तामिळनाडू-तमिझगम वाद: राज्यपाल आणि स्टॅलिन सरकार एकमेकांना का विरोध करत आहेत?

    • Author, बीबीसी तमिळसेवा
    • Role, नवी दिल्ली

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी पोंगल सणासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत तामिळनाडूच्या नावात फेरफार करून नवा वाद निर्माण केला आहे.

रवी यांनी नुकतीच तामिळनाडूचं नाव बदलून तमिझगम करण्याची मागणी केली होती. नाडू शब्दाचा अर्थ 'राष्ट्र' असा होतो, जो की अलिप्ततावाद दर्शवतो, असं त्यांचं म्हणणं होतं.

मंगळवारी राज्यपाल आर.एन. रवी यांनी त्यांचा हा तर्क प्रत्यक्षात उतरवला आणि निमंत्रण पत्रिकेवर स्वत:ची ओळख सांगताना 'तमिझगमचे राज्यपाल' असा शब्दप्रयोग वापरला.

सर्वसाधारणपणे तामिळनाडूच्या राज्यपालांच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत 'तामिळनाडू आलुनार' हा शब्द वापरला जातो.

राज्यपालांच्या या पावलानंतर तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारसोबत त्यांचा वाद निर्माण झाला आहे.

राज्यपालांच्या या भूमिकेवर द्रमुक आणि त्यांच्या मित्रपक्षांनी टीका केली आहे.

पण, हा वाद कसा सुरू झाला आणि तामिळनाडू या शब्दाबद्दल तज्ज्ञांचं काय मत आहे, जाणून घेऊया.

वादाची ठिणगी...

नुकतंच तामिळनाडूच्या गव्हर्नर हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काशी तमिळ संगमच्या आयोजकांचा सन्मान करण्यासाठी राज्यपालांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात काशी तमिळ संगमसाठी काम करणाऱ्या कामगारांचं कौतुक करताना राज्यपाल आर.एन.रवी म्हणाले, “काशी तमिळ संगम ही पंतप्रधानांच्या विचारातून आलेली संकल्पना आहे. हा कार्यक्रम अतिशय कमी वेळात आयोजित करण्यात आला.”

ते पुढे म्हणाले, “तामिळनाडूची राजकीय स्थिती सध्या अशीच आहे. जिथं संधी मिळेल तिथं ते द्रविड असल्याचं सांगतात. पण संपूर्ण भारतात तामिळींसाठी कोणताही प्रकल्प असेल तर त्याला तामिळनाडू विरोध करत असल्याचं दिसतं.

“खरं तर तमिळनाडू म्हणण्यापेक्षा तमिझगम म्हणणं जास्त योग्य आहे. हे राज्य ब्रिटिशांच्या काळात निर्माण झालं. तमिझगम हा भारताचा एक भाग आहे. तमिझगम ही भारताची ओळख आहे. येत्या 25 वर्षांत भारत संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल.”

राज्यपालांच्या भाषणावर टीका करताना द्रमुकचे ज्येष्ठ नेते टी.आर. बालू म्हणाले, “राज्यपाल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यं करत आहेत. तामिळनाडूचे विभाजन करून येथे अशांतता निर्माण करणं हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. राज्यपालांना तामिळनाडू, तमिळ लोक आणि तमिळ भाषेबद्दल फार तिरस्कार आहे, असंच दिसतं. त्यामुळेच त्यांनीच यापासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा.”

लेखक आणि मदुराईचे खासदार एस. व्यंकटेशन यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, "राज्यपाल त्या संकल्पना आणत आहेत ज्या त्यागी संगरालीनगर, अरिगनर अन्ना आणि कॉ. भूपेश गुप्ता यांनी आधीच संपुष्टात आणल्या आहेत. ही जुनी गोष्ट आहे, तरीही ती परत परत चर्चेत येत आहे.”

राज्यपाल रवी यांनी अलीकडच्या काळात तामिळ, तामिळनाडू, द्रविड विचारधारा, द्रविड चळवळ आणि सनातन धर्मावर वादग्रस्त विधानं केली आहेत.

तामिळनाडू हा शब्द किती जुना आहे?

तामिळ राष्ट्रवादी कार्यकर्ते त्यागू सांगतात की, भारत हा शब्द रूढ होण्यापूर्वी तामिळनाडू हा शब्द प्रचलित होता.

ते पुढे सांगतात, “भारत हा शब्द प्रचलित होण्यापूर्वी अनेक शतकांपासून तामिळनाडू हा शब्द वापरला जात आहे. 'शिलाप्पदिकरम्' या प्राचीन ग्रंथात कवी इलांगो आदिगल यानं चेर राजा सेंगुत्तुवनची स्तुती करताना म्हटलंय की, 'तूच आहेस ज्याने गरजणाऱ्या समुद्रांनी वेढलेलं तामिळनाडू निर्माण केलंय. तमिळनाडू हा शब्द 'परिपादल' या ग्रंथातही आला आहे."

ते सांगतात, "तामिळनाडू शब्द वापरण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. काँग्रेस पक्ष मद्रास, मदारस आणि चेन्नई अशा तीन शब्दांचा वापर करत असे. तामिळनाडू हा शब्द वापरण्याची मागणी होत होती, तेव्हा इतर देशातील लोकांना ते समजणार नाही, असं कामराज म्हणाले.”

"त्या काळी इथून एक प्रकारचे कापड निर्यात होत असे. त्याला 'ब्लीडिंग मद्रास' असं म्हटलं जाई. त्यामुळे परदेशी लोकांना मद्रासचेच तेवढे नाव माहीत होते. याचा दाखला देत कामराज असं म्हणाले होते.”

त्यागू म्हणाले, “आयात-निर्यात चालू ठेवण्यासाठी आम्हाला मद्रास हा शब्द कायम ठेवावा लागेल. चेन्नई हा शब्द वापरण्याचा पर्याय त्यांनी ठेवला होता.

“यानंतर द्रमुक, कम्युनिस्ट पक्ष आणि मा पो सिवगनमचे तमिरासु कलागम सारख्या पक्षांनी या राज्याचं नाव तामिळनाडू ठेवण्याचा आग्रह धरला. शंकरनार हे काँग्रेसचे नेते होते, पण त्यांनी मद्रासचं तामिळनाडू असं नामकरण करण्यासाठी 72 दिवस उपोषण करून जीवन संपवलं होतं. त्यावेळी भक्तवत्सलम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता की, तामिळ ‘नाडू’ (देश) असेल तर भारताला काय म्हणायचं?

“जेव्हा 1967 मध्ये डीएमके पक्षाचे सी.एन. अन्नादुराई मुख्यमंत्री झाले, तेव्हा मद्रासचे नाव बदलून तामिळनाडू करण्याचा ठराव विधानसभेत आणला गेला. हा ठराव मंजूर होताच सर्वांनी ‘जय तामिळनाडू’च्या घोषणा दिल्या. हा ठराव संसदेत मंजूर व्हायला एक वर्ष लागलं. याआधी पश्चिम बंगालचे सीपीआय पक्षाचे नेते भूपेश गुप्ता यांनी खासगी विधेयक मांडलं होतं. पण, काँग्रेसनं मतदानाच्या माध्यमातून हे विधेयक फेटाळून लावलं होतं.”

‘स्वतःचा असा वेगळा राष्ट्रवाद असणं स्वाभाविक’

प्राध्यापक करुणानाथन सांगतात,"विशिष्ट संस्कृती असलेल्या एखाद्या वंशसमुहाला स्वतःचा असा वेगळा राष्ट्रवाद असणं स्वाभाविक आहे."

ते सांगतात, “तामिळ भाषा भारताच्या निर्मितीपूर्वीपासून अस्तित्वात आहे. तमिळची स्वतःची संस्कृती आणि वारसा आहे. त्यामुळे त्याच्याशी राष्ट्रवाद जोडला जाणं स्वाभाविक आहे. सोव्हिएत युनियन अस्तित्वात असतानाही त्यातील वेगवेगळ्या राज्यांच्या मागे ‘तान’ लागलेलं होतं, उदा. कझाकिस्तान. हे तान तामिळनाडूच्या ‘नाडू’सारखंच आहे.

"राज्यपालांना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश असे शब्द हवे आहेत. राज्य या शब्दाचा अर्थ एखाद्या देशाचा प्रांत असा होतो. देशाच्या संकल्पनेत असंच घडतं. भारत हा राज्यांचा संघ आहे आणि प्रत्येकाची स्वतःची खासियत, वेगळेपण आहे. त्यांना तेच संपवायचं आहे.”

करुणानाथन पुढे सांगतात, "त्यांना 'नाडू' बाबत कोणतीही अडचण नाही. त्यांना तामिळनाडूबाबत समस्या आहे. त्या लोकांनी स्वतःच कोंगू नाडू आणि कोंगू देशम अशा शब्दांचा वापर सुरू केला होता. हे भारताच्या एकात्मतेच्या विरोधात नाही का? ज्यांना हा शब्द संपवायचा आहे त्यांनी सांगावं यात काय चूक आहे?”

“याच राज्यपालांनी सनातन धर्माबद्दल विधान केलं. त्यांची अशी विधाने राज्यघटनेच्या विरोधात आहेत. ते जे बोलत आहेत ते पूर्णपणे खोटे आहे. राज्यपालांनी खोटं बोलणं अपेक्षित नाही.” तामिळनाडू या नावासाठी जनआंदोलन झालं, अनेकांनी बलिदान दिलं होतं, असं त्यागू सांगतात.

ते म्हणतात, “राज्यपाल स्वतः तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पगार घेत आहेत. जर त्यांचा आपल्या तत्वांवर इतका विश्वास असेल तर त्यांनी पगार घेणं बंद करावं.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)