बॉबी देओलच्या 'आश्रम-3' सीरिजवरून मध्य प्रदेशमध्ये राजकारण का तापलं आहे?

@MXPlayer

फोटो स्रोत, @MXPlayer

भोपाळमध्ये रविवारी प्रकाश झा यांच्या आश्रम-3 या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन केलं. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलं की, राज्यात होणाऱ्या शूटिंगसाठी गाइडलाइन बनविण्यात येतील.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं की, मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या शूटिंगच्या आधी निर्मात्यांनी प्रशासनाला स्क्रिप्ट आणि इतर माहिती देणं गरजेचं आहे. त्यांनी म्हटलं, "ज्यामध्ये आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना भडकवणारे प्रसंग असतील अशा कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगला मध्य प्रदेशमध्ये मान्यता दिली जाणार नाही."

या वेब सीरिजच्या नावावरून आमचाही आक्षेप आहे, असंही त्यांनी म्हटलं.

गृहमंत्र्यांनी केला आंदोलकांचा बचाव

नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं, "नेहमीच आमच्या भावना दुखावणारी दृश्यं का चित्रित का केली जातात? जर तुमच्यात हिंमत असेल तर दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावणारी दृश्यंही चित्रित करून दाखवा."

आंदोलन करणाऱ्यांना पाठिशी घालताना गृहमंत्र्यांनी म्हटलं की, हे नेमकं का झालं याचा विचार प्रकाश झा यांनीही करायला हवा.

रविवारी (24 ऑक्टोबर) मोठ्या संख्येनं बजरंग दलाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत जुन्या जेलच्या परिसरातील शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले. ते प्रकाश झा यांच्याशी बोलत होते. दरम्यान, त्यांनी अचानक तिथे तोडफोड करायला सुरूवात केली. प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली. तिथे असलेल्या व्हॅनिटी व्हॅन, ट्रक आणि दुसऱ्या वाहनांची मोडतोड केली. किमान पाच व्हॅनिटी व्हॅनचं नुकसान झालं.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा
फोटो कॅप्शन, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

शूटिंगसाठी असलेल्या स्टाफलाही मारहाण करण्यात आली. यामध्ये सहा कर्मचारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. हे घडलं तेव्हा वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता बॉबी देओलही उपस्थित होता.

प्रकाश झा यांनी व्यक्त केली नाही प्रतिक्रिया

रविवारी (24 ऑक्टोबर) पोलिसांनी या प्रकरणी चार लोकांना अटक केली होती. सोमवारी (25 ऑक्टोबर) पोलिसांनी 25 कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली. प्रकाश झा किंवा त्यांच्या युनिटकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाहीये.

या सर्व प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास प्रकाश झा यांनी नकार दिला आहे.

सोशल मीडियावर प्रकाश झा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्यावर शाई फेकण्यात आल्यांच दिसतंय.

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, सोशल मीडियावर प्रकाश झा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्यावर शाई फेकण्यात आल्यांच दिसतंय.

भोपाळ जिल्ह्याचे प्रभारी मंत्री भूपेंद्र सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, भोपाळमध्ये जे घडलं ते दुर्दैवी आहे.

त्यांनी म्हटलं, "आम्ही आधी ही वेब सीरिज पाहू. यामध्ये जर कोणताही आक्षेपार्ह विषय असेल तर त्यावर निर्बंध लावण्यात येतील."

शूटिंगसाठी सध्या मध्य प्रदेशमध्ये आवश्यक ती सुरक्षा, संसाधनं आणि जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

हल्ल्यानंतर राजकारण

या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळालं आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी बजरंग दलावर टीका करताना म्हटलं की, "संघाचं बजरंग दल आता अपराधी प्रवृत्तीच्या लोकांची संघटना बनली आहे."

त्यांनी असंही म्हटलं की, भोपाळमध्ये त्यांनी काय केलं हे आपण पाहू शकतो.

त्यांनी म्हटलं, "मुख्यमंत्रीजी, गृहमंत्रीजी, मध्य प्रदेशची जनता तुम्ही पोसलेल्या गुंडांना किती काळ सहन करणार?"

दिग्विजय सिंह

फोटो स्रोत, Getty Images

दिग्विजय सिंह यांच्या या टिप्पणीवर भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "आश्रम वेब सीरिज बनविणाऱ्यांचं कधी 'मदरशां'वर वेब सीरिज बनविण्याचं धाडस का होत नाही? ईदच्या दिवशी जबलपूरमध्ये पोलिसांवर हल्ला करणारे कठमुल्ले कोण होते, राजाजी? शांतीदूत? त्यादिवशी तुमच्या ट्विटरच्या चिमणीची चिवचिव का बंद होते?"

जबलपूरमध्ये ईद मिलाद उन नबीच्या दिवशी पोलिस आणि मुस्लिम लोक आमने-सामने आले होते. या घटनेचा संदर्भ घेऊन रामेश्वर शर्मांनी दिग्विजय सिंह यांना प्रत्युत्तर दिलं.

दुसरीकडे अखिल भारतीय संत समितीने सोमवारी (25 ऑक्टोबर) भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवेदन देऊन आश्रम-3 वेब सीरिजचं शूटिंग थांबविण्याची विनंती केली.

समितीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रकाश झा यांची निर्मिती असलेली आश्रम-3 सनातन धर्माच्या विरुद्ध आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संत समाजाला बदनाम करण्यात येत आहे.

समितीनं म्हटलं की, "सनातन धर्मात आश्रमाचं काय महत्त्व आहे, हे आपल्याला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या पाच दशकांपासून तथाकथित बॉलिवूड आपल्या धार्मिक भावना, भारतीय परंपरा आणि संस्कृतीवर आघात करत आहे."

'मट्टो की सायकल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रकाश झा

फोटो स्रोत, M GANI

फोटो कॅप्शन, 'मट्टो की सायकल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रकाश झा

त्यांनी असंही म्हटलं, "आश्रमच्या आधीच्या दोन सीझनमध्येही साधूसंत आणि आश्रमाचं जे स्वरुप दाखविण्यात आलं आहे, ते निंदनीय आहे आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचं जागतिक कारस्थान आहे."

संतांनी असंही म्हटलं की, काही असामाजिक तत्वांवर कारवाई केली जावी आणि अशा चित्रपटांच्या निर्मितीवरही बंदी घालण्यात यायला हवी. नाहीतर हिंदू समाज अशा कृतींचा प्रतिकार करण्यासाठी तयार आहे. या स्थितीत प्रशासनाची जबाबदारी असेल.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिलं आव्हान

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं की, त्या मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहितील. अशा तऱ्हेच्या वेब सीरिज आणि चित्रपट पूर्ण देशात बॅन करायला हव्यात.

प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं की, चित्रपट निर्मात्यांमध्ये जर हिंमत असेल मदरसे आणि चर्चवरही चित्रपट बनवावा.

प्रज्ञा सिंह ठाकूर

फोटो स्रोत, Getty Images

आता सोमवारपासून (25 ऑक्टोबर) या सीरिजचं शूटिंग दुसऱ्या ठिकाणी होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रकाश झा हे त्यांच्या चित्रपटांचं शूटिंग भोपाळमध्येच करत होते. मात्र त्यांना या पद्धतीच्या विरोधाला सामोरं जावं लागलं नव्हतं. पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक चित्रपट आणि वेब सीरिजचं शूटिंग होत आहे. राज्य सरकार शूटिंगसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देताना दिसतं. मात्र रविवारी जी घटना घडली त्यामुळे राज्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)