अफेअर समजल्याने मोबाईल काढून घेतला, 14 वर्षीय विद्यार्थिनीने शाळाच जाळली, 19 मृत्यू

एका वयस्कर व्यक्तीशी अफेअर असल्याचं समजल्यानंतर शिक्षकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेलाच आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
गयाना येथील माहदिया परिसरातील एका निवासी शाळेत ही घटना सोमवारी (22 मे) पहाटे घडली. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बहुतांश विद्यार्थिनी आहेत.
याशिवाय इतर 9 जखमींवर उपचार सुरू असून त्यामध्ये संशयित विद्यार्थिनीचाही समावेश आहे.
AFP वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, संशयित मुलीवर आता कशा प्रकारे कारवाई करावी, याविषयी शाळा प्रशासन कायदेशीर सल्ला घेत आहे.
संबंधित निवासी शाळेत 57 विद्यार्थिनी राहत असून बहुतांश विद्यार्थिनी या स्थानिक आदिवासी समाजाच्या आहेत.
सदर आग ही शाळेतील स्वच्छतागृहापासून सुरू झाली. यानंतर ती संपूर्ण निवासी शाळेत पसरली. पहाटेची वेळ होती, त्यामुळे जवळपास सगळ्याच विद्यार्थिनी गाढ झोपेत होत्या.
शाळा ही लाकडाने बनवण्यात आलेली असल्यामुळे आग इतर भागात पसरण्यास वेळ लागला नाही.
यानंतर धुराचे लोट आणि आरडाओरडा सुरू झाल्यानंतर हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला.

फोटो स्रोत, Getty Images
पण रात्रीच्या वेळी शाळेच्या वसतीगृहाला कुलूप लावण्यात आलेलं होतं. संपूर्ण गोंधळात या कुलूपाची चावीही गहाळ झाली.
वसतीगृहाचं व्यवस्थापन करणाऱ्या महिलेचा पाच वर्षीय मुलगाही या प्रकारामध्ये मृत्यूमुखी पडला आहे.
यानंतर काही वेळात अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी आत अडकलेल्या लोकांना भिंतीवरून बाहेर काढलं.
सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यामध्ये काही रुग्ण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
आग इतकी भीषण होती की मृत्यूमुखी पडलेल्या काही विद्यार्थिनींच्या मृतदेहांची तिथेच राख बनली आहे.
आता DNA चाचणी करून त्या मुलींची ओळख पटवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आगीची ही घटना म्हणजे खूप मोठी आपत्ती आहे, अशा शब्दांत गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी दुःख व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Getty Images
AFP च्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेला जबाबदार असलेली संशयित विद्यार्थिनी ही 14 वर्षांची आहे. ती येत्या आठवडाभरात रुग्णालयातून बाहेर येईल. यानंतर तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार आहे, अशी माहिती गयानाच्या आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागार लेस्ली रामस्वामी यांनी म्हटलं.
या घटनेची माहिती देताना गयानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गेराल्ड गोव्हिया म्हणाले, "संबंधित मुलीने सुरुवातीला वसतीगृहाला आग लावण्याची धमकी दिली होती. यानंतर काही वेळाने बाथरूममध्ये आग लागल्याचं आढळून आलं."
"संशयित विद्यार्थिनीने हे सगळं त्या व्यक्तीच्या प्रेमाखातर केलं. कारण वसतीगृहातील अनेक विद्यार्थिनी या रात्रीच्या वेळी मन रमवण्यासाठी इमारतीतून बाहेर पडायच्या."
"हा प्रकार खूपच खेदजनक आहे. आम्ही यातून तोडगा काढण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार आहोत."
दरम्यान, संशयित विद्यार्थिनीसोबत रिलेशनशीपमध्ये असलेल्या वयस्कर व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे.
मुलीचं वय हे 16 पेक्षाही कमी होतं. त्यामुळे गयानामधील अल्पवयीन अत्याचार कायद्यानुसार, संबंधित व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती गोव्हिया यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








