'जन्मानंतर मी तिला सोडून गेलो, पण 16 वर्षांनी तिनंच माझा जीव वाचवला'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लुसी वॅलिस
- Role, बीबीसी स्टोरीज
कॅटरिना चक्रीवादळामध्ये सर्वकाही गमावल्यानंतर कलाकार मॅटजेम्स मेटसम पूर्णपणे खचलेले आणि धक्क्यामध्ये होते. त्यांनी अगदी अंत जवळ आला अशीच मनाची तयारी केली होती. पण त्याचवेळी त्यांना एक फोन कॉल आला. हा फोन कॉल त्यांच्या मुलीनं केला होता. तिला त्यांनी केवळ एकदाच पाहिलं होतं. पण आज तीच त्यांच्या जगण्याचं मोठं कारण ठरली होती.
मॅटजेम्स मेटसन 16 वर्षांचे असताना त्या चिमुकलीच्या आईला भेटले होते.
"सेलानीनं माझ्या अमेरिकन इतिहासाच्या वर्गामध्ये प्रवेश केला आणि मी एकदम आवाक् झालो. मला वाटलं, ही कोण मुलगी आहे? मला या मुलीबद्दल माहिती असायला हवं, असं त्या क्षणी मला वाटलं.
मॅटजेम्स यांचे आई वडील कलाकार होते. त्यांचे सावत्र वडीलही कला विषयाचे प्राध्यापक होते. विविध महाविद्यालयांत त्यांनी अध्यापन केलेलं होतं.
"आम्ही सातत्यानं एका ठिकाणाहून दुसरीकडं राहायला जात होतो. त्यामुळं मला कधीही खरे मित्र बनवण्याची संधीच मिळाली नाही. मी काही लोकांना भेटायचो आणि थोड्या दिवसांत आम्ही तिथून निघून जायचो. त्यामुळं माझा कायम इतरांबरोबर दुरावा राहिला. मला वाटतं, आजही तो कायम आहे," असं मॅटजेम्स म्हणाले.
फ्रान्सच्या दक्षिण भागात राहिल्यानंतर त्यांचं कुटुंब ओहियोमधील छोटंसं शहर असलेल्या यलो स्प्रिंग्सला गेलं. त्याठिकाणी त्यांना त्यांची पहिली गर्लफ्रेंड सेलानी भेटली.
"आम्ही एकत्र आलो. पुढं काही वर्ष आमचं नातं होतं आणि नंतर ते तुटलं. पण या दरम्यान आज ज्याला 'हूक अप' म्हणतात ते घडलं होतं. म्हणजे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो आणि सेलानी गर्भवती राहिली होती. पण तसं असलं तरी, आम्ही कपलं किंवा जोडपे नव्हतो," असं मॅटजेम्स सांगतात.
पहिलीच भेट झाली..

फोटो स्रोत, Getty Images
मॅटजेम्स तेव्हा 18 वर्षांचे होते. आपण अद्याप वडील बनण्यासाठी तयार नाही, असं त्यांना वाटत होतं.
"या सर्वानं मी प्रचंड घाबरलो होतो. माझ्या संपूर्ण आयुष्याची उलथा-पालथ झाली होती," असं ते म्हणाले.
"याला सामोरं कसं जायचं याबाबत मला काहीही माहिती नव्हतं. मी खूप लहान होतो आणि अगदीच साधा किंवा भोळा होतो. काय करायचं तेच मला माहिती नव्हतं."
सेलानीनं एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला. तिचं नाव होतं टायलर.
तिच्या जन्मानंतर मॅटजेम्स ग्लेन हेलन नेचर रिझर्व्हच्या प्रवेशद्वारावर सेलानीला भेटले. त्यांनी त्यावेळी पहिल्यांदा मुलीला जवळ, मिठीत घेतलं होतं.
"मी टायलरला जवळपास 30 सेकंदांसाठी हातात घेतलं होतं. बस तेवंढच.
"हे माझं बाळ आहे याची भावनिक जाणीवच मला तेव्हा झालेली नव्हती. जैविकदृष्ट्या विचार केला तर माझा बाळाशी संबंध आहे, हे मला माहिती होतं. पण त्या वेळी बाळ खूप जड आहे, एवढीच काय ती माझी भावना होती. अशा वेळी कशी प्रतिक्रिया द्यायची असते किंवा काय करायचं असतं, हे मला माहिती नव्हतं."
त्यामुळं तिथूनच प्रत्येक गोष्टीपासून पळ काढण्याच्या माझ्या आयुष्यभराच्या प्रवासाला सुरुवात झाली होती, असं मॅटजेम्स सांगतात.
"हा एक खास प्रकारचा संघर्ष किंवा टप्पा होता. त्यावेळी स्वाभिमानशून्य असल्यामुळं मी पळ काढण्याचा मार्ग निवडला आणि पुढं तेच करत राहिलो."
माँट्रियल आणि बॉस्टनमध्ये राहिल्यानंतर अखेर मॅटजेम्स प्रचंड वर्दळ आणि एकप्रकारचा जीवंतपणा असलेल्या न्यू ऑर्लेन्सला पोहोचले. त्यावेळी त्यांचं वय 19-20 वर्षे होतं.
"मी लहान होतो. भावनिकदृष्ट्या माझ्या वयाचा विचार करता मी फार लहान होतो. त्यानंतर अचानक मी एका अत्यंत खास, आकर्षक आणि वेगळ्या ठिकाणी आलो होतो. जगापासून दूर, लपून राहण्यासाठी ते चांगलं ठिकाण होतं, आणि मला तर तेच करायचं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
पण भूतकाळापासून लपत किंवा दूर पळत असले तरी, त्यांची त्यापासून कायमची सुटका होणं शक्यच नव्हतं.
मॅटजेम्स यांनी नंतरच्या काळात त्यांच्या जीवनावर आधारिक एक ग्राफिकल कादंबरी काढली होती. त्यात त्यांनी एका स्केचमध्ये स्वतःला खांद्यावर एक मोठं ओझं वाहून नेताना दाखवलं होतं. अपराधीपणाच्या भावनेचं ते ओझं होतं. जणू 16 टनाएवढा भार घेऊन ते पुढं जात होतं," असं ते म्हणाले.
या सर्वाचा परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवर झाला आणि त्यामुळं त्यांना बराच काळ एका संस्थेमध्ये राहावं लागलं.
त्यांना सुटी मिळाली तोपर्यंत हळू-हळू ते शहराच्या फ्रेंच क्वार्टरमधील (खास लोकांचा समूह) एक सुप्रसिद्ध चेहरा बनले होते. हे शहर नाईटलाईफ, संगीत आणि मुक्तसंचारासाठी प्रसिद्ध होतं.
"मी न्यू ऑर्लेन्सला एखाद्या अज्ञात रहिवाशासारखा गेलो होतो. पण मी जेव्हा संस्थेतून बाहेर आलो तेव्हा, त्यानं मला एक प्रकारची गूढ ओळख दिली होती. अचानक प्रत्येकजण मला ओळखू लागला होता. मी कुणाच्या तरी एका लहानशा खोलीत राहायचो आणि माझ्याकडे माझ्या पेनशिवाय काहीही नव्हतं. त्याठिकाणी मला एखाद्या पात्रासारखी किंवा मी संग्रहालयातली वस्तू आहे अशी वागणूक मिळायची," असं ते म्हणाले.
मॅटजेम्स नेहमीच एक कलाकार होते. पण आता त्यांना तशी ओळख मिळायला सुरुवात झाली होती. त्यांच्याकडं कायमस्वरुपी घर नव्हतं, म्हणून त्यांचं बहुतांश काम किवा कलाकृती या कागदावरच असायच्या.
पुढे जसं-जसे ते समाजात मिसळत गेले तसं तसं त्यांनी कलेचं काम पुढे नेलं. ते वेगवेगळ्या वस्तू शोधून त्या एकत्र जोडून चिटकवून त्यापासून खास शिल्पं तयार करू लागले.
या सर्वासाठी न्यू ऑर्लेन्स हा खजिन्याचा भंडारच होता, अशा आठवणी ते सांगतात. जिकडे नजर जाईल तिकडं तुम्हाला कलात्मक असं काहीतरी नक्कीच सापडेल. जणू जमिनीवरही सोन्याची धूळ पसरलेली असावी, असं. अगदी प्राचीन अमेरिकेच्या 100 वर्ष जुन्या फोटोसारख्या गोष्टी. माचीसच्या काड्या, लॉली स्टिक अशा साहित्याचा वापर करून वस्तू तयार करण्यात त्यांनाही अनोख्या सौंदर्याची अनुभुती मिळायची.
त्यांना यात यशही मिळालं. कलाकृती तयार करून शहरात त्याची प्रदर्शनं भरवणं, बारमध्ये काम करून स्वतःलाच मदत करणं, तसंच सायकलवर फिरून शहरात पिझ्झा डिलिव्हरी करणं असं सर्व काही सुरू होतं.
यादरम्यान त्यांची मुलगी टायलर हरविट्झ तिच्या आईबरोबर म्हणजे सेलानीबरोब यलो स्प्रिंग शहरात मोठी होत होती. तीदेखील एक गुणवान कलाकार होती. वयाच्या चौथ्या वर्षी आईबरोबर अपहोल्स्ट्रीच्या (सोफ्यावली कापडी नक्षीकाम) प्रशिक्षणासाठी गेल्याचं तिला आठवतं.
कटरिना चक्रीवादळ

फोटो स्रोत, Getty Images
"जन्म झाला तेव्हापासून माझ्या आजुबाजुला कलात्मक वातावरणाचा अनुभव मी घेतला, त्यात कधीही खंड पडला नाही," असं ती सांगते.
तिचं कुटुंब एक आनंदी कुटुंब होतं. सेलानीनं लग्न केलं होतं आणि तिला आणखी एक मुलगीही होती. या कुटुंबात लहानाची मोठी होत असताना टायलरला तिच्या जैविक पित्याबाबत जाणून घेण्यात फार काही रसही नव्हता, असं ती म्हणाली.
"प्रत्येक वेळी माझ्याबरोबर माझे कुटुंबीय, मित्र असे अनेक लोक असायचे. त्यामुळं खरं तर मी कधीही त्याबाबत विचारही केला नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही विचारच नव्हते. त्यामुळं माझे वडील कोण होते? किंवा ते कुठे होते? किंवा ते इथं का नाहीत? हे प्रश्न कधीही माझ्यासाठी फार मोठे किंवा महत्त्वाचे नव्हतेच," असं ती म्हणाली.
"मी कधीही विचारलं नाही. त्यामुळं मला काहीही माहितीच नव्हतं."
आईप्रमाणं तीदेखील फर्निचर किंवा त्यावरील कापडी नक्षीकामातील तज्ज्ञ आणि एक कुशल कलाकार बनली होती.
वयात्या तिशीपर्यंत मॅटजेम्स शहरातील हौशी किंवा स्वतः शिकलेल्या कलाकारांपैकी एक बनले होते. जीवनातली सुरुवातीची सुमारे 20 वर्षं दुसरीकडं कुठंतरी राहिले असूनही त्यांनी हे यश मिळवलं होतं. बिल्डर्सच्या प्राचीन अवजारांच्या संवर्धनाचं कामही त्यांना मिळालेलं होतं. पिकाचू आणि पर्ल ही दोन श्वानं त्यांच्यासाठी सर्वस्व होते.
"मला अचानक वाटू लागलं की, मी 30 वर्ष कसा जगलो? यावर माझा विश्वासच बसत नव्हता," असं ते म्हणाले. वेगानं आयुष्य जगायचं आणि तारुण्यातच मृत्यू पत्करायचा अशी त्यांची मानसिकता होती. त्यामुळं त्यांनी हळू-हळू वेग कमी करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी ते फ्रेंच क्वार्टर समुहातून बाहेर पडले आणि नंतर त्यांनी काही वर्षांसाठी न्यू ऑर्लेन्स सोडलं आणि 2005 मध्ये ते स्प्रिंगमध्ये परत आले.
"मला एक अपार्टमेंट मिळालं. मी माझं सामान काढलं आणि त्याचवेळी कटरिना चक्रीवादळाचा तडाखा बसला," असं ते म्हणाले.
कटरिना चक्रीवादळामुळं ऑगस्ट 2005 मध्ये न्यू ऑर्लेन्स पूर्णपणे उध्वस्त झालं. शहरांतील बहुतांश भाग पुराखाली गेला.
सुमारे 2,000 लोक मारले गेले आणि अंदाजे 10 लाख विस्थापित झाले. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
मॅटजेम्स म्हणाले की, "तो पूर्णपणे विनाशच होता. मी आजही डोळे बंद केले तर ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं." आजही त्यांच्यावर त्या घटनेचा खोलवर परिणाम झालेला पाहाला मिळतो.
"त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सर्वकाही पूर्णपणे नष्ट झालं होतं. दुकानं उघडी नव्हती, काहीही सामान मिळत नव्हतं आणि गुन्हेगारीचं प्रमाण गंभीर होतं. ज्यांची घरं आणि सर्वकाही उध्वस्त झालं होतं, असे अनेक लोक होते. प्रत्येकजण प्रचंड प्रमाणात हताश झालेला होता."
मॅटजेम्स यांच्या अपार्टमेंटमध्येही पाणी भरलं होतं, त्यामुळं त्यांचं बहुतांश सामान त्यांनी गमावलं होतं. त्यात त्यांच्या जवळपास सर्वच कलाकृतींचाही समावेश होता.
जीवापाड प्रेम असलेल्या श्वानांना सोबत नेता येणार नाही, या भीतीनं मॅटजेम्स जवळपास आठवडाभर उध्वस्त झालेल्या शहरातील ढिगाऱ्यांमध्येच राहिले. एक दिवस त्यांना एक सुरू असलेला पे फोन आढळला. त्यांनी आईला सुरक्षित असल्याबाबत चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यानंतर त्यांनी मित्राला फोन केला आणि त्या मित्रानं त्यांना दोन्ही श्वानांसह लॉस एंजल्सला पोहोचण्यासाठी मदत केली.
मॅटजेम्स कोरटाऊनमधील एलए जिल्ह्याच्या अत्यंत व्यस्त अशा चौकातील एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहू लागले. त्यावेळी त्यांच्या आजुबाजुला पाडापाडीची काम सुरुच होती.
"मी या फ्लॅटमध्ये राहायला आल्यानंतर त्यांनी अक्षरशः माझ्या आजुबाजुला असलेल्या सर्व इमारती पाडल्या. त्यामुळं मी राहत असलेल्या त्या लहानशा चार मजली इमारतीमध्ये अचानक उंदीर आणि झुरळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती," असंही त्यांनी सांगितलं.
"कुणीतरी मला फ्युटन (एक प्रकारची जमीनीवर अंथरण्याची चटई) दिलं होतं, त्याशिवाय एक लहान ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि दोन टी शर्ट एवढंच सामान माझ्याकडं होतं."
मॅटजेम्स म्हणाले की, त्यांचे श्वान हे केवळ त्यांचे चांगले मित्र नव्हते तर ती त्यांची दोन मुलं होती. ते त्यांचे विश्वासू आणि अगदी जेवणासाठीचे पार्टनरही होते.
चक्रीवादळाच्या दुष्परिणामाशी लढताना

फोटो स्रोत, Henry cherry
"जेव्हा मला नियमित जेवण मिळायचं, तेव्हा त्यांना त्यातलं काही मिळायचं, आणि मला जेव्हा नियमित जेवण मिळत नसायचं तेव्हा मी त्यांच्यातलं खायचो. मी डॉग फुडच्या पिशवीतून मूठभर खाद्य घेऊन ते खायचो," असं ते म्हणाले.
त्यांना शहराच्या दुसऱ्या एका भागामध्ये एका आर्ट सप्लाय स्टोरमध्ये स्टॉक बॉयचं काम मिळालं होतं. त्यासाठी त्यांना तासाला 7 डॉलर मिळत होते. पण त्याठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचं भाडं मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः भीक मागावी लागत होती.
मॅटजेम्स यांचा फोन वाजला की, त्यातून त्यांना न्यू ऑर्लेन्समधील एखाद्या मित्राबाबतची वाईट बातमी मिळायची. चक्रीवादळानंतरचे परिमाण ते सर्वजण भोगत होते.
त्यांच्यापैकी अनेकांना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होती असं त्यांना वाटतं. या आजाराचे परिणाम हे विनाशकारी असू शकतात. "काही लोक दारु पिऊ लागले, काहींनी ड्रग्ज घेतले तर काहींनी आत्महत्या केल्या."
मॅटजेम्स म्हणाले की, ते भावनिक दृष्टीनं पूर्णपणे खचले होते. खोलीत बसून ते एकटक टीव्हीकडं पाहत बसलेले असायचे. टीव्हीचे चॅनलही बदलत नसायचे. कलाकृतीही बनवत नव्हते, "शेवटासाठी सज्ज आहे" असं ते म्हणायचे.
"स्वसंरक्षणाची माझी क्षमता ही पूर्णपणे संपत चालली होती, आणि मला पुन्हा मागे फिरायचं नव्हतं. पण अचानक एक फोन वाजला आणि त्यानं केवळ माझा जीवच वाचवला नाही, तर माझं जीवनही पूर्णपणे बदलून टाकलं," असं ते म्हणाले.
16 वर्षांची टायलर तिची खोली स्वच्छ करत होती, त्यावेळी तिची आई आत आली आणि त्यांनी टायलरच्या हातात पेपरचा एक तुकडा दिला. त्याच्या एका बाजुला पीओ बॉक्स नंबर होता तर दुसऱ्या बाजुला मोबाईल फोन नंबर होता. याद्वारे तुला तुझ्या जैविक पित्याशी संपर्क साधता येईल, असं आईनं टायलरला सांगितलं.
"मला वाटतं की, तिला अनेक कागदांमध्ये हा सापडला असावा आणि तिला वाटलं असेल की, 'आपण हे टायलरला द्यायला हवं, म्हणजे तिला इच्छा असेल तर ती कॉल करू शकेन'," असं टायलर म्हणाली.
"आईनं तो कागद मला देण्याचं काम अगदी सहजपणे केलं होतं. तिनं मला कॉल करण्याऐवजी पत्र लिहिण्याचा आग्रहदेखील केला होता. पण मला तो कागद मिळताच काही क्षणांतच मी त्या नंबरवर फोन केला. समोरून कोणीही उत्तर देणार नाही, अशीच मला 50 टक्के शक्यता वाटत होती. त्यामुळं मी फार विचारच केला नाही.
"फारसं काही गमावण्याची भीतीच नसल्याच्या मानसिकतेत मी होते. त्यामुळं समोरून जेव्हा त्यांनी उत्तर दिलं तेव्हा मी फार भावनिक किंवा तणावातही नव्हते."
तिचा फोन आला आणि...

फोटो स्रोत, Catwheel art
ती म्हणाली की, तिनं कॉल करण्यासाठी फार विचारपूर्वक निर्णयही घेतला नव्हता. ती केवळ उत्सफूर्तपणे वर्तन करत होती.
इकडे मॅटजेम्सला वाटलं की, कदाचित त्याच्या आणखी एखाद्या मित्राबाबतची काहीतरी वाईट बातमी असेल, पण तेवढ्यात त्यानं समोरून टायलरचा आवाज ऐकला.
"तुम्ही यापूर्वी कधी टायलर हे नाव ऐकलंय का" ती म्हणाली.
मॅटजेम्सनं त्यावर उत्तर दिलं : "टायलर, मी या फोनसाठी गेल्या 16 वर्षांपासून वाट पाहत होतो."
त्यावर टायलरनं विचारलं की, 'तुम्ही माझा तिरस्कार करता का?'
"मी तिला म्हटलो, 'मी तुझा तिरस्कार करत नाही. पण तू माझा तिरस्कार करतेस का?' त्यावर तीही नाही म्हणाली. माझा विचार करता, मी त्यावेळी धक्का बसलेला, काहीही हाती नसलेला आणि तिला देण्यासाठी जवळ काहीही नसलेला असा व्यक्ती होतो. तरीही आम्ही संगीत आणि इतरही अनेक विषयांवर बोललो," असं मॅटजेम्स यांनी सांगितलं.
टायलर म्हणाली की, त्यांचं फोनवर बोलणं संपलं तेव्हा त्यांनी एकमेकांच्या संपर्कात कसं राहायचं याबाबत काहीही ठरवलं नव्हतं. पण आपण दोघे वाटलं तर एकमेकांना कॉल करू शकतो, हे त्यांना दोघांनाही माहिती होतं.
मॅटजेम्स यांच्यासाठी हा कॉल जीवनाला नवी दिशा देणारा होता.
"मला अचानक पाठिचा कणा ताठ झाल्यासारखं वाटू लागलं. माझे डोळे उघडले होते आणि मी जमिनीकडं पाहणं थांबवून स्वतःलाच म्हणालो की, 'मी इथं लॉस एंजल्समध्ये आहे, आणि माझ्या मुलीला ही गोष्ट खास वाटते, म्हणजे मीही तसाच खास विचारच करायला पाहिजे ना?'"
आपण टायलरला इम्प्रेस (प्रभावित) करायला हवं, असं त्यांना वाटलं. हे करण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्यातील कला, असा विचार त्यांनी केला.
पुनश्च हरिओम
"मला माझे घर, बँक अकाऊंट किंवा कपड्यांद्वारे तिला इम्प्रेस करणं शक्य नाही. पण मी हवा तेवढा उत्तम कलाकार बनू शकतो. हीच अशी गोष्ट आहे जी मी हाती घेतली आणि पुन्हा कधीही खाली ठेवली नाही. या सर्वासाठी मी टायलरचा कायम ऋणी आहे."
हळू-हळू मॅटजेम्स जीवनात पुन्हा उभं राहू लागले. त्यांनी कलाकृती तयार करून त्याची प्रदर्शनं सुरू केली. त्यांना आता एका चांगल्या अपार्टमेंटमध्ये राहायला जाणंही शक्य होतं. काही वर्षांनी जेव्हा त्यांनी त्यांच्या कलाकृतीचं नवं प्रदर्शन भरवलं होतं, तेव्हा टायलर खास त्यांना पहिल्यांदा भेटण्यासाठी लॉस एंजल्सला आली होती.
"मी त्यावेळी काहीशी तणावात होते, ते अगदी सहाजिकही होतं. पण दुसऱ्याच क्षणाला जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा सर्वकाही ठीक वाटलं. मला अगदी सहजपणा जाणवत होता. मी अगदी समाधानी होते," असं टायलर म्हणाली.
तिला लगेचच आमच्यात असलेलं शारिरीक साधर्म्यही जाणवलं, असं मॅटजेम्स यांनी सांगितलं.
"माझे केस कुरळे आहेत, तर माझ्या आईचे केस अगदी सरळ आहेत. त्यामुळं मला नेहमीच केस कसे सांभाळायचे हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळं मी जेव्हा मॅटजेम्सला भेटले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, 'आमच्या दोघांचेही केस कुरळे आहेत. तसंच आमचे हातही सारखे आहेत आणि आमचे दोघांचेही डोळे हिरवे आहेत," असं ती म्हणाली.
टायलर म्हणाली की, मॅटजेम्सनं तिला दाखवलेली त्यांची पहिली कलाकृती ही एक विविध गोष्टींपासून तयार केलेलं टॉवरसारखं शिल्प होतं.
"तुम्ही त्याचं दार उघडलं आणि तीलत्या वस्तू बाजुला केल्या तर तिथं खाली तुम्हाला खिळ्यांच्या सहाय्याने माझं नाव तयार केलेलं दिसेल. त्यांच्या अनेक कलाकृतींमध्ये माझं नाव लपलेलं आहे. फक्त तुम्हाला ते शोधावं लागतं. माझं नाव ते तिथं असतंच, फक्त कुठं शोधायचं हे तुम्हाला समजायला हवं," असं टायलरनं म्हटलं.
मॅटजेम्सनं कलाकार म्हणून पुन्हा कामाला सुरुवात करावी यासाठी तिनं जी प्रेरणा दिली त्याचं हे प्रतीक असल्याचं टायलरला वाटतं.
मॅटजेम्सच्या कलाकृती पाहिल्यानंतर टायलरनं, वडिलांना तिच्या कलाकृती पाहण्यासाठी ओहियोला येण्याचं आमंत्रण दिलं.
"तीचं बरोबर आहे, हे मला माहिती होतं, त्यामुळं मी ते करायलाच हवं होतं. माझ्यासाठी हे एखादं मशीन रिसेट करण्यासारखं होतं," असं ते म्हणाले.
'मला का जावं लागलं याची जाणीव तिला आहे'
"माझ्यासाठी हे सर्व अचानक माझ्या वयाचा होण्यासारखं म्हणजे मोठं होण्यासारखं आणि किशोरवयातील तरुणासारखं पळ काढण्यापासून थांबवण्यासारखं होतं."
मॅटजेम्स जेव्हा तिथं गेले, तेव्हा टायलर एका सोफ्याच्या कुशनच्या सजावटीचं काम करत होती. त्यांना तिला या कामात मदत करण्याची आणि त्यानिमित्ताने मुलीचे कलागुण जवळून पाहण्याची संधी मिळाली होती.
"फर्निचरच्या कुशनचं नक्षीकाम करण्यामागची माझी प्रेरणा आणि फर्निचर तसंच त्याच्या कापडाबद्दलचं प्रेम हे मला आईमुळं निर्माण झालं. त्यामुळं तो सोफा म्हणजे एक खास कलाकृती होती. कारण त्यासाठी आमच्या तिघांचे विचार एकत्र आले होते," असं टायलर म्हणाल्या. त्या आता 29 वर्षांच्या आहेत.
टायलर यांचा मॅटजेम्स यांना भेटण्याचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे टायलर आता सर्व पालकांच्या म्हणजे आई-सावत्र वडील आणि जैविक वडील यांच्या संपर्कात आहेत आणि ते सगळेच कलाकार आहेत.
"आपण कलाकार असणं आणि अचानक कुटुंबातील सर्व हरवलेले सदस्य सापडणं आणि ते सगळेदेखील कलाकारच असणं, ही काहीशी विचित्र पण खास बाब आहे," असं टायलर म्हणाल्या. टायलर या सध्या त्यांच्या आजी-आजोबांच्या प्रेरणेतून पुन्हा एकदा व्हर्जिनिया विद्यापीठात शिल्पकला आणि साहित्य या विषयांचं शिक्षण घेत आहेत.
गेल्या काही वर्षात मॅटजेम्स आणि टायलर यांच्यात त्यांनी तिला का सोडलं होतं, यावर बरीच चर्चा झाली आहे.
"मला का जावं लागलं होतं, याची जाणीव तिला आहे," असं मॅटजेम्स सांगतात.
"आम्ही काही आठवड्यांपूर्वी बोललो होतो. 'तुम्ही इथं राहू शकत नव्हते, ती तुमच्यासाठी चांगली गोष्ट नव्हती. मग कारण काहीही असो,' असं तिचं मत होतं. त्यामुळं मी ज्या व्यक्तीला सोडून गेलो, तिला त्यामागं काय कारण होतं याची जाणीव असणं आणि तिनं त्यावर नाराज न होणं हे उत्तम आहे. त्याचबरोबर ते अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पदही आहे," असं मॅटजेम्स म्हणाले.
कुटुंबाला सोडून जाण्याऱ्या पित्याबाबत एक चुकीची भावना समाजात निर्माण होत असते, याचीही टायलर यांना जाणीव आहे. पण मॅटजेम्स यांनी जे केलं ते त्यांच्यासाठी आणि नकळतपणे तिच्यासाठीही योग्यच होतं, असं त्या म्हणाल्या.
जर टायलरनं सामाजिक आदर्शांचा विचार करून त्यांच्याबाबत नकारात्मक विचार केला असता, तर काहीही हाती आलं नसतं, असं त्या म्हणाल्या. त्याऐवजी त्यांना एक नवं कुटुंब मिळालं आणि प्रेरणेचा एक नवा स्त्रोतही सापडला आणि ते सगळे आता एक उत्तम जीवन जगत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








