चंद्रास्वामी : हर्षद मेहता ते नरसिंह रावांपर्यंत जवळीक असलेले चंद्रास्वामी कोण होते?

चंद्रास्वामी-स्कॅममधलं एक दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीय शेअर बाजारात हर्षद मेहता हे नाव 1980 ते 90 च्या दशकात प्रचंड चर्चेत होतं. हर्षद मेहता यांनी भारतीय शेयर बाजाराची दिशा आणि दशा दोन्ही बदलले.

हर्षद मेहतावर आधारित असलेली एक वेब सीरीजही खूप गाजली. शेअर बाजारात हर्षद मेहता जेवढ्या वेगाने शिखरावर गेले त्याच वेगाने ते सेन्सेक्ससारखे खाली कोसळले. त्या काळातला सर्वात मोठा घोटाळा करण्याचा आरोप हर्षद मेहतांवर झाला.

तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावसुद्धा या आरोपांच्या फेऱ्यात आले. या सर्व घडामोडींमध्ये आणखी एका नावाची चर्चा झाली. ते म्हणजे चंद्रास्वामी.

चंद्रास्वामी यांच्या आशीर्वादामुळेच हर्षद मेहताचा घोटाळा बराच काळ पडद्याआड राहिला असं म्हटलं जातं.

चंद्रास्वामींचे थेट पंतप्रधानांपर्यंत संबंध कसे होते?

एकेकाळी जे चंद्रास्वामी अनेक देशांमधील पॉवरफुल लोकांमध्ये उठबस करण्यासाठी प्रसिद्ध होते. ते मृत्यूच्या काहीवर्ष आधी अज्ञातवासात होते.

मात्र चंद्रास्वामी हे काही काळ भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी होते.

एका बाजूला तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे ते अत्यंत जवळचे सल्लागार मानले जात होते आणि दुसऱ्या बाजूला राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. चंद्रास्वामींचं व्यक्तिमत्व अनाकलनीय होतं.

नरसिंह राव, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी. व्ही. नरसिंह राव, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी

या दरम्यान अनेक देशांच्या प्रमुखांशी त्यांचे चांगले संबंध असणं, हवालाचा कारभार, परदेशी मुद्रा अधिनियमांचे उल्लंघन यांसारख्या गंभीर आरोपांमुळे चंद्रास्वामी कायम चर्चेत राहिले.

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहाराव यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात चंद्रास्वामी यांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी कधी अपॉईनमेंट घेण्याचीही आवश्यकता भासली नाही, असंही सांगितलं जातं.चंद्रशेखर यांच्या अल्प कार्यकाळातही चंद्रास्वामींचे वजन होते.

कोण होते चंद्रास्वामी?

दिल्ली-जयपूर हायवेच्या मध्यवर्ती भागात बहरोर येथे एका जैन कुटुंबात जन्मलेले चंद्रास्वामी समांतर सत्तेचे केंद्र चालवण्यापर्यंत कसे पोहचले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

चंद्रास्वामी यांचे वडील धरमचंद जैन व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करत होते. मुळचे ते गुजरातचे होते पण चंद्रास्वामी यांच्या जन्मापूर्वीच ते राजस्थानमध्ये स्थलांतरित झाले होते. जन्माच्या काही वर्षांनंतर ते हैदराबादमध्येही होते.

हिरालाल चौबे यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार नेमीचंद (चंद्रास्वामीचे खरे नाव) यांनी कोणतेही शिक्षण घेतले नव्हते.

लहानपणापासून त्यांना तंत्रसाधनेत रस होता. वयाच्या 16 व्या वर्षापासूनच लोक त्यांना संन्यासी किंवा तांत्रिक म्हणायचे. हिरालाल चौबे यांच्यानुसार चंद्रास्वामी सगळ्यात आधी जैन संत महोपाध्याय मर मुनी यांच्या सानिध्यात आले.

23 व्या वर्षी तंत्र-मंत्राची साधना करण्यासाठी ते बनारस येथील गोपीनाथ कविराज यांच्याकडे पोहोचले. 26 व्या वर्षी त्यांनी पहिला महायज्ञ केला. यानंतर ते काही काळ बिहारमध्ये राहिले.

चंद्रास्वामी

फोटो स्रोत, Pti

फोटो कॅप्शन, चंद्रास्वामी

तंत्र-मंत्र आणि ज्योतिष

पत्रकार राम बहादुर राय यांच्यामते मात्र चंद्रास्वामी यांना ना तंत्र-मंत्र येत होते ना त्यांना ज्योतिष विद्येचे काही ज्ञान होते.

पी व्ही नरसिंहाराव यांच्या सल्लागारांमध्ये राहिलेले वरिष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक सांगतात, "चंद्रास्वामी व्यवहारात कुशल होते पण त्यांना तंत्र विद्या आणि ज्योतिषाचे कोणतेही ज्ञान नव्हते ना त्यांचा यासंदर्भात काही अभ्यास होता."

चंद्रास्वामी यांच्या तंत्र साधनेसंदर्भात राम बहादुर राय सांगतात, "1965-1966 या काळात हिंदुस्थान समाचार एजन्सीचे कार्यालय कॅनॉट प्लेसच्या फायर ब्रिगेड मार्गावर होते. तिथे एक संपादक होते रामरूप गुप्त. ते मोठे ज्योतिषी होते. चंद्रास्वामी लोकांची कुंडली घेऊन त्यांच्याकडे येत असत. रामरुप गुप्त जे सांगायचे तेच चंद्रास्वामी लोकांना सांगायचे."

'स्टोरीज ऑफ इंडियाज लिडिंग बाबाज्' या पुस्तकाच्या लेखिका भवदीप कांग यांना मोहन गुरुस्वामी यांनी सांगितले, "आम्ही चंद्रास्वामी यांना हैदराबादच्या सिटी कॉलेजबाहेर उनाडक्या करताना पाहायचो."

चंद्रास्वामी नागार्जुन सागर डॅम प्रोजेक्टमध्ये स्क्रॅप डिलर म्हणून काम करायचे. यातही ते फसवणुकीत अडकले आणि काही वर्षातच राज्याचे मुख्यमंत्री पी व्ही नरसिंहाराव यांच्यासोबत स्वामी बनून दिसू लागले.

नरसिंहराव यांच्याशी जवळीक

पी.व्ही. नरसिंह राव 1971 ते 1973 दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या काळात चंद्रास्वामी आणि नरसिंह राव यांच्यात जवळीक झाली. राजकीय वर्तुळात चंद्रास्वामींचे आगमन 1971च्या थोडं आधी झालं

ज्येष्ठ पत्रकार राम बहादुर राय सांगतात, "सिद्धेश्वरप्रसाद बिहारहून 1962 मध्ये लोकसभेवर निवडून गेले. ते 90 वर्षांचे लोकांमधील नेते होते. 1965-66 च्या आसपास त्यांच्या नोकरदार क्वार्टरमध्ये दोन मुलं राहत होती. एक होते चतुर्भुज गौतम जे नंतर चंद्रशेखर यांचे स्वीय सचिव बनले आणि दुसरे होते चंद्रास्वामी."

नरसिंह राव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी. व्ही. नरसिंह राव

त्या काळात चंद्रास्वामी काँग्रेस नेत्यांच्या घरी खेटा घालायचे, असं राम बहादुर राय सांगतात.

चंद्रास्वामी राम गुप्त यांच्याकडून कुंडली बनवून घ्यायचे आणि हळूहळू दलाली करू लागले. आंध्र प्रदेशपासून ते राजस्थान हरियाणापर्यंत सर्वच ठिकाणी आपली जागा बनवत गेले.

लांब दाढी, पिवळे वस्त्र आणि रुद्राक्ष माळा यामुळे चंद्रास्वामी यांच्या व्यक्तिमत्वाकडे लोक आकर्षित होऊ लागले. प्रसिद्ध इतिहासकार पैट्रिक फ्रेंच यांनी 'इंडिया-ए पोर्ट्रेट' यामध्ये चंद्रास्वामी यांच्याबद्दल लिहिले आहे, "ते काही सभ्य नव्हते पण त्यांच्यात दुसऱ्याला जिंकण्याचे कौशल्य होते. त्यांना इतरांच्या उणीवा कळायच्या...विशेषत: अशा लोकांच्या जे शक्तीशाली होते. अशा लोकांना पैसे आणि ताकद असल्याने लोक आपला विश्वासघात करतील अशी भीती वाटायची."

विशेष बाब म्हणजे चंद्रास्वामी यांना इंग्रजी वाचता आणि बोलता येत नव्हते. पण तरीही जगभरातील अनेक देशांच्या शक्तीशाली सत्ताधाऱ्यांवर त्यांचा प्रभाव होता.

नटवर सिंह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नटवर सिंह

माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांनी आपल्या 'वॉकिंग विद लायन्स' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "1979-80 मध्ये पॅरिसमध्ये ते उपचार घेत होते. त्यावेळी चंद्रास्वामी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या फिजिशियनसोबत मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितले, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी ते थेट युगोस्लाव्हियाहून आले होते. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी आपलं खासगी विमान चंद्रास्वामी यांच्यासाठी पाठवलं होतं."

याच पुस्तकात नटवर सिंह यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे. चंद्रास्वामी यांनी मार्गारेट थॅचर या पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती, जी नंतर खरी ठरली. केवळ ब्रिटिश पंतप्रधानच नव्हे तर ब्रुनेईचे प्रमुख, बहारीनचा शासकसुद्धा चंद्रास्वामींचे भक्त बनले.

मार्गारेट थॅचर
फोटो कॅप्शन, मार्गारेट थॅचर

शस्त्रव्यापारी अदनान खशोगीशी जवळीक

चंद्रास्वामी यांचे सौदी अरेबियाचे शस्त्रव्यापारी अदनान खशोगी यांच्याशी व्यावसायिक संबंध होते.

राम बहादुर राय सांगतात, "अदनान खशोगी यांना भारतात आणणारे चंद्रास्वामीच होते. शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीत नफा घेण्याचा खेळ सुरू झाला होता. मला हेही वाटते की भारताची गुप्तचर यंत्रणा रॉने चंद्रास्वामी यांचा वापर त्यांच्या हितासाठी केला. त्यांना ज्या पद्धतीची मुभा दिली जात होती त्यावरून सरकार त्यांच्या परदेशी संबंधांचा वापर माहिती मिळवण्यासाठीही करत होती."

ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे, "1993-94 मध्ये चंद्रास्वामींच्या आईचे निधन झाले. राजस्थानमधील बहरूर येथे तेरावं कव्हर करण्यासाठी त्यावेळचे एकमेव चॅनेल झी न्यूजकडून मला पाठवण्यात आले. तिथे 40 ते 45 हजार लोकं सहभागी झाले होते आणि किमान 20 बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा तिथे होते."

अदनान खशोगी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अदनान खशोगी

राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी

विजय त्रिवेदी चंद्रास्वामींबद्दल सांगतात, "ते अत्यंत वादग्रस्त होते, पण सर्व पक्षांमध्ये त्यांचे स्थान होते. राम मंदिर बांधण्यासाठी ते मध्यस्थी करत असताना मुलायमसिंह, नरसिंह राव आणि भाजपकडून भैरवसिंह शेखावत त्यांचे ऐकत होते. राजकारणात असे फिक्सर योग्य वेळ आली की, समोर येतात."

1993 साली चंद्रस्वामींनी राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्येत सोम यज्ञाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील हिंदू सहभागी झाले होते.

मुलायम सिंह यादव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुलायम सिंह यादव

हे यज्ञ कव्हर केलेले ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता सांगतात, "त्या काळात लखनऊमध्ये कोहिनूर हॉटेल होते. त्या हॉटेलचा मालकही चंद्रास्वामींचा शिष्य होता. चंद्रास्वामींच्या सांगण्यावरून संपूर्ण हॉटेल या लोकांसाठी बुक करण्यात आले होते. सगळीकडे वोडका पीऊन धुंद असलेले परदेशी सन्यासी दिसत होते आणि सर्वजण चंद्रास्वामींचे भक्त होते."

पामेला बोर्डेस यांची कहाणी 1989 मध्ये समोर आली होती. चंद्रास्वामींच्या सोबतीत ती पैसे आणि सेक्सच्या जगात बुडाली.

1982 साली मिस इंडिया असलेल्या पामेला बोर्डेस यांनी डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती अदनान खशोगी आणि चंद्रास्वामी यांच्यासाठी सेक्शुअल प्रेझेंटर म्हणून काम करत होती.

जेल जावे लागले

चंद्रास्वामींनी सत्ता, सेक्स, पैसा आणि दलालीचे असे सूत जुळवले की ते 'फिक्सिंग किंग' म्हणून उदयास आले.

या स्पर्धेत वेळ सतत आहे तशीच राहत नाही. 1996 नंतर चंद्रास्वामींचा वाईट काळ सुरू झाला आणि त्यांच्याविरोधात एकामागून एक खटले दाखल करण्यात आले. त्यांना तिहार जेलमध्ये जावे लागले. चंद्रास्वामी सत्तेच्या केंद्रापासून दूर झाले पण त्यांचे मित्र प्रत्येक ठिकाणी होते. एवढे खटले दाखल होऊनही ते दिल्लीतल्या आलिशान परिसरात एका फार्म हाऊसमध्ये राहत होते.

चंद्रास्वामी

फोटो स्रोत, Pti

फोटो कॅप्शन, चंद्रास्वामी

प्रताप वैदिक चंद्रास्वामींसोबत आत्मीय संबंधांचा हवाला देत सांगतात, "त्यांनी आपली सर्व ऊर्जा उलट-सुलट कामात घालवली. त्यांची इच्छा असती तर ते चांगली कामगिरी करू शकले असते."

राम बहादुर राय सांगतात, "चंद्रास्वामी कधीकाळी एका पंतप्रधानांच्या सर्वात जवळचे राहिले आहेत हे लोक विसरून जातील. लोकांना बोफोर्स, सेंट किट्स, परदेशी चलनाचे उल्लंघन, इराण कॉन्ट्रॉ हत्यार डील, आर्थिक फसवणूक अशीच प्रकरणं लक्षात राहतील."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)