केरळ हत्तीण मृत्यू: भाजप नेत्या मेनका गांधी यांच्याविरोधात FIR दाखल

मेनका गांधी

फोटो स्रोत, Getty Images

केरळमध्ये एका गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूनंतर आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप नेत्या मेनका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर मल्लापुरमच्या लोकांबाबत आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्याचा आरोप आहे.

सुमारे सहा तक्रारदारांपैकी दोन जणांनी बीबीसी हिंदीसोबत बातचीत केली. मल्लापुरमबाबत त्यांचं वक्तव्य चुकीचं असून हा जिल्ह्यातील नागरिकांचा अपमान आहे. केरळच्या या जिल्ह्यात मुस्लीम लोकसंख्या जास्त असल्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हत्ती

फोटो स्रोत, MOHAN kRISHNAN

त्यांनी मल्लापुरमच्या लोकांविरुद्ध आणि मुस्लिमांविरुद्ध द्वेष वाढवणारं, जिल्ह्यात धार्मिक सद्भावना आणि शांतता बिघडवणारं काम केलं आहे, असं तक्रारदारांचे वकील सुभाष चंद्रन के. आर. यांनी बीबीसीच्या इमरान कुरेशी यांना सांगितलं.

सुप्रीम कोर्टात वकिलीचं काम करणारे चंद्रन पुढे म्हणतात, "मनेका गांधी मल्लापुरम जिल्हा आणि इथल्या लोकांविरुद्ध चालवण्यात आलेल्या द्वेषाने भरलेल्या अभियानात सहभागी होत्या. केरळमध्ये पल्लकड जिल्ह्यात मन्नारकडमध्ये विस्फोटकांनी भरलेलं अननस खाल्ल्यामुळे एका गर्भवती हत्तिणीचा मृत्यू झाला होता. पण काही लोकांनी याला धार्मिक रंग देऊन ही घटना मल्लापुरमची असल्याचं सांगितलं होतं."

काय होता मेनका गांधींचा आरोप?

केरळमध्ये एका हत्तिणीला अत्यंत क्रूर मृत्यू झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चुकीचे असल्याचे मत एका तज्ज्ञांनी आणि हत्ती पाळणाऱ्या मालकांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

हत्तिणीला मारणं ही एक हत्याच आहे असं सांगून मनेका गांधी यांनी मल्लपुरम जिल्हा त्यासाठी कुप्रसिद्ध असल्याचे सांगितले. दिल्लीमध्ये एका न्यूज एजन्सीला मुलाखत देताना त्यांनी असे आरोप केले आहेत.

त्या म्हणाल्या, "हा भारतातल्या सर्वाधिक हिंसक जिल्ह्यांपैकी एक आहे. इथं रस्त्यांवर विषारी पदार्थ फेकले जातात, ते पदार्थ खाऊन 300-400 पक्षी किंवा अनेक कुत्रे एकाचवेळी मरतात.

तसेच मंदिरांमध्ये जवळपास 600 हत्तींचे पाय मोडून, त्यांना उपाशी ठेवून किंवा पाण्यात बुडवून अथवा गंजलेले खिळे खायला घालून मारले जातात."

कोरोना

यावर हत्तीतज्ज्ञ आणि केरळ वनसंशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. पी. एस. इसा बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, "पाळीव हत्तींची एकूण संख्या 507 इतकी आहे. त्यात 410 नर आणि 97 हत्तीणी आहेत. 2017 साली 17, 2018मध्ये 34 आणि 2019 या वर्षी 14 हत्ती मृत्युमुखी पडले आहेत."

2019मध्ये त्यांनी केरळ उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातील हे आकडे आहेत. 2007 ते 2018 या कालावधीत लोकांच्या क्रौर्यामुळे एकूण 14 हत्तींचे प्राण गेल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

'अशा क्रौर्याबद्दल कधीही ऐकले नाही'

हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराच्या आरोपाबद्दल ते म्हणतात, "हे शक्य वाटत नाही. कारण अशी एखादी घटना घडली तर त्याबद्दल सोशल मीडियावर कोणीतरी लिहिणारच… किंवा गुन्हा नोंदवला गेला असता. माझ्यासमोर आजवर कधीही हत्तीला जाळले, बुडवले अशी घटना आलेली नाही. मी अशा क्रौर्याबद्दल कधी ऐकलेच नाही."

मेनका गांधी यांनी आणखी एक आरोप केला आहे. त्रिचूरमधील इरिंजलकुडा शहरातील कुडालमिनक्यम मंदिरात एका हत्तीला बांधून मारलं जात आहे. त्याचे पाय बांधून चारही दिशांना चार पाय ओढले जात आहेत. मी एक महिन्यापुर्वी तक्रार केली होती पण त्याबद्दल काहीही कारवाई झालेली नाही. लवकरच हा हत्तीसुद्धा मरेल.

एलिफंट्स ओनर फेडरेशन या हत्ती पाळणाऱ्या मालकांच्या संस्थेचे महासचिव पी. शशीकुमार म्हणतात, "कुडलमनिक्यम मंदिर सरकारच्या ताब्यात आहे. तिथं कोणत्याही हत्तीला साखळदंडानं बांधलेलं नाही. जेव्हा हे आरोप झाले तेव्हा मुख्य वनाधिकाऱ्यांनी एक टीम पाठवून तपासणी केली होती. तेव्हा काहीही वावगं आढळलं नाही. हे मंदिर हत्तींचा चांगला सांभाळ करणारं मंदिर म्हणून ओळखलं जातं."

'हत्ती संरक्षणाचं सोंग'

शशीकुमार यांच्यामते गुरुवायूरमध्ये 48 हत्ती आहेत. कोची देवासम बोर्डाकडे 9 हत्ती आहेत. त्रावणकोर देवासम बोर्डाकडे 30 आणि मलबार देवासम बोर्डाकडे 30 हत्ती आहेत.

ते म्हणतात, "सध्या त्यांच्या संस्थेचे 380 सदस्य असून त्यांच्याकडे 486 हत्ती आहेत.

हत्तींनी स्वतःला किंवा भक्तांना जखमी करू नयेत म्हणून त्यांच्या पायांना उत्सवकाळात बांधून ठेवलं जातं. त्यांच्या पायावर त्याचे वळ दिसतात. पण काही वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांना त्यात क्रौर्य दिसतं. जर आम्ही घरात हत्ती ठेवला तरी एखादं कुत्रं बांधून ठेवावं तसं आम्ही हत्तीला बांधून ठेवतो."

ते पुढे सांगतात, "स्वतःला संरक्षणवादी म्हणवणाऱ्यांचा उद्देश मंदिरातील उत्सव रोखणे हा आहे. हे हत्ती त्या उत्सवाचे एक भाग असतात. अशा कोणत्याही प्रकारचा अत्याचार आम्ही करत नसल्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवले आहे. हत्तींचे संरक्षण या नावाखाली भरपूर पैसाही मिळत असतो. हत्ती संरक्षणाच्या नावखाली देखावा सुरु आहे."

हत्तीण

"उत्सवात सामिल होणाऱ्या हत्तींची पूर्ण तरपासणी वन विभागाच्या पशू चिकित्सिकांकडून होते. त्यामुळे जखमी हत्तींना किंवा दारु प्यायलेल्या माहुतांना उत्सवात सहभागी होता येणं अशक्य आहे. अर्थात आजही काही उणिवा आहेत हे मी मान्य करतो."

उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात डॉ. इसा सांगतात, गेल्या दशकभरात हत्तींच्या संख्येत घट झाली आहे. याला हत्ती पाळणाऱ्या मालकांचे अयोग्य नियोजनही कारणीभूत आहे. मालकांनी आपल्याकडच्या हत्तींना वेळेवर खाणं दिलं पाहिजे असंही त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पलक्कड जिल्ह्यात हत्तीणीला अननसात स्फोटके घालून मारण्याची घटना दुर्मिळ आहे असं ते म्हणाले, मेनका गांधी यांनी जिल्ह्याचे नावही चुकीचे घेतल्याचे ते म्हणाले. पलक्कड घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशा घटना खपवून घेऊ नयेत.

मेनका गांधी यांनी केरळचे वनमंत्री के. राजू, अतिरिक्त मुख्य सचिव आणि वन विभागाचे मुख्य संरक्षण अधिकारी यांना मोबाईल नंबर, लॅंडलाइन नंबर ईमेल जाहीर करुन त्यावर फोन करुन लोकांनी तक्रार करावी असे आवाहन केले होते.

आपल्या तक्रारींचं उत्तरही मिळत नाही असा आरोपही गांधी यांनी केला आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घटनास्थळी कोझीकोडवरुन एक विशेष तपासणी पथक पाठवल्याचे आणि दोषींवर पोलिसांनी कडक करावी असे आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)