रावणदहनाच्या प्रथेला विरोध का केला जातोय? आदिवासी संघटनांचे म्हणणे काय?

    • Author, शताली शेडमाके
    • Role, बीबीसी मराठी

भारतात दरवर्षी 'दसरा' सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

'अनितीवर नीतीचा विजय' आणि 'असत्यावर सत्याचा विजय' असं म्हणत रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं जातं.

तर दुसरीकडे रावणदहनाची ही प्रथा बंद व्हावी, असा प्रयत्न भारतातील एक मोठा वर्ग करताना दिसतोय.

आदिवासी समाजात तर रावणाला आदिवासी संस्कृतीचा नायक म्हणत 'राजा' मानलं जातं.

रावणदहनातून रावणाची जाहीर विटंबना केली जाते, असा त्यांचा आक्षेप आहे. रावणदहनामुळे आपल्या भावना दुखावल्या जातात, अशीही आदिवासी समाजाची भूमिका आहे.

आदिवासींच्या या नायकाला जाळण्याची परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली असून ती बंद करावी, अशी मागणीदेखील काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे.

यामागचं मूळ कारण काय? आणि रावणदहन बंद करण्याची मागणी जोर का धरत आहे, त्याबाबत जाणून घेऊया.

रावणदहन बंद करण्याची मागणी

अमरावती शहरातील महानंदा टेकाम गेल्या 22 वर्षांपासून रावणदहन प्रथा थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

2006 साली महानंदा टेकाम यांनी तीन महिलांसह या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी रावणदहन बंद करण्याबाबत पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन दिलं.

परतवाड्यातील काली मंदिराजवळील रावणदहन कार्यक्रमात त्यांनी विरोधप्रदर्शन करत रावणाच्या पुतळ्याला पकडून चिपको आंदोलन केलं.

"रावण आमचा पूर्वज आहे, त्याला जाळू नये अशी विनंती केली. मात्र, त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आम्हालाच ठाण्यात डांबलं," असं त्यांनी सांगितलं.

"सुरुवातीला रावण राक्षस होता. वाईट, दुष्ट प्रवृत्तीचा क्रूर म्हणून त्याला जाळायचे. मात्र, हळूहळू रावणाबाबतचा वाढता प्रतिसाद पाहता लोकांनी रावण हा प्रकांडपंडित, हुशार आणि आर्य म्हणणं सुरू केलं. आमच्या चांगल्या गोष्टी गोडीगुलाबीने हिसकावून घेण्याची ही जुनी रीत आहे," असंही त्या म्हणाल्या.

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मधुकर उईके म्हणाले, “आम्ही गेल्या 20 वर्षांपासून नागपुरातील रावणदहन कार्यक्रम थांबवण्याबाबत सातत्याने प्रयत्न करतोय. ही प्रथा अलिकडेच सुरू झाली आहे."

रावणदहनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाला दडपण्याचं षड्यंत्र सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.

पोलीस ॲक्टनुसार कोणत्याही व्यक्तीचा पुतळा जाळणं, दहन करणं हा गुन्हा आहे, असे केल्यास कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागतं.

विविध आंदोलनात विरोध दर्शविताना प्रतीकात्मक पुतळे जाळल्यास गुन्हा दाखल होतो, मग रावणदहनावेळी हा नियम का लागू केला जात नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. तो अधिकार आम्हालाही लागू होतो ना, मग आमच्या जननायकाचं दहन का थांबवत नाहीत? पोलिसांना, प्रशासनाला दरवर्षी निवेदन देऊन, वारंवार विनंत्या करूनही आमचं ऐकून घेतलं जात नाही.

सरकार कुठलंही असो, आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे, समाजिक मुद्यांकडे सर्सासपणे दुर्लक्ष केलं जातं. आम्ही आमच्या मागण्या मांडाव्या तरी कुठे? असा सवाल उईके यांनी उपस्थित केला.

हायकोर्टात याचिका

ॲड. एल. के. मडावी यांनी 1995 साली रावणदनह प्रथा बंद करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर येथे सभा घेतल्याचे सांगितले.

1990 ते 2000 या काळात त्यांनी या प्रथेविरोधात आंदोलनं केली.

1997 साली रावदहन बंद करण्यासंदर्भात नागपूर हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. मात्र, याचिका बेंचवर आल्यानंतर दहनासंदर्भात आणखी पुरावे द्या असे कारण देत ती फेटाळून लावण्यात आली असं मडावी म्हणाले.

रावण कोण होता?

रावणाबाबत विभिन्न मतप्रवाह आहेत. रावणाला काही परंपरांमध्ये वाईट किंवा क्रूर म्हटलं जात असलंं तरी एक समाजातील एक मोठा भाग रावणाची पूजा करतो. आदिवासी समाजात रावणाचा उल्लेख राव, राव पेन, रावूळ, राऊड, रावेन पुरखा असा करत आराध्य मानून पूजा केली जाते.

इतिहास संशोधक डॉ. अशोक राणा याबाबत बोलताना म्हणाले, “मध्य प्रदेशातील मंदसौरजवळ रावणाचं मंदिर असून तेथील शिंपी समाजही रावणाची पूजा करतात. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट भागात कोरकू आदिवासी रावण आणि मेघनादाची पूजा करतात. त्यांच्या लोकगीतांमध्ये रावणाच्या पराक्रमाचा उल्लेख केला जातो."

आचार्य चतुरसेन लिखित 'वयं रक्षामः' पुस्तकातही रावणाचा सकारात्मक उल्लेख करण्यात आलाय, असं डॉ. राणा सांगतात.

डॉ. राणा सांगतात, "हिंदू धर्मग्रंथात, पुराणात रावणाचं वर्णन अनेक विषयांत निपुण, विद्वान, प्रकांडपंडित असं करण्यात आलं आहे. रामायणाच्याही विविध प्रती आपल्याला वेगवेगळ्या भाषेत आढळून येतात, त्यानुसार कथेतही बदल होताना दिसून येतो.

"पेरीयार रामासामी यांची सच्ची रामायण, कन्नड भाषेतील कुहक आदी ग्रंथांमध्ये रावणाचा उल्लेख बलशाली आणि जननायक असा करण्यात आलाय. वाल्मिकी रामायणात रामाची स्तुती करण्यात आली आहे; त्याचप्रकारे रावणाच्या विद्वत्तेचही गुणगाण करण्यात आलं आहे.”

अलीकडच्याच काळात शरद तांदळे यांची 'रावण : राक्षसांचा राजा' ही कादंबरी देखील आली असून लोककला आणि लोककलांमध्ये रावणाची प्रतिमा कशी आहे याबाबतचे संंदर्भ यात आले आहेत.

रावणाचा 'जननायक' म्हणून उल्लेख

रावण हा आदिवासी जननायक असल्याचे संदर्भ अनेक ग्रंथात सापडतात.

राजा रावण आदिवासी समाजाच्या दृष्टीने पूजनीय असून आदिवासी समाजाकडून रावणदहनावर बंदी आणण्याची आता मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत बोलताना लेखक मारोती उईके म्हणाले, “आदिवासी समाजात अनेक ठिकाणी रावेनमुरी, मेघनाद उत्सव साजरा केला जातो. साहित्यिक व्यंकटेश आत्राम यांच्या ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ’ पुस्तकात रावण हा गोंडी संस्कृतीशी तादात्म्य पावतो असा उल्लेख करण्यात आला आहे. रावूळचे संस्कृत रूप रावण झाले आहे, असंही या पुस्तकात नमूद केलंय.”

तर, डॉ. अशोक राणा म्हणतात, “विविध ग्रंथात रावण हा आदिवासी असल्याचा संदर्भ आहे. रामनगीना सिंह लिखित रावणाची सत्यकथा, आचार्य चतुरसेन शास्त्री लिखित ‘वयं रक्षाम:’ ही हिंदी कादंबरी, त्यापासून प्रेरणा घेऊन नागपूरचे नाना ढाकुलकर यांची ‘रक्षेन्द्र’ ही कादंबरी, व्यंकटेश आत्राम लिखित ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ’ इत्यादी पुस्तकांत रावणाच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे.”

हा आर्य-अनार्य असा सरळ-सरळ संघर्ष असल्याचंही डॉ. अशोक राणांनी नमूद केलं.

रावणदहन प्रथा अलीकडचीच

रावणदहनाची प्रथा केव्हापासून सुरू झाली यावर वेगगवेगळे मतप्रवाह आहेत.

याबाबत मारोती उईके म्हणाले, “1956 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या दहनाचा उल्लेख आढळून येत नाही. 1969 मध्ये नागपुरच्या मेकोसाबाग येथील तलवार नामक व्यक्तीने रावणदहनाला सुरुवात केली, आणि तेव्हापासून नागपुरात ही प्रथा सुरू आहे. मात्र, काहीजण 1952 पासून सुरुवात झाली असंही सांगतात."

इतिहास संशोधक डॉ. अशोक राणा याबाबत बोलताना म्हणाले, “रावण दहनाची प्रथा फार जुनी नाही. 60-70 वर्षांपासून रावणदहन केलं जात आहे. इतिहास संशोधक तथा नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते लिखित ‘महात्मा रावण’ या पुस्तकात रावणाचा उल्लेख थोर महात्मा आणि हुतात्मा देशभक्त असा करण्यात आला आहे.

तसेच, रावणाला आर्यांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी आणि आपल्या भगिनींच्या अपमानाचा सूड उगविण्यासाठी प्राणांचे बलिदान करणारा राजा असंही म्हटलं आहे.”

‘रावणदहन आमच्यासाठी महत्त्वाचं’

रावणदहनाबाबत नागपूरस्थित सामाजिक कार्यकर्ते आशुतोष अडोणी यांच्याशी चर्चा केली असता, “रामायण हा आमचा इतिहास आहे आणि जीवनातील आदर्श मूल्यांचे दर्शनही. त्यातील राम-रावण संघर्ष हा केवळ दोन व्यक्ती वा समुदायांमधील संघर्ष नाही. न्याय विरुद्ध अन्याय, नीती विरुद्ध अनिती आणि धर्म विरुद्ध अधर्म, असा तो मूल्यांचा लढा आहे."

या बातम्याही वाचा :

"रावण ही वृत्ती आहे. ते अनीती, अन्याय आणि अधर्माचे प्रतीक आहे. वाल्मिकी रामायणात त्याची साक्ष ठिकठिकाणी मिळते. म्हणून वर्षानुवर्षे या दुष्प्रवृत्तीच्या दहनाचे कार्यक्रम सुरू आहेत. तो एक सामाजिक बोध आहे आणि आदर्श जीवन मूल्यांचे जागरणही. त्यावरून काही लोकांनी सुरू केलेला वाद अनावश्यक आणि अतार्किक आहे,” असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात केव्हापासून सुरू आहे रावणपूजा?

महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी रावणपूजा केली जाते. अनेक आदिवासी समाजामध्ये परंपरागत रुपाने रावण, मेघनाद यांची पूजा केली जाते, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठातून गोंडी लोकसाहित्यावर पी.एच.डी करणारे नंदकिशोर नैताम यांनी दिली.

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज ‘राव पेन’ म्हणून ग्रामदेवतेच्या रुपात रावणाची पूजा करत आलाय. मात्र, येथेही रावणदहनाला सुरुवात झाल्यामुळे त्या प्रतिक्रियेत राव पेन पूजा उत्सवाच्या रुपात साजरी होऊ लागली.

1991 साली माध्यमिक शाळेचे शिक्षक मनीरावेन दुग्गा यांनी धानोरा तालुक्यातील परसवाडी गावात रावणउत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत जिल्हाभरात रावपेन उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

ठिकठिकाणी रावणाची लाकडी प्रतिमा उभारून पूजा केली जाते, ‘रावणदहन थांबवा’चा संदेश देणारी शांतता रॅली काढली जाते, असं नंदकिशोर नैताम यांनी सांगितलं.

नागपूर शहरासह जिल्ह्यातही रावणपूजा साजरी केली जाते. रामटेक तालुक्यातील काही भागात रावणपूजा केली जाते. यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रावणपूजा केली जाते.

"रावेनवाडी, रावेनगढ़, रावेनखिंडी, रावेनठाना, रावेनकोर, और रावेनगढी इत्यादी काही गावांची नावेही रावणाच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील वेगवगेळ्या समुदायांमध्ये रावणाला ग्राम देवतेच्या रुपाने पूजतात. आदिवासी समाजात आजच्या दिवशी शेतातील नवीन धान्याची पूजा करतात. आणि नैवेद्य दाखवून कुटुंबाच्या कल्याणासाठी, गावाच्या रक्षणासाठी निसर्गाकडे, राव पेनकडे आर्जव करतात," अशी माहिती ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक व लेखिका उषाकिरण आत्राम यांनी दिली.

अमरावती शहरासह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रावणपूजा केली जाते. मेळघाटातील कोरकु समाज बांधव रावण-मेघनादाची पूजा करतात. अकोला जिल्ह्यात रावणाचं मंदिर असल्याची माहिती डॉ. राणा यांनी दिली. तेथेही रावणपूजा होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

विविध राज्यात होते रावणाची पूजा

याबाबत बोलताना विजयनगर श्री कृष्णदेवराय विद्यापीठ बल्लारीचे माजी कुलगुरू डॉ. के.एम. मैत्री म्हणाले, “रावण हा अनार्य लोकांचा राजा असल्याचा उल्लेख विविध पुस्तकांत आढळून येतो. महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ओडिसा, तामिळनाडूच्या काही भागांमध्ये रावणाची पूजा केली जाते. कर्नाटकातील कुहकसारख्या साहित्यात रावणाचा सकारात्मक उल्लेख आहे, असं त्यांनी सांगितलं.

“कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यातील कनकपुरा भागात रावणाच्या नावे जत्रा भरते. येथे शिवलंकेश्वर नावाने मंदिर असून कर्नाटक व तामिळनाडू राज्यातील लोकं मोठ्या प्रमाणात येथे दर्शनाला येतात. या भागातील लोकांच्या नावातही रावण नावाचा समावेश आहे, रावळन्ना, रावणाप्पा, रावळगौडा इत्यादी नावे तुम्हाला दिसून येतील”, असं डॉ. मैत्री यांनी सांगितलं.

“दक्षिणेतील द्रविड लोक स्वत:ला मूलवासी मानतात आणि रावण आमचा जननायक होता, असंही ते सांगतात. तामिळनाडूमध्येही रावणाचा मोठा प्रभाव आहे. रावण द्रविड असल्याबाबतची विविध लोकगीतं, लोककथा आढळून येतात.

काही भागात रावणाची मंदिरं आहेत, तेथे शिवभक्त रावण म्हणून पूजा केली जाते. आपल्या समाजाच्या नायकाचं अशाप्रकारे दहन करणे म्हणजे आदिवासी समाजाच्या भावना दुखावणं होय, त्यामुळे ही प्रथा थांबवणं गरजेचं आहे,” असं डॉ. मैत्री म्हणाले.

लेखिका उषाकिरण आत्राम म्हणाल्या, “रावण हा मूळवंशी होता असं मानलं जातं. अनेक लोकगीतं, लोककथांमधून रावण मूलवासी असल्याचा उल्लेख आढळून येतो. रावणाच्या पराक्रमाची, मृत्यूसंदर्भातील दुखा:ची गाणी गायली जातात.

आजही रावणाच्या नावाने पेनकडा किंवा लाकडाचं प्रतिक उभारून गढरावेन, राव पेन, रावेन पुरखा म्हणून रावणाची पूजा केली जाते. मध्य प्रदेशातील गढा मंडला भागातील गोंड समाजातील मडावी लोकं रावणाला आपला पूर्वज मानतात. अमरकंटक भागातील समाज रावणाला आपला पूर्वज मानून त्याची पूजा करतात,” असं आत्राम यांनी सांगितलं.

अनेक साहित्यकृतींमध्ये रावणाचा जननायक म्हणून उल्लेख

विविध साहित्य, ग्रंथांमध्ये रावणाचा जननायक असा उल्लेख करण्यात आला आहे.

पेरियार रामास्वामीलिखित सच्ची रामायण, रामनगीना सिंह लिखित रावणाची सत्यकथा, आचार्य चतुरसेन शास्त्री लिखित ‘वयं रक्षाम:’ ही हिन्दी कादंबरी, त्यापासून प्रेरणा घेऊन नागपूरचे नाना ढाकुलकर यांनी लिहिलेली ‘रक्षेन्द्र’ कादंबरी, व्यंकटेश आत्राम लिखित ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ’ आदि पुस्तकांत रावणाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला असल्याची माहिती लेखिका उषाकिरण आत्राम, डॉ. के.एम. मैत्री, डॉ. अशोक राणा यांनी दिली.

“रावण हा मूळवासी असल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आढळून येतो. रामचरित मानस हे अतिशय लोकप्रिय काव्य आहे. त्यामध्ये रावणाला खऱ्या अर्थाने खलनायक म्हणून चित्रित केलं आहे. वाल्मिकी रामायणात रावणाला त्या पद्धतीने खलपुरुष म्हणून चित्रित करण्यात आलेलं नाही.

"दशरथ जातक कथांमध्येही राम-रावणाचे संबंध चांगले दाखवण्यात आले आहेत. त्यांच्यात भांडणाचं किंवा सीतेला पळवण्याचा उल्लेख नाही. त्यामुळे राम-रावणाच्या युद्धाचाही मुद्दा नाही,” असं डॉ. राणा यांनी सांगितलं.

पत्रकार आणि शोधकर्ता प्रमोद रंजन म्हणाले,“ रावण आणि मेघनादाचा संदर्भ गोंड परंपरेत जास्त दिसून येते. आदिवासी लोकगीतं, लोककथांमध्ये रावणाचा उल्लेख केला जातो. ही कथा ज्याकाळातील आहे त्यावेळेस जातव्यवस्था नव्हती, त्यामुळे विविध ग्रंथात वेगवेगळे उल्लेख करण्यात आले आहेत.

“काळानुसार कथेतही बदल होत गेला. यासंदर्भात भारतीय लेखक ए.के. रामानुजन यांनी रामायणाच्या 300 हून अधिक प्रकारच्या प्रती संग्रहित करून त्यावर एक लेख लिहीला होता. त्यात त्यांनी यासंदर्भातील तपशील दिला होता,” असं रंजन यांनी सांगितलं.

दिवसेंदिवस रावणदहन प्रथा बंद करण्याच्या मागणीचा आलेख वाढतोच आहे. एक ना एक दिवस आमची मागणी मान्य होईल आणि आमच्या नायकाला न्याय मिळेल, या आशेसह आदिवासी समाज आणि विविध सामाजिक संघटनांची पराकाष्टा सुरु आहे. त्यांची ही मागणी मान्य होते की फेटाळली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)