केरळ हत्तीण: फळांमध्ये स्फोटकं भरून शेतात का ठेवली जातात?

फोटो स्रोत, MOhan krishnan
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बंगळुरूहून बीबीसी हिंदीसाठी
केरळमध्ये शेतात वन्यप्राण्यांना येण्यापासून रोखण्यासाठी कमी तीव्रतेची स्फोटकं मांस किंवा अननसमध्ये टाकून खायला घालणं, हे नियमित होत असतं. त्यात नवीन असं काहीच नाहीय. या प्रकाराला मल्याळममध्ये ‘पन्नी पडकम’ म्हटलं जातं.’पिग क्रॅकर’ असा या त्याचा अर्थ आहे.
ही स्फोटकं स्थानिक पातळीवरच बनवली जातात. बऱ्याचदा घरातीलच साहित्यापासून किंवा सणांवेळी आणलेल्या फटाक्यांपासून ही स्फोटकं बनवतात.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांना शेतातून हुसकावून लावण्यासाठी स्फोटकं किंवा इतर विविध प्रकारांचा वापर केवळ केरळमध्ये होत नाही, तर संपूर्ण भारतात होतो.
वाईल्डलाईफ सायन्स कॉलेज ऑफ फॉरेस्ट्रीचे माजी प्राध्यापक डॉ. जेकब चिरन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “ही स्फोटकं हत्तीसाठी नसतात. रानडुकरांसाठी असतात. रानडुक्कर शेतात घुसून पार नासधूस करतात. आणि हे काही नवीन नाहीय.”
केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील मन्नारकडमध्ये स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्ल्यानं एका गरोदर हत्तिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरातली प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्वीट करून सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि तीन संशयितांवर चौकशीचा रोख आहे.
एका अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितलं की, “सध्या आम्ही दोन संशयितांची चौकशी करत आहोत. आतापर्यंत कुणालाच अटक केलेली नाही.”
पीक वाचवण्यासाठी उपाय काय?
पल्लकड जिल्ह्यात जशी घटना घडलीय, तशाच घटनेत 18 वर्षांपूर्वी एक हत्ती पूर्णपणे जखमी झाला होता. त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉ. चिरन यांनीच त्याचं ऑपरेशन केलं होतं.
त्यावेळी डॉ. चिरन यांच्यासोबत अनुभवी पशूचिकित्सक प्रा. केसी पणिक्कर आणि डॉ. पीबी गिरीदास होते. या दोघांनी हत्तीला ट्रंक्विलाइज केलं होतं.
डॉ. चिरन सांगतात, “आम्ही हत्तीला वाचवू शकलो नव्हतो. कारण त्या हत्तीच्या जबड्याच्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही भागांना गंभीर जखम झाली होती. अशा जखमा झाल्या असल्यास कुठलाच प्राणी वाचू शकत नाही.”
अशीच स्फोटकामुळे हत्ती जखमी झाल्याची शेवटची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. आठ ते नऊ वर्षांचा हत्ती कोल्लम जिल्ह्यातील पुनालूर फॉरेस्ट डिव्हिजनमधील पठानपूरजवळ स्फोटकांच्या संपर्कात आला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
केरळचे माजी मुख्य वन्यप्राणी अधिकारी डॉ ईके ऐस्वरन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “अशा प्रकारे हत्तीचा मृत्यू साधा सोपा नाहीये. लोक रानडुकरांना पळून लावण्यासाठी विविध शकली लढवतात. साधारणत: हत्ती कॉफी किंवा इतर झाडांना नुकसान पोहोचवत नाहीत. हत्ती फक्त धान्य आणि केळीच्या पिकांना तुडवतात.”
डॉ. ऐस्वरन सांगतता, “रानडुकरं सगळीकडेच आहेत. मात्र, ही डुकरं जखमी झाल्याच्या घटना फारच कमी दिसून येतात. पठानपुरात हत्तीच्या मृत्यूचा अशीच घटना समोर आली होती. तिथे स्थानिक स्तरावरच स्फोटकं तयार केली गेली होती.”
‘सायलंट किलर’
या प्रश्नावर वाईल्डलाईफ फर्स्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रवीण भार्गव म्हणतात, “अजिबात नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यांना स्फोटकांच्या रुपानं बिनबोभाटपणे वापर केला जातोय. यात प्राण्याचा तोंड अडकवण्यासाठीचं जाळं, खड्डा खोदणं आणि खिळ्यांचे जाळे यांचा समावेश आहे. झाडांना लावले जाणारे विषारी पदार्थ सुद्धा प्राण्यांना मारण्यासाठी वापरले जाते. देशभरात अशा क्लृप्त्या वापरून प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते.”
या सर्व प्रकारांना प्रवीण भार्गव ‘सायलेंट किलर’ म्हणतात. हे सर्व हायपरटेंशनसारखं आहे. जर गोळी चालवली गेली, तर सुरक्षारक्षक गोळीचा आवाज आलेल्या दिशेनं धावत येऊ शकतो. त्यामुळे सायलंट शस्त्रांचा वापर केला जातो, जेणेकरून कुणाला काहीच थांगपत्ता लागू नये. हे केवळ केरळमध्येच होतं असं नाही, तर संपूर्ण भारतात हे होत असतं.
मानव आणि वन्यजीवांमधील वाढता संघर्ष
भार्गव म्हणतात, “जंगल कमी कमी होत असल्यानं मानव आणि वन्यजीवांमध्ये संघर्ष वाढू लागलाय. कारण आपल्याकडे जमिनीसाठी ठोस धोरण नाहीय. ज्यांना सामाजिक न्यायाची गरज आहे, अशांना सुविधा देऊन जंगलापासून दूर केलं जाऊ शकेल, असं धोरण आपल्याकडे नाहीय. लोकांनाही सुरक्षित राहायचंय आणि वन्यजीवांनाही. याला लँडस्केप प्लॅनिंग म्हणतात, जी आपल्याकडे होतच नाहीये.”

फोटो स्रोत, MOhan krishnan
“दोन प्रकारचे धोके आहेत, एक म्हणजे, शिकार आणि स्फोटकांसारख्या शस्त्रांचा वापर. सध्या अस्तित्वात असलेले कायदे या गुन्ह्यासाठी पुरेशे आहेत. मात्र, या कायद्यांची नीट अंमलबजावणी करणं हा मुद्दा आहे. दुसरी समस्या आहे, आपण कशाप्रकारे वन्यजीवांच्या जागेवर कब्जा करत चाललोय. माणसांच्या दबावामुळं वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय.”
अर्थात, मानव आणि वन्यजीव यांच्यातील हा संघर्ष पूर्णपणे थांबू शकत नसला, तरी कमी नक्कीच केला जाऊ शकतो, असं भार्गव म्हणतात.
पिनराई विजयन यांचं राजकीय टीकांना उत्तर
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या घटनांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. जलवायू परिवर्तन कदाचित स्थानिक लोक आणि प्राणी यांच्यावर परिणामकारक ठरतंय.”
भाजप नेत्या मेनका गांधी यांचं नाव न घेता विजयन म्हणाले, “या घटनेलाही काही लोकांनी द्वेषाच्या राजकारणाचा मुद्दा बनवून अभियान चालवलं. मुद्दामहून चुकीच्या गोष्टी तयार केल्या आणि सत्य लपवून खोटंच पसरवलं गेलं. काही लोकांनी तर या घटनेच्या आडून कट्टरता सुद्धा पसरवण्यचा प्रयत्न केला. हे बरोबर नाही.”
अन्यायाविरोधातील आवाजाचा आदर करणारा केरळचा समाज आहे, असंही विजयन यांनी त्यांच्या आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








