कोरोना अहमदाबाद: कोव्हिड-19 पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह बस स्टँडवर आढळला #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह बस स्टँडवर आढळला
गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह अहमदाबादेत एका बस स्टँडवर सापडल्याने खळबळ उडाली.
NDTVने दिलेल्या बातमीनुसार, या 67 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (15 मे) अहमदाबादमधल्या दानिलिम्डा बस स्टँडवर आढळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या मृतदेहाची ओळख पटल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय आणि पोलिसांनी योग्य वेळेत यासंबंधीची माहिती दिली नाही, असा आरोप केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आरोग्य खात्याचे माजी मुख्य सचिव जेपी गुप्ता यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
2. अर्थमंत्र्यांचा दावा खोटा, मजुरांचा संपूर्ण प्रवास खर्च राज्य सरकारने केलाय : अनिल देशमुख
स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकीटचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार उचलत आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (17 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र, निर्मला सीतारामन यांचं ते वक्तव्य खोटं असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला. TV9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार करत आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितल्यानंतर मला धक्काच बसला. परंतु ते खोटं आहे. रेल्वेचं तिकीट केंद्र सरकार देत नाही. त्याचा सर्व भार राज्य शासन उचलत आहे," असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 55 कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले. महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकारने उचलला आहे, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
3. बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 18 मेपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यासंदर्भात मागणी करून दोन दिवस उलटल्यानंतरही बेस्ट उपक्रमाकडून चर्चेसाठी प्रतिसाद न मिळाल्याने बेस्टचे कर्मचारी 'घरी राहा, सुरक्षित राहा' या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नाहीत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

याचा सर्वात मोठा फटका अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याला बसणार आहे. याशिवाय 'बेस्ट'ची वीजपुरवठा विभागाचे कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याने मुंबईतल्या वीजसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे.
'बेस्ट' मधील जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचं कामगार संघटनांचं म्हणणं आहे.
4. फेसबुक, सिल्व्हर लेकपाठोपाठ अटलांटिक जनरलची रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक
अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी जनरल अटलांटिक रिलायन्स जिओमध्ये 6 हजार 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. जनरल अटलांटिक 1.34 टक्के समभाग खरेदी करत असल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहाकडून देण्यात आली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीये.

फोटो स्रोत, PTI
गेल्या चार आठवड्यात जिओमध्ये चौथ्यांदा एवढी मोठी गुंतवणूक झाली आहे. गेल्या महिन्यात फेसबुकनं जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपये गुंतवून 9.9 टक्के भागिदारी विकत घेतली होती. त्यानंतर सिल्व्हर लेक आणि व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सनंही जिओमध्ये गुंतवणूक केली होती.
जिओमधील या सर्व कंपन्यांची एकत्रित गुंतवणूक 67 हजार 194 कोटी रुपये इतकी झाली आहे.
5. अम्फान चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता
अम्फान चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये रविवारी (17 मे) NDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हे वादळ 18 ते 20 मे दरम्यान पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. NDTV इंडियानं ही बातमी दिलीये.
दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो, अशा 11 लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची तयारी केली असल्याचं ओडिशा सरकारनं स्पष्ट केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








