक्षा, गुलाम बाळगणं, अविरत होणारी वाढ आणि नफ्यासाठीची मोहीम आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं व्यावसायिकीकरण, ही बायसनची प्रचंड शिकार आणि स्थानिक समुदाय आणि मानवतेवर पाच शतकांहून अधिक काळ करण्यात आलेल्या हल्ल्यांमागची कारणं आहेत," असं बेथनी ह्युजेस म्हणतात. त्या चोक्टाव नेशन ऑफ ओक्लाहोमाचे सदस्य आहेत आणि मिशिगन विद्यापीठात नेटिव्ह स्टडीज विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

1869 मध्ये जेव्हा अमेरिकेत ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वेमार्ग पूर्ण झाला, तेव्हा त्यामुळे बायसनच्या नाशाचा वेग आणखी वाढला. 1871 मध्ये पेनसिल्व्हेनिया टॅनरी नं (चामडं बनवण्याचा कारखाना) बायसन च्या कातड्यापासून व्यावसायिक स्वरुपाचं चामडं बनवण्याची पद्धत विकसित केली. शिकाऱ्यांच्या झुंडीनं अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातील मैदानी भागात असणाऱ्या बायसनच्या कळपांच्या "धक्कादायक वेगानं" कत्तली केल्या, असं एका अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.
बायसनच्या कवट्यांच्या ढिगाऱ्याचा तो कुप्रसिद्ध फोटो मिशिगन कार्बन वर्क्समध्ये घेण्यात आला होता. मिशिगन कार्बन वर्क्समध्ये बायसनच्या हाडांवर प्रक्रिया केली जात होती.
तिथे बायसनची हाडांवर प्रक्रिया करून त्याचा कोळशा बनवण्यात येत असे, जो साखर उद्योगात साखर गाळणीसाठी आणि शुद्ध करण्यासाठी वापरला जात असे. बायसनची हाडंदेखील गोंद आणि खतं म्हणून वापरली जात असत.
"हा फोटो म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम भागात झालेल्या वस्तीच्या विस्तारामुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर तयार झालेल्या एका अत्यंत यशस्वी व्यवसायाची आणि स्थानिक किंवा मूळ अमेरिकन लोकं वांशिकदृष्ट्या कनिष्ठ असल्याच्या तर्कांची एक नोंद आहे," असं ह्युजेस म्हणतात.
अमेरिकेतील तत्कालीन परिस्थितीचं वर्णन करताना ह्युजेस म्हणतात की "वसाहतवाद आणि भांडवलवाद एकत्रितपणेच वाटचाल करत होते."
ह्युजेस पुढे सांगतात, "बायसनच्या हाडांवर प्रक्रिया करून या कंपनीला जे प्रचंड आर्थिक यश मिळालं होतं आणि त्याला जे प्रोत्साहन दिलं जात होतं, ते अमेरिकन सेटलरच्या वसाहतींच्या विस्ताराच्या काहीवेळा हिंसक असणाऱ्या डावपेचांचं बाय प्रोडक्ट म्हणजे उप-उत्पादन होतं."
"स्थानिक किंवा मूळ अमेरिकन लोकांच्या जमिनी, त्यांचं राष्ट्रियत्व आणि संस्कृती हिरावून घेण्याच्या वसाहतवादी मोहिमांमध्ये भाग घेण्याचा आणि त्यातून फायदा मिळवण्याचा तो एक भाग होता."
ह्युजेस पुढे म्हणतात, "हा फोटो फक्त वसाहतवादाच्या भूतकाळातील हानींची आठवण करून देत नाही. तो व्यावसायिकदृष्ट्या केल्या जाणाऱ्या उपभोग पद्धतींवरील एक आरोप आहे, ज्या पद्धती भौतिक आणि नैतिक नियम अस्पष्ट करतात. ज्यातून शुद्धीकरण केलेल्या साखरेच्या विलासी वस्तू सहजतेनं उपलब्ध होतात आणि ज्या वरकरणी सौम्य, निरुपद्रवी वाटतात."
मूळ अमेरिकन लोकांवर ताबा मिळवण्याचे लष्करी डावपेच
बायसनची शिकार करणं हा एक लष्करी मोहिमेचा देखील भाग होता. मूळ अमेरिकन लोकांमध्ये संसाधनांची कमतरता निर्माण करण्यासाठीचा एक डावपेच म्हणून त्याचा वापर करण्यात आला.
अमेरिकेत वसाहती तयार होत असतानाच्या काळात मूळ अमेरिकन लोकांची संसधानं नष्ट करण्याचा मार्ग म्हणून लष्करी अधिकाऱ्यांनी बायसन मारण्यासाठी सैनिक पाठवलं होते, या गोष्टींची कागदोपत्री व्यवस्थित नोंद झालेली आहे. इतिहासकार रॉबर्ट वूस्टर यांनी त्यांच्या 'द मिलिटरी अॅंड युनायटेड स्टेट्स इंडियन पॉलिसी' या पुस्तकात विश्लेषण केलं आहे.
त्यात त्यांनी म्हटलं आहे की "जनरल फिलिप शेरिडन या दक्षिणेकडील मैदानी भागातील जमातींविरुद्धच्या "संपूर्ण युद्ध" या रणनीतीसाठी जबाबदार असलेल्या लष्करी अधिकाऱ्यानं ही बाब ओळखली की बायसन नष्ट करणं हा मूळ अमेरिकन (इंडियन) लोकांना त्यांच्या भटक्या सवयी बदलण्यास भाग पाडण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे."

फोटो स्रोत, Getty Images
संसदेतील प्रतिनिधी जे बायसनच्या कमी होत असलेल्या कळपांच्या संरक्षणासाठी कायदे मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील होते, त्यांना जनरल शेरिडन यांनी असं सांगितल्याची नोंद आहे की "शिकारी इंडियन्सचा (मूळ अमेरिकन) अन्नसाठा नष्ट करत आहेत. आणि ही गोष्ट सर्वश्रुत आहे की एखाद्या सैन्याचा पुरवठा तुटल्यानं त्यांची गैरसोय होत त्यांच्यासमोरील आव्हानात वाढ होते...त्यामुळेच चिरस्थायी शांतता निर्माण होण्यासाठी बायसन चा संहार होईपर्यंत सैनिकांना त्यांना मारू द्या, त्यांचे कातडे काढून त्यांची विक्री करू द्या."
1868 मध्ये शेरिडन यांनी त्यांच्या एका सहकारी जनरलला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, "सरकारसमोरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या मूळ अमेरिकन जमातींच्या अन्नसाठ्याचा नाश करून (बायसन मारणं) त्यांना गरीब करणं आणि त्यानंतर या जमातींना सरकारकडून देण्यात आलेल्या जागेवर वसवणं."
लेफ्टनंट कर्नल डॉज या आणखी एका लष्करी अधिकाऱ्यानं एका शिकाऱ्याला सांगितलं की, "तुम्हाला शक्य असेल त्या प्रत्येक बायसनला मारून टाका! एक बायसनचा मृत्यू म्हणजे एक इंडियन (मूळ अमेरिकन)चा मृत्यू."
वसाहतवाद्यांच्या सैन्याकडून जे काही सुरू होतं त्याची मूळ अमेरिकन जमातींना कल्पना होती. त्यांना माहित होतं की सैन्य नेमकं काय करतं आहे. बिली डिक्सन हे एक बायसन शिकारी होते आणि टेक्सासच्या सीमेजवळील भागात राहणारे होते.
त्यांनी आपल्या आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की ग्रेट प्लेन्स या अमेरिकेतील मोठ्या मैदानी मुलुखातील किओवास जमातीचे प्रमुख असलेले सटांटा यांनी ही बाब ओळखली होती की "बायसन नष्ट करणं म्हणजे इंडियन (मूळ अमेरिकन) नष्ट करणं."
"सटांटा यांना ज्या गोष्टीची भीती वाटत होती, नेमकी तीच गोष्ट करण्याचा आग्रह जनरल फिलिप शेरिडन यांनी मैदानी मुलखातील जमातींवर कायम विजय मिळवण्यासाठी आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी धरला आणि ती बाब अंमलात आणली," असं डिक्सन पुढे म्हणतात.
बायसनच्या कत्तलींचा मूळ अमेरिकनवर झालेला परिणाम
सैन्याचे डावपेच यशस्वी झाले. किओवा जमातीच्या सदस्यांना नंतर ओक्लाहोमामधील राखीव जागी नेण्यात आलं. यानंतर बायसनवर जास्त प्रमाणात अवलंबून असणाऱ्या आणि बायसनची कत्तल झाल्यामुळे सर्वाधिक प्रतिकूल परिणाम झालेल्या मूळ अमेरिकन लोकांची सरासरी उंची एका पिढीच्या कालावधीतच एका इंचानं (2.5 सेमी) घटली.
बायसन आता त्यांच्या जीवनाचा भाग न राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला होता. तसंच त्यांच्या आर्थिक स्थितीवर देखील याचा विपरित परिणाम झाला होता.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्यातील बालमृत्यूचं प्रमाण 16 टक्क्यांनी वाढलं होतं. तर बायसन वर अवलंबून असणाऱ्या समुदायाचं दरडोई उत्पन्न बायसन वर अवलंबून नसलेल्या समुदायांपेक्षा 25 टक्के कमी होतं.

अर्थात कित्येक वर्षांपासून बायसनच्या शिकारीवरून वादविवाद होत आहेत. 3 ते 6 कोटी प्राणी शिकारी कसे काय संपवू शकतील? 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात हा प्रश्न विचारण्यात आला होता.
या अभ्यासात बायसन ची संख्या कमी होण्यास साथीचे रोग जबाबदार असल्याचं उत्तर देण्यात आलं होतं. त्यावेळेस अमेरिकेत असलेले - नेब्रास्का प्रांतामधील अॅंथ्रॅक्स आणि मोंटाना प्रांतातील टेक्सास टिक फिव्हर - "हे रोग लाखो बायसनचा नाश करण्यासाठी पुरेसे प्राणघातक ठरले असतील", असं या अभ्यासात म्हटलं आहे.
बायसनची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यामागचं कारण काहीही असलं तरी बायसनची संख्या पुन्हा कधीच पूर्ववत झाली नाही आणि अजूनही अमेरिकेत बायसन धोकादायक स्थितीतील प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहेत.
बायसन संर्वधनाचे अलीकडचे प्रयत्न
मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये ग्रेट प्लेन्स (अमेरिकेतील गवताळ मैदानी प्रदेश) मध्ये बायसन परत आणण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. (प्रेअरिज या अमेरिकेतील गवताळ कुराणांच्या प्रदेशासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत).
अमेरिकन सरकारच्या 2023 इन्फ्लेशन रिडक्शन अॅक्टमध्ये संपूर्ण अमेरिकेत बायसनची संख्या वाढवण्यासाठी 2.5 कोटी डॉलर्स (1.97 कोटी पौंड) निधीची तरतूद करण्यात आली होती.
बायसनची संख्या वाढवण्यासाठीचे छोटे स्वरुपातील प्रयत्न आधीच सुरू आहेत. द नेचर कॉन्झर्व्हन्सी या पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या राखीव जागांवर वाढवण्यात आलेले 1,000 बायसन आता त्यांच्या नैसर्गिक चराईच्या गवताळ प्रदेशात परतले आहेत.
तर मोंटाना प्रांतातील एका संवर्धन प्रकल्पाचं 5,000 बायसन प्रेअरीज च्या मैदानी प्रदेशात परत आणण्याचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर मूळ अमेरिकन जमातींनी नॅशनल वाईल्डलाईफ फेडरेशनबरोबरच्या भागीदारीतील प्रकल्पात 250 बायसन त्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर परत केले आहेत.
वसाहतवादी मानसिकता आणि आपण
बायसन च्या कवटीच्या ढिगाऱ्याच्या फोटोबद्दल बोलताना ह्युजेस एकंदरीतच वसाहतवादी मानसिकतेबद्दलची आपली वेदना व्यक्त करतात.
ह्युजेस म्हणतात की बायसनच्या कवटीच्या ढिगाऱ्याच्या फोटोमागील संदेश कालांतरानं हरवला आहे.
ह्युजेस पुढे म्हणतात की या फोटोमध्ये एक सोपा संदेश आहे, ज्यामुळे फोटो पाहणाऱ्याला भूतकाळाबद्दल दु:ख वाटू शकतं. "मात्र ज्या पद्धतीनं वसाहतवाद आणि वसाहतवादी व्यवस्था आपलं पर्यावरण आणि आपल्या आयुष्याला नकारात्मकपणे आकार देते आहे" त्या गोष्टीचा सामना करण्यास तो फोटो दर्शकाला भाग पाडत नाही.
त्या पुढे म्हणतात, "त्याहूनही अधिक, उत्पादनांचे ग्राहक हे वसाहतवादाला चालवणारं इंजिन कसे आहेत या गोष्टीकडे हा फोटो लक्ष वेधतो."

ह्युजेस म्हणतात, "जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अमानवीय बनवत असाल किंवा एखाद्या सजीवाकडे तुम्ही 'नैसर्गिक संसाधनं' म्हणून पाहत असाल, तर त्यातून तुम्ही स्वत:मधील माणुसकीचा अभाव दाखवला आहे आणि तुमच्या सभोवतालच्या जगाशी नातं ठेवत जगणं म्हणजे काय याबद्दलचा तुमचा गैरसमज दाखवून दिला आहे."
ह्युजेस पुढे म्हणतात, "लोकांना हा महत्त्वाचा संदेश दिला पाहिजे. कारण ही एक सतत अस्तित्वात असलेली समस्या आहे, ती काही फक्त इतिहासातील एक समस्या नाही."
गोष्ट जरी बायसनच्या कत्तलीची असली तरी मूळ विषय पर्यावरण, सजीवसृष्टीबाबतच्या मानवी अविवेकीपणाचा आहे. त्यामुळेच हा मुद्दा आज देखील तितकाच महत्वाचा आहे. म्हणूनच इतिहासातील भयावह सत्य जाणून घेताना वर्तमानातील वस्तुस्थिती विषयी सजग राहण्याची नितांत आवश्यकता लक्षात येते. कारण हे कटू सत्य फक्त बायसनपुरतंच मर्यादित नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











