अल्पवयीन मुलीवर अनेकांकडून अत्याचार, कधी वेश्यावस्तीत विकले तर कधी कलाकेंद्रात

- Author, योगेश लाठकर
- Role, बीबीसी मराठीसाठी बीडमधून
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर अनेकांनी बलात्कार केले. पैशाचे आमिष दाखवून, खायला देतो असे आमिष दाखवून अनेकांनी तिच्या असाहयतेचा फायदा घेतला, असे पोलिसांनी सांगितले आहे.
एका स्वयंसेवी संस्थेनं तक्रार दाखल केल्यानंतर न्यायाधीशांसमोर पीडितेनी आपला जबाब नोंदवला आहे.
16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकांनी अत्याचार केल्यानंतर ती गरोदर राहिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात बीड पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पीडितेच्या आईचे निधन पीडिता 8 वर्षांची असताना झाले. पीडितेचे वडील हे मोलमजुरी करत असत. त्यामुळे दोघांचे गुजराण त्यावर होणे कठीण झाले होते.
'बालविवाह लावून देण्यात आला'
चार-पाच वर्षं वडिलांनी तिला सांभाळले आणि नंतर तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अंबेजागाई तालुक्यातच एका हॉटेलवर स्वयंपाक्याचे काम करणाऱ्या मुलासोबत पीडितेचे लग्न लावून देण्यात आले.
पण नवऱ्याकडे तिला चांगली वागणूक मिळाली नाही. तिचा पती तिला मारहाण करत असे, रोजच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून ती आठ महिन्यांनी माहेरी परत आली.

फोटो स्रोत, Getty Images
वडिलांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. काही दिवस घरात ठेऊन घेण्यासाठी ते तयार झाले पण तिला घराबाहेर जाण्यास त्यांनी तगादा लावला. तिला मारहाण सुरू झाली.
तिने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तिच्या वडिलांना समज दिली. काही दिवस शांततेत गेल्यानंतर पुन्हा छळाचे सत्र सुरू झाले आणि नाइलाजाने तिला आपले घर सोडावे लागले.
आपल्या गावातून ती अंबेजोगाई शहरात आली. तिथे ती एका बस स्टॉपवर राहू लागली. एका व्यक्तीने तिच्याशी ओळख वाढवली. ती असहाय असल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने तिला मुंकुंदराज टेकडीवर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले.
ती पुन्हा त्याच बस स्टॉपवर आली. ती एकटी असल्याची गोष्ट अनेकांच्या लक्षात आली आणि त्यांनी देखील तिच्या असहायतेचा गैरफायदा घेतला. काही जण तिला पैशाचे आमिष देत असत काही जण तिला खाण्याचे आमिष देत असत.

तर काही जण या सर्व गोष्टीतून तुझी सुटका करतो असं म्हणायचे आणि तिला गावापासून 7-8 किमी दूर नेऊन तिच्यावर अत्याचार करायचे. त्या ठिकाणी तिला एकटेच सोडायचे.
अंधारात, रात्री बेरात्री ती पायपीट करत आपल्या बस स्टॉपवर परत यायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तिच्यावर अत्याचार करण्यासाठी कुणीतरी तयार असायचेच. ही सर्व हकीकत तिने न्यायाधीशांना सांगितली आहे.
'पीडितेला वेश्यावस्तीत विकले'
पीडिता ही एकटीच आहे आणि काही झालं तरी पुन्हा याच ठिकाणी परत येते असे हेरून काही लोकांनी तर तिला दुसऱ्या लोकांकडे पाठवून त्यांच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली.
एका व्यक्तीने तिला वेश्यावस्तीत विकले होते पण तिथून ती पुन्हा बसस्टॉपवर आली. मग तिला दुसऱ्या ठिकाणी वेश्याव्यवसाय जिथे चालतो तिथे विकण्यात आले. तिथून देखील ती तिच्या नेहमीच्या बसस्टॉपवर आली.
सकाळी सात वाजल्यापासूनच काही लोक तिचा शोध घेत त्या बसस्टॉपवर येत असत. तिच्याजवळ पैसे असले तर ती थेट एखादी बस पकडून दुसऱ्या गावी निघून जाई. अन्यथा दिवसभर अशा लोकांचा त्रास सहन करावा लागेल अशी भीती तिला वाटत असे.
पोलिसांकडून मदत घ्यावी किंवा इतर कुणाकडून मदत घ्यावी तर त्याची देखील तिला भीती वाटू लागली. घर सोडल्यापासून तब्बल दोन वर्षं तिची वणवण सुरू होती. याकाळात तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार झाल्याचे तिने न्यायाधीशांसमोर सांगितले आहे.
पीडितेची माहिती छत्रपती शाहू महाराज या सेवाभावी संस्थेच्या तत्त्वशील कांबळे यांना समजली. त्यांनी तिचा शोध घेतला आणि तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर तिला त्यांना बाल हक्क समतीकडे सुपूर्त केले.

फोटो स्रोत, Getty Images
"पीडितेची कहाणी ऐकून मन सुन्न झाले आहे. त्यादिवसापासून मला जेवण देखील गेले नाही," अशी प्रतिक्रिया तत्त्वशील कांबळे यांनी माध्यमांना दिली आहे.
बाल हक्क समितीने पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांना सर्वकाही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी तिचा जबाब न्यायाधीशांसमोरच नोंदवून घेतला आहे.
तिने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी 9 जणांविरुद्ध बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. इतर काही जणांवर मानवी तस्करीचा गुन्हा देखील लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडितेची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर ती गरोदर असल्याचे लक्षात आले आहे. तिचा गर्भ 20 आठवड्यांचा असल्यामुळे तो पाडण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. सध्या पीडिता ही बाल हक्क समितीकडेच राहते.
न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल अशी माहिती बाल हक्क समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वणवे यांनी दिली.
"कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही, सर्व तपास निष्पक्षपणे होईल, या घटनेतील उर्वरित आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील आणि पीडितेला न्याय मिळेल," असं अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.








