प्रौढांनीही ब्रेस्ट मिल्क प्यायलं तर काय होतं? याचे आरोग्याला काय फायदे होतात? वाचा

    • Author, सोफिया बेट्टीजा
    • Role, ग्लोबल आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

आईच्या दूधाच्या फायद्यांबद्दल नेहमीच बोललं आणि सांगितलं जातं. त्यामुळे बाळांना स्तनपान देण्याचा आग्रह धरला जातो. या दुधामुळे बाळांचं पोषण होतं आणि रोगप्रतिकारक्षमता वाढते. मात्र हाच फायदा मिळवण्यासाठी चक्क प्रौढदेखील ब्रेस्ट मिल्क पीत आहेत. हे दूध प्यायल्यामुळे खरोखरंच फायदा होतो का? वेगवेगळे गंभीर आजार त्यामुळे टाळले जाऊ शकतात का? संशोधन त्याबद्दल काय सांगतं? याबद्दल या लेखात जाणून घेऊया.

आईच्या दुधाला दैनंदिन वापरातील भाषेत 'लिक्विड गोल्ड' म्हटलं जातं. काही तज्ज्ञ तर याला 'मॅजिकल पॉवर्स' स्रोत म्हणतात.

ब्रेस्ट मिल्क (स्तनपानातून मिळणारं दूध) नवजात बाळांच्या वाढीसाठी आवश्यक आणि महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळे मुलांना आवश्यक पोषण आणि अँटीबॉडी मिळतात, असं वैज्ञानिक मानतात.

त्यामुळे ब्रेस्ट मिल्कला सुपरफूड म्हणतात.

मात्र काही प्रौढ व्यक्तीदेखील या सुपरफूडच्या क्षमतेला महत्त्व देत आहेत.

जेमसन रिटेनॉर यांना तीन अपत्ये आहेत. त्यांची पत्नी मेलिसा जेव्हा ब्रेस्टफीडिंग करत होती, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी ब्रेस्ट मिल्क घेतलं होतं.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "मी पहिल्यांदा ब्रेस्ट मिल्कला शेकमध्ये मिसळलं. मात्र त्यांना ते थोडंसं विचित्र वाटलं."

जेमसन यांना एका युट्यूब व्हिडिओमधून ब्रेस्ट मिल्क पिण्याच्या फायद्यांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर ब्रेस्ट मिल्कबाबत त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्या व्हिडिओमध्ये एका बॉडीबिल्डरनं ब्रेस्ट मिल्कचे फायदे सांगितले होते.

त्यानंतर जेमसन रोज पत्नीच्या ब्रेस्ट मिल्कचं सेवन करू लागले. ते दररोज 450 ग्रॅम ब्रेस्ट मिल्क घेतात.

ते म्हणाले, "आरोग्याच्या दृष्टीनं हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ आहे. ब्रेस्ट मिल्कमुळे स्नायू तयार करण्यास उपयोग होतो आहे. आठ आठवड्यात पाच टक्के स्नायू मिळवत माझं वजन कमी होत होतं."

जेमसन म्हणतात की ब्रेस्ट मिल्कचा समावेश आहारात केल्यानंतर ते आजारी पडल्याचं किंवा साधा ताप, सर्दी झाल्याचं आठवत नाही.

ते म्हणतात, "मला एखाद्या बाळाप्रमाणे आरोग्य राखायचं आहे. मी एखाद्या बाळाप्रमाणे झोपू इच्छितो. त्यामुळे मी एखाद्या बाळाप्रमाणेच आहार घेण्याचं ठरवलं आहे. मला खूप छान वाटतं आहे, मी छान दिसत आहे."

ऑनलाईन विकत घेण्यात आहे धोका

वैज्ञानिक म्हणतात की ब्रेस्ट मिल्कमुळे प्रौढांना काही फायदा होतो, याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्याचे फायदे असू शकतात आणि त्याचे पुरावेदेखील आहेत.

डॉक्टर लार्स बोड, सॅन डिएगोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठात मानवी दूध (ह्युमन मिल्क) इंस्टिट्यूटचे संस्थापकीय संचालक आहेत. ते म्हणतात, "यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. ब्रेस्ट मिल्कमुळे बाळाचे स्नायू वेगानं वाढतात आणि बॉडीबिल्डरना देखील असंच हवं असतं."

"बॉडीबिल्डर त्यांच्या शरीराबद्दल खूपच सजग असतात. त्यामुळे यात काहीतरी महत्त्वाची बाब असू शकते. त्यामागच्या विज्ञानाबद्दल आम्हाला माहित नाही."

मात्र त्याचबरोबर, डॉ. बोड सावधगिरी बाळगण्याचा सल्लादेखील देतात. कारण अनेकदा अशा ऑनलाईन संकेतस्थळांवरून (वेबसाईट) मानवी दूध विकत घेतलं जातं, जी संशयास्पद असतात.

डॉ. बोड याबाबत इशारा देत म्हणतात, "असं ऑनलाईन विकत घेतलेल्या दूधाची चाचणी केलेली नसते आणि त्यामुळे आरोग्याला गंभीर स्वरूपाचा अपाय होऊ शकतो. एचआयव्ही किंवा हेपेटायटिससारखे आजार त्यामुळे होऊ शकतात."

सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीचा आहार आणि आरोग्य जितकं चांगलं असतं तितकंच ब्रेस्ट मिल्कदेखील चांगलं असतं. ब्रेस्ट मिल्कमुळे अनेक संसर्ग होऊ शकतात.

महिला अशा वातावरणात ब्रेस्टफीडिंग करतात, जे पूर्णपणे रोगांपासून मुक्त नसतं. त्यामुळे ब्रेस्ट मिल्कला देखील संसर्ग होण्याचा धोका असतो.

2015 मध्ये अमेरिकेतील लहान मुलांच्या हॉस्पिटलचा एक अभ्यास करण्यात आला होता.

त्या अभ्यासातून समोर आलं होतं की ऑनलाईन पद्धतीनं विकत घेण्यात आलेल्या ब्रेस्ट मिल्कच्या 101 नमुन्यांपैकी 75 टक्के नमुन्यांमध्ये हानिकारक सूक्ष्मजीव किंवा जिवाणू होते. इतकंच नाही तर 10 टक्के नमुन्यांमध्ये गाईच्या दूधाच्या फॉर्म्युल्याची भेसळ होती.

जेमसन जेव्हा त्यांच्या पत्नीपासून वेगळे झाले, तेव्हा त्यांना ब्रेस्ट मिल्क उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्यांनी ब्रेस्ट मिल्क ऑनलाईन स्वरुपात विकत घेण्याचं ठरवलं.

ते म्हणाले की त्यांना दूधातील भेसळीच्या धोक्यांबद्दल माहिती नव्हती.

जेमसन म्हणाले, "मी ब्रेस्ट मिल्क इंटरनेटवरून विकत घेतलं. मी फेसबुकवरून त्या दूधाची माहिती घेतली होती आणि मला ते योग्यच वाटलं होतं. त्यामुळे मी ते मागवण्याचं ठरवलं."

ब्रेस्ट मिल्कच्या फायद्यांबद्दल वैज्ञानिक स्वरूपाच्या माहितीची कमतरता आहे, या गोष्टीची त्यांना काळजी वाटत नाही. कारण त्यांना स्वत:ला यामुळे फायदाच झाला आहे.

त्यांच्यासाठी नकारात्मक बाब म्हणजे यातून त्यांना आलेला वाईट अनुभव.

ते म्हणतात, "लोक नक्कीच माझ्याकडे आश्चर्यानं पाहायचे. कारण आपल्याला वाटतं की ब्रेस्ट मिल्क फक्त बाळांसाठी असतं. मात्र लोकांना वाटतं तितकं हे विचित्र नाही."

अशक्त बाळांच्या अडचणीत होऊ शकते वाढ

डॉक्टर मेघन आझाद, आईच्या म्हणजे मानवी दूधावर संशोधन करतात. ते म्हणतात, "मी कधीही प्रौढांना ब्रेस्ट मिल्क पिण्याचा सल्ला देणार नाही."

"ब्रेस्ट मिल्क प्यायल्यामुळे काही नुकसान होतं असं मला वाटत नाही. मात्र ज्या बाळांना या दुधाची आवश्यकता आहे, प्रौढांनी ब्रेस्ट मिल्क प्यायल्यास त्या बाळांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. बाळांना ब्रेस्ट मिल्क मिळण्यास अडचणी येऊ शकतात."

डॉक्टर बोड यांना देखील वाटतं की जर मानवी दूध जास्त असेल तर नफा कमावण्यासाठी त्याची विक्री करण्याऐवजी ते गरजू बाळांना पुरवलं पाहिजे.

ते म्हणाले, "अशक्त बाळांची दूधाची गरज पूर्ण होऊ शकेल इतकं दूध देखील आपल्याकडे नाही. ब्रेस्ट मिल्कमध्ये असे गुणधर्म असतात, जे बाळांचा रोगांपासून बचाव करतात."

डॉक्टर आझाद या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात की अडचणीत असलेल्या माता जर असा विचार करू लागल्या की ब्रेस्ट मिल्क विकून पैसे कमावता येतील, तर त्यामुळे या धोकादायक प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळू शकतं.

अर्थात जेमसन मात्र ब्रेस्ट मिल्क प्यायल्यामुळे स्वत:ला गुन्हेगार समजत नाहीत.

ते म्हणतात, "मी ब्रेस्ट मिल्क प्यायल्यामुळे बाळं उपाशी राहिल्याचा आरोप लोकांनी माझ्यावर केला आहे. मात्र, मी हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहून मातांकडे त्यांच्या सर्व दूधाची मागणी करतो आहे असं अजिबात नाही!"

जेमसन दावा करतात की किमान 100 महिलांनी ब्रेस्ट मिल्क विकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला आहे.

ब्रेस्ट मिल्कचा आरोग्याला काय फायदा होऊ शकतो?

आईच्या किंवा मानवी दूधावर अजूनही फारसं संशोधन झालेलं नाही.

डॉ. आझाद म्हणतात, "संशोधनासाठी जे लोक निधी पुरवतात ते बराच काळ ब्रेस्ट मिल्कची परवा करत नाहीत. कारण ते याकडे महिलांच्या बाबतीत कमी महत्त्वाचा मुद्दा म्हणून पाहतात. हा एक पुरुषी दृष्टीकोन आहे."

अर्थात त्यात बदल होतो आहे.

ब्रेस्ट मिल्क प्यायल्यामुळे प्रौढांना असलेल्या धोक्यांच्या दरम्यान काही असे घटक आहेत ज्यामुळे ब्रेस्ट मिल्क प्यायल्यामुळे प्रौढांना उपयोग होतो.

ब्रेस्ट मिल्क प्यायल्यामुळे संधिवात, हृदयविकार, कर्करोग, इरिटेबल बाउल सिंड्रोम सारख्या आजारांच्या बाबतीत फायदा होण्यावर संशोधन होतं आहे.

डॉ. आझाद ह्युमन मिल्क ओलिगोसॅकेराइड्समुळे आरोग्याला होणाऱ्या संभाव्य फायद्यांबाबत उत्साही आहेत. हे मानवी दूधात आढळणारे प्रीबायोटिक फायबर आहेत.

प्रौढ व्यक्ती हे फायबर पचवू शकत नाहीत. मात्र बाळांमध्ये यामुळे पोटातील फायदेशीर जिवाणू विकसित होऊ शकतात.

डॉ. आझाद म्हणतात, "ओलिगोसॅकेराइड्समुळे प्रौढांच्या आतड्याला आलेल्या सुजेवर काही फायदा होऊ शकतो का नाही, याबाबत संशोधक अभ्यास करत आहेत."

"आरोग्याच्या अनेक पैलूंच्या दृष्टीनं मायक्रोबायोम म्हणजे सूक्ष्मजीव महत्त्वाचे असतात हे आपल्याला माहीत आहे. पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये कशी सुधारणा होऊ शकते आणि त्यामुळे काय फायदे होऊ शकतात, हे आपण पाहू शकतो. यासंदर्भात ब्रेस्ट मिल्ककडून बरीच आशा आहे."

2021 मध्ये उंदरांवर एक अभ्यास करण्यात आला होता. त्या अभ्यासात डॉ. बोड यांना आढळलं होतं की एका एचएमओमुळे एथेरोस्क्लेरोसिसच्या वाढीला आळा घातला गेला होता. एथेरोस्क्लेरोसिसमुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो किंवा स्ट्रोक येतो.

ते म्हणतात, "आर्टिफिशियल कम्पाउंड किंवा कृत्रिम संयुगांचा वापर करून बनवलेली जी बहुतांश औषधं मानवी शरीरात दिली जातात, त्यांच्याऐवजी मानवी दूधातील संयुगं अधिक सुरक्षित आणि प्रभावी आहेत."

यांच्याबाबतीत महत्त्वाच्या शक्यता जरी असल्या, तरी त्यांचा क्लिनिकल डेटा अद्याप दुर्मिळ आहे.

डॉ. बोड म्हणतात की जर क्लिनिकल अभ्यासातून चांगले निष्कर्ष समोर आले तर या कम्पाउंड किंवा संयुगाचा वापर करून हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक रोखण्यास मदत होऊ शकते. ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आल्यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो.

डॉ. बोड म्हणाले, "तुम्ही विचार करा की यामुळे जर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक आल्यामुळे होणारे मृत्यू कमी झाले तर ती किती मोठी बाब असेल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)