‘मला हत्तींनी लहानाचं मोठं केलं, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत’

- Author, सुनिथ परेरा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी मोठा होत असताना माझ्याकडे कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी नव्हते. माझ्याकडे हत्ती होते.
जसं रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुकमधला मोगली लांडगे आणि इतर प्राण्यांच्या संगतीत वाढतो अगदी तसंच बालपण मी देखील घालवलं आहे.
मी हत्तींसोबत बोलत, त्यांच्यासोबत फळं खात वाढलो. शिवाय मी त्यांच्याकडून बरंच काही शिकलो.
ज्याप्रमाणे मोगली बघिराच्या पाठीवर स्वार व्हायचा तसंच मी देखील सूर्यास्ताच्या वेळी अंघोळीनंतर हत्तीच्या पाठीवर बसून घरी यायचो."
माझ्यासाठी हत्ती प्राण्यापेक्षाही जास्त होते. आमच्यात एक भावनिक बंध तयार झाले होते.
माझं बालपण 2 कोटी 20 लाख लोकसंख्येच्या देशातील एका लहानशा खेड्यात गेलं. माझं गाव रत्नपुरा हे दक्षिण श्रीलंकेत आहे. माझ्या कुटुंबाकडे पाळीव हत्तींचा कळप होता.
माझ्या आजोबांनी पाच हत्ती पाळलेले होते. यांपैकी दोन माद्या आणि तीन नर होते. यातला एकदंत नावाचा टस्कर हत्ती कळपाचा अभिमान होता.
दक्षिण आशियामध्ये टस्कर्स जातीचे हत्ती अतिशय मौल्यवान आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. कारण सर्वच आशियाई हत्तींमध्ये लांब सुळे असतातच असं नाही. श्रीलंकेतील वन्यजीव विभागाच्या मते त्यापैकी फक्त 2% टस्कर्स श्रीलंकेत आहेत.
पण मला कधीच एकदंतचं अप्रूप वाटलं नाही. मी नेहमीच मनिकेच्या पाठीवर स्वार व्हायचो कारण मला ती आवडायची. ती कळपातील लहान मादी होती.
'मनिके' म्हणजे मौल्यवान किंवा आदरणीय स्त्रीसाठी वापरला जातो.
हत्तींसोबत अंघोळ
माझ्या घराजवळून एक नदी वाहायची. आमचे आजोबा या हत्तींना रोज संध्याकाळी अंघोळीसाठी नदीवर घेऊन जायचे आणि त्यांच्यासोबत मी देखील जायचो.

पण मी जसजसा मोठा होत गेलो तशी त्यांची देखरेख करण्याची जबाबदारी देखील माझ्यावर पडली. हत्तींची काळजी घेणाऱ्यांना माहूत म्हटलं जातं. हे हत्ती अंघोळ करताना दुसऱ्या हत्तीला दुखापत तर करत नाहीत ना, हे बघण्यासाठी मला त्यांच्या सोबत जावं लागायचं.
अंघोळीला सुरुवात झाली की, मनिके खाली झोपायची आणि तिचा माहूत प्रेमरथना तिच्यावर पाणी शिंपडून तिचं अंग नारळाच्या काथ्याने घासायचा.
त्याआधी तो त्याचे दोन्ही हात जोडून तिला नमस्कार करायचा.
मध्यमवयीन प्रेमरथना उंचीला कमी होता. मनिकेने त्याला लाथ मारल्यामुळे त्याचा अगदी समोरचा दात पडला होता.
तो क्वचितच त्याचा आसूड वापरायचा. आपल्या हत्तीला झोपलेल्या अवस्थेतून उठवण्यासाठी 'दाहा' म्हणावं लागायचं. मग हत्ती उठून चालायचे. प्रेमरथना मनिकेला उठवण्यासाठी हलक्या आवाजात 'दाहा' म्हणायचा.
पण मनिके त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करायची.
तो तिला परत परत आज्ञा द्यायचा आणि ती ही मुद्दाम त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पडून राहायची.
तो तिला घाबरवण्यासाठी काठी शोधल्याचं नाटक करायचं, की जणू काही तो आता तिला मारणारच आहे.
पण ती तरीही उठायची नाही. यावर अक्षरशः प्रेमरथना रडकुंडीला येऊन म्हणायचा की, "मी आता तुला पुन्हा सांगणार नाही...तू (हत्ती) बहिरी झाली आहेस का?"

पण मला माहित होतं तो कधीच मनिकेला दुखावणार नाही. निदान माझ्या समोर तरी नाही.
मी आपला नदीकाठच्या एका दगडावर बसून रोजचं हे नाटक पहायचो. मला देखील ते बघायला आवडायचं.
सुमारे 10 - 15 मिनिटं ओरडल्यानंतर मनिके उठायची, तिच्या सोंडेत पाणी घेऊन अंगावर फवारायची आणि मग घराकडे चालू लागायची.
जाताना मी तिला नम्रपणे म्हणायचो की, "मनिके, मला तुझा हात दे"
ती अलगद तिचे पुढचे पाय मुडपून मला तिच्यावर स्वार होण्यासाठी परवानगी द्यायची आणि मी तिच्यावर बसून घराकडे निघायचो.
तिचं शरीर जरी ओलं असेल तरी मी तिच्यावर स्वार व्हायचो, कारण मला माहिती होतं की, घरी जाईपर्यंत माझे कपडे सुकणार आहेत.
पण कधी-कधी माझ्या पायघोळातून सुयांची टोकं टोचल्यासारखे तिचे केस मला टोचायचे.
आम्ही घराकडे जाताना लोक आमच्याकडे बघतच राहायचे कारण लहान मुलगा हत्तीवर स्वार झालेला पाहून त्यांना आश्चर्य वाटायचं.
आम्ही घरी आल्यावर मनिके मला न विचारताच तिचे दोन्ही पाय वर उचलून मागच्या बाजूने मला उतरू द्यायची.
ऐश्वर्य दाखविण्याचं साधन
श्रीलंकेच्या श्रीमंत अभिजात वर्गासाठी हत्ती बाळगणं हे त्यांची सामाजिक स्थिती दाखवण्याचं एक साधन होतं.
पण या प्रतिष्ठेबरोबरच हत्ती कामासाठी आणि बौद्ध मिरवणुकीत सहभागी करण्यासाठी ठेवले जायचे.
1970 मधील हत्तींच्या राष्ट्रीय गणनेनुसार, 378 मालकांकडे 532 हत्ती होते.
पण आज श्रीलंकेत केवळ 47 लोकांकडेच हत्ती असून त्यांची संख्या 97 इतकी असल्याचं कॅप्टिव्ह एलिफंट ओनर्स असोसिएशनचे सचिव सांगतात.
श्रीलंकेतील अनेक मुलांप्रमाणे मी देखील एप्रिल महिना कधी येतोय याची वाट पाहायचो. हा माझा आवडता महिना होता.
हा महिना सिंहली हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो आणि याच महिन्यात शाळांना सुट्ट्या लागतात.

माझ्या वयाची बरीच मुलं नवीन कपडे आणि भेटवस्तू मिळणार म्हणून खूश असायचे. पण मी मात्र हत्ती येणार म्हणून खूश व्हायचो. हे हत्ती जंगलात लॉगिंग साइट्सवर मोठ्या झाडांची खोडं उचलण्याच्या कामावर गेलेले असायचे.
एप्रिल महिन्यात या लॉगिंग साइट्स तात्पुरत्या बंद केल्या जायच्या. त्यामुळे हत्ती काही दिवसांसाठी घराकडे परतायचे. कधीकधी दुर्गम भागातून परत येण्यासाठी त्यांना कित्येक आठवडे लागायचे.
घोट्यांभोवती साखळदंड आणि गळ्यात लटकलेल्या घुंगरांच्या आवाजाने हत्ती आल्याची वर्दी मिळायची.
घराजवळ येताच त्यांचा वेग वाढायचा. त्यामुळे साखळदंड आणि घंटाचा जोरदार आवाज व्हायचा.
घरी परतणाऱ्या हत्तींच्या स्वागतासाठी मुख्य दरवाजात केळी, उसाच्या कांड्या, समुद्री मीठ किंवा चिंच ठेवलं जायचं
ते त्यांची सोंड घरात ठेऊन आम्हाला त्यांच्या सोंडेनेच स्पर्श करायचे आणि आणखीन खाऊ शोधायचे.
मनिके नेहमी माझ्याकडे झुकायची. आणि खाऊ दिला की, तिचे कान फडफडून प्रेम दाखवायची.
हत्तीच्या मलमूत्राच्या वासाने माझ्या सुट्टीची सुरुवात झालेली असायची.
लॉगिंग साइट्सवर परत जाण्यापूर्वी हत्ती काही आठवडे घरामागील गोठ्यात विश्रांती घ्यायचे.
त्यांना घरी सुरक्षित वाटायचं, ते तासनतास झोपून घोरायचे.
मला हा आवाज खोल आणि लयबद्ध आवाज वाटायचा. यादरम्यान त्यांचे सुपासारखे कान हलकेच फडफडायचे. हे दृश्य खूप सुखावणारं असायचं.

आणि त्यांच्या आजूबाजूला अन्न असल्याचा वास आला तरी ते एक विशिष्ट आवाज काढायचे.
कोणत्याही गोष्टीपेक्षा मला त्यांचा हा आवाज ऐकणं खूप आवडायचं. विशेषत: अंधारात.
चांदण्या रात्री देखील मला दूरवरून हत्तीचं ठसठशीत कपाळ दिसायचं. त्यामुळे मी एकटा नाहीये हे मला माहीत असायचं.
साखळदंडातील जीवन
पाळीव हत्तींना अनेकदा त्यांचं संपूर्ण आयुष्य साखळदंडात कंठावं लागायचं.
श्रीलंकेत अशी एक समजूत आहे की, पूर्वीच्या जन्मात हे हत्ती मनुष्य होते. त्यांच्यावर त्यांच्या मालकांचं कर्ज होतं, त्यामुळे त्यांनी या जन्मात हत्ती बनून, त्यांच्यासाठी हे काम करून त्यांचं कर्ज फेडलं.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस श्रीलंकेतील लाकूड उद्योग उतरणीला लागला. त्यामुळे हत्तींपासून मिळणारं उत्पन्न देखील संपुष्टात आलं. आमचे तीन हत्ती त्यांचं "कर्ज" फेडू शकले नाहीत.
मला आठवतंय, मी पाच वर्षांचा असताना आमचा टस्कर एकदंतचा मृत्यू झाला होता.
तो आजारी होता, बरेच महिने त्याच्यावर उपचार सुरू होते. पण त्याला बरं करण्यात यश आलं नाही. त्याला आमच्या अंगणात पुरण्यात आलं.
पैशासाठी रपेट
नव्वदच्या दशकाच्या शेवटी लाकूड उद्योगाची जागा नव्या रोजगाराने घेतली होती. विदेशी पर्यटक आल्यावर त्यांना हत्तीवरून रपेट दिली जायची. पुढे या उद्योगाची भरभराट झाली.
मी तेव्हा आठव्या इयत्तेत होतो. मनिकेला आमच्या घरापासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या उत्तर श्रीलंकेतील हबराना या ठिकाणी पाठवण्यात आलं.

तिच्या संपूर्ण आयुष्यात ती कधीच लॉरीमध्ये बसली नव्हती. यावेळी मात्र तिने लॉरीतून प्रवास केला.
नेहमीप्रमाणे प्रेमरथनाने तिला लॉरीत जाण्यासाठी आवाज चढवला.
पण यावेळी तिने त्याचं न ऐकून घेण्याचं नाटक केलं नव्हतं. ती खरोखरच खूप घाबरली होती. तिला वारंवार शौचाला येत होती, यावरून तिला आलेला तणाव दिसत होता.
सुरुवातीला, तिने तिचे पुढचे पाय ट्रकवर ठेवले. पण तिने लॉरीवर चढण्यास ठामपणे नकार दिला आणि तिचे मागचे पाय जमिनीवर ठेवले.
अनेक तासांच्या धडपडीनंतर अखेर ती लॉरीमध्ये बसली. तोपर्यंत ही घटना बघण्यासाठी रस्त्याच्याकडेला अनेक लोक जमले होते.
ती लॉरीतून जात होती, पण ती पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत मी तिला दुरून पाहत होतो.

तिला दूर नेत असल्याने मी खूप अस्वस्थ झालो होतो. मी स्वतःशीच पुटपुटलो आणि म्हणालो, "आपण लवकरच भेटू."
शेवटची वर्षं
आम्ही वर्षातून एक किंवा दोनदा मनिकेला भेटायचो. प्रत्येक एप्रिल महिन्यात ती काही आठवडे घरी परतायची. आता तिला लॉरीतून प्रवास करायची सवय झाली होती.
एव्हाना ती साठ वर्षांची झाली होती, पण हत्तींसाठी कुठे आलीय निवृत्ती.
ते त्यांच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत काम करत राहतात.
अखेरीस माझ्या वडिलांनी मनिकेला घरी परत आणण्याचा निर्णय घेतला. तिची देखभाल करणं खर्चिक असलं तरी आम्ही तिला पुन्हा कामावर पाठवलं नाही.
2006 च्या शेवटी तिला आमच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारळाच्या बागेत पाठवण्यात आलं. तिथे तिच्यासाठी भरपूर अन्न होतं.
हा तिचा शेवटचा प्रवास असेल हे तिला किंवा मला, आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं.
काही दिवसांनंतर मनिके आजारी पडली. तिच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र आम्ही लगेचच तिला भेटायला गेलो.
ती एका मोठ्या नारळाच्या बागेत पहुडलेली होती.
उठण्याइतपत देखील ताकद तिच्यात उरली नव्हती. पण त्या शेवटच्या क्षणी देखील तिने तिच्या सोंडेने आम्हाला स्पर्श केला. जणू काही ती तिचा खाऊच शोधत असावी.

मी तिच्या कपाळाला हात लावला, तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ती लवकर बरी होईल या आशेने आम्ही अंधार पडल्यानंतर घरी परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला फोन आला, मनिके आता आमच्या कर्जातून उतराई झाली होती.
तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिच्या अंत्यसंस्काराला मी एकटाच गेलो होतो. बौद्ध भिक्खूंना अंतिम संस्कार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मनिके नारळाच्या बागेच्या मध्यभागी एकटीच पडली होती, तिचा चेहरा पांढर्या कपड्याने झाकलेला होता.
एका युगाचा अंत
मनिके माझी आयुष्यभराची सोबती होती. माझं संगोपन करण्यासाठी आणि माझ्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केलं असलं तरी, तिनेच त्यासाठी घाम गाळला होता.
मी तिच्या रक्ताचा नसेन, पण मला वाटतं की तिनेच मला वाढवलं.
मी पुन्हा या भूतलावर मनिकेला कधीच भेटू शकणार नाही. पण लंडनच्या गजबजलेल्या रस्त्यावरून बीबीसीच्या कार्यालयात जाताना माझ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा उफाळून येतात.
मनिकेचा चेहरा आठवून माझं मन भरून येतं, मला अविरत शक्ती मिळते पण त्याचवेळी माझ्या मनात अपराधीपणाची भावना येते.
मी तिच्यावर खूप प्रेम करायचो, मग मी तिला साखळदंडात का जखडून ठेवलं?
मनिकसोबत 20 वर्षे घालवल्यानंतरही मी तिच्यासोबत कधीही फोटो काढला नाही याचा मला खूप वाईट वाटतं. मी तिला गमावेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.
जर मी तिला पुन्हा भेटलो तर मी तिच्यासोबत नुसता फोटोच घेणार नाही तर तिला साखळदंडातून सोडवीन आणि मुक्तपणे जगू देईन.
शेवटच्या क्षणी मी तिच्या डोळ्यात पाहून धन्यवाद देईन.
आणि जर खरोखरच मृत्यूपश्चात देखील एखादा जन्म असेल तर मी खरंच तिच्या कर्जाची परतफेड करेन.
गुडबाय, मनिके.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








