You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आयव्हीएफनंतर नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे का? आकडेवारी सांगते-
- Author, रवि प्रकाश
- Role, बीबीसी हिंदीसाठी
भारतीय टेलिव्हिजन वरील ख्यातनाम अभिनेत्री देबिना बॅनर्जी तिच्या दुसऱ्या मुलीला, दिविशाला 'मिरॅकल बेबी' म्हणते.
देबिनाने तिच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलंय की, तिला तिच्या दुसऱ्या गर्भधारणेवर विश्वासच बसत नाहीये. दिविशाचा जन्म तिच्यासाठी एक चमत्कार आहे.
खरं तर, देबिनाने एप्रिल 2022 मध्ये तिची पहिली मुलगी लियानाला जन्म दिला. तिचा जन्म आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञानाने झाला होता.
काही दिवसांनी ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली. ही गर्भधारणा पूर्णपणे सामान्य म्हणजेच नैसर्गिक होती.
आपल्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या सात महिन्यात तिने तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ती वेळेपूर्वीच प्रसूत झाली. याला प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतात.
सध्या ती आणि तिचा पती गुरमीत चौधरी आपल्या दोन्ही मुलींसह आनंदाने आयुष्य जगत आहेत. अलीकडेच त्यांनी त्यांची दुसरी मुलगी दिविशाचं वाराणसीमध्ये मुंडन करून घेतलं.
नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे?
नोएडात राहणाऱ्या आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या जोडप्याने लग्नाच्या दहा वर्षानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेतली. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्यांना दुसरं मूल झालं. दुसरी गर्भधारणा नैसर्गिक होती.
दुसऱ्यांदा आई झाल्याचा आनंद व्यक्त करताना मिताली (नाव बदललं आहे) सांगते, "आम्हाला वाटलं होतं की आता पहिल्यांदा आयव्हीएफ केलंय म्हटल्यावर दुसऱ्यांदाही आयव्हीएफच करावं लागणार. पण डॉक्टरांनी नैसर्गिक गर्भधारणा शक्य असल्याचं आश्वासन दिलं होतं आणि आमच्या बाबतीत तसंच घडलं."
सरोगसी आणि आयव्हीएफ तंत्राद्वारे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचंही असं म्हणणं आहे की, आयव्हीएफ नंतर नैसर्गिक गर्भधारणा झाल्याची कित्येक उदाहरणं आहेत आणि ती सातत्याने वाढत आहेत.
रांचीच्या डॉ. रुपश्री पुरुषोत्तम सांगतात की, आयव्हीएफ गर्भधारणेनंतर प्रत्येकवेळी हीच पद्धत वापरावी लागेल असं गरजेचं नाही. आमच्या इथे बऱ्याच महिलांची दुसरी गर्भधारणा नैसर्गिकरित्या झाली असून त्यांची दोन्ही मुलं निरोगी आहेत.
डॉ. रूपश्री पुरुषोत्तम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आमच्याकडे अशी बरीच प्रकरणं येतात, ज्यात आयव्हीएफ नंतर नैसर्गिक गर्भधारणा झालेली आहे. खरं तर खूप उशिरा लग्न झाल्यामुळे किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येतं."
"मग अशावेळी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करण्यासाठी ते आमच्याकडे येतात. पण पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या तणावाची पातळी कमी झालेली असते. त्या खूश असतात. पती पत्नीचे संबंधही सुधारतात आणि त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता वाढते."
त्या सांगतात की, "वय जास्त असलेल्या महिलांना सहसा थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह, ताणतणाव अशा समस्या असतात. त्यामुळे आधी सामान्यपणे गरोदर राहिल्यानंतर त्यांना अनेकदा दुसऱ्या मुलासाठी आयव्हीएफची मदत घ्यावी लागते."
"त्यामुळे आयव्हीएफ नंतरही नैसर्गिक प्रसूतीचा दर तसा कमीच आहे. पण जर त्या निरोगी असतील, तर त्यांची दुसरी गर्भधारणा नैसर्गिक असण्याची शक्यता जास्त असते "
पण असं का घडतं?
भारतातील सुप्रसिद्ध सरोगसी तज्ज्ञ डॉ. नयना पटेल याही डॉ. रूपश्री यांच्या म्हणण्याशी सहमत आहेत.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आयव्हीएफ नंतर नैसर्गिक गर्भधारणेची शेकडो उदाहरणं आहेत.
मात्र यासाठी ते जोडपं आनंदी आणि तणावमुक्त असणं गरजेचं असतं.
डॉ. नयना पटेल सांगतात की, "एखाद्या महिलेची आयव्हीएफ गर्भधारणा झाल्यानंतरही जर तिच्या अंडाशयाची (ओव्हरी) गुणवत्ता चांगली असेल आणि तिच्या पतीच्या शुक्राणूंचा दर्जाही चांगला असेल तर ती महिला दुसऱ्यांदा नैसर्गिक पद्धतीने गरोदर होऊ शकते.
"कारण पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्यावरील तणाव बऱ्यापैकी कमी झालेला असतो. त्यांचं लैंगिक जीवनही सुधारलेलं असतं. अशावेळी नैसर्गिक पद्धतीने गर्भ राहणं सामान्य गोष्ट आहे."
संशोधन काय सांगतं?
आयव्हीएफ नंतर नैसर्गिक गर्भधारणा होण्याच्या प्रकरणांवर जे संशोधन करण्यात आलंय त्यानुसार दर पाचपैकी एक म्हणजे 20 टक्के महिला आयव्हीएफची मदत घेतल्यानंतर दुसऱ्यावेळी नैसर्गिक पद्धतीने गरोदर राहतात.
यापैकी बहुतेक महिलांनी पहिल्या गर्भधारणेनंतर तीन वर्षांत दुसऱ्यांदा गरोदर राहून मुलांना जन्म दिला.
मागच्या महिन्यात 21 जून रोजी 'ह्युमन रिप्रोडक्शन' नावाच्या संशोधन मासिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
यात इंग्लंडमधील अशा 22 महिलांची उदाहरणं समाविष्ट करण्यात आली आहेत ज्यांनी पहिल्यांदा आयव्हीएफची मदत घेतली आणि दुसऱ्यांदा नैसर्गिकरित्या गरोदर राहिल्या.
आता जगभर याच आकड्यांची चर्चा सुरू आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या ईजीए इन्स्टिट्यूट फॉर वुमेन्स हेल्थच्या डॉ. अॅनेट थ्वेट्स यांच्या नेतृत्वाखालील चार डॉक्टरांच्या पथकाने 1980 ते 2021 दरम्यान जगभरातील 5000 हून अधिक महिलांवर केलेल्या 11 संशोधनांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला.
डॉक्टरांच्या या पथकात डॉ. अॅनेट थ्वेट्ससह डॉ. जेनिफर हॉल, डॉ. ज्युडिफ स्टीफन्सन आणि डॉ. गेराल्डिन बॅरेट यांचाही समावेश होता.
या अहवालावर सहमत असणाऱ्या आणि दिल्लीत 'फेमिनिस्ट' नावाचं आयव्हीएफ सेंटर चालवणाऱ्या डॉ. सौजन्या अग्रवाल सांगतात की, आयव्हीएफ नंतर अंदाजे 20 टक्के महिला नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकतात.
त्यांनी सांगितलं की, "खरं तर आयव्हीएफ घेण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा महिलांच्या ट्यूब मध्ये ब्लॉक असतो किंवा पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी असते. किंवा दोघांमध्येही थोड्या थोड्या समस्या असतात. त्यानंतर मग अशी जोडपी आयव्हीएफकडे वळतात. या गरोदरपणात किरकोळ समस्या दूर होतात."
पण सौजन्या अग्रवाल पुढे असंही सांगतात की, आयव्हीएफ करवून घेणाऱ्या बहुतेक महिलांना जाणून घ्यायचं असतं की, पुढील वेळेसही त्यांना आयव्हीएफ करून घ्यावं लागेल का?
त्या सांगतात, "लोक एकदा नाही बऱ्याचदा विचारतात. पण याचं उत्तर वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळं असतं. तिथपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांना बऱ्याच चाचण्या करून घ्याव्या लागतात. जर सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या तर दुसऱ्यावेळी गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने होण्याची शक्यता असते."
आता सर्व चाचण्या नॉर्मल आल्यानंतरही आयव्हीएफ का करून घ्यावं लागतं?
यावर सौजन्या सांगतात की, "खरं तर सगळं काही नॉर्मल असताना देखील स्त्रियांमध्ये गर्भधारणा होत नाही याला वैद्यकीय परिभाषेत अनएक्सप्लेंड इनफर्टिलिटी म्हणतात. अशी बरीच प्रकरणं असतात ज्यात दुसऱ्या वेळी होणारी गर्भधारणा नैसर्गिक असण्याची शक्यता असते."
आयव्हीएफची सुरुवात कधी झाली?
1978 मध्ये पहिल्यांदा आयव्हीएफ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. एका आकडेवारीनुसार संपूर्ण जगात आत्तापर्यंत एक कोटीहून जास्त मुलं या तंत्राने जन्माला आली आहेत.
आयव्हीएफनंतर नैसर्गिक गर्भधारणेबाबत बरंच संशोधन झालं आहे. अशा संशोधनातून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण नव्या अभ्यासात करण्यात आलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)