FIFA World Cup: 'फुटबॉलच्या वेळी मारामारी करणं सेक्सपेक्षा जास्त आनंददायी आहे'

फुटबॉल हुलिगन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • फ्रान्सविरुद्ध सेमीफायनल हरली म्हणून मोरक्कोचे चाहते फ्रान्समध्ये पोलिसांना भिडले.
  • मोरक्कोच्या चाहत्यांनी फ्रान्समध्ये विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या फॅन्सच्या अंगावर बाटल्या आणि पेटते फटाके फेकले.
  • याआधी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये मोरक्को आणि बेल्जियमच्या फॅन्समध्ये मारामाऱ्या झाल्या होत्या.
  • याच वर्षी इंडोनेशियात झालेल्या एका मॅचदरम्यान हिंसाचार झाला, त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 125 लोकांचा जीव गेला.

वरवर पाहाता वेगवेगळ्या वाटणाऱ्या घटना एका सिस्टिमने एकत्र बांधल्या गेल्या आहेत. ती सिस्टीम म्हणजे फुटबॉल मॅचनंतर होणारा हिंसाचार. जगाच्या पाठीवर कुठेही फुटबॉल मॅच असोत, कोणीही जिंको किंवा हरो, लहानमोठ्या झटापटी होतातच.

फुटबॉलचे फॅन्स 'करो या मरो' याच मानसिकतेचे असतात. अनेक देशांमधल्या मॅचेस युद्धापेक्षा कमी नसतात.

बऱ्याचदा हरलेल्या-जिंकलेल्या संघाचे फॅन्स एकमेकांशी भिडतात, डोकी फुटतात. जगभरात हे घडत आलेलं आहे... आणि त्यामुळेच कदाचित या फुटबॉलच्या आतातायी फॅन्सला आवरण्यासाठी प्रत्येक मोठ्या स्पर्धेदरम्यान पोलिसांची खास कुमक तैनात असते.

याहीवर्षी कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये हजारो पोलिसांची कुमत तैनात आहे. इतकंच नाही, कतारपासून हजारो किलोमीटर लांब असणाऱ्या फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, ब्राझील, अर्जेटिना अशा देशांमध्येही फॅन्सच्या अतिउत्साहाला किंवा रागाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.

पण एवढा फौजफाटा कशासाठी, आणि फुटबॉलच्या प्रत्येक मॅचनंतर डोकी फुटतात ती का? याचीच रंजक गोष्ट.

इंग्लिश भाषेत फुटबॉल मॅचनंतर होणाऱ्या या हाणामारीला एक खास शब्द आहे - ‘फुटबॉल हुलिगनीझम’. याचा शब्दशः अर्थ म्हणजे फुटबॉलच्या काळात होणारी हाणामारी.

गेल्या कित्येक दशकात या हाणामारीची एक संस्कृती तयार झालीये. याचं मूळ यूकेमध्ये असलं तरी जगभरात ही संस्कृती पसरली आहे.

या संस्कृतीचे पाईक कोण? अर्थातच पुरुष.. त्यातही नुकतीच मिसुरडं फुटलेली तरुण मुलं.

बीबीसी थ्रीने अशाच हाणामारी करणाऱ्या मुलांवर ‘द फुटबॉल फाईट क्लब’ नावाची डॉक्युमेंट्री केली आहे. यातली सगळी मुलं 17 ते 25 या वयोगटातली आहेत. कोणाचं लग्न ठरलंय, कोणाला दोन-तीन वर्षांची मुलं आहेत पण लग्न मोडलंय, कोण अजूनही शाळेत शिकतंय... पण सगळ्यांचा समान धागा एकच. आपल्या आवडत्या फुटबॉल क्लबला समर्थन देणं आणि जे दुश्मन क्लब आहेत त्यांच्या फॅन्सची डोकी फोडणं.

यातली गंमत अशीये की अनेकदा ही पोरं मॅच पाहातही नाहीत, त्यांना खेळ पाहाण्यापेक्षा खुमखुमी असते ती मारामारीची.

या डॉक्युमेंट्रीत यूकेच्या बेरी शहरात राहाणारा आणि स्वतःला बेरी बॉईज या गँगचा मेंबर म्हणून घेणारा पॉल म्हणतो, “फुटबॉल मॅचच्या वेळी होणारी मारामारी सगळ्यात बेस्ट असते. तेवढाच आपल्या जगण्याचा उद्देश आहे असं वाटतं. आम्ही काही मूर्ख नाही आहोत, पण या मारामारीत मजा येते, एक नशा आहे.”

फुटबॉल हुलिगन

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आणि ही पोरं करतात कोणाशी मारामारी? याचंही उत्तर एक तरुण देतो. त्याने आपला चेहरा झाकला आहे.

तो म्हणतो, “आम्ही काय रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तिऱ्हाईत माणसाला, बायका-पोरांना मारत नाही. जे आमच्या समोर असतात तेही असेच त्यांच्या टीमचे, क्लबचे कट्टर समर्थक असतात. तेही आमची डोकी फोडण्याच्या हेतूनेच आलेले असतात. त्यांनाही मारामारीच करायची असते.”

“ही एक नशा आहे. मला या नशेचं व्यसन आहे. एरवी मी कामावर जातो, पैसा कमवतो टॅक्स भरतो, पण फुटबॉल सीझन सुरू झाला की मला या नशेची ओढ लागते. मला नाही वाटत मी मरेपर्यंत ही नशा माझ्याकडून सुटेल,” तो मुलगा पुढे म्हणतो.

कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्ल्डकप चालूये कतारमध्ये, मग बेल्जियम आणि फ्रान्समध्ये मारामाऱ्या कशा होतात, तर त्याचं उत्तर असंय की अनेकदा ठरवून, पोलिसांची नजर चुकवून, विशिष्ट ठिकाणी भेटून अशा मारामाऱ्या केल्या जातात. आपण आपल्या मित्रांना चहाला बोलवतो, हे फुटबॉल हुलिगन्स (गुंड) त्यांच्या दुश्मनांना मारामारी करायला बोलावतात.

पण हे झालं मैदानाबाहेरचं. मैदानातही हैदोस चालूच असतो. तेव्हा काय करतात हे हुलिगन्स?

त्याचेही अनेक मार्ग आहेत. समोरच्या फॅन्सला चिडवणं, टोमणे मारणं, प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंच्या नावाने शेरेबाजी करणं, त्यांना शिव्या देणं, त्यांच्या रंग, वर्ण, देशावरून कुत्सित बोलणं, प्रतिस्पर्धी खेळाडूंना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर लेझर पॉईंटर मारणं, खेळाडूंना इजा होईल या उद्देशाने किंवा खेळात व्यत्यय आणण्यासाठी मैदानात वेगवेगळ्या गोष्टी फेकणं, प्रतिस्पर्धी टीमच्या फॅन्सच्या दिशेने नाणी, विटा, दगड, जळते फटाके, पेट्रोल बॉम्ब फेकणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मारामारी करणं, मग भले हत्यारांशिवाय किंवा काचेच्या बाटल्या, लाकडी दांडे जे काही हाताला सापडेल ते घेऊन समोरच्याला हाणणं.

दर मॅचनंतर कोणी ना कोणी जखमी होतं, क्वचित केसेसमध्ये लोकांचा जीवही जातो.

फॅन्स खूपच हिंसक झाले असतील तर सशस्त्र दलांनाही बोलवावं लागतं.

पण हे सगळं कशासाठी?

कॅनेडियन प्राध्यापक एर्ल स्मिथ यांनी आपल्या ‘सोशियोलॉजी ऑफ स्पोर्टस् अँड सोशल थिअरी’ या शोधनिबंधात याबद्दल सविस्तर लिहिलं आहे.

ते लिहितात, “जमावाची मानसिकता, इथे स्वतःला कट्टर समर्थक म्हणवून घेणाऱ्या गटाची मानसिकता, समाजशास्त्र, या गटाच्या अशा वागणुकीला इतिहासात घडलेल्या घटनांनी समर्थन यातून हुलिगन्स स्वतःच्या वागण्याचं समर्थन करत जातात. त्यांना वाटतं की अशा वागण्याने (त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या टीमप्रति निष्ठावान असतात), आपली निष्ठा या प्रकारे जाहीर करण्याने समाजात त्यांची इज्जत वाढते.”

इथे समाज म्हणजे हुलिगन्सचा गटच. कोणी किती हिंसा केली यावर त्या माणसाचं या गटातलं स्थान ठरतं.

फुटबॉल

फोटो स्रोत, Getty Images

पौरुषत्व, वर्चस्वाची लढाई आणि उत्तेजना अशा तीन गोष्टी या फुटबॉल हुलिगन्सच्या वागण्याच्या प्रेरणा ठरतात असंही स्मिथ म्हणतात.

फुटबॉल हुलिगन्सच्या मानसिकतेचा अनेक अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे. त्यावर अनेक डॉक्युमेंट्रीजही आलेल्या आहेत.

अनेक अभ्यासकांना वाटतं की या वागण्याने अशा हुलिगन्सला ‘आपण काहीतरी महत्त्वाचं करतोय’ असं वाटतं. मारामारी करायला मिळणार या भावनेने उत्तेजित व्हायला होतं. त्यांना खरं मॅचमध्ये रस नसतोच. बीबीसी थ्रीच्या डॉक्युमेंट्रीत अरॉन नावाचा 17 वर्षांचा मुलगा म्हणतो, “हे रोलर-कोस्टर राईड करण्यासारखं आहे, तेही फुकट, आणि दहापट जास्त आनंददायक.”

याच डॉक्युमेंट्रीत पॉल म्हणतो, “काय होणार हे माहीत नसतं, त्याचंच थ्रिल एक्सायटिंग असतं. कधी तुमच्या डोक्यावर बाटली फुटेल, कधी तुम्ही समोरच्याच्या डोक्यावर बाटली फोडाल. हे बघा, हा व्रण दिसतोय, माझ्या चेहऱ्यावर फाटकन बाटली येऊन आदळली होती. मला नंतरच काहीच आठवत नाही. पण मी पुन्हा जाईल तशी मारामारी करायला. 8-10 टाके पडले तर काही फरक पडत नाही.”

या मानसिकतेमुळे कित्येक पोरांच्या नोकऱ्या गेल्यात, त्यांच्या आईबापानी त्यांना घराबाहेर काढलंय तर काहींचे ब्रेकअप झालेत. पण ही मुलं या नशेतून बाहेर येत नाहीत.

बरं, या हाणामाऱ्या स्थानिक पातळीवर मर्यादित नाहीयेत. जसे फुटबॉलचे क्लब असतात, तशा या टाळकी फोडणाऱ्यांच्या गँग असतात.

त्यांचं मोठं नेटवर्क असतं. फुटबॉल खेळणारा तालुका पातळीवरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो, तसं टाळकी फोडणाऱ्या ‘परफॉरमन्स’ वर त्यालाही वरवर जाण्याची संधी मिळते.

14-15 व्या वर्षापासून तरुण मुलग्यांची भरती व्हायला सुरुवात होते. अनेकांच्या घरात कोणी ना कोणी, काका, मामा, भाऊ असले उद्योग करतच असतो.

गंमत म्हणजे आयुष्यात इतरवेळी ही पोरं गुंड वगैरे नसतात. काही नोकरी करत असतात, काही शिकत असतात पण जगभरातल्या हुलिगन्समध्ये एक समान धागा आहे. सगळीच तरूण मुलं कमी उत्पन्न गटातली असतात.

या टाळकी फोडणाऱ्यांच्या गँग्स वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. बॉईज, लॅड्स, फायटर्स... तुम्हाला साधारण लक्षात आलंच असेल. कधी कधी ते ज्या क्लबचे पाठिराखे असतात त्या क्लबच नाव घेऊन पुढे वॉरियर्स, फायटर्स असलं काहीतरी लावतात.

स्थानिक पातळीवर होणाऱ्या मारामाऱ्या कमी हिंसक असतात पण जसंजसं मोठे क्लब, प्रिमियर क्लब पातळीवर स्पर्धा पोहचते, हाणामाऱ्याही हिंसक व्हायला लागतात.

स्कॉटिश अबेरडीन कॅज्युअल्स या स्कॉटिश गँगचा प्रसिद्ध सदस्य होता जे अॅलन. 1980 दशकात या गँगने मोठा दंगा केला होता. याच अॅलनने स्वतःच्या अनुभवावर एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात तो म्हणतो, “फुटबॉलच्या वेळी मारामारी करणं सेक्सपेक्षा जास्त आनंददायी आहे.”

प्रतिस्पर्धी गँग्स एकमेकांना कधी भिडतात?

परत मारामारी करणाऱ्यांना तुरुंगवास, स्टेडियममध्ये प्रवेश करायला कायमची बंदी आणि अनेकदा मॅच असेल त्याच्या दोन किलोमीटर परिसरात फिरकायलाही बंदी अशा शिक्षा दिलेल्या असतात.

त्यामुळे कधी अशा मारामाऱ्या ठरवून पोलिसांची नजर जाणार नाही अशा ठिकाणी होतात तर कधी स्टेडियमच्या बाहेर होतात.

विशेषतः मॅच सुरू होताना आणि संपल्यावर दोन्ही टीमचे पाठिराखे बाहेर पडत असतात, गर्दी झालेली असते.

या प्रकारात सहभागी न होणारे पण मॅच पाहायला आलेले शेकडो-हजारो लोक असतात.

हीच सुवर्णसंधी असते मारामारीसाठी. कोणीतरी काहीतरी बोलतं.

दोन्हीकडचे हुलिगन्स वाटच पाहात असतात. टाळकी फोडायला सुरुवात होते.

फुटबॉल

फोटो स्रोत, Getty Images

या हाणामारी संस्कृतीचा इतिहास

फुटबॉल हुलिगनिझम किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर फुटबॉल मॅचच्या दरम्यान होणाऱ्या हाणामाऱ्यांचा इतिहास फुटबॉलच्या इतिहासाइतकाच जुना आहे.

मुळात फुटबॉलचा उगम चौदाव्या शतकात इंग्लंडमध्ये झाला. 1314 मध्ये इंग्लंडचा राजा एडवर्ड दुसरा याने फुटबॉल खेळावरच बंदी घातल्याची नोंद आहे. त्याला कारणही तसंच होतं म्हणा, फुटबॉल तेव्हा अतिशय हिंसक खेळ होता ज्यात एकमेकांची प्रतिस्पर्धी असणारी गावं डुकरांचं मुत्राशय एकमेकांच्या हद्दीत लाथाडायची.

याने दंगली व्हायच्या, मारामारी व्हायच्या. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊन कोणी राजद्रोह करू नये म्हणून राजाने खेळावरच बंदी घातली.

लिव्हरपूल विद्यापीठात सादर झालेल्या एका अभ्यासानुसार आधुनिक काळात 1846 मध्ये पहिल्यांदा फुटबॉल मॅचदरम्यान हिंसाचार झाल्याची नोंद आहे.

1880 ते 1885 या काळात फुटबॉल खेळणाऱ्या संघांचे पाठिराखे प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंना आणि पाठिराख्यांना मारहाण करणं, पंचांना बदडून काढणं असे उद्योग करायचे.

या काळात चालू मॅचमध्ये दगडफेक, खेळाडूंवर थुकणं, असे प्रकारही व्हायचे.

फुटबॉल

फोटो स्रोत, Getty Images

1950 च्या दशकानंतर असले प्रकार लॅटिन अमेरिकन देशांमध्ये व्हायला लागले. तिथली कट्टरता तर एवढी जबरदस्त होती की दोन देशांमध्ये मॅच हरल्यावरून युद्ध झाल्याचीही उदाहरणं आहेत.

1960 नंतर हा फुटबॉल हुलिगनिझम नव्याने युरोपात पसरला. त्यांचं केंद्रस्थान आजही यूकेच आहे.

फुटबॉलमुळे होणाऱ्या हिंसाचाराला आवर घालण्यासाठी जगभरात कोट्यवधी डॉलर्स खर्च होत असतात. एकट्या यूकेत हा खर्च 4 कोटी 80 लाख मिलियन पाऊंड आहे.

मँचेस्टर मेट्रोपॉलिटन यूनिव्हर्सिटीत वरिष्ठ प्राध्यापक असलेल्या जेफ पिअर्सन यांना वाटतं की कोरोनानंतर एकदंरच समाजविघातक प्रवृत्ती वाढल्या आहेत त्यामुळे फुटबॉलदरम्यान होणाऱ्या गुंडगिरीतही मोठी वाढ झालीये.

मग यावर उपाय काय?

बीबीसीच्या या लेखात याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

पहिलं म्हणजे स्टेडियममध्ये दारूबंदी. युरोपातल्या अनेक शहरांमध्ये जिथे मॅच होणार असेल तिथे आसपास दारू विकण्यावर निर्बंध घातले आहेत.

दारू प्यायलेले फॅन्स जास्त धिंगाणा करतात असा एकंदर अनुभव आहे. पण तरीही दारूबंदीने फारसा फरक पडणार नाही असं तज्ज्ञांना वाटतं.

जेफ पिअर्सन म्हणतात, “याचा उलटा परिणाम होण्याची भीती आहे. दारूबंदीने काही होत नाही. उलट फॅन्स चिडतात आणि दुसऱ्या मार्गाने दारू मिळेल याची व्यवस्था करतात.”

बऱ्याचदा हुल्लडबाजी करणारे गुंड दारू प्यायलेले नसतात याकडेही ते लक्ष वेधतात.

‘हंटिंग द हुलिगन्स’ या पुस्तकाचे लेखक माईक लेटन म्हणतात की, “दारूबंदीने थोडाफार फायदा होऊ शकतो. पण जे सराईत गुंड आहेत त्यांना याने काही फरक पडत नाही. त्यांनी नक्कल करू पाहाणारे किंवा जे या प्रकारात नवे आहेत त्यांना आळा घालण्यात थोडंफार यश येऊ शकतं.”

दुसरा उपाय असा सुचवला जातो की मॅचेस संध्याकाळऐवजी दुपारी खेळवा. म्हणजे ज्यांना दंगा करायचा आहे त्यांना दारू पिऊन, दंग्याचं नियोजन करायला कमी वेळ मिळतो. पण याहीबद्दल तज्ज्ञांना खात्री नाहीये.

माईक यांनी 40 वर्षं फुटबॉलदरम्यान होणाऱ्या हिंसाचाराला आवर घालण्यात घालवली आहेत.

ते म्हणतात, “हे पाहा, ज्यांना हाणामारी करायची आहे ते करणार, तुम्ही मॅच लवकर ठेवा नाहीतर उशीरा.”

अजून एक सल्ला असा दिला जातो की जिथे गोंधळ होईल अशी शक्यता असेल तिथे स्टेडियम रिकामी ठेवा. तात्पर्य मॅच बघायला फॅन्सला येऊ देऊ नका.

यावर लेटन म्हणतात, “या सर्वात मोठा बाळवटपणा आहे. एकतर यामुळे त्या शेकडो लोकांना शिक्षा मिळते ज्यांना मनापासून मॅच पहायची आहे आणि जे कोणताही गोंधळ घालत नाहीत. दुसरं म्हणजे तुम्ही लोकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी प्रतिबंध केला तर आगीत तेल ओतल्यासारखं होईल.”

फुटबॉल हुलिगन

फोटो स्रोत, Getty Images

चौथा रस्ता म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणं.

सध्या जगभरातल्या महत्त्वाच्या मॅचेसमध्ये हा रस्ता अवलंबला जातो. दोन्ही टीम्सच्या फॅन्समध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवणं, दोन्ही बाजूंच्या फॅन्समध्ये काही रिकाम्या जागा सोडणं, मध्ये जाळ्या लावणं, सुरक्षरक्षकांची फौज उभी करणं, दोन्ही टीमच्या फॅन्सला वेगवेगळ्या दिशांनी आत सोडणं आणि बाहेर सोडणं अशा काही उपायांनी मारामारीचे प्रसंग कमी होऊ शकतात असं फुटबॉल अधिकाऱ्यांना वाटतं.

निदान स्टेडियममध्ये जो गोंधळ होतो तो या उपायांन कमी झाल्याचं गेल्या काही वर्षांत दिसून आलं आहे.

शेवटचा पर्याय म्हणजे फॅन्सला कसं वागावं याचं प्रशिक्षण देणं.

ऐंशीच्या दशकात बेल्जियमच्या एका फुटबॉल क्लबने पाठिराख्यांना प्रशिक्षण देण्याचा कोर्स सुरू केला होता.

याचा मुख्य उद्देश असतो किशोरवयीन मुलांना प्रतिस्पर्धी टीम, त्यातले खेळाडू आणि त्यांचे फॅन्स यांचा आदर करायला शिकवणं.

यात फुटबॉलचे स्टार खेळाडू, आधी गुंडगिरी करणारे पण आता सुधारलेले फॅन्स आणून या मुलांचं प्रबोधन केलं जातं.

पण हा मामला खर्चिक आहे आणि सर्वांपर्यंत या मार्गाने पोचता येईलच असं नाही.

सर्वात वेगवान रस्ता म्हणजे जे अशा प्रकारची गुंडगिरी करतात त्यांना पकडून शिक्षा देणं असं लेटन यांना वाटतं. ते म्हणतात, “ही गुंडगिरी चालते कारण त्यांना वाटतं गर्दीत आपल्याला कोणी ओळखू शकणार नाही. नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांना ओळखून शिक्षा दिली तर या प्रकरणांना आळा बसेल.”

एकंदर काय तर फुटबॉल मॅचदरम्यान होणाऱ्या हाणामारीचा प्रश्न जगाला भेडसावतो. यात कोट्यवधी डॉलर्स खर्च होतात, मनुष्यबळ लागतं आणि क्वचित कोणाचा जीव जातो.

मानसिकता, इतिहास आणि सामाजिक असमानता या तीन गोष्टींच्या एकत्रिकरणातून जन्माला आलेल्या या हाणामारी संस्कृतीवर इंस्टट उपाय अजून कोणाच्या हाती लागलेला नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)