अंगकोर : आशियातील असं प्राचीन शहर, ज्याचा उदय आणि ऱ्हास पाण्यामुळे झाला

    • Author, मारिसा कॅरुथर्स
    • Role, बीबीसीसाठी

अंगकोर वाट दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करतं, परंतु बहुतेकांना ज्यामुळे साम्राज्याचा उदय आणि ऱ्हास झाला. त्या गुंतागुंतीच्या आणि विस्तीर्ण जलप्रणालीबद्दल फारशी माहिती नसते.

दरवर्षी एप्रिलमध्ये खमेर नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान सोफी पेंग, तिची चार भावंडं आणि पालक कंबोडियातील सर्वात पवित्र पर्वत ‘नोम कुलेन’ येथे तीर्थयात्रा करतात. बलाढ्य अंगकोर साम्राज्याचं जन्मस्थान म्हणून कल्पित कुलेनच्या सौम्य उतारांना स्थानिक लोकांच्या हृदयात विशेष स्थान आहे.

इ.स. 802 पासून धार्मिक सणांच्या वेळी कंबोडियन लोक राजांना राज्याभिषेक करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याने पवित्र होण्यासाठी त्याच्या शिखरावर जातात. साम्राज्याचा संस्थापक जयवर्मन द्वितीयला जेव्हा पवित्र पाण्याने धुतले गेले आणि देवराजा किंवा देव राजा म्हणून घोषित केले त्यावेळी अंगकोर साम्राज्याची सुरुवात झाली.

साम्राज्याने आधुनिक काळातील कंबोडिया, लाओस, थायलंड आणि व्हिएतनामचा बराचसा भाग व्यापला आणि जगातील सर्वात मोठं पूर्व-औद्योगिक शहरी केंद्र - अंगकोर शहर अस्तित्त्वात आलं.

सीएम रीप शहराच्या उत्तरेस 50 किमी अंतरावर असलेल्या या पवित्र स्थानाला अमर करण्यासाठी 1,000 लिंग - हिंदू देवता शिवाचा एक फलिक प्रतीक अवतार - कबाल स्पीन येथील नदीच्या पात्रात कोरण्यात आले, जिथलं पाणी अंगकोरच्या मैदानात आणि टोनले सॅप सरोवरात वाहत जातं. आजही हे पाणी पवित्र मानलं जातं आणि त्याच्या शक्तीने आजार बरे होतात आणि भाग्य उजळतं असं मानलं जातं.

"हे कंबोडियन लोकांसाठी खूप खास ठिकाण आहे; आमच्या इतिहासाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे," पेंग म्हणाले. "दरवर्षी, माझं कुटुंब खमेर नवीन वर्षाच्या विधींचा एक भाग म्हणून माउंट कुलेनला भेट देतं. आम्ही मंदिरात ठेवण्यासाठी अन्न घेऊन येतो आणि आमचं भाग्य उजळावं यासाठी आमच्यावर कबाल स्पीनचं पाणी टाकतो."

जयवर्मन द्वितीय च्या आध्यात्मिक आशीर्वादाने अंगकोर साम्राज्याचा पाण्याशी जवळचा संबंध प्रस्थिपित झाला. तरीही, दक्षिणेकडे रोलॉस आणि नंतर पाच शतकांहून अधिक काळ राजधानी त्याच्या अंतिम विश्रांतीच्या ठिकाणी - अंगकोर - येथे स्थलांतरित होईपर्यंत मुख्य अभियंते त्यांच्या कौशल्यांचा वापर करून साम्राज्याचा उदय आणि ऱ्हास घडवून आणणारी गुंतागुंतीची जलव्यवस्था तयार करू शकले नाहीत.

“साम्राज्याची भरभराट होण्यासाठी अंगकोरची मैदानं आदर्श आहेत," असं सिडनी विद्यापीठातील भूविज्ञान विभागातील संशोधक डॅन पेनी यांनी स्पष्ट केलं ज्यांनी अंगकोरचा विस्तृत अभ्यास केलाय. "टोनले सॅप सरोवराजवळ तांदळाच्या शेतीसाठी सुपीक जमिनीसारखी भरपूर साधनसंपत्ती आहेत. हा तलाव जगातील सर्वात उत्पादक अंतर्देशीय मत्स्यव्यवसायांपैकी एक आहे आणि अंगकोर या प्रचंड अन्न साठ्याच्या उत्तर किनार्‍यावर वसलेलं आहे. या साधनसंपत्तीच्या जोरावर अंगकोर यशस्वी झालंय.”

1950 आणि 60 च्या दशकात फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ बर्नार्ड फिलिप ग्रोस्लियर यांनी अंगकोरच्या प्राचीन शहरांच्या आराखड्याची पुनर्रचना करण्यासाठी हवाई पुरातत्वशास्त्राचा वापर केला. यावरून त्याचा अफाट विस्तार आणि त्याच्या जल व्यवस्थापन जाळ्याची जटिलता दिसून आली आणि ग्रॉस्लियर यांनी अंगकोरला "हायड्रॉलिक सिटी" म्हणून संबोधलं.

तेव्हापासून पुरातत्वशास्त्रज्ञांनी पाण्याचं जाळं आणि त्याने पार पाडलेली महत्त्वपूर्ण भूमिका यावर व्यापक संशोधन केलंय.

2012 मध्ये 1,000 चौ.कि.मी.मध्ये पसरलेल्या हायड्रोलिक प्रणालीची खरी व्याप्ती, इकोले फ्रॅन्सेस डी’एक्स्ट्रेम-ओरिएंट येथील पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. डॅमियन इव्हान्स यांच्या नेतृत्वाखालील एअरबोर्न लेझर स्कॅनिंग तंत्रज्ञानाद्वारे (LiDAR) उघड झाली.

डॉ. इव्हान्स म्हणाले, "कोड्याचे हरवलेले तुकडे अतिशय लक्षवेधी ठरले. "आम्ही आता एका कागदावर काम करत आहोत जो अंगकोरचा शेवटचा स्पष्ट नकाशा आहे आणि हायड्रॉलिक प्रणालीसह वास्तवदर्शी चित्र दाखवतो. पाणी हे साम्राज्याच्या यशाचं रहस्य होतं.”

फोटो कॅप्शन: अंगकोर साम्राज्य आधुनिक काळातील कंबोडिया, लाओस, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये पसरलं होतं (श्रेय: रिचर्ड शारॉक्स/गेटी इमेजेस)

त्याच्या आकाराचं शहर तयार करण्यासाठी, नोम कुलेनपासून अंगकोरच्या मैदानापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी मानवनिर्मित कालव्यांचं बांधकाम महत्त्वाचं होतं. अंगकोरच्या निर्मितीसाठी लागलेल्या 1,500 किलो वजनाच्या अंदाजे 10 दशलक्ष वाळूच्या दगडाच्या विटा वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला.

लोकसंख्या, शेती आणि पशुधन यांना आधार देण्यासाठी पावसाळी हवामानात वर्षभर पाणीपुरवठ्याची खात्री देण्यासोबतच, हायड्रॉलिक प्रणालीमुळे मंदिरं शतकानुशतकं उभी राहिली आहेत. दगडांचं वजन सहन करण्यासाठी फक्त वालुकामय माती पुरेशी नाही. तर, मुख्य अभियंत्यांनी शोधून काढलं की वाळू आणि पाण्याचे मिश्रण स्थिर पाया तयार करतं, म्हणून प्रत्येक मंदिराभोवती असलेल्या खंदकातून भूजलाचा कायम पुरवठा होण्यासाठी डिझाइन केले गेले. यामुळे अनेक शतकांनंतरही मंदिर कोसळणार नाही इतका पुरेसा मजबूत पाया तयार झालाय.

साम्राज्याच्या संपूर्ण इतिहासात लागोपाठच्या राजांनी अंगकोरच्या जटिल पाण्याच्या जाळ्याचा विस्तार, जीर्णोद्धार आणि सुधारणा केली. यामध्ये कालवे, डाईक, खंदक, बारे (जलाशय) यांच्या प्रभावी जाळ्यांचा समावेश आहे – पश्चिम बारे ही 7.8 किमी लांब आणि 2.1 किमी रुंद सर्वात मोठी मानवनिर्मित रचना आहे जी अंतराळातून दिसते – तसेच पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी सर्वोत्तम अभियांत्रिकी प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे.

गुंतागुंतीची पाणी व्यवस्थापन प्रणाली असलेल्या ऐतिहासिक शहरांची अनेक उदाहरणं आहेत, परंतु असं कुठेही नाही.

"अंगकोरची हायड्रॉलिक प्रणाली त्याच्या विस्तारामुळे खूप अद्वितीय आहे," पेनी म्हणाले. "विस्तृत पाणी व्यवस्थापन प्रणाली असलेल्या ऐतिहासिक शहरांची अनेक उदाहरणे आहेत, परंतु असं कुठेही नाही. उदाहरणार्थ, जलाशयांचे प्रमाण. वेस्ट बारायमध्ये जेवढं पाणी आहे ते अविश्वसनीय आहे. ते बांधलं गेलं तेव्हा अनेक युरोपीय शहरं त्यामध्ये आरामात बसू शकली असती. हे डोकं भंडावून सोडणारं आहे; तो समुद्र आहे."

असं असताना, अंगकोर साम्राज्याच्या उदयास पाण्याने हातभार लावला असला तरी, त्याच्या ऱ्हासालाही पाणीच जबाबदार होतं. "हे स्पष्ट आहे की शहराच्या वाढीमध्ये पाणी व्यवस्थापनाचं जाळं खरोखर महत्वाचं होतं आणि त्यामुळेच संपत्ती आणि सामर्थ्याकडे वाटचाल झाली," पेनी म्हणाले. "परंतु जसजसं ते अधिक जटिल आणि मोठं होत गेलं, तसतसं त्याने शहराच्या वाढीवर टाच आणली."

संशोधनातून असं दिसून आलंय की 14 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 15 व्या शतकाच्या सुरुवातीस, हवामानातील नाट्यमय बदलांमुळे दीर्घकाळ मान्सूनचा पाऊस झाला आणि त्यानंतर तीव्र दुष्काळ पडला. या हवामानातील बदलांचा परिणाम पाणी व्यवस्थापन जाळ्यावर झाला, ज्यामुळे बलाढ्य साम्राज्याच्या पडझडीला अखेरचा हातभार लागला.

पेनी म्हणाले, "हवामानाच्या या प्रचंड बदलांमुळे संपूर्ण शहराला फटका बसला होता.” “जाळ्याचे प्रमाण आणि त्याचे परस्परावलंबन याचा अर्थ दुष्काळाचा प्रचंड त्रास आणि लोकांनी या प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी बदल केले आणि त्यानंतर अनेक वर्ष पाणीच पाणी झाल्यामुळे काही भाग वाहून गेले. यामुळे संपूर्ण जाळ्याचे तुकडे झाले आणि ते निरुपयोगी झाले."

पुढील संशोधनात असं सूचित होतं की हवामानातील बदल, हायड्रॉलिक प्रणालीमध्ये बिघाड आणि शेजारील सियामी देशांकडून होणारे वाढते हल्ले यामुळे राजधानी दक्षिणेकडे औडोंगला हलवली गेली.

"इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अंगकोरचा शेवट झाल्याचं तुम्हाला सांगितलं जातं कारण सियामी लोकांनी 1431 मध्ये त्याला ताब्यात घेतलं.," डॉ. डॅमियन म्हणाले. "असं घडलं असं मला वाटत नाही. आमच्याकडे असलेले पुरावे हे अधिक दीर्घकालीन असल्याचं सूचित करतात. प्रचंड दुष्काळाचा दबाव, पाणी व्यवस्थापन यंत्रणा बिघडत जाणे, सियामी देशांकडून सतत होणारे हल्ले आणि सागरी मार्गांचा विस्तार या सर्व गोष्टींचा त्याला हातभार लागला."

असं सर्व असतानाही एकेकाळी अंगकोरवर बहिष्कार टाकल गेला होता, मात्र निसर्गाने पुन्हा त्यावर दावा केला. स्थानिकांना प्राचीन वास्तूंबद्दल माहिती होती.

1860 पर्यंत फ्रेंच संशोधक हेन्री मौहॉट यांनी त्याचा "पुन्हा शोध" लावेपर्यंत ते उर्वरित जगासाठी जंगलाने झाकलेलं होतं. यामुळे मोठ्या जीर्णोद्धार प्रकल्पांची मालिका सुरू झाली जी आजही सुरू आहे.

गेल्या दोन दशकांत, कंबोडियामध्ये अंगकोर वाट, ता प्रोहम आणि बायॉन मंदिरांच्या सावलीत उभं राहण्यासाठी अंगकोर वाट पुरातत्व उद्यानात येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2.2 दशलक्ष लोकांनी परिसराला भेट दिली. हॉटेल्स, भोजनालयं आणि पर्यटकांच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. मंदिरं स्थिर राहण्यासाठी सतत भूजल पाणी पुरवठ्यावर अवलंबून असल्याने युनेस्को-सूचीबद्ध साइटच्या जतनाबद्दल चिंता निर्माण झालेय.

2009 ते 2011 या कालावधीत पावसाळ्यात आलेल्या तीव्र पुरामुळे पाण्याच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर प्राचीन जलप्रणालीच्या जीर्णोद्धारास सुरूवात झाली. सीएम रीपच्या बाहेरच्या गेस्टहाऊसचे मालक असलेल्या सोचेता हेंग यांना 2011 चा पूर आठवला – 50 वर्षांतील प्रांतातील सर्वात वाईट. "त्यामुळे खूप नुकसान झालं,” असं त्या म्हणाल्या.

"पिकं नष्ट झाली, लोकांना बाहेर काढावं लागलं आणि माझ्या अतिथीगृहात पाणी आलं. ते विनाशकारी होतं.”

अंगकोर पुरातत्व उद्यानाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या ‘एपीएसएआरए’ (APSARA) राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील, जीर्णोद्धार प्रकल्पाने अनेक हायड्रॉलिक प्रणालीने बारे आणि जलमार्गांचं नूतनीकरण केलंय, ज्यामध्ये अंगकोर थॉमचा 12 किमीचा खंदक, पश्चिम बारे आणि 10 व्या शतकातील शाही खोरे, स्राहंग यांचा समावेश आहे. या प्रयत्नांमुळे पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेचा सामना करण्यात मदत झाली आहे आणि 2009 आणि 2011 दरम्यान संपूर्ण प्रांतात आलेल्या भीषण पूरस्थितीला प्रतिबंध करण्यात मदत झाली आहे.

याचा अर्थ आज, शतकानुशतकं जुनी विशाल यंत्रणा सतत पाणीपुरवठा करून सीएम रीपची तहान भागवत आहे, विध्वंसक पूर रोखत आहे आणि असा पाया तयार करत आहे जो अंगकोरच्या पवित्र मंदिरांना भविष्यात स्थिर ठेवेल.

"बारे आणि जलप्रणालींचे नूतनीकरण सिंचनासाठी पाणी पुरवतं, त्यामुळे ते आजच्या कृषी क्षेत्राचा भाग बनले आहेत आणि मंदिरांना स्थिर ठेवण्यास देखील मदत करतात," डॉ. इव्हान्स म्हणाले. "हे खरोखरच अविश्वसनीय आहे की ही पाणी व्यवस्थापन प्रणाली अजूनही सीएम रीपला सेवा देते."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)