राहुल गांधींनी RSS सोबत ज्या संस्थेची तुलना केली ती मुस्लीम ब्रदरहूड संस्था काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड या दोन संघटनांची तुलना केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली असून मुस्लीम ब्रदरहूड हे नावही चर्चेत आलं आहे.
मुस्लीम ब्रदरहूड ही इजिप्तमधील सर्वात जुनी आणि मोठी इस्लामी संघटना आहे. त्याला इख्वान अल मुस्लमीन नावानेही ओळखलं जातं. तिची स्थापना 1928 साली हसन अल-बन्ना यांनी केली होती.
सुरुवातीच्या काळात या संघटनेचं ध्येय इस्लामी नैतिक मुल्यं आणि चांगल्या कामांचा प्रचार आणि प्रसार करणं हा
जगभराती मुस्लीम आंदोलनांवर हिचा प्रभाव पडला आणि मध्यपुर्वेतील अनेक देश तिचे सदस्य आहेत.
इजिप्तमधील ब्रिटनची वसाहत संपावी आणि पाश्चिमात्य देशांचा प्रभाव कमी व्हावा यासाठी मुस्लीम ब्रदरहूड संघटनेनं काम केलं.

फोटो स्रोत, Getty Images
इजिप्तमध्ये या संघटनेला बेकायदेशीर घोषित करण्यात आलं आहे, मात्र गेली अनेक दशके सत्तेवर राहिलेल्या होस्नी मुबारक यांना पदच्युत करण्यात या संस्थेने मोठी कामगिरी बजावली होती. एका व्यापक लोकआंदोलनामुळे 2011मध्ये मुबारक यांना सत्ता सोडावी लागली होती.
आपण लोकशाहीची तत्वे अनुसरतो आणि देशाचं शासन इस्लामी कायदा म्हणजे शरीयावर चालावं असं या संघटनेचं म्हणणं आहे.
'इस्लामच उत्तर आहे', अशी या संघटनेटची सर्वाधिक चर्चेत आलेली घोषणा आहे.
1928 साली हसन अल-बन्ना यांनी मुस्लीम ब्रदरहूडची स्थापना केल्यावर त्याच्या शाखा देशभरात पसरल्या. गरिबी आणि भ्रष्टाचारामुळे इजिप्तमध्ये या संघटनेची सदस्यसंख्या सतत वाढत गेली.
ब्रदरहूडने हॉस्पिटलं, शाळा आणि लोककल्याणकारी संस्था सुरू केल्या, त्याला सरकारी मदत मिळत नव्हती.
1940 च्या दशकात त्यांच्या सदस्यांची संख्या 20 लाखांवर गेली. त्याबरोबरच या संघटनेची विचारधारा सगळ्या अरब जगतात पसरली.
बन्ना यांनी एका सशस्त्र पलटणीची निर्मिती केली होती. ब्रिटिश सत्तेविरोधात बॉम्बफेक आणि हत्या करण्यासाठी ही पलटण तयार केली होती.
हसन अल- बन्ना यांची हत्या
1948 मध्ये हसन अल-बन्ना यांची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केली.
ब्रिटीश लोकांच्या हत्या झाल्यामुळे तसेच ज्यू लोकांच्या हितरक्षणासाठी इजिप्त सरकारने 1948 मध्ये या संघटनेवर बंधनं घातलीय.
1954 साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासर यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर मुस्लीम ब्रदरहूडवर बंदी घातली गेली. हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. त्यानंतर ही संघटना भूमिगत होऊन काम करू लागली.

फोटो स्रोत, Getty Images
मुस्लीम ब्रदरहूडने अन्वर अल सादात यांना पाठिंबा दिला. सादात 1970 साली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. सुरुवातीच्या काळात दोन्हींनी एकमेकांना मदत केली मात्र नंतर त्यांच्या नात्यात दुरावा तयार झाला.
1980 साली मुस्लीम ब्रदरहूडने पुन्हा एकदा मुख्य राजकारणात येण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा मुख्य प्रवाहात
मुस्लीम ब्रदरहूडने 1984 साली वफाद पार्टी आणि 1987 साली उदारमतवादी पक्षांशी हातमिळवणी केली.
पाच वर्षांनंतर संघटनेने मोठं यश मिळवलं, त्यांनी अपक्ष उमेदवारांसह 20 टक्के जागा जिंकल्या.
यामुळे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना मोठा फटका बसला.
सरकारने या संघटनेला दडपण्याची मोहीम हाती घेतली. त्यांच्या शेकडो सदस्यांना पकडलं आणि राज्यघटनेतही बदल केला. या बदलानुसार राष्ट्राध्यक्षपदासाठी अपक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली. तसेच कट्टरवादी कारवाया रोखण्यासाठीही एक कायदा आणला आणि संरक्षण दलांची ताकद वाढवली.
होस्नी मुबारक यांचा पक्ष नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीने मुस्लीम ब्रदरहूडचा प्रभाव घटवण्यासाठी भरपूर मेहनत केली. हे सगळं 2010 साली संघटनेला संसदीय निवडणुकीत फायदा होऊ नये यासाठी करण्यात आलं मात्र हे सगळं त्यांच्यावर उलटलं.
2011 साली लोक रस्त्यावर उतरले आणि होस्नी मुबारक यांना सत्ताच्युत करण्यासाठी दबाव वाढला.
लोकांमध्ये पसरणाऱ्या असंतोषाला मुस्लीम ब्रदरहूडला जबाबदार ठरवलं गेलं. तर हा सामान्य लोकांचा आवाज आहे असं या संघटनेनं म्हटलं.
मात्र तहरीर चौकातील आंदोलनात ब्रदरहूडच्या परंपरागत घोषणा ऐकू आल्या नाहीत.
मुबारक यांचं सरकार कोसळलं
तीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या होस्नी मुबारक यांना सत्ता सोडावी लागली. क्रांती आंदोलकांना जीवे मारण्याच्या आदेशाला न रोखल्याबद्दल त्यांना दोषी ठरवलं गेलं आणि त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला गेला.
2012 साली त्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








