कोरोना: मुंबईमध्ये पावसाळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढणार - डॉ. प्रदीप आवटे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईत येत्या काळात कोरोना बाधितांचा आकडा वाढणार का, टेस्टिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे का? अशा अनेक प्रश्नांवर बीबीसी मराठीने राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी संवाद साधला.
कम्युनिटी स्प्रेड म्हणजे काय? कोव्हिड-19 ला हरवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, येत्या काळात या आजाराची स्थिती कशी राहील या बाबत डॉ. आवटे यांनी माहिती दिली.
प्र- भारताने आता आकड्यांच्या बाबतीत चीनलाही मागे टाकलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आता आकडे वाढणार असं म्हटलं होतं. तर नजीकच्या काळात आकडे वाढतील अशी अपेक्षा तुम्ही करत आहात का?
उ- येत्या काळात आता जी रुग्णसंख्या आहे त्याच्या दुप्पट रुग्ण असणार आहेत असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढेल. हा व्हायरस नवीन आहे. येणारा काळ मान्सूनचा काळ आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
मुंबईत मोठ्या प्रमाणात आर्द्रताही वाढते. त्याचा परिणाम आणि या वातावरणाशी हा व्हायरस कसा जुळवून घेतो हे आपल्याला अद्याप माहिती नाही. याच काळात स्वाईन फ्लूचे रुग्णही वाढतात. हे दोन्ही विषाणू सारख्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे येत्या काळात वाढ स्वाभाविक आहे असं म्हणायला हरकत नाही.
प्र-त्यासाठी शासन किती तयार आहे असं तुम्हाला वाटतं?
उ- ही लढाई मुख्यतः तीन पातळ्यांवर आहे. पहिली म्हणजे सर्वेक्षण. क्षेत्रीय पातळीवर लोकांचा शोध घेणं हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे तितकी क्षमता तुमच्या प्रयोगशाळांकडे असणं. प्रयोगशाळा संवर्धन हा दुसरा भाग. तिसरा भाग म्हणजे रुग्णालयांची उपलब्धता असणं. काही गंभीर रुग्ण असतील तर त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर असणं.


सध्या आपण त्रिस्तरीय योजना तयार केली आहे. त्यात पायाभूत म्हणजे कोव्हिड केअर सेंटर. त्यामुळे अनेक मंदिरं शाळा, मैदानं यांचं रुपांतर अशा प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये केलं आहे.
रुग्णाच्या लक्षणाची तीव्रता पाहून त्यांना कुठे उपचार घेता येतील ज्यांची लक्षणं सौम्य आहे त्यांच्यासाठी हेल्थकेअर सेंटर तालुकापातळीवर तयार केली आहेत आणि जिल्हापातळीवर कोव्हिड हॉस्पिटल तयार केली आहेत. त्यामुळे आपण एका अर्थाने सौम्य आणि गंभीर अशी व्यवस्था राज्यात केली आहे. आजच्या घडीला दोन हजार अशा प्रकारची रुग्णालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यात दोन लाख खाटा उपलब्ध आहेत. साडेसात हजाराच्या आसपास आयसीयू बेड्सची व्यवस्था उभी केली आहे.
प्र- लॉकडाऊन जसं वाढेल जसं वाढेल तशी रुग्णसंख्या कमी व्हायला हवी होती. मात्र तसं होताना दिसत नाही. हे अडचणीचं वाटत नाही का?
उ- आपल्याकडची सगळी मोठी शहरातली 40 टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता प्रचंड आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे तिथे मोठी वाढ संभवणार आहे. मुंबईसारख्या महानगरात प्रत्येक चौ. किमीवर 20,000 लोक राहतात. त्यामुळे जो आजार शरीरद्रव्यांच्या मार्फत पसरतो तिथे ही वाढ अत्यंत स्वाभाविक आहे.
प्र- आपण कम्युनिटी स्प्रेडला आलो आहोत का?
उ- सध्या आपल्याला कम्युनिटी स्प्रेडची सुरुवातीची चिन्हं दिसत आहेत. अजून मोठ्या प्रमाणात तो सुरू झालेला नाही. त्यामुळे त्या एका विशिष्ट गटात (Cluster) मध्ये सापडत आहेत.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

प्र. मुंबईत कम्युनिटी स्प्रेड झाला आहे हे कबुल करायलाा सरकार मागे पुढे पहात आहे का?
उ- सगळ्यात आधी कम्युनिटी स्प्रेड काय आहे ते पाहूया. ज्या केसेसचं कुठलेच धागेदोरे सापडत नाहीत. त्यांचं साथरोगशास्त्रीय लिंक शोधण्याचा प्रयत्न करता तेव्हा कशाही आणि कुठेही केसेस आढळतात एकाच देशात किंवा प्रदेशात एकूण रुग्णसंख्येच्या 20 ते 30 टक्के रुग्ण अशा प्रकारे आढळत नाही तेव्हा कम्युनिटी स्प्रेड सुरू झालाय असं म्हणता येणार नाही.
प्र- ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या रुग्णांमध्ये लक्षणं आढळली नाहीत त्यांच्या चाचण्या थांबवल्या आहेत. हा एक खूप मोठा धोका नाही का?
उ- याबद्दल काहीतरी गैरसमज झालेला आहे. ICMR ने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपण जे बाधित रुग्ण आहे त्यांच्या संपर्कात येणारे लोक म्हणजे त्यांच्या घरातले लोक, शरीरद्रवाशी संबंध आहे, खाण्याच्या प्लेट शेअर केल्या आहेत. त्यांना आपण निकटच्या जोखमीच्या सहवासी असं म्हणतो. अशा व्यक्तींमध्ये लक्षणं नसतील तर पाचव्या सहाव्या दिवशी आपण त्यांची चाचणी करतो.
प्र- मुंबई, पुणे, ठाणे या शहरांप्रमाणेच आता इतर शहरांमध्येही परिस्थिती गंभीर आहे.
उ- महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यांचे 8 आरोग्य विभाग आहेत. त्या प्रत्येक विभागात आम्ही Rapid regional task force तयार केला आहे. त्यामध्ये आमच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा आणि जागतिक आरोग्य संघटनेतील अधिकारी यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही मंडळी क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे. त्यांच्याशी आम्ही रोज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलतो आहोत. जिथे आपल्याला सुधारणेला वाव आहे त्या करणं दैनंदिन स्वरुपात होत आहेत.
प्र- WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन आणि अनेक अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता आपण कोव्हिड बरोबर जगण्याची सवय करायला हवी. ही सवय म्हणजे नेमकं काय करायला हवं?
उ- आपण आतापर्यंत बघितलं तर आपण देवीच्या रोगाचं निर्मुलन केलं. त्याचा एकही रुग्ण सापडला नाही कारण त्याच्याविरुद्ध आपल्याला एक अतिशय प्रभावी लस सापडली. पोलिओच्या बाबतीतही तेच. 2011 पासून पोलिओची एकही केस भारतात नाही. स्वाईन फ्लूच्या बाबतीत तसं होऊ शकत नाही. स्वाईन फ्लूचा विषाणू त्याची जनुकीय रचना सारखी बदलत असतो. कोरोना नवीन आहे. अमेरिकेतला, भारतातला जपानमधला कोरोना विषाणूचा प्रकार वेगळा आहे असं वैज्ञानिक सांगत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरं म्हणजे कोरोनाविरुद्ध कोणतीही लस आता उपलब्ध नाही. त्यामुळे हा साथरोग एका क्षणी संपून जाईल असं होऊच शकत नाही. काही काळानंतर रुग्णसंख्येचा वेग अत्यंत मंदावेल. वुहानमध्ये जसं पाहिलं की तिथे मागच्या आठवड्यात 100 रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णसंख्येचा वेग कमी होईल पण आपल्याबरोबर तो असणारच आहे. त्यामुळे आपण त्याबरोबर जगण्याची सवय केली पाहिजे.
वाईटातून काही चांगलं घडतं असं आपण नेहमी म्हणतो. या साथीमुळे आपल्याला कळलं की सार्वजनिक आरोग्य हा क्रमांक एकचा विषय आहे. सर्व स्तरातील लोक त्याबद्दल बोलत आहे. एका रोगाने सर्व जगातील अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र बदलू शकतो. हे उमगलं. मुंबईतलं कस्तुरबा रुग्णालय, पुण्यातलं नायडू रुग्णालय हे खास साथ रुग्णालय आहे. ही सर्व इंग्रजांच्या काळातील आहे. त्यानंतर स्वतंत्र भारतात अशी रुग्णालयं उभी केली पाहिजे असं आपल्याला वाटलं नाही.
जनता म्हणून आपल्याला काही बदल करावे लागतील. हात धुणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हे आपल्याला पहिल्यांदाच कळलं. कोव्हिडपेक्षा जास्त रुग्ण टीबीने दगावले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या चांगल्या सवयी या आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. असं जगणं म्हणजे कोव्हिडबरोबर जगणं असा होतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








