You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जवळची माणसं तुटू लागली; सगळंच काही बिनसत चाललंय, हे कळू लागलेलं'
- Author, अमित भंडारी
- Role, पत्रकार
बोलायला लागला की अखंड बडबड. अथक कोणत्याही विरामचिन्हाशिवाय बोलण्याची त्याची सवय. बाईट देत असेल टेलिव्हिजनला तर इतक्या हुशारीने तो बाईट देत असे की, व्हीडिओ एडिटरला प्रश्न पडायचा की, नेमका याचा बाईट कुठे आणि कसा कापावा?
ग्लॅमरचं त्याला भलतंच आकर्षण. स्पॉटलाईटमध्ये राहण्याची त्याची अहमहमिका. खरं तर त्याच्या प्रत्येक कृतीत धडपड होती. यशाचं आभाळ कवेत घेऊनही तो कायम राहिला तो ‘एस्टॅब्लिश्ड स्ट्रगलर’ सारखाच.
तो लक्षातच मुळी राहिला नाव लिहिण्याच्या त्याच्या शैलीमुळे. ज्या इंडस्ट्रीत नावाचा शॉर्टकट किंवा नाव बदलून आपली ओळख निर्माण करण्याचा अट्टाहास, तिथे हा मनुष्य स्वतःच नाव वडिलांच्या नावासकट लिहायचा. त्यामुळे ते नाव ठसठशीत लक्षात राहिलं – ‘नितीन चंद्रकांत देसाई’.
अजूनही कर्टन बाजूला जायचंय आणि सेट लावण्याला फायनल टच द्यायाचा शिल्लक आहे, अशाच अवस्थेत सतत घाईत असणारी त्याची देहबोली. प्रत्येक गोष्टीची त्याला एक अनामिक घाई होती. खूप कमी वेळात सगळं पूर्ण करण्याचा एक वेगळाच अट्टाहास होता. पण जे काही हवंय, ते 'लार्जर दॅन लाईफ' हे सूत्र मात्र ठरलेलं.
एखादी गोष्ट क्रिएट करणाऱ्या माणसाला त्या गोष्टींबद्दल बोलताच येत अशातला भाग नाही, पण देसाईंकडे ती क्लृप्ती होती अन् स्मार्टली ते वापरत. ते केवळ बोलणेच नाही तर बोललेले प्रत्यक्षात आणण्याची जिद्द अन् ताकदही होती.
डोळे विस्फाण्यापेक्षा दिपून जातील, भव्य दिव्य आणि अप्रूप वाटेल, असं निर्माण करण्याकडे त्यांचा कल होता. हिंदी सिनेमाच्या कलादिग्दर्शनाच्या संक्रमणावस्थेत 'व्हिजन' या शब्दाची व्याख्या बदलण्यासाठीचा पहिला पायंडा पाडला असेल तर तो या कलंदराने.
दिग्दर्शकाचं व्हिजन प्रत्यक्षात आणणारा कलादिग्दर्शक
2011 मध्ये त्याने जिम जॉईन केली. कलादिग्दर्शक पहाटे उठून जिममध्ये. हा पठ्ठ्या सुरुवातीला चालायला यायचा. दिवसभर राब-राब राबून स्वतःचं काम, प्रॉडक्शनच्या जबाबदाऱ्या आणि नवीन काहीतरी सतत डोक्यात शिजत असलेले वेगवेगळे बिझनेस प्लॅन्स, असं भलतंच ओझं घेऊन हा माणूस सतत वावरायचा अभिनिवेश नसल्याच्या स्टान्समध्ये.
अशाच अवस्थेत पहाटे जिम करताना भेटला तेव्हा नितीन देसाईंचा 'नितीनदादा' झाला.
शॉर्टकटचा कोणताही पर्याय न घेता कंबर कसून मेहनत घेणाऱ्या शैलेश परूळेकरांसारखा फिटनेसमधल्या द्रोणाचार्यांकडे नितीन दादा यायला लागला. कॉर्नफ्लेक्स वगैरे नाश्ता करून हजर झालेल्या नितीन दिसाईला दुसऱ्या दिवसापासून शिळी चपाती आणि चहाचा नाश्ता करून हजर व्हायला सांगितलेलं. कारण पोलीस हवालदाराचा रोल ते करणार होते. सगळ्या काळात फिट राहण्यासाठी जीव तोडून मेहनत घेतलेला नितीन देसाई मी पाहिला आहे.
नव्या भूमिकेत शिरण्याच्या वेडाने तो झपाटून गेला होता. नवीन कोणतीही गोष्ट करायचा असला की हा माणूस झपाटून जायचं वेडी माणसं इतिहास घडवतात असं वाटून सुरुवातीला कौतुक वाटायचं नंतर त्याची सवय झाली आणि मग अशाप्रकारे स्वतःला इतिहास जमा ही करून घेतात असा प्रश्न ही काल मनात आला.
देवदास, लगान, हम दिल दे चुके सनम जोधा अकबर, स्वदेस असे एकाहून एक सरस सिनेमात कला दिग्दर्शन करणारं वलयांकित नाव काही दिवसातच जिव्हाळ्याचा सौहार्दाचं नातं निर्माण करून गेला.
सेटवरची काम पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करणारा, प्रत्येक फ्रेम देखणी होण्यासाठी रक्त आटवणारा आणि कॅमेरामन आणि दिग्दर्शकाची व्हिजन प्रत्यक्षात आणणारा असा हरहुन्नरी कलावंत होता.
त्याला प्रचंड भूक होती. सगळंच आपलंसं करायचं होतं. यशाच्या परिस्थिती त सतत उंचावत ठेवायच्या होत्या. प्रत्येक क्षणावर मी आरूढ होऊ शकतो आणि यशाच्या वारूलाही मी लगाम घालू शकतो. हे त्याच्या वागण्या बोलण्यात अन् जगण्यातही येऊ लागलं होतं.
त्याला एकाचवेळी मालिका, सिनेमा , कलादिग्दर्शन या सगळ्यात क्षेत्रात मुशाफिरी करायची होती. अभिनय निर्मिती, कलादिग्दर्शन आणि अप्रत्यक्षरीत्या दिग्दर्शन या सगळ्यातच त्याला प्रचंड स्वारस्य होतं.
दोन हातांनी दहा लढाया लढण्यासाठी कायम सज्ज असणारा माणूस कामाचं प्रचंड ओझं बाळगत होता. पण कुठेही निराशेचीची किनार त्यावेळी नव्हती. दिवसही तसेच होते आणि भोवतालही.
स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जिगर होती...
2013-14 सालची गोष्ट आहे. आयफा अवॉर्ड्सची.
चीनमधून मकाऊमध्ये आयफा अवॉर्डसाठी पुरस्कार घ्यायला दाखल होत असताना डोळ्यात एक अनामिक चमक होती.
'जोधा-अकबर'च्या कला दिग्दर्शनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळी गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आशुतोष गोवारीकर आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म करणार होते. विमानातून बाहेर पडताना कॉल सुरु झाला तो थेट व्हेनिशिअन मकाऊच्या रेड कार्पेटपर्यंत. नव्या सिनेमाबद्दल.
नव्या ध्येयाने तो पछाडलेला होता. बॉलिवूडमध्ये काम करत असतानाच त्याला मराठीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवायचा होता. त्याच्या बोलण्यातून सतत जाणवत होते. हिंदीत काम करत असतानाही प्रादेशिक भाषांमध्ये असणाऱ्या बिझनेसची गणित बदलता येतील, असं कुठेतरी खोलवर त्याला वाटत होतं.
'राजा शिवछत्रपती' मालिका आणि त्यानंतर 'बालगंधर्व', 'अजिंठा'सारखा सिनेमा तोपर्यंत झाला होता.
मकाऊमधील ती रात्र मधुर भांडारकर आणि नितीन देसाई यांच्यासोबत बसून, जुगार न खेळताही सिनेमाच्या सट्टा बाजारात स्वत:चं नशीब आजमावू पाहणार्या या कलंदरांसोबत अनेक स्वप्नांच्या अवकाश गंगेतून फिरून आलो होतो.
गप्पा रंगल्या होत्या त्या फक्त सिनेवर्तुळाच्या नवीन प्रोजेक्ट, बजेट आणि बॉक्स ऑफिसच्या आकड्यांच्या. बॅकग्राऊंडला कशी नव्हतं छान छान आवाज रंग भरत होता.
2008 मध्ये ‘राजा शिवछत्रपती’ सेटवर महाराजांचा राज्याभिषेक करायचा होता. “तू कव्हर करायला यायला पाहिजे,” हे सांगण्यासाठी पहाटे साडेचार वाजता या माणसाने झोपेतून उठवलं होतं. “अरे एवढा हक्क मी तुझ्यावर ठेवतोच आणि तो राखून ठेवलेला आहे,” हे हसत हसत वाक्य चिपकवलं होतं. तितक्या जवळचा हा माणूस नक्कीच होता.
आपल्या भूतकाळाबद्दल बोलत असताना मुलुंडपासून पवईपर्यंतचा हा प्रवास नेमकं काय काय मोजायला लावले, याचा पाढा वाचताना अभिमानाने भरून घ्यायचा.
माणसं काम करत असली तरी सेटवर जाणं, पाहणं, त्या गोष्टीचं प्रेशर घेणं आणि त्यासोबत असंख्य व्याधींनी ग्रासलेले शरीर अधिक मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन आणि गोळ्यांचा मारा करत राहणं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सज्ज होणं. असा त्याचा दिनक्रम बनून गेला होता.
लोकांवर कामाचं प्रेशर निर्माण करणं आणि काम वेळेत करून घेण्यासाठी हा माणूस वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत होता.
भरत शहाच्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्याचं काम नितीन दिसायला मिळालं होतं. सेट भव्य-दिव्य आणि नेत्रदीपक असावा, एवढी त्याची मागणी होती. पैसेही मोजून देणार होते आणि देसाई ठणकावून घेणारे होते.
कमीत कमी वेळात हे सगळं गणित बसवायचं कसं, अपेक्षेनुसार करायचं जरी म्हटलं आणि समोर जितके दिवस होते, त्या दिवसात काम करणं शक्य नव्हतं.
पावणे तीनशे माणसं सेटवर काम करत होती. पण त्यांना एकाच वेळी कमांड देणार तरी कसं? देसाईंनी शक्कल लढवली. त्यावेळी देसाई सेटवर राउंड हँड घालून वावरायचे.
पावणे तीनशेपैकी किती जणांना नितीन देसाई माहीत असणार, माझी ओळख ही हॅट आहे. त्यामुळे कामगारांना प्रत्येक ठिकाणी आहे असा भास होईल आणि काम वेळेत पूर्ण होईल अशी आशा होती आणि नेमकं तसंच घडलं.
किस्सा सांगत असताना रंगात आल्यानंतर मिशीवरून हात फिरवायची त्यांची एक लाख होती.
काय सांगू... असं म्हणून हरिदासाची कथा सुरू व्हायची. मग हातवारे व्हायचे अख्खा इतिहास डोळ्यासमोर रंगसंगती सकट उभा केला जायचा देशाने काला दिग्दर्शक असला तरी हा माणूस अख्यान लावणारा उत्तम कीर्तनकारही होऊ शकला असता असं क्षणभर वाटून जायचं.
उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं आणि दुसऱ्यांनी पाहिलेली स्वप्न ही प्रत्यक्षात आणणं यासाठी लागणारी जिगर असते, ती या माणसात होती. कामाचा झपाटा, उरक आणि आवाका इतका मोठा की पुढच्या क्षणी सगळं काही हातातून निसटून जाईल. अशी आनंद भीती त्याला वाटत असणार म्हणून एक अजब घाईत हा मनुष्य सतत वाटायचा.
अतिसामान्य ते असामान्य हा केवळ शब्दांचा फरक नाही तर तो कर्तृत्वाचा फरक अधोरेखित करण्यासाठी रक्ताचे पाणी केले होते.
‘अनाहत’च्या सेटसाठी खऱ्याखुऱ्या झेंडूची शेती
अमोल पालेकर यांच्या ‘अनाहत’ सिनेमासाठी हम्पीमधील अख्खा सेट मौसम नसताना झेंडूच्या फुलांनी सजवायचा होता आणि तोही खऱ्याखुऱ्या झेंडूच्या फुलांनी. नेमका तो सीन कधी आहे, केव्हा आहे, आदल्या दिवशी किती तयारी कशाप्रकारे करावी लागेल, याचा नेमका अंदाज घेऊन या कलंदर आणि तिथल्या शेतकऱ्याला पटवून चक्क झेंडूची शेती करायला लावली होती आणि पालेकरांना चक्क खुश करून टाकलं होतं. ही आठवण सांगताना त्याला कोण एक अभिमान वाटायचा!
गोविंद निहलानींच्या ‘तमस’च्या फिल्म सिटीमधील सेटवर मुलुंडहून जाताना आणि रात्री काम करून परतताना जीवाचे जे हाल व्हायचे, हे सांगताना आपण मर्सिडीजमध्ये बसलो आहोत, याचा त्याला प्रचंड अभिमान होता.
कला दिग्दर्शनाचे धडे हे नितीश रॉय यांच्याकडून गिरवले आणि डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘चाणक्य’च्या 26 व्या भागापासून ती अख्खी सिरीयल एकट्याने हाताळली याचा अभिमान.
'काळ' कोणताही असो, मी तो माझ्या कला दिग्दर्शनातून निर्माण करू शकतो, याचा विश्वास आणि ते निर्माण करण्याचे. अभ्यासपूर्ण कौशल्य कसबही या माणसाकडे होतं. मग आलेला 'काळ' बदलण्याचा किंवा सारं काही नव्याने शून्यातून उभा करण्याऐवजी हा माणूस परिस्थितीला शरण का गेला असेल, याचे उत्तर मात्र काही केल्या सापडत नाही.
हॉलिवूडचं काम करण्याचं स्वप्न
पवई हिरानंदानीमधल्या सेंटर अव्हेन्यूमधील दुसऱ्या मजल्यावर आपल्या ऑफिसच्या दारात गाडी पार्क होते, याचा त्याला कोण अप्रूप होता!
उद्या हॉलिवूडचा एखादा डायरेक्टर जर आपल्याकडे आला तर त्याला काही लिफ्ट घेऊन यायला सांगू आणि गाडी सोडली की थेट एनडीला भेटायला तो पोहोचू शकतो.
मिशन इम्पॉसिबलच्या फ्रेंचायजीमधला जो भाग भारतात चित्रित होणार होता, त्याचे काही अंशी भागाचे काम नितीन देसाईंकडे आले होते. त्यानंतर हॉलीवूडच्या बऱ्याच सिनेमासाठी आपण प्रॉडक्शन डिझाईनचे काम आशियासाठी आणि पर्यायाने भारतात करू शकू, अशा एका स्वप्नाने होतो.
देसाईंच्या दृष्टीने येणारा काळ हा संक्रमणाचा काळ होता, त्यात बुद्धासाठी तब्बल 400 कोटीचे बजेट आलेले होते. या कलाकॄतीनंतर सोनेरी दिवस येतील. एनडी स्टुडिओ वेगळी आर्थिक भरारी घेईल असं वाटण्याचा काळ होता.
फासे उलटे पडू लागले...
पण नेमकं तो काळ सुरू झाला, ज्या वेळेला आयुष्यात प्रत्येक दान उलटं पडू लागलं. राजकीय वरदहस्त लाभलेल्या माणसाने डोक्यावरून हात काढून घेतला. गुंतवणूकदारांचा पैशासाठी तगादा सुरू झाला.
आयुष्यात फासे उलटे पडू लागलेल्या दिवसांमध्ये देसाईंकडूनही काही चुका घडू लागल्या. काम केलेल्या माणसांचे पैसे थकवणे, इथपासून ते निर्मात्यांसाठी त्यांनी केलेल्या कामाचे सेट्स आपल्या खासगी गोदामात ठेवून, नंतर त्याची रवानगी हिंदी स्टुडिओमध्ये करण्यापर्यंत.
जवळची माणसं तुटू लागली. त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या अत्यंत जवळच्या जिव्हाळ्याच्या माणसांनी त्यांच्यापासून फारकत घेतली. सगळंच काही बिनसत चाललंय, हे कळू लागलं होतं.
राजकारणाविषयी वाढती मैत्री, त्याचा आयुष्य झिरपत चालण्याचा वास देसाईंच्या वागण्या बोलण्याला येऊ लागला होता.
आपल्या टीममधल्यांची मानधनं खोळंबून ठेवली जाऊ लागली, त्यावेळी प्रवास विकोपाच्या दिशेने सुरू झाला होता.
शोकांतिकेच्या विलापिकेची नांदी
या दरम्यान स्टुडिओमध्ये काम करत असताना निर्माते प्रॉडक्शन हाऊस आणि कलाकार यांचा अनुभव कटू असल्याचे आजच्या दिवशीही बोलले जाते. काही प्रकरणं तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्येही दाखल झाली होती.
सामूहिक कलात्मक प्रयत्नांच्या आधारावर बेतलेला मालिका-सिनेमा-नाटक हा कलाप्रकार आहे. परस्परांवरांच्या प्रयत्नांच्या कौशल्याच्या साखळीतून कलाकृती निर्माण होत असते.
आयुष्याच्या ऊन-पावसात होरपळून निघालेला माणूसच आपल्या अधिकारांचा गैरवापर करत इतरांवर अन्याय करायला लागतो, तेव्हा एका शोकांतिकेच्या विलापिकेची नांदी सुरू झालेली असते.
कामानं जागलेले डोळे निद्रानाशाच्या चिंतेनं ग्रासलेले दिसू लागले..
एकीकडे राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमांच्या आणि सरकारी सभा कॉन्फरन्सेस यांची काम मिळत असली, तरीही कर्जाचे डोंगर वाढतच होते. तक्रार, गाऱ्हाणी, दाद-फिर्यादी यांचा ससेमीरा सुरू झाला आणि कर्जाच्या चिखळात पाय कधी कधी रूतू लागला.
कामाने जागलेले डोळे आता निद्रानाशाने चिंतेने ग्रासलेले दिसू लागले होते, तर विचारांचा भुंगा मन पोखरत असल्याचेच सांगत होते.
मधल्या काळात त्यांनी जवळच्या आपल्या माणसांची मनं दुखावली, काही जणांना ठेच पोहोचवल्या. ग्लॅमर आणि अधिकाराच्या मुग्धतेने धुंदीची नशा केव्हा घेतली, हे त्याचे त्यालाच कळले नाही.
पदावर असलेल्या राजकीय नेत्यांमध्ये ऊठबस सुरू झाल्याचा हा परिणाम होता की काय, नितीनदादाचा नितीन ‘दादा’ होऊन गेला होता.
आजपर्यंत दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करून 24 तास अखंड काम करण्याची ऊर्जा नितीन देसाईंमध्ये होती. शूटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत नजाकतभरी फ्रेम दिसण्यासाठीचा अट्टाहास. त्याच्या या पॅशनचं असं प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला वाटायचं.
‘असं करायचं ना सालं की, लोक बघतच बसली पाहिजेत’
अखेरचे बोलणं झालं त्यावेळी जाणवलं होतं की, स्वतःशीच असलेला त्यांचा संवाद हा तुटला आहे. पण इतरांचं आखीव-रेखीव आणि सुबक प्रॉडक्शन डिझाईन करणारा माणूस स्वतःच्या आयुष्याचं डिझाईन नेट नेटकं नक्कीच करू शकेल, असा विश्वास होता.
‘राजा शिवछत्रपती-चा सीट ज्यावेळी उभारला होता, त्या वेळी छत्रपतींचे किल्ले ज्यांनी बांधले त्या फिरोजी इंदुलकरांचा उल्लेख असणारी ती पायरी त्याने आवर्जून बनवली होती. या सेटच्या पायरीवर तरी किमान आपलं नाव लिहिण्याचा मोह त्याला झाला होता.
गडाच्या पहिल्या पायरीवर हिरोची इंदुलकरांची स्वाक्षरीची खूण ते ठेवत. कारण महाराजांचं पहिलं पाऊल ज्या गडाच्या पायरीवर जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा आपल्याला पदस्पर्श करण्याची संधी असेल. आपल्या नावावर महाराजांची पाऊल उमटेल, ही भावना त्यामागे होती.
स्वतःला आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणताना असंच काहीसं भव्य दिव्य आपल्या हातून घडावं. ते घडलंही. पण त्यामागील नम्रतेची आणि ऋजतेची भावना मात्र कुठेतरी लोप पावत गेली.
आम्ही भेटल्यावर पुढच्या प्रोजेक्टबद्दल बोलत असताना, “असं करायचं ना सालं की, लोक बघतच बसली पाहिजेत.” हे वाक्य हमखास यायचं.
गळ्याभोवती फास अडकवण्यापूर्वीच्या ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या, त्यावेळी हा विचार मनात आला असेल का…?
(लेखक अमित भंडारी हे सोहम ग्रुपचे डिजिटल सीईओ आहेत. त्यांनी सिने आणि नाट्य क्षेत्रात अनेक वर्षं पत्रकारिता केली आहे. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)