You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीन देसाईंना एका हिंदी कलाकारामुळे काम मिळत नव्हतं - प्रसाद लाड
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूमुळे देशभरात एकच खळबळ उडालीय. 3 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेतही अधिवेशनादरम्यान नितीन देसाईंच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन चंद्रकांत देसाईंचा मृतदेह आढळला.
लिखित सुसाईड नोट सापडली की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, नितीन देसाईंनी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली.
नितीन देसाईंच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करताना, भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, “नितीन देसाई यांच्या मोबाईलवरील ध्वनीफितीची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यात म्हटल्याप्रमाणे कोणत्या हिंदी फिल्म कलाकारासोबत झालेल्या वादामुळे नितीन देसाई यांना काम मिळणे बंद झाले? मराठी कला दिग्दर्शकावर अन्याय करणारा तो हिंदी कलाकार कोण होता? याची चौकशी करा.”
'11 पैकी शेवटच्या 2 क्लिपची चौकशी झाली पाहिजे'
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत एनडी स्टुडिओ सरकराने ताब्यात घेण्याची आणि नितीन देसाई यांनी त्रास देणाऱ्या हिंदी फिल्म कलाकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
प्रसाद लाड म्हणाले, “नितीन कलाकार होताच. तो माझा जुना मित्र आणि माझा नातेवाईकदेखील होता. आपण पाहिलं असेल गिरणगावात मोठा झालेला एक मुलगा एवढे भव्यदिव्य सेट उभे करतो. सातत्याने तो माझ्या संपर्कात होता. भाई जगताप, त्यांच्या मुलीच्या लग्नात आपण देखील आला होतात. आठ-नऊ महिन्यांपूर्वी तो डिप्रेशनमध्ये गेला होता.
"एडलवाईसचं कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं. इंस्टिट्यूटचं कर्ज होतं. पण ते कर्ज रिकव्हर करताना कशा पद्धतीत मानसिक तणाव द्यायला पाहिजे याविषयावरदेखील सरकारने एक भूमिका त्यांची देखील जाणून घेतली पाहिजे. सचिनभाऊंनी जो प्रस्ताव ठेवला, NCLTमध्ये असलेलं कर्ज राज्य सरकारने फिल्मसिटीच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे कशी येईल आणि रामोजी फिल्मसिटीसारखी एखादी फिल्म सिटी नितीनच्या नावाने कशी उभी करता येईल त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत.”
चौकशीची मागणी करताना लाड म्हणाले, “नितीन देसाई यांच्या 11 ऑडिओक्लिप पैकी शेवटच्या 2 क्लिपची चौकशी झाली पाहिजे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की एका हिंदी फिल्म कलाकाराबरोबर झालेल्या वादामुळे मला काम मिळत नव्हतं. हा फिल्म कलाकार कोण होता जो मराठी माणसांवर अन्याय करत होता? फिल्मसिटीमधला दहशतवाद थांबला पाहिजे. त्यावरसुद्धा सरकराने विचार केला पाहिजे.”
“सरकारने एजलवाईज आणि हा फिल्म कलाकार कोण याची चौकशी करावी, तसंच एनडी स्टुडिओ त्यांच्या कुटुंबियांना विश्वासत घेऊन ताब्यात घ्यावा ही मी सरकारला विनंती करतो.”
कर्जाच्या वसुलीचा मुद्दा शेलारांकडून उपस्थित
भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभा सभागृहात नितीन देसाईंच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, “आपल्या कर्तृत्त्वाने, प्रतिभेने कलादिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे नितिन चंद्रकांत देसाई यांनी दुर्दैवीरित्या आपले जीवन संपवले.
“त्यांनी एनडी स्टुडिओवर 180 कोटींचे कर्ज काढले होते. या 180 कोटींचे 252 कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा.”
'स्टुडिओवर जप्ती आली म्हणून मृत्यूला कवटाळले'
विधानपरिषदेत हा मुद्दा भाजपचे विधिमंडळ नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.
दरेकर म्हणाले, “माझ्या त्यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. या कलाकाराची आत्महत्या अशीच जाऊ द्यायची का?ते माझ्याकडे आले त्यांचे कर्ज 150 कोटी होते पण ते 250 कोटींवर गेले.
मागील 3 ते 4 महिन्यात माझ्या पाच ते 6 बैठका झाल्या. कर्जाची चौकशी झाली पाहिजे. व्याजावर व्याज लावले गेले. त्याच्या स्टुडिओवर जप्तीची प्रक्रिया आली म्हणून त्याने आज मृत्यूला कवटाळले.”
100 कोटीसाठी आपल्या मराठी तरुणाने मृत्यूला कवटाळले. त्याला नोटिसा कशा गेल्यात, त्याला कुणी प्रेशर केलं याची चौकशी व्हायला हवी.मी राज्यातल्या मुख्यमंत्री यांना फोन केला एक मराठी माणूस आहे त्याने साम्राज्य उभं केलं राज्य सरकारने एनडी स्टुडिओवर ताबा घ्यावा असे त्यांनी रेकॉर्ड मध्ये म्हटलं आहे, असं त्यांनी म्हटलं.
या सर्व लोकांची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. आत्महत्या ही चिंता करायला लावणारी आहे. कुठली फायनान्स कंपनी आहे ते बघायला हवे. नितीन देसाई यांचा स्टुडियो पाडू नये, सरकारने तो आपल्या ताब्यात घ्यावा.अशी मागणी त्यांनी केली.
चौकशी करण्याचं फडणवीसांचं आश्वासन
विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या मुद्द्याला उत्तर दिलं.
फडणवीस म्हणाले, “नितीन देसाई एक महत्त्वाचं नाव होतं. ज्या प्रकारे त्यांनी बस्तान बसवलं त्याचा मराठी माणसाला अभिमान होता. अनेक राजकीय पक्षांचे कार्यक्रम व्हायचे त्याची थीम ठरवायला बोलवायचे.अनेक ठिकाणी प्रकल्पांमध्ये नितीन देसाई पूर्ण करायचे. दिल्लीतील चित्ररथ आपण तयार करायचो.
मा. पंतप्रधान साहेबांनी जे घाट सुंदर केले त्यासंदर्भात नितीन देसाईंचा सहभाग आहे. त्यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. काही कर्ज झालं होतं. स्टुडिओ गहाण होता. एनसीएलटीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला. तरी ते प्रयत्न करत होते."
कुठेही जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे दबाव तयार करण्यात आला का याची चौकशी सरकार करतील. कायदेशीर बाबी तपासून त्यांची आठवण म्हणून त्याचं संवर्धन करता येईल त्यासंदर्भातील कायदेशीर बाब तपासून पाहू,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ND स्टुडिओवर जप्तीची कारवाई होणार होती?
नितीन देसाई सध्या आर्थिक अडचणीत होते आणि त्यांच्या कर्जतमधल्या एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची शक्यता होती. असं वृत्त काही दिवसांपूर्वीच रायगडमधील दैनिक कृषीवलने दिलं होतं.
नितीन देसाई यांनी काही सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज एडलवाइस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. आता ते कर्ज 249 कोटी रुपयांवर गेलं होतं, असं वृत्तात म्हटलं आहे.
रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यानुसार, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी एनडी स्टुडीओच्या जप्तीबाबत अद्याप निर्णय दिला नव्हतं.
कोण होते नितीन देसाई?
नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म दापोली झाला होता. कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता असा त्यांचा प्रवास होता. अनेक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
लगान (2001), देवदास (2002), जोधा अकबर (2008), प्रेम रतन धन पायो (2015) या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते.
त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते.
त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आशुतोष गोवारीकर, विधु विनोद चोप्रा, संजय लीला भन्साली या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं होतं.
त्यांनी कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
2005 मध्ये त्यांनी कर्जतला एनडी स्टुडिओ सुरू केला होता.
भव्यदिव्य सेट, अनोखं कला दिग्दर्शन यासाठी त्यांची ओळख होती.
मुंबईतल्या प्रसिद्ध लालबाग राजा गणपतीचा देखावा ते साकारायचे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)