नरसिंह राव यांची काँग्रेसला अचानकच आठवण का झाली?

नरसिंह राव, काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी पंतप्रधान नरसिंह राव
    • Author, अनिल जैन
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर दीड दशकभरानंतर काँग्रेस नेतृत्वाला त्यांची दखल घ्यावी लागली हा एकप्रकारे नाईलाजच म्हणावा लागेल.

समर्पित काँग्रेसी आणि विद्वान नेता अशा शब्दांत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचं कौतुक केलं. राव यांच्या धाडसी नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र संदेशात माजी पंतप्रधानांविषयी गौरवोद्गार काढले. आर्थिक ध्येयधोरणांविषयी त्यांचं द्रष्टेपण आणि धाडसी निर्णयांमुळे देशाने नव्या युगात पाऊल टाकलं आणि आधुनिक भारताच्या संरचनेला नवा आयाम मिळाला.

पाच वर्षं पंतप्रधान म्हणून आणि तितकीच वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिलेल्या नरसिंह यांची काँग्रेसने पदावरून दूर झाल्यानंतर आठ वर्षं फारशी दखल घेतली नाही.

पक्षाने त्यांना उपेक्षेची वागणूक दिली आणि अपमानित केलं. मृत्यूनंतरही त्यांना पक्षाकडून सन्मान आणि सर्वमान्यता मिळायला दीड दशकांचा कालावधी जावा लागला.

काँग्रेसची सूत्रं प्रामुख्याने ज्या कुटुंबाकडे आहेत त्या गांधी कुटुंबीयांना नरसिंह राव यांच्या योगदानाची दखल घ्यायला भाग का पडलं? याची कारणं काय आहेत?

काँग्रेसचं नशीब जोरावर असतं, त्यांच्याकडे सत्ता असती तर सोनिया गांधी या नरसिंह राव यांच्यासह अन्य नेत्यांचं गुणगान गाण्यात मश्गुल असत्या.

विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेल्या प्रेमाने संकटात

नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आंध्र प्रदेश आणि तेलंगणात स्थानिक पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्या योगदानाचा ज्या पद्धतीने उपयोग करून घ्यायला सुरुवात केली त्याने काँग्रेस नेतृत्वाला माजी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष राव यांच्याबाबत विचार बदलावा लागला.

याआधी राव यांच्या जन्मदिनी आणि पुण्यतिथीवेळी त्यांचं किंवा त्यांच्या कार्याचं स्मरण करण्याची औपचारिकता कोणी निभावत नसे.

नरसिंह राव यांचं आता स्मरण करणं हे एकप्रकारे संधीसाधूपणा आहे आणि देशात शिरजोर झालेल्या अस्मितेच्या राजकारणाची कबुली दिल्यासारखं आहे. मृत्यूनंतर पूर्णत: विस्मृतीत टाकण्यात आलेल्या नरसिंह राव यांचं आता स्मरण करणं हे अस्मितेच्या राजकारणाचं प्रतीक आहे.

नरसिंह राव यांच्या बळावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राजकीय पाया बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तेलंगण सरकारच्या वतीने पूर्ण वर्षभरात नरसिंह राव यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी राहाव्यात यासाठी स्मारक उभारण्याचा निर्णय जाहीर केला.

यासंदर्भात त्यांनी वर्तमानपत्रात अख्खं पान भरून जाहिराती दिल्या. या जाहिरातींमध्ये तेलंगणाचा सुपुत्र, भारताचा गौरव असं नरसिंह राव यांच्याबद्दल लिहिण्यात आलं आहे.

1977 मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अखंड आंध्र प्रदेशाच्या सरकारमध्ये राव अनेक वर्ष मंत्री होते. नंतर ते राज्याचे मुख्यमंत्रीही झाले. त्यावेळी तेलंगण स्वतंत्र राज्य नव्हतं.

राव यांचं जन्मस्थळ आता तेलंगणात येतं आणि ते तेलंग ब्राह्मण समाजाचे आहेत. राव यांच्या माध्यमातून तेलंग समाजाची मतं आपल्या बाजूने वळवण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे.

नरसिंह राव, काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव

तेलुगू देसम पक्ष अर्थात टीडीपीचाही उद्देश काहीसा असाच आहे. राव यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी टीडीपीने केली आहे.

भाजपला आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पाय रोवायचे आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जेव्हाही या भागाचा दौरा करतात तेव्हा आजीवन काँग्रेसी राहिलेल्या राव यांचं स्मरण करतात.

काँग्रेसला एका कुटुंबाचा पक्ष असं म्हणून ते जेव्हा टीका करतात तेव्हाही राव यांच्या महानतेचा दाखला द्यायला ते विसरत नाहीत. कांग्रेस पक्षाने राव यांना अव्हेरलं, त्यांचा अपमान केला अशी टीका पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा करतात.

या राज्यांमध्ये काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पराभवाचं कारण राव यांना विस्मृतीत टाकणं हे नाही. मात्र तेलंगण राष्ट्र समिती, वाईएसआर काँग्रेस, टीडीपी आणि भाजप अशा सगळ्या पक्षांशी काँग्रेसला एकट्याने मुकाबला करायचा आहे.

सर्व विरोधी पक्षांना राव यांचा आलेला पुळका पाहूनच काँग्रेस नेतृत्वाला माजी पंतप्रधान राव यांचा उमाळा येणं साहजिक आहे.

याचाच भाग म्हणून तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने राव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. या कार्यक्रमासाठी जारी करण्यात आलेल्या संदेशात राव यांच्या कार्याची भरभरून तारीफ करण्यात आली आहे.

यातून काँग्रेसचा प्रयत्न हाच आहे की पंतप्रधान म्हणून राव यांनी जे निर्णय घेतले ते काँग्रेसचं यश आहे. अन्य कोणत्याही पक्षाचं नाही असं काँग्रेसला दाखवायचं आहे.

काँग्रेसची संकुचित वृत्ती

पण हे सगळं करताना काँग्रेसने आपल्या संकुचित आणि कूपमंडूक प्रवृत्तीचं दर्शन घडवलं आहे. राव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश फक्त तेलंगण काँग्रेसला देण्यात आले आहेत.

देशाचे माजी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष राहिलेल्या माणसाला काँग्रेसने एका राज्यापुरतं मर्यादित ठेवलं आहे. राव यांचं कार्यकर्तृत्व हे सर्वसमावेशक आणि खऱ्या अर्थाने देशव्यापी होतं.

राव यांची मातृभाषा तेलुगू होती. मात्र तरीही त्यांचं हिंदी, इंग्रजी, तामीळ, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, बांगला, उर्दू, संस्कृतसह इतर भाषांवर प्रभुत्व होतं. आंध्र प्रदेशव्यतिरिक्त ते महाराष्ट्र आणि ओडिशामधून लोकसभेवर निवडून गेले होते.

तीन राज्यातून लोकसभेवर निवडून जाणारे इंदिरा गांधी यांच्यानंतरचे ते दुसरे नेते होते. राव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने देशभरात कार्यक्रमांचं आयोजन केलं असतं तर काँग्रेसला याचा राजकीय फायदा झाला असता.

नरसिंह राव, काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, सोनिया गांधी आणि राहुल गांधी

पण ही काँग्रेस आणि नेतृत्वाची मानसिकता आहे. यामुळेच असंख्य शिलेदार आणि इतिहासाचे मानबिंदू असणाऱ्या नेत्यांचा इतिहास असणाऱ्या 135 वर्षं जुन्या पक्षाची ओळख नेहरू-गांधी घराण्याचा पक्ष अशी मर्यादित राहिली आहे.

म्हणूनच विरोधी पक्ष काँग्रेसची एका घराण्याचा पक्ष म्हणून हेटाळणी करतात. स्वातंत्र्य संग्रामातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भाजप आपलं वैचारिक संचित असल्याचं सांगते.

भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक

महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कारणीभूत ठरवून तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी बंदीची कारवाई केली होती. याच धर्तीवर सुभाषचंद्र बोस यांनी 1938 मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर हिंदू महासभेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांना मज्जाव केला होता. मात्र या दोघांचाही आपल्याच विचारसरणीचे नेते म्हणून भाजपकडून उल्लेख केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्याच्या दौऱ्यावर जातात त्यावेळी राज्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची नावं घेण्यास विसरत नाहीत. काँग्रेस पक्ष या नेत्यांची आठवण काढत नाही पण मोदी या नेत्यांचं स्मरण करतात.

मोदी आसामला गेले की गोपीनाथ बोर्दोलोई, उत्तर प्रदेशात चौधरी चरण सिंह, हरियाणात चौधरी देवीलाल या नेत्यांची आठवण काढतात, त्यांचा उल्लेख करतात. हे नेते आपल्या विचारधारेशी संल्ग्न होते हे सांगण्यात त्यांना संकोच वाटत नाही.

नरसिंह राव, काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी

फोटो स्रोत, PIB

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपला सरदार वल्लभभाई पटेल तसंच सुभाषचंद्र बोस आमच्याच विचारांचे होते असं सांगण्यात संकोच वाटत नाही मग काँग्रेसला आपल्या पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांचं स्मरण करायला, त्यांच्या योगदानची दखल घ्यावी असं का वाटत नाही?

काँग्रेसचं हे वागणं वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यापुरतं मर्यादित नाही. ही यादी खूप मोठी आहे. जे आजीवन काँग्रेसमध्ये राहिले, ज्यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान दिलं अशा नेत्यांचं काँग्रेसला विस्मरण झालं आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने कधी संविधान परिषदेचे अध्यक्ष आणि देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तसंच पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरं केल्याचं आठवत नाही.

ज्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचं स्मरण केलं जातं ते अन्य नेत्यांच्या नशिबी नाही.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लालबहादूर शास्त्रींच्या समाधाळीस्थळी गेल्या आहेत असं ऐकल्याचं, पाहिल्याचं आठवत नाही. केवळ राष्ट्रीय नेते असं नाही, राज्याराज्यातही काँग्रेसकडे दमदार नेत्यांची परंपरा आहे. ज्यांनी राज्यात पक्ष म्हणून काँग्रेसचा पाया रचला, काँग्रेसची पाळंमुळं समाजाच्या सर्व स्तरात पोहोचवली, राज्यातून राष्ट्रीय स्तरावर गेलेल्या नेत्यांचं काँग्रेसला विस्मरण होतं.

नरसिंह राव, काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी
फोटो कॅप्शन, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री

उत्तर प्रदेशात संपूर्णानंद, चंद्रभानू गुप्त, चौधरी चरण सिंह, कमलापती त्रिपाठी, हेमवतीनंदन बहुगुणा, बिहारमध्ये श्रीकृष्ण सिंह, कृष्ण बल्लभ सहाय, भोला पासवान शास्त्री, केदार पांडेय, ललित नारायण मिश्र यांचं योगदान काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. मात्र पक्षाला आता यांच्यापैकी कोणाचंही काम आठवत नाही.

मंडल कमिशनचे बीपी मंडल काँग्रेसमध्ये असताना बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यांनी नंतर काँग्रेसला रामराम करून सोशलिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते जनता पार्टीत गेले.

आजच्या घडीला देशातल्या मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणसंस्थांमध्ये 33 टक्के आरक्षणाची सुविधा मिळवून देण्याचं श्रेय मंडल यांनाच जातं. पण काँग्रेसला मंडल यांच्या योगदानाचं स्मरण करावं असं वाटत नाही.

मध्य प्रदेशात द्वारका प्रसाद मिश्र, रविशंकर शुक्ल, प्रकाशचंद्र सेठी, श्यामाचरण शुक्ल, अर्जुन सिंह, राजस्थानमध्ये मोहनलाल सुखाडिया, जयनारायण व्यास, हरिदेव जोशी, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, कर्नाटकात एस. निजलिंगप्पा, देवराज अर्स, आंध्र प्रदेशात टी. प्रकाशम, ब्रह्मानंद रेड्डी, तामिळनाडूत सी. राजगोपालाचारी, के. कामराज, एम. भक्तवत्सलम, ओडिशात हरेकृष्ण महताब तसंच नवकृष्ण चौधरी ही ठसठशीत नावं आहेत ज्यांच्या कार्याचा काँग्रेसला पक्ष म्हणून फायदा झाला आहे. परंतु आता काँग्रेसने त्यांना पूर्णपणे विस्मृतीत ढकललं आहे.

इतकी नावं आणि इतकी मोठी नावं भाजपकडे नाहीत. मात्र काँग्रेस सध्याच्या नेत्याला कौटुंबिक ओळख, जुना वारसा यांच्यापल्याड नेऊ पाहते आहे.

काँग्रेसच्या बेड्या

स्वातंत्र्यसंग्रामावेळी देश ज्या प्रश्नांना, समस्यांना सामोरं गेला तशीच परिस्थिती आता असलयाचं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सांगतात. ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला गेला ती मूल्यं आता धोक्यात असल्याचं ते सांगतात.

सध्याच्या काळातील प्रश्नांची राहुल यांना जाण आहे तर या आव्हानांना ते कसं सामोरं जाणार आहेत?

काँग्रेसची अवस्था दारूण अशी झाली आहे. वैचारिक आघाडीवर पक्ष हेलकावे खात आहे. पक्षाचं नेतृत्व कोणाकडे यावरूनही गोंधळ आहे. प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्याने काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना जनआंदोलन आणि त्याचे बारकावे माहितीच झालेले नाहीत.

प्रादेशिक राजकारण आणि वर्गवादी महत्त्वाकांक्षा यांच्याकडे फारकत घेतल्याच्या दृष्टिकोनातून पाहणं काँग्रेसने सोडलेलं नाही.

विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी भाजपला टक्कर देऊ शकतो असा पक्ष काँग्रेसच आहे. कारण काँग्रेसकडे देशव्यापी संघटनात्मक संरचना आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कार्यकर्ते पसरले आहेत.

नरसिंह राव, काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काँग्रेस नेते राहुल गांधी

देश संकटात आहे आणि स्वातंत्र्यलढ्यातून विकसित झालेली मूल्यं धोक्यात आहे, असं राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांनी काँग्रेसला त्यांच्या जुन्या नायकांचं स्मरण करून द्यावं. ज्यांनी काँग्रेससाठी खस्त्या खाल्या, स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं त्यांचं पुण्यस्मरण करणं आवश्यक आहे.

समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांप्रती असलेला दृष्टिकोन काँग्रेसला बदलावा लागेल. स्वातंत्र्यानंतर, वैचारिक मतभेदातून अनेकांनी काँग्रेसपासून फारकत घेत या विचारसरणींना आपलसं केलं होतं.

प्रश्न हा की काँग्रेसने ज्या पद्धतीने तेलंगणात नरसिंह राव यांच्या कार्याचं स्मरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्या धर्तीवर अन्य राज्यांमध्ये तिथल्या नेत्यांच्या कार्याला उजाळा देण्याची योजना आहे का?

(लेखात व्यक्त केलेली मतं हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)