दृष्टिकोन : राहुल गांधी यांनी संघाची तुलना मुस्लीम ब्रदरहूडशी का केली?

फोटो स्रोत, Reuters
- Author, अपूर्वानंद
- Role, लेखक आणि विश्लेषक
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लीम ब्रदरहूडसोबत केलेली तुलना संघाला अजिबात रुचलेली नाही. इस्लाम किंवा मुसलमान यांच्याशी निगडित कोणत्याही वस्तू किंवा संकल्पनेचं आपल्याशी नातं जोडण्याचा विचारही संघ आणि त्यांच्या समर्थकांसाठी अंगावर काटा आणणारा आहे.
यामुळे राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी निर्भत्सना केली. राहुल हे भारतालाच ओळखून नसल्याने ते संघाला सुद्धा समजू शकणार नाहीत, अशी टिप्पणी भाजप आणि संघाच्या वतीने करण्यात आली.
राहुल गांधी हे नेमकं असं काय बोलले, ज्याचा संघाला एवढा राग आला आहे?
राहुल गांधी असं काहीसं म्हणाले - "अरेबियामध्ये जी मुस्लीम ब्रदरहूड संस्था आहे, तशीच संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात भारतात आहे. दोन्ही संस्था एकसारख्याच आहेत."
हे सांगण्यासाठी राहुल गांधी यांनी तीन तथ्यं समोर ठेवली. ते सांगतात, "दोन्ही संस्था गेल्या शतकातल्या तिसऱ्या दशकांत अस्तित्वात आल्या. दोन्ही संस्थांवर आपल्या देशातील राष्ट्रीय नेत्यांची हत्या केल्यानंतर प्रतिबंध लागला. दोन्ही संस्थांमध्ये महिलांना प्रवेश निषिद्ध आहे."
तुलना नेहमीच मर्यादित असते. पण ज्यांच्यात ही तुलना केली जाते, त्या एकमेकांसारख्या आहेत, हे सांगण्यासाठी ही तुलना कधीच नसते. दोघांचा कल एक आहे किंवा त्यांचा स्वभाव सारखाच आहे, हे सांगणं हाच तुलनेचा हेतू असतो.
काय आहे मुस्लीम ब्रदरहूड?
मुस्लीम ब्रदरहूडचा जन्म हा इजिप्तमध्ये झाला, पण इस्लाम इतरही देशांमध्ये असल्याने त्यांच्याबद्दलचं आकर्षण तुर्की, ट्युनिशिया, पॅलेस्टाईन, कुवेत, जॉर्डन, बहारीनसारख्या देशांमध्येही आहे. त्यांच्यासारखे राजकीय पक्ष तिथेही आहेत.
मुस्लीम ब्रदरहूड या नावावरून एक समजतं की, ही संस्था मुस्लिमांच्या बंधुभावावर आधारलेली आहे आणि या संस्थेला मजबूत करणं हाच त्यांचा हेतू आहे. याचबरोबर इस्लामला समाज आणि राज्याच्या संघटनेचा ते पाया मानतात.
हीच गोष्ट संघाच्या बाबतीत सांगता येऊ शकते. हिंदूंमध्ये बंधुत्व वाढवणं आणि त्यांचं संघटन मजबूत करणं हाच त्यांचा उद्देश असतो. 'संघटनेत शक्ती आहे', हा संघाचा आवडता मंत्र आहे. पण एक गोष्ट यात सांगितलेली नाही. ती म्हणजे, हे संघटन हिंदूंचं असलं पाहिजे.
अटल बिहारी वाजपेयी यांनीही सांगितलं होतं की, संघ हिंदूंना एकत्रित करण्याचं काम करतो. त्यांच्यानुसार, "संघापुढे दोन कामं आहेत - एक, हिंदूंना संघटित करणं आणि सक्षम हिंदू समाज निर्माण करणं, आणि दुसरं, जाती किंवा कृत्रिम भेदांच्या पलीकडे जाणं."
पण, काय जातीविहीन, आत्मसन्मान युक्त समाजाच्या स्थापनेसाठी कोणाला आक्षेप का असावा?

फोटो स्रोत, Getty Images
संघ आपलं काम अनेक संघटनांच्या जाळ्यामार्फत करतं. या संघटना वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण आणि सेवा देण्याच्या नावावर सक्रिय असतात. हेच काम मुस्लीम ब्रदरहूड ही संस्था करते. शिक्षण, आरोग्य आणि दुसऱ्या अनेक क्षेत्रांमध्ये ही संस्थाही अनेक रूपांतून सक्रिय असते.
हमासच्या कामाचं स्वरूपही असं असतं आणि पाकिस्तानात हाफीज सईदची जमात-उद-दावा संघटनाही अशाच स्वरूपाचं काम करते.
कोणत्याही एका विचारधारेनं चालणाऱ्या सगळ्या संघटना विचारवंत रूसोचा एक सिद्धांत जाणून आहेत. हा सिद्धांत असा की, ताकदीपेक्षाही लोकांच्या भावनेला अनुकूल करून वर्चस्व स्थापन करणं केव्हाही सोपं असतं. असं करून संघटना आपला व्यापक जनाधार बनवतात. हा जनाधार त्यांच्या पाठीशी कायम उभा राहतो.
उदाहरणार्थ, हमासच्या कट्टरतावादी कारवायांमुळे त्यांच्यावर जेव्हाही कारवाई होईल किंवा त्यांच्याभोवतीचा फास आवळला जाईल तेव्हा त्यांच्या सामाजिक कार्यांमुळे लाभ मिळालेली जनता त्यांच्या बाजूनं उभी राहील.
संघाची नेमकी रणनिती काय आहे?
संघानुसार त्यांची दुसरी जबाबदारी ही की, इतर धर्मीयांना मुख्य प्रवाहात आणणं. त्यांच्यावर प्रथम संस्कार करून मगच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सोपस्कार करणं हे आहे.
संघ मुसलमान किंवा ख्रिश्चनांना कसे संस्कार देतो किंवा कसं संस्कारित करतो, हे फक्त तेच जाणतात. गेल्या चार वर्षांत ज्या पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार केला जात आहे, त्याच पद्धतीनं इथून पुढेही सुरू राहिला तर राहुल गांधी यांचा इशारा खरा ठरेल आणि भारत पूर्णतः बदलून जाईल.

फोटो स्रोत, RSS.ORG
ब्रदरहूड आणि संघ यांच्यात समानतेचा आणखी एक धागा म्हणजे पश्चिमेकडे जन्माला आलेल्या विचारांबद्दल घृणा हे एक आहे.
ब्रदरहूडनुसार पाश्चात्त्य विचार मुसलमानांना भ्रष्ट करणारे आहेत. संघसुद्धा शुद्ध भारतीय संस्कृतीवर भर देतो.
पण पश्चिमेकडील तंत्रज्ञानाबद्दल या दोन्ही संस्थाना कोणताही त्रास नाही. कारण हे तंत्रज्ञानच त्यांचे शुद्ध विचार प्रसारित करण्याचं माध्यम आहे.
राहुल गांधी यांचा हा आक्रमक आणि सरळ रोख संघासाठी नवा आहे. हे पण लक्षात घेण्यासारखं आहे की, आजपर्यंत संघाला कोणत्याही राजकीय नेत्यानं सरळ आव्हान दिलेलं नाही. त्यांना कुणीही भारतीय नाही, असं म्हटलेलं नाही.
त्यामुळे राहुल यांच्या हल्ल्यामुळे संघ चौकस झाला आहे. भाजपला विरोध किंवा त्यांच्या नेत्यांवरील हल्ल्यांबद्दल संघाला कोणताही आक्षेप नाही. पण जर कुणी संघावर टीका केली तर त्यांचे कान टवकारतात.
याचं एक महत्त्वाचं कारण आहे. संघ स्वतः चर्चेत राहणं पसंत करत नाही. हरतऱ्हेच्या 'रडार'खाली राहून काम करणं हा त्यांचा स्वभाव आहे. संघाच्या प्रत्येक बाजूवर प्रकाश पडावा, ही त्यांची इच्छा नसते.
संघापासून सावध राहण्याची इंदिरा गांधींची ती चिठ्ठी...
जवाहरलाल नेहरूंनंतर राहुल पहिले असे काँग्रेस नेते आहेत जे संघाला भारतासाठीचा मोठा धोका मानतात. मध्यंतरी जनता पार्टीच्या सरकारच्या काळात संघच्या सदस्यतेलाच जॉर्ज फर्नाँडीस आणि दुसऱ्या समाजवाद्यांनी अस्वीकार्ह ठरवलं होतं.
यामुळेच जनता पार्टी तुटली होती. जन संघाने आधीच स्वतःला जनता पार्टीमध्ये विलीन केलं होतं. पण त्यांची बांधिलकी ही संघाशी होती. म्हणून ते नंतर वेगळे झाले, आणि तोच गट नंतर भाजप या नावानं अवतरित झाला.

फोटो स्रोत, Getty Images
नेहरू संघाला भारत या विचारासाठीच धोका मानायचे. म्हणून ते संघ आणि जन संघ या दोघांनाही लोकांपासून सावधान करायचे. काँग्रेसमध्ये मनाने हिंदू असलेले अनेक सक्रिय नेते होते, जसे की राजेंद्र प्रसाद, गोविंद वल्लभ पंत, सरदार पटेल, पुरषोत्तम दास टंडन, रविशंकर शुक्ल. पण त्यांना संघाबद्दल विशेष आपत्ती नव्हती.
5 डिसेंबर 1947ला लखनौहून इंदिरा गांधी यांनी संघाच्या वाढत्या प्रभावाबद्दल नेहरूंना पत्र लिहून सावध केलं होतं. ज्यात त्यांनी संघाच्या एका रॅलीबद्दल विस्तारानं वर्णन केलं आहे. त्या जर्मनीतील 'ब्राऊन शर्ट'च्या लोकप्रियतेचा उल्लेख तिथे करताना म्हणतात, "जर्मनीचा हल्लीचा इतिहास आपल्या इतका जवळ आहे की एका क्षणासाठी तो विसरणं कठीण आहे. मग, भारतासाठी हेच भाग्य आपण आमंत्रित करतो आहोत काय?"
पुढे त्या लिहितात, "काँग्रेसच्या संघटनेत आधीच अशा लोकांचा शिरकाव झालेला आहे. अनेक काँग्रेसी नेते अशा प्रवृत्तींचं समर्थन करताना दिसतात. हीच परिस्थिती मोठ्या हुद्द्यावरील सरकारी अधिकाऱ्यांची आहे."
राहुल यांच्या निशाण्यावर भाजपऐवजी संघ का?
1949ला इंदिरा यांचं लखनऊहूनच लिहिलेलं दुसरं एक पत्र काँग्रेसला संघाच्या मानसिकतेपासून सावध करतं. त्या लिहितात, "मी असं ऐकलं आहे की टंडन त्या प्रत्येक शहराचं नाव बदलू पाहत आहेत, ज्याच्यामागे 'बाद' हा शब्द आहे. त्यांना त्याऐवजी 'नगर' हा शब्द ठेवायचा आहे. अशा प्रकारच्या गोष्टी वाढत राहिल्या तर मला वाटतं मी स्वतःला 'जोहरा बेगम' किंवा दुसऱ्या अशा एखाद्या नावानं हाक मारण्यास सुरू करीन."

फोटो स्रोत, Getty Images
पण त्यानंतर स्वतः इंदिरा गांधींमधली ही दृढता कमी होऊ लागली. त्या हिंदू प्रतीकांवरून आपलं काम निभावू लागल्या. त्यामुळे नेहरू आणि सुरुवातीच्या काळातल्या इंदिरा यांच्यानंतर राहुल पहिले असे नेते आहेत जे संघाला भारतासाठी धोका मानतात.
राहुल असं करून हे सुद्धा दाखवून देत आहेत की, ते सत्तेची नव्हे तर विचारांची लढाई लढत आहेत. ते प्रत्येक ठिकाणी भाजपऐवजी प्रथम संघावर हल्ला करतात. असं करून त्यांना जणू संघ हीच एक राजकीय संघटना आहे, हे सिद्ध करायचं आहे.
स्वतःला या पातळीवर पाहणं संघाला पसंत नाही, कारण ते स्वतःला राजकारणापेक्षा वरचढ मानतात. उलट संघ स्वतःला अनेक राजकीय संघटनांमध्ये रक्ताप्रमाणे प्रवाहित असल्याचं मानतात.

फोटो स्रोत, RSS.ORG
राहुल गांधी यांनी असंही सांगितलं की, संघ भारतातील प्रत्येक मोठ्या संस्थेवर ताबा मिळवू पाहत आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण भारतातल्या प्रत्येक संस्थेवर एका संघटनेच्या पातळीवर एका विचाराचा अंमल आला तर लोकसत्तेची भावनाच गळून पडेल. असं झाल्यानं त्याचा समाजावर काय परिणाम होईल, याचा अजून कुणी विचार केलेला नाही.
फक्त संघ आणि ब्रदरहूड नव्हे तर कम्युनिस्ट पक्षांना पण असंच दुसऱ्या विचारांना जागा सोडण्याचा विचार पटत नाही.
काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांना विचारण्यात आलं की, संघाप्रमाणेच आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी काँग्रेस शिक्षणसंस्था का चालवत नाही? तेव्हा राहुल म्हणाले होते की, शाळा या विचार प्रचाराचं माध्यम असू नयेत.
राहुल वारंवार भारत या विचारालाच यापासून धोका असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात. एकप्रकारे स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पहिल्यांदाच कोणत्या तरी विचाराला आपल्याशी जोडू पाहत आहे. संघासाठी, डाव्यांसाठी एक स्पष्ट विचारसरणी असणं हे काही नवीन नाही. पण सध्या काँग्रेससाठी ही नवी गोष्ट आहे.
त्यांना स्वतःला भारताच्या त्या विचाराला शोधायचं आहे ज्याच्या विरासतीचा दावा राहुल वारंवार करतात.
संघासाठी चिडण्यासारखी दुसरी गोष्ट अशी की, वारंवार त्यांना ब्रदरहूडप्रमाणे संघातही स्त्रियांना स्थान नाही हे दाखवून देणं. बहुसंख्यांकातील पितृसत्ताक विचारधारेच्या चरित्राला संघ समोर ठेवत असल्याचा राहुल यांना दाखवून द्यायचं आहे.

फोटो स्रोत, RSS
राहुल यांनी आपल्या युरोप दौऱ्यात हे वारंवार सांगितलं की, भारतातल्या मोठ्या संस्थांच्या तोंडवळ्यात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यामुळेच ते आपल्या कर्तव्याबद्दल जागरूक झाले. असं बोलून राहुल आपल्या मिशनला राजकीय नव्हे तर विचारांचं एक अभियान म्हणून पुढे आणू पाहत आहेत.
पण हे जेवढं संघाला आव्हान आहे, तेवढंच आव्हान काँग्रेसलाही आहे. पुन्हा आपल्या अस्तित्वाच्या तर्काचा काँग्रेस शोध घेईल? पुन्हा काँग्रेस भारताचा शोध घेईल? ही आव्हानं काँग्रेसपुढे आवासून उभी आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








