आसाराम बापू- सत्संगाचे कार्यक्रम ते आमरण जेलपर्यंतचा प्रवास

आसाराम बापू

फोटो स्रोत, Getty Images

गुजरातमधील गांधीनगर सेशन कोर्टानं स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला महिला शिष्यावरील बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलंय आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मध्ये आसाराम बापूविरोधात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता.

सेशन कोर्टातील न्या. डी. के. सोनी यांनी आसाराम बापूला दोषी ठरवण्याचा आदेश पारित केला. मात्र, शिक्षेची निर्णय राखून ठेवण्यात आला असून, आज (31 जानेवारी) जाहीर करण्यात येईल.

आसारामच्या पत्नीसह इतर सहा जणांना कोर्टानं पुराव्याअभावी निर्दोष सोडलंय.

अहमदबादमधील चंदखेडा पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार, आसाराम बापूने 2001 ते 2006 या काळात वेगवेगळ्या वेळी आश्रमात महिला शिष्यावर बलात्कार केला.

कोर्टानं तक्रारदाराने केलेले आरोप मान्य करत, कलम 376-2(सी), कलम 377 आणि इतर कायद्यांअतर्गत आसाराम बापूला दोषी ठरवलंय, असं सरकारी वकील आर. सी. कोडेकर यांनी दिली.

आसाराम बापू हा सध्या बलात्काराच्या इतर प्रकरणात जोधपूरच्या तुरुंगात आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी याआधी जोधपूर न्यायालयानं आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 2013 सालच्या या प्रकरणात आज सकाळीच कोर्टात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले होते.

77 वर्षांच्या आसाराम बापूवर 2013 मध्ये 16 वर्षांच्या मुलीवर जोधपूरजवळच्या एका आश्रमात बलात्कार करण्याचा आरोप आहे. मुलीचे आईवडील आसारामचे अनुयायी होते.

15 ऑगस्ट 2013 रोजी पीडित मुलगी शाळेत पडली, तेव्हा तिच्यावर उपचार करण्यासाठी तिचे आईवडील तिला आसारामच्या आश्रमात घेऊन गेले. पोलिसांच्या मते तेव्हाच आसारामनी तिच्यावर बलात्कार केला होता.

त्यानंतर आसाराम बापूला इंदूरमध्ये अटक करण्यात आली. अटकेनंतर समर्थकांनी गोंधळ घातला आणि निदर्शनं केली.

आसाराम बापू

फोटो स्रोत, Getty Images

अटकेनंतर त्याची पौरुषत्व चाचणी घेण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आणि मग 2 सप्टेंबर 2013ला त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.

आसाराम यांच्याकडून आतापर्यंत 12 वेळा जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यातला एकही अर्ज कोर्टाने स्वीकारला नाही.

2014 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा अनेक साक्षीदारांवर आसाराम समर्थकांनी हल्ला केला होता.

कोण आहे आसाराम बापू?

आसाराम बापू

फोटो स्रोत, AFP

एप्रिल 1941मध्ये पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या बेरानी गावात जन्माला आलेल्या आसाराम याचं खरं नाव असुमल हरपलानी आहे.

सिंध प्रांतातल्या व्यापारी समुदायाशी संबंधित असलेल्या आसारामचं कुटुंब 1947च्या फाळणीनंतर अहमदाबाद शहरात येऊन स्थायिक झालं.

60च्या दशकांत त्याने लीला शाह यांना आपलं अध्यात्मिक गुरू मानलं. त्यानंतर लीला शाह यांनी असुमल याचं नाव आसाराम असं ठेवलं.

1972 मध्ये आसाराम यांनी अहमदाबादपासून जवळपास 10 किलोमीटर दूर साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या मुटेरामध्ये त्यांचा पहिला आश्रम सुरू केला.

इथून सुरू झालेला आसारामचा अध्यात्मिक प्रकल्प हळूहळू गुजरातमधल्या शहरांमार्गे देशातल्या इतर राज्यांमध्ये पोहोचला.

भक्ती आणि संपत्ती

आसाराम बापू

सुरुवातीला गुजरातच्या ग्रामीण भागातले गरीब, मागास आणि आदिवासी वर्गातले आसाराम बापूचे भक्त बनले. प्रवचन, देशी औषधं आणि भजन-किर्तन या त्रिसूत्रीच्या जोरावर आसाराम यांचा प्रभाव हळूहळू शहरी मध्यमवर्गांमध्ये वाढू लागला.

सुरुवातीच्या वर्षांत प्रवचनानंतर प्रसादाच्या नावाखाली मिळणाऱ्या मोफत जेवणामुळे आसाराम यांच्या 'भक्तांच्या' संख्येत वेगानं वाढ झाली.

नंतरच्या काही वर्षांत आसारामनी आपला मुलगा नारायण साई यांच्यासह देश-विदेशात 400 आश्रमांचं जाळं उभारलं.

भक्तांची संख्या वाढल्यानंतर राजकीय नेत्यांनीही आसाराम यांच्या माध्यमातून एका मोठ्या मतदार समूहावर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला.

आसाराम बापू

फोटो स्रोत, Getty Images

1990 पासून 2000च्या दशकापर्यंत त्यांच्या भक्तांच्या यादीत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी यांसारखे दिग्गज नेते सामिल झाले होते.

यांच्याबरोबरीनं दिग्विजय सिंह, कमलनाथ आणि मोतीलाल व्होरा यांसारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा भक्तांच्या यादीत होते.

तसंच, भाजपचे विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री सुद्धा आसाराम यांचं दर्शन घेण्यासाठी वारंवार जात राहिले आहेत. यात शिवराजसिंह चौहान, उमा भारती, रमण सिंह, प्रेमकुमार धूमल आणि वसुंधराराजे यांचा समावेश आहे.

या सगळ्या नेत्यांपेक्षा 2000मध्ये आसाराम यांचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्यांच्या यादीत महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं.

मात्र, 2008मध्ये आसाराम यांच्या मुटेरा इथल्या आश्रमात दोन लहान मुलांच्या हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली.

2008चं मुटेरा आश्रमकांड

आसाराम बापू

फोटो स्रोत, Getty Images

5 जुलै 2008ला आसारामचा मुटेरा आश्रमाबाहेरील साबरमती नदीच्या सुखलेल्या पात्रात 10 वर्षीय अभिषेक वाघेला आणि 11 वर्षीय दीपेश वाघेला यांचे अर्धे जळलेले आणि विकृत अवस्थेत असलेले मृतदेह आढळले.

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या या चुलत भावंडांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच आसारामच्या भक्तांनी तिथल्या 'गुरुकुल'मध्ये त्यांना प्रवेश दिला होता.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं डी. के. त्रिवेदी आयोगाची नियुक्ती केली होती. पण, आजतागायत या आयोगाचाचा अहवाल सर्वांसाठी खुला करण्यात आलेला नाही.

याच दरम्यान, 2012मध्ये गुजरात पोलिसांनी मुटेरा आश्रमाच्या 7 कर्मचाऱ्यांवर मुलांच्या हत्येचे आरोप निश्चित केले.

जोधपूर बलात्कार प्रकरण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑगस्ट 2013मध्ये आसाराम यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारं शाहजहांपूरमधलं पीडित कुटुंब घटनेपूर्वी आसाराम यांच भक्त होतं. पीडितेच्या वडिलांनी स्वतःच्या खर्चातून शाहजहांपूर इथला आश्रम बांधला होता.

शिक्षणाचे चांगले संस्कार व्हावेत या आशेत त्यांनी आपली दोन्ही मुलं आसाराम यांच्या छिंदवाडा इथल्या गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी पाठवली होती.

7 ऑगस्ट 2013 ला पीडितेच्या वडिलांना छिंदवाडा इथल्या गुरुकुलमधून फोन आला. तुमची 16 वर्षीय मुलगी आजारी पडली आहे, अशी त्यांना बतावणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा पीडितेचे आई-वडील छिंदवाडा इथल्या गुरुकुलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, तुमच्या मुलीला भूतबाधा झाली आहे. ज्याला आसाराम घालवू करू शकतात.

14 ऑगस्टला पीडितेचं कुटुंब आसाराम यांना भेटण्यासाठी त्यांच्या जोधपूर इथल्या आश्रमात पोहोचलं. 15 ऑगस्टला संध्याकाळी 16 वर्षीय पीडितेला 'बरं' करण्याच्या बहाण्यानं आपल्या खोलीत बोलवून तिच्यावर आसाराम यांनी बलात्कार केला. असा उल्लेख या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे करण्यात आला आहे.

पीडितेच्या कुटुंबासाठी ही घटना म्हणजे त्यांचे भगवान त्यांचे भक्षक झाल्यासारखी होती. विश्वास गमावल्यामुळे दुखावलेल्या या कुटुंबानं सुनावणीची गेली पाच वर्ष स्वतःच्या घरात जवळपास नजरकैदेत काढली आहेत.

पैशाची प्रलोभनं ते मारून टाकण्याच्या धमक्या मिळाल्या तरी हे कुटुंब आपल्या भूमिकेवर कायम राहिलं.

साक्षीदारांवर हल्ल्यांचं सत्र

आसाराम बापू

फोटो स्रोत, Getty Images

28 फेब्रुवारी 2014च्या सकाळी आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या सुरतच्या दोन बहिणींपैकी एकीच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाला.

15 दिवसांतच दुसरा हल्ला आसारामचा व्हीडिओग्राफर राकेश पटेल यांच्यावर झाला. या हल्ल्यानंतर काही दिवसांतच दिनेश भगनानी नावाच्या तिसऱ्या साक्षीदारावर सुरतच्या कपड्यांच्या बाजारपेठेत अॅसिड हल्ला झाला.

हे तिनही साक्षीदार या गंभीर हल्ल्यांनंतरही वाचले. यानंतर 23 मे 2014 ला आसाराम यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिलेले अमृत प्रजापती यांच्यावर चौथा हल्ला झाला. पॉईंट ब्लँक रेंजच्या बंदुकीनं सरळ मानेला गोळी लागल्यानंतर 17 दिवसांनी प्रजापती यांचा मृत्यू झाला.

पुढचा हल्ला आसाराम प्रकरणात जवळपास 187 बातम्या लिहीणारे शाहजहांपूरचे पत्रकार नरेंद्र यादव यांच्यावर करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर तिक्ष्ण हत्यारानं वार केले. त्यांचं ऑपरेशन झालं आणि मानेवर 76 टाके पडले. या ऑपरेशननंतर त्यांना नवं आयुष्य मिळालं.

आसारामचे सचिव म्हणून काम केलेल्या राहुल सचान यांच्यावर जोधपूर न्यायालयात साक्ष दिल्यानंतर आवारात जीवघेणा हल्ला झाला होता. जानेवारी 2015मध्ये पुढचे साक्षीदार अखिल गुप्ता यांची मुजफ्फरनगरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बरोबर एका महिन्यानंतर आसारामचे सचिव म्हणून काम पाहिलेल्या राहुल सचान यांच्यावर साक्ष दिल्यानंतर लगेच जोधपूर न्यायालयाच्या आवारातच जिवघेणा हल्ला झाला. राहुल त्या हल्ल्यात बचावले. पण, 25 नोव्हेंबर 2015 पासून आजपर्यंत राहुल गायब आहेत.

याच प्रकरणात आठवा हल्ला 13 मे 2015ला महेंद्र चावला या साक्षीदारावर पानिपतमध्ये हल्ला झाला. हल्ल्यात वाचलेल्या महेंद्र यांना आज अपंगत्व आलं आहे.

पुढे तीन महिन्यांनंतर जोधपूर प्रकरणात साक्षीदार असलेल्या 35 वर्षीय कृपालसिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येच्या काही आठवडे आधीच सिंह यांनी जोधपूर न्यायालयात पीडितेच्या बाजूनं साक्ष दिली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)