छायाकल्प चंद्रग्रहण कधी आहे? जाणून घ्या वेळ, महत्त्व आणि या मागच्या विज्ञानाबाबत

फोटो स्रोत, Brazil Photo Press
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हटलं की खगोलप्रेमींसाठी पर्वणीच असते. आज (शुक्रवार 5 जून रोजी) वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. भारतात हे पाहता येऊ शकणार आहे. यावर्षीचं पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारीला झालं होतं.
हे चंद्रग्रहण 5 जूनला रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल. 6 जूनच्या पहाटे 2 वाजून 34 मिनिटांनी हे संपेल. 12 वाजून 54 मिनिटांच्या सुमारास हे ग्रहण सर्वात प्रभावी असेल, असं सांगितलं जात आहे.
भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातही हे ग्रहण पाहता येणार आहे.
आज रात्री होणारं चंद्रग्रहण हे पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. म्हणजेच पृथ्वीच्या सावलीचा काही भाग चंद्रावर पडेल.
छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?
हे पूर्ण चंद्रग्रहण नसून छायाकल्प चंद्रग्रहण असेल. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात.
2020 या वर्षात एकूण 4 चंद्रग्रहण होणार आहेत. त्यापैकी पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारीला झालं आहे. तर उरलेली चंद्रग्रहणं 5 जून, 5 जुलै, 30 नोव्हेंबर रोजी होतील.
जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे.
सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते पण चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतं असं तज्ज्ञ सांगतात. चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडात दिसणार आहे.
तुम्हाला चंद्रग्रहण पाहता येईल का?
विज्ञान प्रसारचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी. व्ही. वेंकटेश्वरन यांच्या मते, आजचं छायाकल्प चंद्रग्रहण इतकं सुस्पष्ट दिसणार नाही. फक्त चंद्रावर हलकीशी सावली पडल्याचं दिसेल. म्हणजेच चंद्र थोडासा अस्पष्ट दिसेल. चंद्राचा फक्त 58 टक्के भाग या सावलीने व्यापला जाईल.
ते सांगतात, हे चंद्रग्रहण इतक्या सहजपणे पाहता येऊ शकणार नाही. ग्रहण पूर्ण प्रभावात असताना अतिशय लक्ष देऊन पाहावं लागेल. त्यासाठी आकाश मोकळं असावं. तेव्हा चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण भागातील प्रकाशमानतेचा फरक तुम्हाला कळू शकेल.
पीनम्ब्रल म्हणजे काय?
टी. व्ही. वेंकटेश्वरन सांगतात, सावल्या दोन प्रकारच्या असतात. प्रकाशाला रोखणारी कोणतीही वस्तू दोन प्रकारच्या सावल्या निर्माण करत असते. अतिशय घनटाट असलेल्या सावलीला अम्ब्रल सावली म्हणतात. तर हलक्या आणि पसरट सावलीला पीनम्ब्रल सावली म्हटलं जातं.
म्हणजेच, अम्ब्रल भागात पूर्ण सावली पडलेली असते. तर पीनम्ब्रल भागात सावलीचा काही भागच पडलेला पाहायला मिळतो.
याच महिन्यात सूर्यग्रहणसुद्धा
यावर्षी 2020 मध्ये एकूण 6 ग्रहण लागणार आहेत. याध्ये दोन सूर्यग्रहण तर चार चंद्रग्रहण आहेत. यापैकी एक चंद्रग्रहण वर्षाच्या सुरुवातीला 10 जानेवारीला झालं होतं. त्यानंतर आता 5 जूनला दुसरं चंद्रग्रहण होणार आहे.
आज होणाऱ्या चंद्रग्रहणानंतर 5 जुलै आणि 30 नोव्हेंबरला सुद्धा चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. याशिवाय सूर्यग्रहण 21 जून आणि 14 डिसेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









