तीन दिवसात 10 हत्तींचा मृत्यू, बांधवगड नॅशनल पार्कमधील हत्तींच्या मृत्यूमागे 'कोदो' की आणखी काही?

हत्ती

फोटो स्रोत, Vishnukant Tiwari/BBC

फोटो कॅप्शन, 29 ऑक्टोबरला चार हत्ती मृतावस्थेत सापडले होते.
    • Author, शुरैह नियाझी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

मध्य प्रदेशातील बांधवगड नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लागोपाठ 10 हत्तींचा मृत्यू झाला आहे. या हत्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दल अजूनही स्पष्ट झालं नाहीय.

हत्तींच्या या लागोपाठ झालेल्या मृत्यूंबाबत वन विभागानं जे प्राथमिक निष्कर्ष काढले, त्यानुसार कोदो (Kodo) च्या पिकाला कवक (Fungus) लागल्यामुळे त्यातून विष निर्माण होतं. हत्तींनी हे विषयुक्त कोदो खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. कोदो हा एक धान्याचा किंवा मिलेट्सचा प्रकार आहे.

बांधवगड टायगर रिझर्व्हचे उपसंचालक पी. के. वर्मा यांनी सांगितलं की, "अजून आम्ही पूर्ण तपास अहवालाची वाट पाहत आहोत. या अहवालातूनच हत्तींच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, हे स्पष्ट होईल. सध्यातरी असं दिसतं आहे की, कोदो खाल्ल्यामुळे हत्तींना विषबाधा झाली."

या घटनेबाबत मध्य प्रदेशातील विरोधी पक्षांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

हे वन विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडलं असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.

तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

तीन दिवसात 10 हत्तींचा मृत्यू

वन विभागानुसार, सर्वात आधी 29 ऑक्टोबरला वन विभागाच्या टीमला 4 मृत हत्ती सापडले, तर इतर 6 हत्ती गंभीररित्या आजारी होते. आजारी हत्तींवर उपचार सुरू होते.

मात्र, दुसऱ्याच दिवशी मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे आणखी 4 हत्तींचा मृत्यू झाला, तर 31 ऑक्टोबरला उर्वरित 2 हत्तींचा देखील मृत्यू झाला.

हे सर्व हत्ती 13 हत्तींच्या कळपाचा भाग होते. या कळपातील उरलेले 3 हत्ती निरोगी आहेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं आहे.

एकाचवेळी 10 हत्तींचा मृत्यू होण्याचं हे देशातील पहिलंच प्रकरण आहे. त्यामुळे राज्य सरकारपासून ते केंद्र सरकारच्या पातळीपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होते आहे, तपास होतो आहे.

हत्तीचा संग्रहित

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हत्ती

सध्या बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये स्पेशल टास्क फोर्स, वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाचे डॉक्टर आणि तज्ज्ञ या हत्तींच्या मृत्यूमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

जबलपूरच्या स्कूल ऑफ वाईल्डलाईफ फॉरेन्सिक अँड हेल्थ च्या डॉक्टरांनी हत्तींचं शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टम) केलं आहे. आता शवविच्छेदनाच्या विस्तृत अहवालाची वाट पाहण्यात येते आहे.

बांधवगड टायगर रिझर्व्हचे उप संचालक पी. के. वर्मा म्हणाले, "हा अहवाल दोन-तीन दिवसात येऊ शकतो. अर्थात, यासाठी एरव्ही अधिक कालावधी लागतो. मात्र, आता हा अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत."

दरम्यान, शनिवारी (2 नोव्हेंबर) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं यासंदर्भात एक टीम नियुक्त केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोनं ही टीम तयार केली आहे. ही टीम स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास करणार आहे.

हत्तींच्या मृत्यूमागे कोदो की आणखी काही कारण?

मुख्य वन रक्षक (वाईल्ड लाईफ) व्ही एन अम्बार्ड यांनी पत्रकारांना प्राथमिक माहिती देताना सांगितलं की, "शव विच्छेदनाच्या वेळेस मृत हत्तींच्या पोटात कोदो पीकाचे दाणे मिळाले. ते दाणे मृत्यूमागचं कारण असू शकतात. याआधी देखील मध्य प्रदेशात दूषित धान्य किंवा मिलेट्समुळे वनजीवांचा मृत्यू झाल्याच्या किरकोळ घटना घडल्या आहेत."

यासंदर्भात अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आयव्हीआरआय बरेली, डब्ल्यूआयआय देहरादून, स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅब सागर इत्यादींसह या क्षेत्रातील इतर तज्ज्ञ संस्थांशी चर्चा सुरू आहे. कोदो विषारी असण्याच्या शक्यतेचाही तपास केला जातो आहे.

दरम्यान, वन विभागानं या परिसरातील कोदोच्या पिकाला नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाचं म्हणणं आहे की कोदोच्या पिकाला दोन दिवसांत नष्ट केलं जाईल. त्याचबरोबर त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.

याशिवाय, ही घटना जिथे घडली तिथून 5 किलोमीटर परिघात तपास केला जातो आहे. परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये एखादा विषारी पदार्थ तर नाही ना याची देखील तपासणी केली जाते आहे.

हत्ती

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कोदो विषारी होतं का, याचादेखील तपास केला जातो आहे. (प्रातिनिधिक फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्टेट टायगर स्ट्राईक फोर्स, वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि राज्याचे वन मंत्री रामनिवास रावत यांनी पाच सदस्यांच्या एसआयटीची स्थापना केली आहे.

तर स्टेट वाईल्डलाईफ बोर्डाचे सदस्य असलेल्या संतोष शुक्ला यांनी देखील हत्तींच्या मृत्यूबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले, "या प्रकारे एकाच वेळी 10 हत्तींचा मृत्यू होण्याची घटना याआधी कधीही घडलेली नाही. या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. कारण अद्याप हत्तींच्या मृत्यूमागचं कारण स्पष्ट झालेलं नाही."

संतोष शुक्ला असंही म्हणाले की, या प्रकरणात शिकाऱ्यांच्या सहभाग तर नाही ना, याचाही तपास झाला पाहिजे.

मध्य प्रदेशातील वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांचं म्हणणं आहे की पारंपारिकदृष्ट्या कोदोचा समावेश हत्तींच्या आहारात असतो. त्यामुळे कोदोमुळे मृत्यू झाला असण्याची शक्यता फारच कमी आहे.

ते म्हणाले, "जर तुम्ही हत्ती ज्या भागात वावरतात तो भाग पाहिला तर बहुतांश भागात आदिवासी भागात लागवड केले जाणारे कोदो-कुटकी ही पिकं दिसतील. छत्तीसगड पासून ते मध्य प्रदेश आणि झारखंडपर्यंत हत्ती कोदो-कुटकी खातात."

"त्यामुळे कोदो खाल्ल्यामुळे 10 हत्तींचा मृत्यू झाला असल्याच्या सरकारी दाव्यात फारसं तथ्य दिसत नाही. हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे आणि याची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे."

बांधवगड नॅशनल पार्क आणि माणूस-वन्यजीव संघर्ष

बांधवगड नॅशनल पार्क मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात 1,536 चौ. किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिसरात विस्तारलेलं आहे. वाघांच्या मोठ्या संख्येसाठी हे नॅशनल पार्क जगभरात प्रसिद्ध आहे.

2018-19 या वर्षात जवळपास 40 जंगली हत्तींचा एक कळप ओडिशा आणि छत्तीसगडच्या मार्गे इथे आला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, सध्या मध्य प्रदेशात जवळपास 150 हत्ती आहेत. यातील जवळपास 70 हत्ती एकट्या बांधवगड नॅशनल पार्कमध्ये राहतात.

हा परिसर माणूस आणि वन्यजीवांमधील संघर्षासाठी सुद्धा परिचित आहे. इथे हत्तींबरोबरच वाघ आणि अस्वलाबरोबरच्या संघर्षाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

शनिवारीच (2 नोव्हेंबर) एका जंगली हत्तीनं तीन जणांना पायदळी तुडवलं होतं. यात दोन जणांचा मृत्यू झाला.

कोदोचं पीक नष्ट केलं जातं आहे.

फोटो स्रोत, S Shukla

फोटो कॅप्शन, कोदोचं पीक नष्ट केलं जातं आहे.

संतोष शुक्ला यांना वाटतं की, माणूस आणि वन्यजीवांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि त्याच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे याप्रकारचे संघर्ष किंवा घटना घडत आहेत.

वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे म्हणतात की, "आज हत्तींनी दोन जणांना मारलं आहे. आता या घटनेमुळे लोक अधिक हिंसक होतील. बांधवगडमधील जे फील्ड अधिकारी आहेत, त्यांना माणूस-वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या व्यवस्थापनाची माहिती नाही. हा त्याचाच परिणाम दिसतो आहे."

अजय दुबे पुढे म्हणतात, "हा भारतासाठी देखील चिंतेचा विषय आहे. कारण वन्यजीव, नॅशनल पार्क यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार असल्याचं देश मानतो. या प्रकारच्या घटनांमुळे फक्त पर्यटनावरच नकारात्मक परिणाम होणार नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या देशाच्या प्रतिमेला धक्का बसेल. यातून शिकारी आणि तस्करांना प्रोत्साहन मिळेल."

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष काय म्हणाले?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली. त्यात त्यांनी आदेश दिला की घटनेच्या सर्व अंगांचा तपास करण्यासाठी एक उच्चस्तरीय टीम तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात यावी.

मुख्यमंत्री म्हणाले की, "या घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल."

तर विरोधी पक्षांनी देखील सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश आणि मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी सरकारवर टीका केली आहे आणि ही घटना वन विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडली असल्याचं म्हटलं आहे.

हत्ती

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

जयराम रमेश यांनी 30 ऑक्टोबरला सोशल मीडियावर लिहिलं, "मध्य प्रदेशातील बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये 7 हत्तींचा मृत्यू झाल्याची आणि 2 किंवा 3 हत्तींची स्थिती गंभीर असल्याची बातमी खूपच धक्कादायक आहे."

"यामुळे एका फटक्यात बांधवगडमधील हत्तींची संख्या 10 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घटनेची तात्काळ संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केली गेली पाहिजे."

मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना लिहिलं की, "दिवाळीच्या अगोदरच भगवान गणेशाचं प्रतीक असलेल्या दहा हत्तींचा बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये मृत्यू होणं, ही खूपच दुखद घटना आहे. आपण गणपतीची पूजा करतो. मात्र मध्य प्रदेश सरकार हत्तींचं संरक्षण करू शकलं नाही."

"या घटनेमागे काहीही कारण असो, यात वन विभागानं सर्वाधिक बेजबाबदारपणा दाखवला आहे. छत्तीसगड आणि कर्नाटकातून स्थलांतरित होऊन आलेल्या हत्तींची योग्य ती काळजी वन विभागानं घेतली नाही."

(बीबीसी प्रतिनिधी विष्णुकांत तिवारी यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.