'ज्यांना हात दाखवायचा त्यांना आम्ही जूनमध्येच दाखवला' - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाची भेट घेऊन आपल्या आणि राज्याच्या भवितव्याविषयी जाणून घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्निक दर्शन घेतले.

ईशानेश्वर मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष कॅ. अशोक खरात हे अंकशास्त्र-ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.

अनेकजण त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात तेव्हा एकनाथ शिंदे हे देखील त्याच हेतूने खरात यांना भेटल्याची चर्चा आहे.

ज्योतिषाला हात दाखवण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ईशानेश्वर मंदिरात एकनाथ शिंदे गेले होते. ईशानेश्वर मंदिराचे अध्यक्ष अशोक खरात हे ज्योतिषी आहेत. त्यांनाच हात दाखवण्यासाठी गेले अशी टीका एकनाथ शिंदेंवर झाली. याबाबत एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली, त्यावेळी ते म्हणाले की आमचं सरकार चांगलं काम करत आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे असली टीका आमच्यावर केली जात आहे.

"जर माझ्यात आत्मविश्वास नसता, माझा आत्मविश्वास डळमळीत झाला असता तर 50 आमदार आणि 13 खासदार माझ्यासोबत आले असते का. ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना आम्ही 30 जून रोजीच दाखवला," शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंनी आपल्या बंडाची आठवण करून देत आपण उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला होता यावर भाष्य केले.

'गोशाळेला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते' - केसरकर

शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की 'मुख्यमंत्री ज्योतिषाला भेटण्यासाठी गेले असं म्हणणे हे अयोग्य आहे.'

दीपक केसरकर

फोटो स्रोत, Getty Images

"ईशानेश्वर येथे नवीन गोशाळेची निर्मिती होत आहे, ती पाहण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. त्यांना जर भविष्य पाहायचं असतं तर ते मुंबईला पाहता आलं नसतं का," असा सवाल केसरकर यांनी केला.

"जर अशोक खरात हे भविष्य पाहत असतील तर त्यांना भेटणारी प्रत्येक व्यक्तीच भविष्य पाहण्यासाठी जाते असे म्हणणे दुर्दैवी आहे," असं केसरकर यांनी म्हटलं.

सरकार तंत्र-मंत्रात अडकलं - संजय राऊत

त्यांच्या या भेटीवर अद्याप शिंदे किंवा खरात यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.

पण त्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. सरकार तंत्र-मंत्रात अडकले आहे त्यामुळे राज्यावर संकटं येत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला घेरले आहे, त्यावरून संजय राऊत यांनी टीका केली.

हात दाखवायला जाणे हे आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं लक्षण - पवारांची टीका

एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या ज्योतिषांच्या भेटीवरुन शरद पवारांनी देखील टीका केली आहे. "दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासाला धक्का बसल्याची लक्षणे आहेत. "जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

शरद पवार

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदर्शन किंवा कोणाला हात दाखवण्यासाठी का जात आहेत, हे मी काही सांगू शकणार नाही. माझा यावर विश्वास नाही. मी कोणालाही हात दाखवायला जात नसतो.

"पण हल्लीच्या काळात आपण नवीन गोष्टी पाहत आहोत. अशा गोष्टी आजपर्यंत आपण महाराष्ट्रात पाहिल्या नव्हत्या," अशी टिप्पणीही शरद पवार यांनी केली.

आम्ही तर हतबलच झालो - अजित पवार

अजित पवार

एकनाथ शिंदे हे ज्योतिषाकडे गेले त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, यावर आम्ही काय बोलणार आम्ही तर हतबलच झालो आहोत. अजित पवार म्हणाले, "सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. अशा काळात विज्ञान काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री हात दाखवायला किंवा ज्योतिष पाहायला गेले म्हणजे आता बोलायला काही राहिले नाही. आम्ही तर हतबलच झालो आहोत."

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

ते म्हणाले, "मुख्यमंत्री नाशिकमधल्या एका ठिकाणी ज्योतिष पाहण्यासाठी गेल्याची सध्या चर्चा आहे. हे जर खरं असेल तर ते अत्यंत वेदनादायी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचं, मुख्यमंत्र्यांचं वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा निषेध व्यक्त करते. ज्योतिष हे शास्त्र स्वप्न विकण्याची कला आहे, थोतांड आहे, असं आम्ही वारंवार सिद्ध केलं आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असं कृत्य करणं म्हणजे समाजात चुकीचा संदेश परवण्यासारखं आहे, याचा आम्ही निषेध व्यक्त करतो," असं महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलं आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनी मुख्यमंत्री देवदर्शनासाठी आले होते, शेतकरी तसंच जनतेसमोरील अडचणी, संकटं दूर व्हावीत यासाठी प्रार्थना केल्याची माहिती माध्यमांना दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)