थायलंडमधल्या 'त्या' हत्तींनी खरंच एकमेकांना वाचवायला धबधब्यात उडी मारली असेल का?

थायलंड, हत्ती दुर्घटना

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, त्या दुर्घटनेत दोन हत्ती जिवंत राहिले.
    • Author, अॅना जोन्स
    • Role, बीबीसी न्यूज

गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. थायलंडच्या राष्ट्रीय अभयारण्यातल्या एका धबधब्यात पडून एकाच कळपातल्या तब्बल 11 हत्तींचा मृत्यू झाला होता.

धबधब्यात पडून 6 हत्ती दगावल्याची बातमी सुरुवातीला मिळाली होती. मात्र, काही दिवसांनंतर पाण्याच्या प्रवाहात आणखी 5 हत्तींचे मृतदेह सापडले.

सुरुवातीला असं मानलं गेलं होतं की धबधब्यात पडलेल्या एका पिल्लाला वाचवताना या हत्तींचा मृत्यू झाला. खाओ याई राष्ट्रीय उद्यानातल्या रेंजर्सने ही माहिती दिली होती. या अभयारण्यात 'हेऊ नॅरोक' (नरकातील धबधबा) नावाचा दीडशे मीटर उंच धबधबा आहे.

हा अत्यंत धोकादायक धबधबा असल्याचं म्हणतात. या धबधब्यावरून जाताना हत्तीचं पिल्लू पाय घसरून पडलं आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून इतर हत्तींनी धबधब्यात उडी घेतली असावी, असा अंदाज बांधण्यात आला होता.

थायलंड, हत्ती दुर्घटना

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, या धबधब्यात घसरून पडून हत्तींचा मृत्यू झाला होता.

एकाच वेळी एकाच कळपातल्या 11 हत्तींचा मृत्यू ही केवळ त्या कळपासाठीच हादरवून टाकणारी घटना नव्हती. तर या घटनेविषयी जी माहिती सांगण्यात आली, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. हत्तींनी जे बलिदान दिलं, ते वाचून जगभरातले वाचक हळहळले. आमची बातमीही लाखो वाचकांनी वाचली.

मात्र, भावना बाजूला ठेवून जरा विचार करूया. हत्तींकडे पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याइतपत सहानुभूती आणि कौशल्य असू शकेल का? आणि कदाचित याघडीला यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दुर्घटनेतून बचावलेल्या हत्तींवर या घटनेचा काय परिणाम झाला असेल?

न्यूयॉर्कमधल्या हंटर कॉलेज सिटी युनिवर्सिटीत मानसशास्त्राचे सहप्राध्यापक असलेले डॉ. जोशुआ प्लॉटनिक दशकभराहूनही अधिक काळापासून थायलंडमधल्या हत्तींचा अभ्यास करत आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, प्रत्यक्ष साक्षीदाराच्या अभावी नेमकं काय घडलं असेल, हे आपण सांगू शकत नाही. मात्र, "हा अंदाज नक्कीच बांधता येऊ शकतो की कुटुंबातला एखादा सदस्य संकटात असेल तर कळपातले इतर हत्ती त्याला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व करू शकतात."

हत्तींना धोका ओळखता येतो आणि त्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी ते एकत्र येऊन मार्ग शोधतात, याचे ठोस पुरावे आहेत.

थायलंड, हत्ती दुर्घटना

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, हत्तींची दुर्घटना

मात्र, डॉ. प्लॉटनिक म्हणतात की "अशा धोकादायक परिस्थितीत सर्वच्या सर्व हत्ती धबधब्यावर जातील", याची शक्यता कमी वाटते.

कदाचित हा एक भयंकर अपघात असावा.

विएन्नामधल्या युनिवर्सिटी ऑफ व्हेटर्नरी मेडिसीनमध्ये हत्तींचे तज्ज्ञ असलेल्या डॉ. रॅचेल डेल यादेखील मान्य करतात की हत्ती 'स्वतःच्या प्राणांची बाजी लावूनही' संकटात सापडलेल्या हत्तीची मदत करतील, यात शंकाच नाही.

मात्र, त्या पुढे असंही सांगतात की, "हत्ती हुशार प्राणी आहे, अत्यंत हुशार. त्यामुळेच कुठलीही जोखीम उचलताना आधी रिस्क असेसमेंट करण्याची क्षमता त्यांच्यात असावी."

भिचेत नूंतो हे थायलंडच्या सायन्स रिसर्च अँड इनोव्हेशन कार्यालयात थायलंड ह्युमन-एलिफंट कोएक्झिस्टंट प्रकल्पाचे प्रमुख आहेत. ते हत्तींच्या स्वभावाचा अभ्यास करत आहेत.

त्यांनी सांगितलं की अपघातावेळी पार्कमधली परिस्थिती अत्यंत खराब होती आणि पावसाळ्यात 'हेऊ नॅरोक' धबधबा हत्तींसाठी कायमच धोकादायक असतो.

थायलंड, हत्ती दुर्घटना

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, काँक्रिटचं कुंपण

1992 सालीदेखील या धबधब्यात अशीच एक घटना घडली होती. त्यात 8 हत्तींचा धबधब्यात पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी एक पिल्लू धबधब्यात पडल्यानंतर त्याच्या आईने उडी घेतल्याचं आपण बघितल्याचं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. 1987 सालीसुद्धा हत्तीचं एक पिल्लू या धबधब्यात पडलं होतं.

अशा दुर्घटना रोखण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी क्रॉंक्रिटचे खांब उभारले आहेत.

मात्र, सगळीकडे असे खांब उभारता येत नाही. या हत्तींच्या कळपाच्या पावलांचे ठसे अधिकाऱ्यांना आढळले आहेत. त्यावरून असा अंदाज बांधण्यात येत आहे की हा कळप खांबांच्या कडेने चालत गेला आणि जिथे त्यांना जागा मिळाली तिथून त्यांनी खांब ओलांडून धबधब्याचं टोक गाठलं.

थायलंड, हत्ती दुर्घटना

फोटो स्रोत, BHITCHET NOONA

फोटो कॅप्शन, हत्तींचा कळप

नॅशनल पार्क, वाईल्डलाईफ अँड प्लँट कॉन्झर्व्हेशन विभागाने (DNP) दिलेल्या माहितीनुसार हत्तींचा हा कळप कदाचित वर्षातून एकदाच येणाऱ्या एका विशिष्ट वनस्पतीच्या शोधात स्वतःचा जीव धोक्यात टाकून धबधब्याच्या टोकावर गेला असणार. दुसरी शक्यता अशीही आहे की माणसाचा संपर्क टाळण्यासाठी म्हणून हा कळप नेहमीच्या रस्त्याने न जाता दुसऱ्या मार्गाने गेला असणार.

"माणसाप्रमाणेच हत्तीही अनेक प्रकारचे असतात. सभ्य, खोडकर, गुणी. ते जेव्हा त्यांच्या नेहमीच्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असे अपघात होण्याची शक्यता जास्त असते", असं DNP संचालक सोंगथम सुकसावँग यांचं म्हणणं आहे.

मानसिक आघात

या अपघातातून एक पिल्लू आणि त्याची आई असे दोन हत्ती बचावले. हे दोघं धबधब्यातल्या गुळगुळीत दगडांच्या मध्ये अडकले होते. उद्यानातल्या बचाव पथकाने त्यांना सुरक्षित बाहेर काढलं.

आपल्या कळपातला एखादा सदस्य संकटात आहे हे कळण्याइतपत सहानुभूती आणि बुद्धीमत्ता हत्तींमध्ये असेल आणि ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील, तर अशा अपघातातून बचावलेल्या हत्तींच्या मनावर काय परिणाम होत असेल?

डॉ. प्लॉटनिक म्हणतात, "हत्ती हा मोठा मेंदू असलेला, हुशार, सामाजिक आणि सहानुभूती असलेला प्राणी आहे. त्यामुळे जसा मानसिक आघात आपल्यावर होतो तशाच प्रकारचा त्रास तेही भोगतात."

थायलंड, हत्ती दुर्घटना

फोटो स्रोत, KHAO YAI NATIONAL PARK

फोटो कॅप्शन, दुर्घटना

मृत्यूमुखी पडलेल्या हत्तींमध्ये काय नातं होतं, हे अद्याप तरी माहिती नाही. मात्र, या अपघातात कळपाचा नेता दगावला असेल तर अनेक वर्ष जंगलात फिरून जमवलेली जंगलाविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आता नष्ट झाली आहे.

याविषयी सविस्तर समजवून सांगताना डॉ. डेल म्हणतात मानवाप्रमाणे हत्तीसुद्धा पिढीजात चालत आलेल्या ज्ञानाचा उपयोग करत असतात. या दुर्दैवी घटनेचे काय परिणाम होतील?, त्यांच्या वागणुकीत काही बदल होतो का? किंवा ते आपले जुने मार्ग सोडून नवीन मार्ग चोखाळतील का? हे कळण्यासाठी बराच काळ लागेल.

मात्र, अपघातातून बचावलेल्या माय-लेकाच्या जोडीकडे जगण्याचं कौशल्य आहे आणि आपल्या अनुभवातून यापुढे कधीच त्या धबधब्याकडे जायचं नाही, हा धडा ते घेतील, असा विश्वास वनअधिकाऱ्यांना वाटतो.

नूंतो यांच्या म्हणण्यानुसार परिसरातून जे काही रिपोर्ट्स मिळाले आहेत त्यावरून असं दिसतं की या कळपातले इतरही काही हत्ती याच परिसरात असावेत आणि वाचवण्यात आलेले दोन्ही हत्ती लवकरच त्यांचा शोध घेतील. मात्र, समजा असं झालं नाही तर या दोन हत्तींना दुसरा कुठला तरी कळप आपल्यात सामावून घेईल. बचावलेल्या हत्तींवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की त्यांना जेव्हा पुन्हा जंगलात सोडण्यात आलं तेव्हा इतर हत्तींनी त्यांना आपल्या कळपात सामावून घेतलं.

नूंतो म्हणतात, "ते जगू शकतात. ते जुळवून घेऊ शकतात. इतकंच नाही तर कदाचित कुटुंब वाढवण्यासाठी ही मादी दुसऱ्या नर हत्तीशी संबंधही ठेवू शकते."

'जंगलही नाही सुरक्षित'

हत्तींविषयी माणसाला कायमच आकर्षण राहिलं आहे. गेली हजारो वर्षं माणसाने हत्तींशी मैत्री केलेली आहे. त्यांचा आकार मोठा असला तरी सामान्यपणे हत्ती हा शांत, माणसाप्रमाणेच कुटुंबात राहणारा, मौजमजा करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर माणसासारखंच त्यालाही दुःख होतं आणि म्हणूनच खाओ याईसारख्या दुर्घटनेविषयी सहानुभूती व्यक्त होणं, स्वाभाविक आहे.

थायलंड, हत्ती दुर्घटना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हती

डॉ. डेल म्हणतात हत्तींमध्ये माणसासारखे गुण असले तरी त्याचा हत्तींना उपयोग होत नाही.

"मनुष्य प्राणी काही गोष्टींमध्ये निपुण आहे. जगण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला मदत करतात त्या प्राण्यांनाही मदत करतीलच असं नाही आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीकडे मानवी चष्म्यातून बघून इतर प्राण्यांना समजून घेता येत नाही आणि त्यांना जगण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी कशाची गरज आहे, हेही जाणून घेता येत नाही."

या हत्तींनी काय विचार करून अशी कृती केली असावी, याचा भावना बाजूला ठेवून शांत चित्ताने विचार करावा लागेल. त्यातूनच शास्त्रज्ञांना अशा प्रकारच्या दुर्घटना रोखण्यासाठीचे पर्याय शोधून काढता येतील.

डॉ. प्लॉटनिक म्हणतात, अशा प्रकारच्या घटना दुर्मिळ असल्या तरी यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की हत्तींसारख्या भव्य प्राण्यांसाठीसुद्धा 'जंगल सुरक्षित ठिकाण नाही.'

या कळपातल्या हत्तींचे मृतदेह एकत्र करून त्यांचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर या अभयारण्यातच त्यांचे मृतदेह पुरण्यात येतील.

नूंतो म्हणतात, "वनअधिकाऱ्यांसाठी ही खूप दुःखद घटना आहे. असं पुन्हा कधीच घडू नये, अशी त्यांची इच्छा आहे. थायलंडच्या लोकांसाठीदेखील हा खूपच भावनिक क्षण आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)