यंदा सोयाबीन, कापूस विकण्याची योग्य वेळ कोणती?

cotton

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सध्या शेतकरी कापसाची वेचणी करत आहेत. तर अनेकांनी सोयाबीनचं खळं करून ते साठवून ठेवलं आहे.

गेल्या वर्षी या दोन्ही पिकांना डिसेंबरच्या काळात चांगला दर मिळाल्यानं यंदाही शेतकरी हीच अपेक्षा बाळगून आहेत.

त्यामुळे सध्याचा मार्केटचा ट्रेंड काय सांगत आहे? सध्या सोयाबीन आणि कापसाला किती दर मिळत आहे? तसंच यंदा सोयाबीन-कापूस विकण्याची योग्य वेळ कोणती असू शकते? या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

सोयाबीनच्या दरात महिन्याभरात किती वाढ?

भारत सरकारच्या agmarknet या वेबसाईटवर दररोज देशभरातल्या बाजारपेठांमधील शेतमालाचे दर नोंदवले जातात.

नोव्हेंबर 2022ची आकडेवारी पाहिल्यास, या महिन्यात सोयाबीन या शेतमालाला देशभरात सरासरी 5,543 रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळत आहे.

गेल्या महिन्यात हा दर 5,085 रुपये इतका होता. म्हणजे देशभरातील सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केल्यास गेल्या एका महिन्यात सोयाबीनचा दर 458 रुपयांनी वाढला आहे.

महाराष्ट्राचा विचार केल्यास, नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनला प्रती क्विंटल सरासरी 5,281 रुपये दर मिळत आहे.

ऑक्टोबरमध्ये हा दर 4,721 रुपये इतका होता. याचा अर्थ महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात सोयाबीनच्या दरात 560 रुपयांनी वाढ झाली आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

कापसाच्या दरात कितीनं वाढ?

नोव्हेंबर 2022मध्ये कापसाला देशभरात सरासरी 8,577 रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळत आहे.

गेल्या महिन्यात हा दर 7,989 रुपये इतका होता. म्हणजे देशभरातील कापसाच्या बाजारभावाचा विचार केल्यास गेल्या एका महिन्यात कापसाचा दर 588 रुपयांनी वाढला आहे.

महाराष्ट्राचा विचार केल्यास, नोव्हेंबर महिन्यात कापसाला प्रती क्विंटल सरासरी 8,769 रुपये दर मिळत आहे.

ऑक्टोबरमध्ये हा दर 7,820 रुपये इतका होता. याचा अर्थ महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात कापसाच्या दरात 949 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोयाबीन-कापूस कधी विकावा?

सोयाबीन आणि कापसाचे सरासरी दर गेल्या महिन्याभरात वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मग वाढत्या दराचा हा ट्रेंड असाच कायम राहू शकतो का? तसं असेल तर शेतकरी किती दिवस हा शेतमाल साठवून ठेवू शकतो आणि कधी तो विकू शकतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

यंदा सोयाबीनचं जागतिक उत्पादन चांगलं असल्यानं आणि सोयाबीनचा सध्याचा दर पाहिल्यास सोयाबीनला प्रती क्विंटल 5,500 रुपयांहून अधिक दर मिळण्याची शक्यता कमी दिसतेय, असं मत शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक व्यक्त करत आहेत.

यंदा सोयाबीनचं जागतिक उत्पादन चांगलं आहे. ते सोयाबीनच्या मागणीपेक्षा जास्त आहे. ज्यावेळी मागणीपेक्षा उत्पादन जास्त असतं, त्यावेळी शेतमालाचे दर खालावत जातात.

“यंदा सोयाबीनच्या दराची रेंज प्रती क्विंटल 5,000 ते 5,800 रुपये राहण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतकऱ्यानं 5 हजारांच्या खाली सोयाबीन विकायचं नाही आणि 5,,600 ते 5700 च्या वरती दर गेल्यास ते टप्याटप्यात ते विकलं पाहिजे,” असाही अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

ऑल इंडिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष मनीष डागा यांच्या मते, “कापसाच्या बाबतीत गेल्यावर्षी वेगळी परिस्थिती होती. पीक कमी आणि मागणी चांगली होती. त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना थोड्या थोड्या प्रमाणात कापूस विकण्यास सांगितलं होतं. यावर्षी उलट परिस्थिती आहे. आम्ही शेतकऱ्यांना कापूस विकण्याचा सल्ला देत आहोत. कारण सर्व जीनिंग सुरू झाल्यावर मुहूर्तामध्ये अधिक दर दिला जातो. तेव्हा शेतकऱ्यानं थोडा कापूस विकला पाहिजे.”

“कापूस उद्योगाची सध्याची स्थिती वाईट आहे. कापूस, सूत आणि कापडही वाईट स्थितीत आहे. आतापर्यंत 5 लाख गाठींचं उत्पादनही झालेलं नाही. उद्दिष्ट मात्र 20 लाख गाठींचं होतं. त्यामुळे कापसाला 9500 ते 9600 दर प्रती क्विंटल मिळाल्यास शेतकरी त्यांच्याकडील 50% कापूस विकू शकतात,” डागा पुढे सांगतात.

ही झाली शेतमाल अभ्यासक आणि इंडस्ट्रीमधील लोकांची मतं. पण, या मतांसोबतच शेतकऱ्यानं स्थानिक बाजारपेठेतील बाजारभावातील चढ-उतार बघून शेतमालाची विक्री करणं कधीही योग्य ठरू शकतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)