स्मिता पाटलांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मंथन' चित्रपटाचे कान्समध्ये कौतुक

स्मिता पाटील
फोटो कॅप्शन, स्मिता पाटील यांनी मंथनमध्ये गावातील एका अस्पृश्य महिलेची भूमिका केली होती
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात पडतं आणि चित्रपट समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात या गोष्टींची प्रचिती देणारा आणि भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला एक अनोखा चित्रपट म्हणजे मंथन.

इतक्या दशकानंतर आजही हा चित्रपट समकालीन परिस्थितीला स्पर्श करणारा आहे, यातच या कलाकृतीची महानता दिसून येते.

मंथन या चित्रपटाची निर्मिती, कलाकार आणि तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीविषयी...

भारतीय चित्रपटाचं विश्वाची दुनिया अतिशय अनोखी आहे. इथं रुपेरी पडद्यावर घडतात त्यापेक्षा अधिक नाट्यमय आणि रंजक गोष्टी पडद्यामागे घडत असतात. 1970च्या दशकात गुजरातमधील 5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एक वास्तववादी आणि चित्रपट माध्यमाला कलाटणी देणाऱ्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्रत्येकी 2 रुपयांचं योगदान दिलं होतं.

भारतीय सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला हा चित्रपट म्हणजे मंथन. या चित्रपटाचं दिग्दर्शन ख्यातनाम दिग्दर्शक शाम बेनेगल यांनी केलं होतं. ज्या हल्लीच्या भाषेत 'क्राऊड फंडिंग' म्हणतात म्हणजे अनेक लोकांनी एकत्र येऊन पुरवलेलं भांडवल, त्या पद्धतीनं अनेकांच्या पैशांतून तयार झालेला हा पहिला भारतीय चित्रपट.

अर्थात, याला थोड्या थोडक्या नव्हे तर 5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भांडवल पुरवलं होतं.

मंथन हा 1976 मध्ये प्रदर्शित झालेला 134 मिनिटांचा चित्रपट आहे. दूधाचा तुटवडा असलेल्या भारताचं रुपांतर जगातील आघाडीचा दूध उत्पादक देशात करणाऱ्या दूध सहकाराची चळवळ कशी सुरू झाली हे कथासूत्र असणारी ही काल्पनिक कथा होती.

ज्यांना संपूर्ण देश भारताचा दूधवाला माणूस म्हणजे 'मिल्कमॅन ऑफ इंडिया' या नावानं ओळखतं त्या वर्गिस कुरियन यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन ही कथा तयार करण्यात आली होती. वर्गिस कुरियन यांनी भारतात दूध उत्पादनात क्रांती घडवून आणली होती. (यानिमित्तानं विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे जगातील एकूण दूध उत्पादनाच्या जवळपास एक चतुर्थांश दूध उत्पादन आज भारतात होतं.)

निर्मितीनंतर जवळपास 50 वर्षानंतर नवं रुप लाभलेल्या या जुन्या चित्रपटाचा या आठवड्यात कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेट वर्ल्ड प्रिमियर झाला. जीन-लुक गोडार्ड, अकिरा कुरोसावा आणि विम वेंडर्स या दिग्गजांच्या क्लासिक चित्रपटांच्या जोडीनं मंथनला हा सन्मान मिळाला आहे.

या चित्रपटाच्या जुन्या प्रिंटवरून त्याला पुन्हा नवं रुप देणं हे एक आव्हान होतं, असं पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते, जुन्या गोष्टींचं जतन करणारे कलाप्रेमी शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांना वाटतं.

मंथनच्या जुन्या रिळांची अवस्था बरीच वाईट झाली होती. त्याच्या दोन फिकट झालेल्या प्रिंट उपलब्ध होत्या. चित्रपटाच्या रिळांचं बुरशीमुळं बरंच नुकसान झालं होतं.

त्यामुळे त्याच्या अनेक भागांवर उभ्या हिरव्या रेषा उमटल्या होत्या. चित्रपटाच्या आवाजाची रिळं तर पूर्णपणे नष्ट झाली होती. वाचलेल्या एकमेव प्रिंटवरून तंत्रज्ञांना ती पुन्हा नव्या स्वरुपात आणावी लागली.

चित्रपट
फोटो कॅप्शन, गिरीश कर्नाड (डावीकडे) यांनी व्हेटर्नरी डॉक्टरची भूमिका केली होती. हा डॉक्टर एका खासगी डेअरी मालकाला भेटतो. या डेअरी मालकाची भूमिका अमरीश पुरी (उजवीकडे) यांनी केली होती.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या चित्रपटाला नवं स्वरुप देणाऱ्या तंत्रज्ञांनी एक निगेटीव्ह आणि एक प्रिंट वाचवली. वाचलेल्या प्रिंट वरून त्यांनी ध्वनी मिळवला आणि त्याला डिजिटल स्वरुपात आणलं आणि चित्रपटाची प्रिंट देखील दुरुस्त केली.

चित्रपटाच्या प्रिंट स्कॅनिंग आणि त्याच्यावरची डिजिटल प्रक्रिया चेन्नईतील प्रयोगशाळेत करण्यात आली. प्रख्यात बोलोग्नास्थित रिस्टोरेशन प्रयोगशाळेच्या देखरेखीखाली, श्याम बेनेगल आणि त्यांचे दीर्घकाळापासून सहकारी असणारे छायाचित्रणकार गोविंद निहलानी यांच्या देखरेखीखाली ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. बोलोग्ना प्रयोगशाळेत चित्रपटातील आवाजात सुधारणा करण्यात आली.

साधारण 17 महिन्यानंतर 4K अल्ट्रा हाय डेफिनिशन रुपात मंथन चा एकप्रकारे पुनर्जन्म झाला होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या खऱ्या नायकांपैकी एक असलेले बेनेगल म्हणतात या चित्रपटाला त्यांच्या ह्रदयात विशेष स्थान आहे. हा चित्रपट त्यांना अतिशय भावलेला चित्रपट आहे.

जणूकाही आम्ही कालच या चित्रपटाची निर्मिती केली अशा रितीनं या चित्रपटाची दुरुस्ती झाली आहे हे पाहणं हा आनंददायक अनुभव आहे.

त्याच्या पहिल्या प्रिंटपेक्षा तो अधिक चांगला दिसतो आहे, असं 89 वर्षांचे बेनेगल म्हणतात.

बेनेगल यांना आठवतं की कुरियन यांच्यावर बेतलेल्या असंख्य माहितीपटांची (डॉक्युमेंटरी) त्यांनी निर्मिती केली होती. ऑपरेशन फ्लड, भारतातील दूधक्रांती आणि ग्रामीण भागातील मार्केटिंगचं उपक्रम यासारख्या विषयांवर आधारित हे माहितीपट होते.

मात्र हे माहितीपट ठराविक लोकांपर्यतच म्हणजे ज्यांना याचा लाभ झाला आहे त्यांच्यापर्यतच पोहोचले आहेत असं सांगत जेव्हा बेनेगल यांनी कुरियन यांना चित्रपट निर्मितीची सूचना केली तेव्हा त्यांनी टाळाटाळ केली. कुरियन यांनी बेनेगल यांना सांगितलं की चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यास कुरियन यांचा नकार होता.

सहकाराच्या मॉडेलअंतर्गत छोटे शेतकरी सकाळी आणि संध्याकाळी गुजरातमधील दूध केंद्रांवर दूध घेऊन यायचे आणि तिथे ते दूध विकायचे.

त्यानंतर गोळा झालेलं दूध डेअरींमध्ये लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रियेसाठी पाठवलं जायचं.

चित्रपट
फोटो कॅप्शन, या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेस अभिनेता नसिरुद्दीन शाह, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या बनवणं आणि म्हशीचं दूध काढण्यास शिकले होते.

कुरियन यांनी मग सूचना केली या दूध केंद्रांवरच प्रत्येक शेतकऱ्यांच्या बिलातून दोन रुपये कापून घेण्यात यावे. जेणेकरून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी भांडवल उपलब्ध होईल आणि हे सर्व शेतकरी चित्रपटाचे निर्माते बनतील. या दूध केंद्रांमधून जे पैसे गोळा झाले त्यातून मंथन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.

"हे पैसे देण्यासाठी शेतकरी लगेच तयार झाले, कारण या चित्रपटातून आम्ही त्यांचीच कथा मांडणार होतो," असं बेनेगल सांगतात.

मंथन मध्ये नामवंत कलाकार होते. या चित्रपटात गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, नसरुद्दीन शाह, अमरीश पुरी, कुलभूषण खरबंदा आणि मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकरांनी या चित्रपटासाठी अनेक पटकथा लिहिल्या.

त्यातील एका पटकथेची निवड शाम बेनेगल यांनी केली होती. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं.

या चित्रपटात शहरातील एक जनावरांचा डॉक्टर (व्हेटर्नरी डॉक्टर) आणि त्याची टीम सहकारी डेअरी सुरू करण्याची योजना घेऊन गुजरातमधील एका अत्यंत विभागलेल्या, फूट पडलेल्या गावात येतात. कामाच्या सुरूवातीला हा डॉक्टर बदलाच्या गोंधळलेल्या स्वरुपाच्या राजकारणात सापडतो. त्याला खासगी डेअरी मालकाकडून, गावाच्या प्रमुखाकडून आणि स्थानिक अस्थिर दूधवाल्याकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं.

"बदलाच्या राजकारणाचं मंथन हे सूक्ष्मदर्शी चित्र आहे...बेनेगल यांनी सरकारी अधिकारी गावात येऊन तिथल्या गावकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोन बदलण्याचा कसा प्रयत्न करतो या प्रसंगावर अतिशय अत्यंत जळजळीत सामाजिक टिप्पणी केली आहे," असं 'वर्ल्ड डायरेक्टर सेरीज: शाम बेनेगल' या पुस्तकाच्या लेखिका संगीता दत्ता लिहितात.

चित्रपटाची निर्मिती करताना पैशांचा अभाव होता आणि 45 दिवसांचं चित्रपटाचं शूटिंग हे एक आव्हान होतं. चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या फिल्मच्या साठ्यातून पॅचवर्क कसं वापरण्यात आलं याची आठवण निहलानी सांगतात. सर्व टीम गावातील एका कुटुंबासारखी राहिली.

चित्रपटात अनेक गावकऱ्यांनी देखील अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा गावातील असल्यामुळे आपले कपडे गावकऱ्यांसारखेच दिसावेत यासाठी चित्रपटातील कलाकारांनी संपूर्ण शूटिंग दरम्यान तेच कापडे वापरले, असं दत्ता सांगतात.

चित्रपट
फोटो कॅप्शन, बेनेगल (डावीकडे) दुरुस्त करून नवं रुप देण्यात आलेल्या प्रिंटकडे पाहताना. या प्रिंटला शिवेंद्र सिंह डुंगरपूर (उजवीकडे) आणि त्यांच्या टीमनं नवं रुप दिलं आहे.

नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात बेनेगल यांच्याबरोबर केली आणि नंतरच्या काळात ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक बनले. त्यांना हा चित्रपट बनत असताना ते हा चित्रपट कसे जगले ते आठवतं.

"मी एका झोपडीत राहिलो. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या कशा बनवायच्या आणि म्हशीचं दूध कसं काढायचं हे मी शिकलो. मी जे पात्र साकारत होतो त्याप्रमाणे माझी शरीरयष्टी, देहबोली व्हावी यासाठी मी दुधाच्या बादल्या घ्यायचो आणि चित्रपटाच्या टीमला दूध वाटायचो," असं नसीरुद्दीन शाह सांगतात. चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंगदरम्यान त्यांनी तोच सुती अंगरखा घातला होता. कान्स चित्रपट महोत्सवात तेच हा चित्रपट सादर करणार आहेत.

कुरियन यांनी सुरूवातीला हा चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित केला होता.

"या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला, कारण चित्रपटाचा बहुतांश प्रेक्षकवर्ग हाच चित्रपटाचा निर्मातादेखील होता. दररोज हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व भागांतून ट्रकभरून लोक येत असल्याचं अनोखं दृश्य आम्हाला दिसायचं," असं बेनेगल सांगतात.

चित्रपट
फोटो कॅप्शन, दूध उत्पादक शेतकऱ्यांनीच निर्मिती केलेल्या या चित्रपटात अनेक गावकऱ्यांनी देखील अभिनय केला आहे.

भारतातील इतर कोणत्याही चित्रपटापेक्षा जास्त कॉपी या चित्रपटाच्या बनवण्यात आल्या. त्या प्रिंटचे फॉरमॅट 35 मिमी पासून ते 8 मिमी, सुपर 8 आणि नंतर व्हिडिओ कॅसेट्स इतक्या विविध प्रकारचे होते. जगभरात मंथन चित्रपट दाखवला गेला. अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या असेंब्लीमध्ये सुद्धा तो दाखवला गेला. भारतात मंथनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

मंथनच्या यशामुळे कुरियन यांना आणखी एक कल्पना सुचली. या चित्रपटाचा वापर दूधक्रांतीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी 16 मिमीच्या प्रिंटचं देशभरातील गावांमध्ये वाटप केलं. याद्वारे गावांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या सहकारी डेअऱ्या स्थापन करण्याचं आवाहन करण्यात आलं.

चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यात देखील त्यांनी व्हेटर्नरी डॉक्टर, दूधाशी संबंधित तंत्रज्ञ आणि चारा तज्ज्ञ यांच्या टीम या चित्रपटाचा वितरण करण्यासाठी आणि चित्रपट दाखवण्यासाठी गावांमध्ये पाठवल्या.

स्मिता पाटील
फोटो कॅप्शन, बेनेगल म्हणतात, समाजात बदल घडवून आणण्याच्या सिनेमाच्या प्रचंड क्षमतेची हा चित्रपट आठवण करून देतो.

बेनेगल म्हणतात, "बदल घडवण्याच्या सिनेमाच्या क्षमतेची जबरदस्त आठवण मंथन हा चित्रपट करून देतो." भारतातील विविध समस्यांचा शोध या चित्रपटात घेतला जात असल्यामुळे आश्चर्यकारकरित्या आजच्या काळातदेखील हा चित्रपट लागू पडतो, तितकाच समर्पक आहे.

रेल्वेगाडीच्या दृश्यानं या चित्रपटाची सुरूवात होते. आजही ट्रेन उशीरा धावत असतात. चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात एक पॅसेंजर ट्रेनमधून डॉक्टर आणि त्याचा सहाय्यक एका शांत गावातील स्टेशनवर उतरतो. थोडासा उशीर झालेले गावकरी त्या दोघांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यासाठी प्लॅटफॉर्मकडे धाव घेतात.

"आम्हाला माफ करा. रेल्वेगाडी वेळेवर आली," असं एक गावकरी धापा टाकत डॉक्टरला सांगतो.