'8 ठिकाणी खोदकाम पूर्ण, एका ठिकाणी मानवी सांगाडे सापडले'; 'या' धर्मस्थळाखाली काय गूढ दडलंय?

'या' धर्मस्थळाखाली काय गूढ दडलंय? मानवी सांगाड्यांनी उपस्थित केले प्रश्न
    • Author, बल्ला सतीश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

(इशारा: या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

धर्मस्थळ हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थान आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये या मंदिराशी संबंधित काही गंभीर आरोप समोर आले आहेत. यामध्ये हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार, आणि प्रभावशाली लोकांकडून पीडितांवर दबाव आणण्याचे प्रकार होत असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि स्थानिक लोक सांगत आले आहेत.

काहींना धमक्या आल्या, काहींवर खोटी प्रकरणं दाखल केली गेली. आता या प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे, पण लोकांमध्ये अजूनही भीती आहे.

मागील महिन्यातील 29 जुलैपासून कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेत्रावती नदीच्या काठावर पोलिसांच्या देखरेखीखाली एक पथक खोदकाम करत आहे. या जमिनीखाली मानवी सांगाडे गाडले गेले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी ही कारवाई सुरू आहे.

ही गोष्ट तेव्हापासून सुरू झाली, जेव्हा धर्मस्थळ या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी पूर्वी सफाई कर्मचारी म्हणून काम केलेल्या एका व्यक्तीने खळबळजनक असा दावा केला. या सफाई कर्मचाऱ्याने एका प्रभावशाली कुटुंब आणि त्यांच्या लोकांच्या सांगण्यावरून तिथे शेकडो मृतदेह पुरल्याचे सांगितले.

3 जुलै रोजी, या अज्ञात व्हिसलब्लोअरने असा गंभीर आरोप केला की, 1998 ते 2014 या काळात जे मृतदेह गाडले गेले, त्यामध्ये अनेक महिला आणि मुलींचा समावेश होता. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती, असं त्यानं सांगितलं.

19 जुलै रोजी कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे. या टीमला तक्रारदाराच्या मदतीने सांगितलेल्या 13 ठिकाणी खोदकाम करण्याची जबाबदारी देण्यात आली.

ज्या 8 ठिकाणी खोदकाम पूर्ण झालं आहे, त्यापैकी एका ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले आहेत. परंतु, पोलिसांनी फॉरेन्सिक तपास झाल्यानंतरच यावर काही निष्कर्ष काढता येईल, असं स्पष्ट केलं आहे.

धर्मस्थळ मंदिराच्या प्रमुखाच्या भावानं यापूर्वी धार्मिक स्थळ चालवणाऱ्या कुटुंबाविरुद्ध 'बदनामीकारक मजकूर' प्रकाशित करण्यावर स्थगिती आदेश मिळवला होता. परंतु, आता कर्नाटक उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केला आहे.

20 जुलै रोजी मंदिर प्रशासनानं एक निवेदन जारी करून 'निष्पक्ष आणि पारदर्शक' तपासाला पाठिंबा दिला. निवेदनात म्हटलं, "सत्य आणि विश्वास हे समाजाच्या नैतिकतेचा आणि मूल्यांचा आधार असतात. आम्ही एसआयटीला विनंती करतो की, त्यांनी योग्य तपास करून खरी माहिती समोर आणावी."

धर्मस्थळात नेमकं काय घडलं? मृत्यूचं गूढ आणि लोकांचा संताप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अलीकडील घडामोडींमुळे धर्मस्थळ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र हे ठिकाण चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

माहितीच्या अधिकारात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, 2001 ते 2011 या काळात धर्मस्थळ आणि शेजारच्या उजिरे या 2 गावात एकूण 452 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

येथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की, या मृत्यूंमागे आत्महत्या किंवा अपघातही कारणीभूत असू शकतात. शिवाय, ज्या 452 मृत्यूंचा उल्लेख आहे, त्यांचा संबंध त्या दफन केलेल्या प्रकरणांशी नाही, ज्याचा दावा माजी सफाई कर्मचाऱ्याने केला होता.

कारण त्याचे आरोप केवळ अशा प्रकरणांवर आहेत, ज्यांची पोलिसांनी तपासणीच केली नाही, असा त्याचा दावा आहे.

तरीही, आरटीआय अर्ज दाखल करणाऱ्या 'नागरिक सेवा ट्रस्ट' या एनजीओने 'बीबीसी'ला सांगितलं की, फक्त दोन गावांमधून इतक्या मोठ्या प्रमाणात अनैसर्गिक मृत्यू होणं हे सामान्य नाही. पोलिसांच्या नोंदीत असलेल्या मृत्यूंबरोबरच, गेल्या काही वर्षांतही अशाच प्रकारच्या अनैसर्गिक मृत्यूंचे आरोप होत आहेत.

स्थानिक रहिवासी महेश शेट्टी थिमारोडी आणि गिरीश मत्तेण्णावर यांनी असा आरोप केला आहे की, 1979 साली एका शिक्षकाला जिवंत जाळण्यात आलं होतं, कारण त्यानं धर्मस्थळातील प्रभावशाली लोकांविरोधात न्यायालयात दाद मागितली होती.

धर्मस्थळ आणि उजिरेमधील अनेक लोकांना डिसेंबर 1986 मधील आणखी एक घटना आठवते, जेव्हा 17 वर्षांची एक मुलगी आपल्या कॉलेजमधून अचानक बेपत्ता झाली होती. 56 दिवसांनंतर तिचा मृतदेह नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर विवस्त्र अवस्थेत सापडलं होतं.

मुलीच्या वडिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप, मुलीचे कुटुंबीय आणि स्थानिक लोकांचा आहे.

पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केला नाही, असं त्यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.

Photo Caption- तक्रारदाराला दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित करताना त्याला डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्णपणे काळ्या कपड्यांनी झाकलेलं होतं. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, तक्रारदाराला दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित करताना त्याला डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्णपणे काळ्या कपड्यांनी झाकलेलं होतं. (फाइल फोटो)

मृत मुलीच्या बहिणीने सांगितलं, "जेव्हा आमच्या बहिणीचा मृतदेह सापडला, तेव्हा तिचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. आमच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याऐवजी, आमच्या वडिलांनी पुरावे सुरक्षित राहावेत म्हणून तिचा मृतदेह दफन केला होता.

आमच्या मामीने सांगितलं होतं की, जेव्हा मृतदेह सापडला, तेव्हा तिचे पुढचे दात गायब होते. गावातील प्रभावशाली लोक आमच्या वडिलांवर नाराज होते."

2003 साली आणखी एक अशीच घटना घडली होती. त्यावेळी प्रथम वर्षात शिकणारी एक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी धर्मस्थळाहून अचानक बेपत्ता झाली होती. ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला आली होती.

तिच्या आईने आरोप केला की, पोलिसांनी त्यांची तक्रारही नोंदवून घेतली नाही. त्यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, गावातील काही वयोवृद्ध लोकांनी त्यांना घाबरवलं होतं.

"तुम्हाला वाटतं का आम्हाला दुसरं काही काम नाही? आता तुमचं तुम्हीच पाहून घ्या," असं त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप आहे.

त्या सांगतात की, त्यांच्या अडचणी इथंच संपल्या नाहीत.

त्या म्हणाल्या, "जेव्हा मी मंदिराबाहेर बसले होते, तेव्हा काही लोकांनी माझं अपहरण केलं आणि ओलीस ठेवलं. मी माझ्या मुलीबद्दल त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर मागून वार केला. तीन महिन्यांनंतर मला थेट बंगळुरूच्या एका रुग्णालयात शुद्ध आली."

जेव्हा त्या मंगळुरूमधील त्यांच्या घरी परतल्या, तेव्हा त्यांचं घर जळून खाक झालेलं होतं. त्यांनी सांगितलं, "माझे कपडे, मुलीचे कपडे, माझी कागदपत्रं, तिचीही कागदपत्रं, सगळं काही जळून राख झालं होतं."

अलीकडील घडामोडींनंतर त्यांनी विनंती केली आहे की, जर खोदकामात त्यांच्या मुलीचे अवशेष सापडले, तर ते त्यांना सोपवावेत.

आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्हीही तणावातून जात असाल, तर भारत सरकारच्या 'जीवनसाथी' हेल्पलाइनवर 1800 233 3330 या क्रमांकावर संपर्क करून मदत घेऊ शकता. तसंच, याबाबत आपल्या मित्रांशी आणि नातेवाइकांशी बोलणंही महत्त्वाचं आहे.

Photo Caption- धर्मस्थळ प्रकरणी कायदेशीर लढा देणारे प्रमुख लोक

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, धर्मस्थळ प्रकरणी कायदेशीर लढा देणारे प्रमुख लोक

या सर्व घटनां दरम्यान, 2012 साली अशी एक घटना समोर आली जिने धर्मस्थळाच्या कथित गुन्हेगारी इतिहासाला वेगळं वळण दिलं.

ऑक्टोबर 2012 मध्ये एका अल्पवयीन मुलीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला. त्या शरीरावर ठिकठिकाणी जखमांच्या खुणा होत्या.

मुलीच्या आईने 'बीबीसी'ला सांगितलं, "तिच्या शरीराकडे पाहून कुणालाही कळू शकलं असतं की, तिच्यावर अनेक लोकांनी बलात्कार केला होता."

मृत्यूचा तपास अत्यंत निष्काळजी आणि हलगर्जीपणे करण्यात आल्याचा आरोप मुलीचे कुटुंबीय आणि स्थानिकांनी केला. न्यायाच्या मागणीसाठी स्थानिक लोक आणि मानवाधिकार संघटनांनी संपूर्ण कर्नाटकभर आंदोलनं केली.

कर्नाटक पोलिसांनी संतोष रावला आरोपी म्हणून हजर केलं आणि कुटुंबाच्या तक्रारीत धर्मस्थळाच्या ज्या चार प्रभावशाली लोकांचं नाव होतं, त्यांना क्लीन चिट दिली.

तब्बल 9 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर, 2023 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने संतोष रावची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयानं सांगितलं की, 'सरकारी पक्षाला संतोष राव विरोधात एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही.'

'बीबीसी'नं या चारही प्रकरणांबाबत पोलिसांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

धर्मस्थळाचे 'प्रभावशाली लोक'

धर्मस्थळ मंदिराशी संबंधित कुटुंबावर व्हिसलब्लोअरने केलेले आरोप आणि इतर चारही प्रकरणांमधील एक साम्य म्हणजे, सर्व आरोप त्या एकाच कुटुंबावर आहेत जे या मंदिराचं व्यवस्थापन पाहतात.

2012 मध्ये ज्यांच्या नातीचा मृतदेह सापडला होता, त्यांनी सांगितलं की, "सर्वांना माहीत आहे की, खरे गुन्हेगार कोण आहेत. ते लोकांना मारून रस्त्याच्या कडेला पुरायचे आणि ते पोलिसांनाही घाबरत नसत. तेव्हा स्वच्छतागृह नव्हते, आम्ही जंगलात जायचो. तिथे कधीकधी रानडुकरांनी उकरलेले मृतदेह दिसायचे."

'नागरिक सेवा ट्रस्ट' या एनजीओचे सदस्य असलेले सोमनाथ यांनीही हीच गोष्ट पुन्हा सांगितली. याच ट्रस्टने या भागात झालेल्या अनैसर्गिक मृत्यूंबाबत आरटीआय दाखल केला होता.

त्यांनी 'बीबीसी'ला सांगितलं, "इथे एक टोळी आहे, जी 'डी गँग' म्हणून ओळखली जातं. धर्मस्थळातील काही मोठ्या लोकांचा या टोळीला पाठिंबा आहे."

एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आल्याच्या कथित प्रकरणात महेश शेट्टी थिमारोडी हे कायदेशीर लढा देत आहेत. ते सांगतात की, गेल्या 13 वर्षांत त्यांच्याविरोधात 25 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

ते म्हणाले, "मी लहानपणापासून हे सगळं पाहत आलो आहे. तुम्हाला माहीत आहे का की, किती मृतदेह जंगलात सडले किंवा रस्त्यांच्या खाली पुरले गेले?"

Photo Caption- धर्मस्थळ हे एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित धार्मिक स्थान आहे.
फोटो कॅप्शन, धर्मस्थळ हे एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित धार्मिक स्थान आहे.

या प्रकरणात त्यांच्यासोबत लढणारे माजी पोलीस अधिकारी आणि माजी भाजप नेते गिरीश मत्तेण्णावर यांनीही आरोप केला की, शेकडो बलात्कार आणि खूनाचे गुन्हे कधीच नोंदवले गेले नाहीत.

त्यांनी 'बीबीसी'शी बोलताना म्हटलं की, "दोषी लोक धर्म आणि देवाचं नाव घेऊन हे सगळं करतात."

अलीकडच्या काही वर्षांत अनेक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी मंदिर चालवणारं कुटुंब सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला आहे.

विद्यार्थी नेता तनुश शेट्टीनं सांगितलं की, त्यानं जेव्हा सोशल मीडियावर धर्मस्थळ कुटुंबाविरोधात लिहायला सुरुवात केली, तेव्हा त्याला 'लवकरच तुझा अपघात होणार आहे,' असा मेसेज आला.

त्याच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन महिन्यांनंतर त्याला एका रिक्षाने धडक दिली. त्यानंतर त्याला पुन्हा एक मेसेज आला, 'तुझा अपघात मी पाहिला. ती देवाची इच्छा होती.'

तनुशने आरोप केला की, पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर जेव्हा त्यानं थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला, तेव्हाच एफआयआर नोंदवण्यात आला.

तनुशने सांगितलं, "पण नंतर न्यायालयानं तपासावर स्थगिती दिली. जो कोणी धर्मस्थळाच्या प्रभावशाली लोकांविरुद्ध बोलतो, त्यालाच टार्गेट केलं जातं."

Photo Caption- या यूट्यूबर्सनी धर्मस्थळ प्रकरण उचलून धरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
फोटो कॅप्शन, या यूट्यूबर्सनी धर्मस्थळ प्रकरण उचलून धरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कर्नाटकातील एक प्रमुख यूट्यूब पत्रकार एम.डी. समीर यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, धर्मस्थळातील प्रभावशाली लोकांविरोधात रिपोर्टिंग केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.

2012 साली अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर स्थानिक सोशल मीडिया पत्रकार समीर यांनी हा मुद्दा उचलून धरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

समीर यांनी सांगितलं की, सध्या त्यांच्यावर तीन खटले चालू आहेत आणि यूट्यूबवरचा बराचसा कंटेंट काढून टाकण्यासाठी त्यांना कायदेशीर नोटिसाही मिळाल्या आहेत.

या प्रकरणात तक्रार करणाऱ्या व्यक्तीने, जो स्वतःला धर्मस्थळाचा माजी सफाई कर्मचारी सांगतो, त्यानं आपल्या जबाबात, 'माझं नाव उघड होण्यापूर्वीच कुणीतरी मला गायब करेल किंवा माझी हत्या करेल,' अशी भीती व्यक्त केली आहे.

'बीबीसी'ने या आरोपांवर प्रतिक्रिया मागण्यासाठी धर्मस्थळ मंदिराच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

महेश शेट्टी थिमारोडी यांनी दावा केला आहे की, मंदिर चालवणारं कुटुंब इतकं प्रभावशाली आहे, कारण भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या तिन्ही मोठ्या पक्षांनी आजवर त्यांना पाठिंबा दिला आहे.

"राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते त्यांची भेट घेतात," असं थिमारोडी सांगतात.

परंतु, तीनही पक्षांनी हे आरोप फेटाळले आहेत.

नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर भाजपच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं, "या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे. चौकशी पूर्ण होऊ द्या, मग अहवाल जनतेसमोर येईलच."

तर दुसरीकडे काँग्रेसच्या माध्यम समितीचे उपाध्यक्ष सत्यप्रकाश यांनी काँग्रेस सरकारनेच एसआयटीची स्थापना केली असल्याचा मुद्दा मांडला.

ते म्हणतात, "गुन्हेगार कितीही प्रभावशाली असले, तरी त्यांना न्याय मिळवून देणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे. जे लोक सत्य बोलत आहेत, त्यांना संरक्षण देणं देखील आमचं कर्तव्य आहे."

जेडीएसचे प्रवक्ते अरिवलागन म्हणाले, "आमच्या कोणत्याही नेत्याचा त्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. एसआयटीच्या तपासाचा निकाल येईपर्यंत थोडी वाट पाहा."

या प्रकरणात तक्रारदाराचं प्रतिनिधित्व करणारे वकील के.व्ही. धनंजय यांनी 'बीबीसी'शी बोलताना सांगितलं की, तक्रारदारानं केलेल्या आरोपांची सत्यता तपासणं ही आता पोलिसांची जबाबदारी आहे.

के.व्ही. धनंजय म्हणतात, "त्यांचे आरोप जुन्या प्रकरणांशी किंवा सुरू असलेल्या चौकशींशी संबंधित नाहीत. ही पूर्णपणे नवीन तक्रार आहे. माझ्या माहितीनुसार, हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)