या व्हेल माशावर हेरगिरी करत असल्याची शंका का घेतली जातेय? जाणून घ्या

व्हेल मासा

फोटो स्रोत, NORWEGIAN ORCA SURVEY

फोटो कॅप्शन, हा बेलुगा व्हेल मासा हेरगिरी करत असेल असं डॉ. ओल्गा शपाक यांना वाटत नाही
    • Author, जोनाह फिशर आणि ओकसाना कुंदीरेन्को
    • Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी आणि विशेष निर्माता, सीक्रेट्स ऑफ द स्पाय व्हेल

एक पट्टा असलेला बेलुगा व्हेल मासा नॉर्वेच्या समुद्रकिनाऱ्यावर कसा काय पोहोचला? हे गूढ अखेर उकललं आहे.

(बेलुगा व्हेल हा व्हेल माशाचा प्रकार आहे. त्याचा आकार डॉल्फिन आणि मोठ्या व्हेल माशाच्या आकारादरम्यान असतो. तो मुख्यत: आर्क्टिक आणि उप-आर्क्टिक प्रदेशात आढळतो. ते त्यांच्या डोक्याच्या विशिष्ट आकारासाठी प्रसिद्ध आहेत.)

स्थानिक लोकांनी या पांढऱ्या रंगाच्या पाळीव व्हेलचं नाव ह्वालदिमीर (Hvaldimir) असं ठेवलं आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये जेव्हा हा मासा समुद्रकिनाऱ्यावर दिसला होता, तेव्हा त्याची खूपच चर्चा झाली होती. हा मासा रशियासाठी हेरगिरी करत असल्याचाही अंदाज बांधण्यात आला होता.

बेलुगा व्हेल माशांच्या एका तज्ज्ञाचं म्हणणं आहे की, हा व्हेल मासा लष्कराशी संबंधित होता आणि आर्क्टिक प्रदेशातील एका नौदलाच्या तळावरून पळालेला आहे.

मात्र, डॉ. ओल्गा शपाक यांना हा व्हेल मासा हेरगिरी करत असेल असं वाटत नाही. त्यांना वाटतं की, या बेलुगा व्हेल माशाला नौदलाच्या तळाला सुरक्षा पुरवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात होतं.

त्यांना वाटतं की, हा व्हेल मासा 'उपद्रवी' असल्यामुळे त्यानं त्या तळावरून पळ काढला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

रशियन सैन्यानं आपण बेलुगा व्हेल माशाला प्रशिक्षण देत असल्याची गोष्ट मान्यही केलेली नाही किंवा ती नाकारलेली देखील नाही.

डॉ. शपाक 1990 च्या दशकापासून रशियात समुद्री सस्तन प्राण्यांवर काम करत आहेत. 2022 मध्ये त्या त्यांच्या मायदेशी म्हणजे युक्रेनमध्ये परतल्या आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, रशिया बेलुगा व्हेल माशांना प्रशिक्षण देतं याबद्दल त्यांना कोणतीही शंका नाही.

डॉ. शपाक यांचा हा दावा, त्यांचे माजी रशियन सहकारी आणि मित्रांशी झालेल्या चर्चेवर आधारलेला आहे. 'सीक्रेट्स ऑफ द स्पाय व्हेल' या बीबीसीच्या माहितीपटात त्यांनी हे सांगितलं आहे. हा माहितीपट आता बीबीसी आय प्लेअरवर उपलब्ध आहे.

व्हेलला लावलेला होता पट्टा

पाच वर्षांपूर्वी हा गूढ व्हेल मासा नॉर्वेच्या उत्तर भागातील समुद्रकिनाऱ्यावर मासेमारांच्या जवळ आल्यानंतर चर्चेत आला होता.

एका बोटीवर असलेल्या जो आर हेस्टन या एका मासेमारानं सांगितलं की, "आधी त्या व्हेल माशानं बोटीला रगडण्यात सुरुवात केली. मी असं ऐकलं होतं की, ज्या प्राण्यांना किंवा समुद्रीजीवांना काही अडचण असते किंवा ते संकटात असतात, तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव होते की, त्यांनी माणसांकडून मदत घेतली पाहिजे. मला वाटत होतं की, हा एक स्मार्ट व्हेल मासा आहे.

"ते खूप दुर्मिळ दृश्य होतं. कारण हा बेलुगा व्हेल पाळीव वाटत होता. शिवाय, या प्रदेशात म्हणजे आर्क्टिकपासून इतक्या दूर दक्षिणेला हा मासा दिसत नाही."

व्हेल

फोटो स्रोत, JØRGEN REE WIIIG

फोटो कॅप्शन, डॉ. शपाक म्हणतात की रशिया बेलुगा व्हेल माशांना प्रशिक्षण देतो याबद्दल त्यांना कोणतीही शंका नाही

या व्हेल माशाला एक पट्टादेखील बांधण्यात आलेला होता. त्यावर कॅमेरा बसवण्यासाठी एक माउंट देखील लावण्यात आलेला होता. याशिवाय या पट्ट्यावर इंग्रजीत लिहिलेलं होतं, "उपकरण सेंट पीटर्सबर्ग."

हेस्टन या मासेमारानं बेलुगा व्हेलवरील पट्टा काढण्यास मदत केली. यानंतर हा व्हेल मासा पोहत जवळच्याच हेमरफेस्ट बंदरापर्यंत पोहोचला आणि अनेक महिने तिथेच राहिला.

पट्ट्यावर काय लिहिलेलं होतं?

अन्नासाठी जिवंत मासा पकडण्यास सक्षम नसलेल्या या बेलुगा व्हेल माशाकडे इथे येणारे लोक आकर्षित होत होते.

तो बेलुगा व्हेल मासा त्यांच्या कॅमेराला धक्का द्यायचा. एकदा तर त्यानं एक मोबाईल फोन परत केला होता.

ईव्ह जुआर्डियन नॉर्वे ओर्का सर्व्हेशी निगडीत आहेत. त्या म्हणतात, "ही बाब अतिशय स्पष्ट होती की, या विशेष बेलुगा व्हेल माशाला, एखाद्या टार्गेटसारखी वाटणारी प्रत्येक गोष्ट आपल्या नाकावर लावण्यासाठीचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. कारण तो व्हेल मासा प्रत्येक वेळेस असंच करत होता."

पट्टा

फोटो स्रोत, OXFORD SCIENTIFIC FILMS

फोटो कॅप्शन, या व्हेल माशानं एक पट्टादेखील घातला होता, ज्यावर कॅमेरा लावण्यासाठी एक माउंट लावलेला होता, याव्यतिरिक्त त्या पट्ट्यावर इंग्रजीत लिहिलं होतं, 'उपकरण सेंट पीटर्सबर्ग'

"मात्र, आम्हाला हे माहित नव्हतं की, हा बेलुगा व्हेल मासा त्या नौदल तळावरून इथे कसा पोहोचला आहे आणि याला कशाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे."

या व्हेल माशाची कहाणी चर्चेत होती आणि त्याच दरम्यान नॉर्वेनं या बेलुगा माशाच्या देखभालीची आणि अन्नाची व्यवस्था केली. या व्हेल माशाला 'ह्वालदिमीर' असं नाव देण्यात आलं.

नॉर्वेच्या भाषेत व्हेल माशाला ह्वाल म्हणतात, तर दिमीर हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नावातून घेण्यात आलं आहे.

तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

सुरक्षिततेच्या कारणास्तव डॉ. शपाक रशियातील त्यांच्या सूत्रांची नाव सांगत नाहीत. मात्र, त्यांचा दावा आहे की जेव्हा नॉर्वेमध्ये हा बेलुगा व्हेल मासा दिसला होता, तेव्हा रशियात समुद्रातील सस्तन प्राण्यांवर काम करणाऱ्या गटांना हे माहित होतं की, हा त्यांचाच बेलुगा व्हेल मासा आहे.

त्या म्हणतात, "पशु वैद्य आणि प्रशिक्षकांद्वारे त्यांना ही माहिती मिळाली की बेपत्ता झालेल्या बेलुगा व्हेल माशाचं नाव एंद्रुहा आहे."

डॉ. शपाक यांच्या मते, एंद्रुहा/ह्वालदिमीरला सर्वात आधी 2013 मध्ये पकडण्यात आलं होतं. या व्हेल माशाला रशियाच्या दुर्गम पूर्वी प्रदेशातील ओखोत्स्क समुद्रात पकडण्यात आलं होतं.

डॉ. शपाक

फोटो स्रोत, OXFORD SCIENTIFIC FILMS

फोटो कॅप्शन, डॉ. शपाक

एक वर्षानंतर त्याला सेंट पीटर्सबर्गच्या एका डोल्फिनीरियमच्या मालकी हक्क असलेल्या एका केंद्रात रशियाच्या आर्क्टिक प्रदेशातील लष्करी कामावर पाठवण्यात आलं होतं. तिथे या बेलुगा व्हेलचे प्रशिक्षक आणि डॉक्टर संपर्कात राहिले.

डॉ. शपाक म्हणतात, "मला वाटतं की, जेव्हा त्यांनी या व्हेल माशावर विश्वास ठेवत खुल्या समुद्रात त्याला प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली तेव्हा तो त्यांच्या तावडीतून निसटला."

त्या म्हणतात, "त्या व्यावसायिक डोल्फिनीरियममध्ये काम करणाऱ्या सूत्रांकडून मला माहिती मिळाली आहे की एंद्रुहा किंवा ह्वालादिमीर व्हेल मासा खूपच हुशार होता. त्यामुळे प्रशिक्षण देण्यासाठी तो उत्तम होता. मात्र तो खूपच उपद्रवी देखील होता. त्यामुळे हा व्हेल पळून गेल्यावर त्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं नव्हतं."

रशियाची भूमिका काय?

उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये मुर्मांस्कमध्ये रशियाच्या नौदलाच्या तळाजवळ असलेली ती जागा दिसते जी बहुधा ह्वालदिमीरचं घर असेल. पाण्यात स्पष्टपणे अशा जागा दिसतात ज्यात पांढरा व्हेल मासा आहे.

थॉमस नीलसन नॉर्वेच्या दे बेरेंट्स ऑब्झर्व्हर या ऑनलाइन वृत्तपत्राशी जोडलेले आहेत. ते म्हणतात, "पाणबुड्या आणि जहाजांच्या खूपच जवळ बेलुगा व्हेल माशाला ठेवण्यात आलं होतं. त्यावरून असं दिसून येतं की तो एखाद्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहे."

अर्थात, रशियानं मात्र अधिकृतपणे ही गोष्ट मान्य केलेली नाही की, त्यांच्या सैन्यानं ह्वालदिमीरला प्रशिक्षण दिलं आहे.

तसं समुद्रातील सस्तन प्राण्यांना लष्करी उद्दिष्टांसाठी प्रशिक्षण देण्याचा रशियाचा प्रदीर्घ इतिहास आहे.

2019 मध्ये रशियाचे एक रिझर्व्ह कर्नल व्हिक्टर बेरेन्टस म्हणाले होते की, "आम्ही जर या माशाचा वापर हेरगिरीसाठी करत असू तर तुम्हाला काय वाटतं की आम्ही त्याच्यावर एक मोबाईल नंबर देऊ आणि लिहू - कृपया या क्रमांकावर संपर्क करा."

कोट कार्ड

दुर्दैवानं ह्वालदिमीरच्या या अविश्वसनीय कहाणीचा शेवट सुखद झाला नाही.

हा बेलुगा व्हेल त्याच्या अन्नाची व्यवस्था करण्यास शिकला होता. अनेक वर्षे तो नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्याजवळ दक्षिणेस प्रवास करत राहिला आणि या दरम्यान त्याला स्वीडनच्या किनाऱ्याजवळ देखील पाहिलं गेलं.

मात्र, 1 सप्टेंबर 2024 ला नॉर्वेच्या नैऋत्य किनाऱ्यावर सिराविका शहराजवळ त्याचा मृतदेह समुद्रात तरंगत असलेला सापडला.

व्लादिमीर पुतिन यांच्या रशियाची शक्ती या बेलुगा व्हेलपर्यंत पोहोचली होती का?

बहुधा नाही. अनेक कार्यकर्त्या गटांनी या व्हेल माशाला गोळी घालण्यात आली असा दावा केला होता. मात्र, तरीदेखील नॉर्वेच्या पोलिसांनी ही शंका फेटाळली आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, या व्हेलच्या मृत्यूसाठी कोणतीही मानवी कृती थेट कारणीभूत ठरली असेल असं कोणतंही चिन्ह दिसत नाही.

एक लाकूड तोंडात अडकल्यामुळे ह्वालदिमीर व्हेलचा मृत्यू झाला असं शव विच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)