राजस्थानच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून 25 वाघ बेपत्ता, समिती स्थापन होताच कसा लागला 10 वाघांचा शोध?

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प

फोटो स्रोत, Roop singh meena

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, बीबीसी हिंदी
    • Reporting from, जयपूर

राजस्थानच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात 77 वाघ आहेत. त्यातले 25 बेपत्ता झाल्यानं त्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये अशा प्रकारची समिती बनवण्याचे आदेश आल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे 25 वाघ नेमके कधी आणि कसे बेपत्ता झाले? ही चर्चा होती. त्यात समिती स्थापन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 10 वाघांचा शोधदेखील लागला.

“एका वर्षापासून बेपत्ता असलेले 14 पैकी 10 वाघ हे 5 नोव्हेंबरला सापडले. त्यांना कॅमेऱ्यात टिपलं गेलं,” असं राजस्थानचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अधिकारी पवन कुमार उपाध्याय यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

“उरलेले चार वाघही लवकर सापडतील अशी आशा आहे. पण एका वर्षापासून जास्त काळापासून इथून बेपत्ता झालेल्या आणखी 11 वाघांच्या संदर्भातील तपास या चौकशी समितीकडून करण्यात येईल,” असं ते पुढे म्हणाले.

चौकशी समिती का स्थापन करावी लागली?

राजस्थानचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अधिकारी पवनकुमार उपाध्याय यांनी 4 नोव्हेंबर रोजी ही चौकशी समिती स्थापन केली आहे.

पवनकुमार उपाध्याय यांनी समितीच्या स्थापनेचे आदेश देताना नमूद केलं की, खूप दिवसांपासून अनेक वाघ बेपत्ता होत असल्याची माहिती टायगर मॉनिटरींग रिपोर्टमध्ये मिळत आहे.

या संदर्भात रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांना पत्रंही लिहण्यात आली होती. मात्र, कोणताही समाधानकारक बदल दिसून आला नाही.

10 ऑक्टोबरला मुख्यालयाकडून यासंदर्भातील निरीक्षण अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालाच्या हवाल्याने उपाध्याय यांनी म्हटलं की, एका वर्षाहून अधिक काळ लोटूनही 11 वाघांबाबत कसलाही पुरावा मिळालेला झालेला नाही.

तसंच जवळपास 11 महिन्यांपासून इतर 14 वाघही परिसरात फिरत असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळेच बेपत्ता वाघांच्या शोधासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

त्यामुळे बेपत्ता वाघांच्या शोधासाठी समिती स्थापन केली असून, दोन महिन्यात समिती आपला अहवाल सादर करेल.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

शोध कसा घेणार?

या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक राजेश गुप्ता, जयपूरचे वन संरक्षक डॉ. टी. मोहनराज आणि भरतपूरचे उप-वनसंरक्षक मानस सिंह हे सदस्य आहेत.

“आम्ही सगळ्या सदस्यांनी बसून शोध कसा घ्यायचा हे ठरवले आहे. आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर जाणार आहोत. बेपत्ता वाघांची माहिती गोळा करण्यासाठी त्यांचा सखोलपणे माग घेतला जाईल. जंगलात असणारे आमचे अधिकारी आत्ताही ते करत आहेतच. पण आम्ही आणखी खोलात शोध घेणार आहोत,” असं या सदस्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

सगळ्या नोंदी पाहून कुठे कशाप्रकारे सुधारणा करण्याची गरज आहे ते समिती पाहणार आहे.

समितीच्या स्थापनेचे आदेश देताना राजस्थानचे मुख्य वन संरक्षक पवन कुमार उपाध्याय यांनी टायगर मॉनिटरींग रिपोर्टमध्ये खूप दिवसांपासून वाघ बेपत्ता असल्याचं दिसत असल्याचं म्हटलंय.

फोटो स्रोत, Mohar singh meena.

फोटो कॅप्शन, समितीच्या स्थापनेचे आदेश देताना राजस्थानचे मुख्य वन संरक्षक पवन कुमार उपाध्याय यांनी टायगर मॉनिटरींग रिपोर्टमध्ये खूप दिवसांपासून वाघ बेपत्ता असल्याचं दिसत असल्याचं म्हटलंय.

“वाघांचे अनेक जैविक घटक असतात. या घटकांचा माग काढला जाईल. आत्ता दहा वाघ दिसले आहेत तर माग काढताना आणखी नक्की सापडतील,” असं समिती सदस्य पुढे म्हणाले. सहसा पाऊस सुरू असताना वाघ असल्याचे पुरावे दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष जंगलात जाऊनच त्यांचा शोध घेतला जाईल, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

याशिवाय, वाघ बेपत्ता झाल्यानंतर रणथंबोरच्या प्रादेशिक संचालक आणि उप-प्रादेशिक संचालकांनी शोध घेण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत, हेदेखील ही समिती पाहणार आहे.

टायगर मॉनिटरिंच्या सगळ्या नोंदींचंही विश्लेषण ही समिती करेल. कोणा अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे वाघ बेपत्ता झाले आहेत का, तेही तपासलं जाईल.

सध्या असलेल्या व्यवस्थेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठीही समिती काही सूचना देईल.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

वाघांचं मॉनिटरिंग कसं होतं?

वाघांचा माग घेण्यासाठी वन विभाग तीन पद्धती वापरतं. या तीनही पद्धती वापरून जर खूप काळापर्यंत वाघाचा माग घेता आला नाही, तर त्याला बेपत्ता ठरवलं जातं.

“वाघाच्या पायाचे ठसे, कॅमेरामध्ये वाघ दिसतोय की नाही हे आणि प्रत्यक्ष जंगलातली त्यांची संख्या आम्ही पाहतो,” असं पवन कुमार उपाध्याय बीबीसीला सांगत होते.

वाघांच्या संख्येची नोंद ठेवण्यासाठी वन विभाग तीन पद्धती वापरतं.

फोटो स्रोत, Roop singh meena

फोटो कॅप्शन, वाघांच्या संख्येची नोंद ठेवण्यासाठी वन विभाग तीन पद्धती वापरतं.

मॉन्सून दरम्यान वाघ इतके तिकडे फिरत असतात. त्यामुळे त्यांचा व्यवस्थित माग घेता येत नाही, असंही ते म्हणाले.

रणथंबोरमध्ये 'टायगर वॉच' ही अशासकीय संघटना काम करते. या संस्थेसोबत मिळून वाघ्र संवर्धनाचं काम डॉ. धर्मेंद्र खांडल करतात.

अनेकदा पावसाळ्यात कॅमेरेच नीट काम करत नाहीत. त्यामुळे वाघांची नोंद होत नाही, असं डॉ. धर्मेंद्र खांडल सांगत होते.

वाघ केव्हा बेपत्ता होतात?

“सहसा वाघांचं आयुष्य 15 ते 17 वर्ष इतकं असतं. आत्ता बेपत्ता झालेल्या वाघांपैकी अनेक वाघांचं वय खूप जास्त आहे. काही तर वीस ते बावीस वर्षांचे आहेत,” असं खांडल सांगत होते. वाघ इतके दिवस जिवंत राहत नाहीत. पण त्यांचा मृतदेह न मिळाल्याने वन विभागाने त्यांना बेपत्ता घोषित केलं आहे, असंही ते पुढे म्हणाले.

याआधी काही वाघ खरंच हरवले होते. पण आत्ताचे बेपत्ता नाहीत. त्यांचा फक्त माग काढता आलेला नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं आपसात भांडण आहे, असंही खांडल सांगत होते.

एखाद्या क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीही कधी कधी दोन वाघ आपसात भांडण करतात आणि त्यातला एक वाघ मरतो. अशावेळी त्यांचा मृतदेह मिळाला नाही तर त्यालाही बेपत्ता घोषित केलं जातं.

रणथंभबोर व्याघ्र प्रकल्पातल्या गावात काही दिवसांपूर्वी सापडलेला मृत वाघ.

फोटो स्रोत, Roop singh meena

फोटो कॅप्शन, रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातल्या गावात काही दिवसांपूर्वी सापडलेला मृत वाघ.

“एखादा वाघ विहिरीत पडला किंवा आजारी पडून गुहेतच मेला तर तो जंगलात असल्याचे पुरावे मिळत नाहीत,” असं वन्यजीव तज्ज्ञ डॉ. सतीश शर्मा सांगतात.

सायबेरियामध्ये पक्षी येतात आणि जातात. दरवर्षी अशापद्धतीने ते हवेतून स्थलांतर करतात. तसंच वाघही जमिनीवर स्थलांतर करतात. ती वाघांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अन्नाच्या, सुरक्षित जागेच्या किंवा वाघिणीच्या शोधात हे स्थलांतर केलं जातं. पण त्यालाच वाघ बेपत्ता झाला, असं म्हटलं जातं, असंही शर्मा पुढे सांगत होते.

वाघ दिसेल तेव्हाच त्याची नोंद होईल. याला वेळ लागतोच, असंही ते म्हणालेत.

कुठे किती वाघ आहेत?

मार्च 2022 च्या आकडेवारीनुसार, भारतात 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचं व्यवस्थापन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून केलं जातं.

भारतातल्या 53 व्याघ्र प्रकल्पात 75 हजार चौरस किलोमीटर इतकी जमीन मोडते. 2006 ला पहिल्यांदा मोजणी झाली तेव्हा प्रकल्पात 1411 इतके वाघ होते.

सरकारी गणनेनुसार मध्यप्रदेशात 526, कर्नाटकात 524, उत्तराखंडमध्ये 442 आणि महाराष्ट्रात 312 वाघ आहेत.

फोटो स्रोत, Mohar singh meena

फोटो कॅप्शन, सरकारी गणनेनुसार मध्यप्रदेशात 526, कर्नाटकात 524, उत्तराखंडमध्ये 442 आणि महाराष्ट्रात 312 वाघ आहेत.

2023 च्या गणनेनुसार, देशात 3682 वाघ आहेत. 2018 मध्ये 2967 होते. म्हणजे पाच वर्षांत वाघांच्या संख्येत 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सगळ्यात जास्त म्हणजे 526 इतके वाघ मध्यप्रदेशात आहेत. त्यानंतर कर्नाटकात 524, उत्तराखंडमध्ये 442 तर महाराष्ट्रात 312 वाघ आहेत.

राजस्थानातल्या चार व्याघ्र प्रकल्पात 91 वाघ आहेत. यातले सगळ्यात जास्त म्हणजे 77 वाघ रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्येच आहेत.

अलीकडच्या दिवसांत सातत्याने होत आहेत वाघांचे मृत्यू

वाघांचे सातत्याने होणारे मृत्यू हे राजस्थान वन विभागासमोरचं मोठं आव्हान आहे. अलीकडेच तीन नोव्हेबंरला रणथंबोरमध्ये एका वाघाचा मृतदेह मिळाला होता.

प्रकल्पातल्या उलियाना गावात हा वाघ मृतावस्थेत सापडला. त्यांचं पोस्टमार्टम केलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अनेक जखमा असल्याचं समजलं. त्यामुळे माणसाच्या हल्ल्यात तो मेला असल्याची शक्यता जास्त आहे.

याआधीही या भागांत वेगवेगळ्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत मिळाले आहेत. जानेवारी 2023 ला टी-57चा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच जानेवारीच्या शेवटाला टी-114 या वाघाचा आणि त्याच्या बछड्याचा मृत्यू झाला.

फेब्रुवारी महिन्यात 9 तारखेला टी-19 10 मे रोजी टी-104, सप्टेंबर महिन्यात टी -79, 11 डिसेंबर ला टी-69, तर 3 फेब्रुवारी 2024 ला टी-99, 4 फेब्रुवारीला टी-60 आणि त्याचा बछडा, तर 7 जुलैला टी-58 मृतावस्थेत सापडले होते.

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातल्या एका गावात काही दिवसांपूर्वी एका वाघाचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचे अंतिम संस्कार केले.

फोटो स्रोत, Roop singh meena

फोटो कॅप्शन, रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातल्या एका गावात काही दिवसांपूर्वी एका वाघाचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचे अंतिम संस्कार केले.

“विषबाधा हेही वाघांच्या मृत्यूमागचं महत्त्वाचं कारण आहे. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातल्या गावातून दरवर्षी जवळपास 500 पाळीव प्राण्यांची वाघ शिकार करतात. त्याची भरपाई फार कमी मिळते,” डॉ. धर्मेंद्र खांडल सांगतात.

“अनेकदा गावकरी वाघाला मारून त्याचा मृतदेह पुरून टाकतात अशाही घटना घडतात. कोणाला काही थांगपत्ता लागत नाही आणि वाघ बेपत्ता म्हणवला जातो."

राजस्थाच्या बुंदी जिल्हात रामगढ व्याघ्र प्रकल्पात ऑक्टोबर 15 ला आरवीटी-2 या वाघाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह खूप दिवसांनी सापडला. त्याच्या मृत्यूची कारणमीमांसा अजूनही सुरू आहे.

“वाघ बेपत्ता होणं फार स्वाभाविक आहे,” असं राजस्थानच्या वन विभागाच्या मुख्यालयातल्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात.

वाघ ट्रॅक होत नाही याचा अर्थ ते बेपत्ता असतात असा होत नाही, असं काही तज्ज्ञांना वाटतं.
फोटो कॅप्शन, वाघ ट्रॅक होत नाही याचा अर्थ ते बेपत्ता असतात असा होत नाही, असं काही तज्ज्ञांना वाटतं. (प्रातिनिधिक छायाचित्र)

“गुहेत राहणारे वाघ अनेकदा वर्चस्वाच्या लढाईत मारले जातात. अनेकदा जंगलात दूर गेल्यामुळे त्यांचे अवशेष मिळत नाहीत.

ज्या वाघाचा माग निघत नाही, त्याला बेपत्ता म्हटलं जातं. पण त्यासाठी अचानक शोध समिती बनवण्यामागे अधिकाऱ्यांचं आपसातलं भांडण हे कारण आहे,” असंही ते पुढे सांगत होते.

त्यामुळेच 4 नोव्हेंबरला 25 वाघ बेपत्ता असल्याचं म्हटलं जातं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी त्यातले 10 सापडतात.

एका वाघाच्या मृत्यूची तपासणी करणाऱ्या वनविभागाच्या एका अधिकाऱ्यावर 25 बेपत्ता वाघांसाठी शोध समिती तयार करुन दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)