मोबाईलमधल्या छुप्या ॲपद्वारे पुण्यातील स्वघोषित धर्मगुरु पाहायचा भक्तांचे खासगी क्षण, अशा ॲपपासून सावध कसं व्हायचं?

फोटो स्रोत, UGC
'माझ्याकडे दिव्य शक्ती आहे', असं सांगून भक्तांना फसवणाऱ्या स्वघोषित धर्मगुरुला पोलिसांनी अटक केली आहे.
हा स्वघोषित धर्मगुरु भाविकांच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड करत असे. महिला तसेच पुरुष भक्तांच्या मोबाईलद्वारे तो त्यांच्या खासगी आयुष्याचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये पाहात असे.
तसेच भक्तांना वेश्यागमन, अनैतिक शारीरिक संबंध आणि इतर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत असे.
आता या बाबाला पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रसाददादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद भीमराव तामदार (29) असं या स्वघोषित धर्मगुरुचं नाव आहे. प्रसाद हा स्वतःला आध्यात्मिक गुरू भासवायचा. त्याने एकाचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर बावधन पोलिसांनी प्रसाद दादा भीमराव तामदार याला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रसाद दादा भीमराव तामदार याचं सोशल मीडियावर अनेक महिलांना अंघोळ घालताना, महिलांसोबत विचित्र डान्स करत असताना, तसेच महिलांची ओटी भरत असतानाचे व्हीडिओ याआधी देखील व्हायरल झाले आहेत.

फोटो स्रोत, UGC
याबाबत पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, "पुरुष आणि महिला भक्तांचे शारीरिक आणि मानसिक छळ करण्यासाठी प्रसाद तामदार यांनी पुण्यातील मुळशी तालुक्यातील सुसगावातील स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये चक्क एक मठ उभारला आहे. प्रसाद तामदार स्वतःला दिव्यशक्ती असलेला आध्यात्मिक गुरू भासवत असल्याने त्याला मानणारा एक मोठा भक्त परिवार देखील आहे. मात्र, आता याच प्रसाद तामदार विरोधात बावधन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 75 (1) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013 चे कलम 3 सहा भारतीय तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 प्रमाण गुन्हा दाखल केला आहे."
ॲप इन्स्टॅाल करुन खाजगी क्षण पाहण्यासोबतच या स्वघोषित धर्मगुरुने आणखीही कृत्य केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. काही भक्तांना आंघोळ घालण्याच्या निमित्ताने तो तुमच्यातल्या वाईट गोष्टी माझ्यात घेतोय असं म्हणत अत्याचार करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
यात काही भक्तांना तो मृत्यूची भीती देखील घालत होता. पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, "त्याचा भक्त परिवार मोठा होता. त्यापैकी संकटात कोण आहे याचा अंदाज बांधून तो कृती करायचा. काही लोकांना त्याने अमुक तारखेला किंवा अमुक वर्षी तू मरणार आहेस असं सांगून काही कृती करायला भाग पाडलं"
वेगवेगळ्या मार्गाने या बाबाने फसवणूक केल्याचं तपासात स्पष्ट झालंय. याबरोबरच त्यांच्याकडून पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन, लॅपटॅाप असं साहित्य ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे मंगळवारी (1 जुलै) कोर्टात पोलिसांनी आणखी कोठडीची मागणी केली. तपासातील बाबी लक्षात घेऊन कोर्टाने 4 जुलै पर्यंत कोठडीत वाढ केली आहे.
या सर्व प्रकरणी प्रसाददादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद भीमराव तामदार याच्या वकिलाशी बोलण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत.
असे ॲप्स कशासाठी तयार करण्यात आले आहेत?
रोहन न्यायाधीश सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट आहेत, तसंच डिजिटल टास्क फोर्सचे संचालक आहेत.
नेमकी ही फसवणूक कशी होते, त्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते आणि त्यावरील उपाययोजना काय, याची माहिती त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
रोहन म्हणतात, "या प्रकरणात एअरड्रॉईड किड किंवा एअरड्रॉईड पेरेन्टल कंट्रोल हे स्पाय सॉफ्टवेअर वापरण्यात आलं आहे. सहसा ते अमेरिकेत पेरेन्टल कंट्रोलसाठी म्हणजे मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालकांकडून वापरलं जातं. भारतात त्याचा गैरवापर होतो आहे."
रोहन पुढे म्हणाले, "याचा वापर करून युजरच्या बऱ्याचशा हालचालींवर लक्ष ठेवलं जातं, त्या रेकॉर्ड केल्या जातात. कारण अलीकडे प्रत्येकाचाच मोबाईल फोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे दिवसाचे अनेक तास मोबाईल आपल्या हाती किंवा जवळच असतो. साहजिकच याप्रकारचं सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून युजरवर पाळत ठेवली जाते. त्याच्या खासगी गोष्टींची माहिती घेतली जाते किंवा त्या रेकॉर्ड केल्या जातात."

फोटो स्रोत, Getty Images
या छुप्या सॉफ्टवेअरबद्दल ते म्हणाले, "जर हे ॲप किंवा सॉफ्टवेअर पेड स्वरुपाचे असतील तर ते जेव्हा मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले जातात तेव्हा ते मोबाईलच्याच सॉफ्टवेअरमध्ये लपवलं जातं. मोबाईलमधील इतर ॲपप्रमाणे त्याचा लोगो मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत नाही. ते एकप्रकारे लपवण्यात आलेलं असतं. त्यामुळे युजरला त्याच्या मोबाईलमध्ये असं एखादं सॉफ्टवेअर किंवा ॲप इन्स्टॉल करून त्याच्यावर लक्ष ठेवलं जात असल्याची अजिबात कल्पना येत नाही."
आपल्या मोबाईलचं संरक्षण कसं कराल?
हे सॉफ्टवेअर किंवा ॲप नेमकं कशाप्रकारे युजरच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल केलं जातं, याबद्दल रोहन म्हणाले, "हे सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये दोन प्रकारे इन्स्टॉल करता येतात. एकतर ज्याला याप्रकारे फसवणूक करायची आहे ती व्यक्ती युजरचा मोबाईल कोणत्या तरी कारणानं स्वत:च्या हातात घेतो आणि हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो."

फोटो स्रोत, Getty Images
"जर मोबाईल ॲंड्राईड असेल तर एपीके प्रकारची फाईल असते आणि जर मोबाईल आयफोन असेल तर आयपीए फाईल असते. पेनड्राईव्हचा वापर करून ती फाईल मोबाईलमध्ये टाकली जाते. शिवाय हे पटकन करता येतं. फक्त एक ते दीड मिनिटात हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यात, कॅमेरा, फोटो, लोकेशन, मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट, एसएमएस इत्यादी इतर कोणतंही ॲप मोबाईलवर इन्स्टॉल करताना ज्या परमिशन दिल्या जातात त्या सर्व परमिशन मिळवता येतात. पुण्यातील प्रकरणात याच पद्धतीचा वापर झाला असणार आहे."
"याप्रकारचं सॉफ्टवेअर किंवा ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे रिमोट इन्स्टॉलेशन. यात सायबर क्राईमप्रमाणे एखादी लिंक किंवा पीडीएफमध्ये या एपीके फाईल इन्स्टॉल केलेल्या असतात. युजरनं ती लिंक किंवा फाईल ओपन केल्यावर ते सॉफ्टवेअर युजरच्या नकळत मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतं. मात्र प्रत्यक्ष मोबाईल हातात घेऊन हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यास ज्याप्रकारे सर्व परमिशन मिळवता येतात, तसं रिमोट इन्स्टॉलेशन केल्यास होत नाही. त्याबाबतीत मर्यादित परमिशनच घेता येतात."
अशा प्रकारांपासून बचाव करण्याचा उपाय सांगताना रोहन म्हणाले, "या प्रकारच्या सॉफ्टवेअर किंवा ॲपपासून बचाव करण्यासाठी अँटी व्हायरस मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. ज्याप्रमाणे आपण आवर्जून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये अँटी व्हायरस इन्स्टॉल करतो. तसंच मोबाईलच्या बाबतीत देखील करण्याची आवश्यकता आहे."
ढोंग उघडं पडल्यावर भक्त हादरले
प्रसाद तामदार याला पुण्यात आणि महाराष्ट्र मानणारा मोठा भक्त परिवार आहे. मात्र, बाबाचं खरं ढोंगी रूप बाहेर आल्यानंतर अनेक भक्तांना मोठा हादरा बसला आहे. प्रसाद तामदार याच्या विरोधात भविष्यात अजून काही महिला आणि पुरुष भक्त समोर येऊन तक्रार देण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे.
"आसाराम बाबा, राम रहीम बाबा यांच्यासारखे स्वघोषित धर्मगुरुचे इतके धक्कादायक कारनामे उघडकीस आल्यानंतरही आमच्या महिला कशा काय या स्वघोषित धर्मगुरुंच्या आहारी जातात", असा संताप महिला हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
"स्वघोषित धर्मगुरु प्रसाद तामदार याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी पोलिसांनी कारवाई करावी" अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











