स्वत:च्या बैलाला काम मिळावं म्हणून गावातली 70-80 गुरं ठार केली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमरेंद्र यरलागड्डा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आंध प्रदेशातल्या नंदयाल जिल्ह्यातल्या धोने तालुक्यातल्या कमलापुरम गावात होणाऱ्या गायी आणि बैलांच्या मृत्यूचं रहस्य अखेर उघडकीस आलं आहे. गेल्या चार वर्षांत 80 गायी आणि बैलांचा या गावात मृत्यू झाला होता.
गावातल्या एका गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून या सगळ्या प्रकरणाचा पत्ता लागला. गावातलाच एक माणूस गोठ्यात उडी मारताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि थोड्याच वेळात गोठ्यातल्या वासराचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी शंकराचारी नावाच्या एका माणसाला अटक केली आहे.
शेतीच्या आणि इतर कामांसाठी गावकऱ्यांनी त्याच्याच बैलाचा वापर करावा या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचा संशय आहे.


नेमकं प्रकरण काय?
कमलापुरम गावातल्या बुग्गना शिवरामी रेड्डी यांच्या एका वासराचा 14 नोव्हेंबरला मृत्यू झाला. मृत्यूमागचं नेमकं कारण समजलं नाही.
अशा पद्धतीनं अचानकपणे गावात याआधीही अनेक गाय, बैल आणि वासराचे मृत्यू झाले होते. पशूंमध्ये एखादा नवा, माहीत नसलेला आजार असेल असंही गावकऱ्यांना वाटत होतं.
पहिल्यांदा वासराला साप चावल्यानं मेला असा समज झाल्याचं बुग्गना शिवरामी रेड्डी बीबीसीशी बोलताना सांगत होते.
"त्या दिवशी सकाळी आम्ही मक्याच्या शेतात काम करत होतो. वासराला घरीच बांधलं होतं. दुपारी घरी आलो तर वासरू मरून पडलं होता. तेव्हा साप चावल्यानं मेला असेल असं आम्हाला वाटलं," रेड्डी सांगत होते. आम्हाला कोणाबद्दल कसली शंकाही आली नाही, असंही ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Sivaramireddy
काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात पंपाच्या मोटारीची चोरी झाली होती. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला. वासरू मेल्यावर तिथलं फुटेज त्यांनी पाहिलं तेव्हा सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनी शंकराचारी भिंतीवरून उडी मारून आल्याचं त्यांना दिसलं.
“आम्ही घरी नाही हे त्याला माहीत असावं. येताना त्याच्या हातात काहीतरी होतं. जाताना हात रिकामे होते,” रेड्डी म्हणाले. शंकाराचारी यांनीच वासराला विष दिलं असल्याची शंका त्यांना आली.
रेड्डी यांच्या घरातल्या सीसीटीव्हीचं हे फुटेज बीबीसीनंही पाहिलं. पण त्यात शंकराचारी यांच्या हातात काय आहे हे नेमकं कळत नाही.
शिवरामी रेड्डी आणि गेल्या चार वर्षांत ज्यांच्या पशूंचे असे अकस्मात मृत्यू झालेत त्या गावकऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी 22 नोव्हेंबरला तक्रार नोंदवून घेतली.
शंकराचारी यांच्याजवळ एक बैल आहे. नांगरासाठी, गायींना गाभण ठेवण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी गावकऱ्यांनी आपल्याच बैलाचा वापर करावा असं त्यांना वाटत होतं. त्यातून त्यांची मिळकतही वाढली असती. म्हणून त्यांनी गावातल्या इतर गायी आणि बैलांना विष दिलं, अशी ही तक्रार आहे.
त्यानुसार पोलिसांनी शंकराचारी याला अटकही केली.
लॅब चाचणीतून काय समोर आलं?
कमलापुरम आणि आसपासच्या गावातून जवळपास 80 गाय आणि बैलांचे मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
हा आकडा नेमका किती आहे याची स्वतंत्र तपासणी बीबीसीने केलेली नाही.
ग्रामस्थांच्या सांगण्यावरून तक्रार नोंदवून घेतली आहे आणि तपास सुरू आहे असं धोनेचे पोलीस निरीक्षक राकेश यांनी सांगितलं.
"प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या तरी संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. वासराच्या मृत्यू कशामुळे झाला हे फोरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच कळेल. अस्थिमज्जेत विषारी पदार्थाचे कण उरले असतील तरच काही ठोस पुरावा हाती लागेल असं पशूपालन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
"गावकरी सांगतात त्याप्रमाणे गेल्या चार पाच वर्षात झालेल्या 70 ते 80 बैल, गायी आणि वासराच्या मृत्यूलाही शंकराचारीच जबाबदार आहे का याचाही तपास घेतला जाईल,” असं राकेश म्हणाले.

फोटो स्रोत, sivaramireddy
शंकराचारी याची विचारपूस केल्यानंतर पाणी पिण्यासाठी, लोखंड चोरण्यासाठी भिंतीवर उडी मारून घरात गेलो अशी उत्तरे त्याने दिली. त्याच्या हातातील संशयास्पद वस्तू म्हणजे मोबाईल फोन असल्याचं त्याचं म्हणणं आहे, असंही राकेश यांनी पुढे सांगितलं.
फॉरेन्सिकचा रिपोर्ट यायला वेळ लागेल.
पोस्टमॉर्टममध्ये काय आढळून आलं?
वासराची हाडं, पोट, केस आणि खुराचा भाग एकत्र करून विजयवाडा मधल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत असं धोने तालुक्यातल्या पशूपालन विभागातले अधिकारी नागराजू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, UGC
“आम्हाला समजल्यावर गावात जाऊन आम्ही वासराच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं. आत्तापर्यंत समजलेल्या गोष्टींवरून वासराचा मृत्यू ऑरगॅनो फॉस्फरस या कीटकनाशकात असणाऱ्या विषारी पदार्थामुळे झाला असल्याचं आम्हाला समजलं आहे,” असंही नागराजू पुढे म्हणाले.
फॉरेन्सिक रिपोर्टवरून ते अधिक स्पष्ट होईल.
पशूंच्या मृत्यूमागे खरंच काही नवा आजार आहे का? हे पाहण्यासाठी पशूपालन विभागानं कमलापुरममध्ये एक चिकित्सा शिबीराचंही आयोजन केलं होतं.
“या शिबिरादरम्यान आम्ही पशूंची तपासणी केली. त्या भागात कोणताही आजार नसल्याचं आम्हाला दिसलं. पण पशू अनाकलनीय पद्धतीने मरत आहेत असं ग्रामस्थ सांगत होते. गेल्या काही वर्षात हे खूप पहायला मिळालं,” असं नागराजू म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











