राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, चारपानी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं?

- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 13 मार्चच्या सकाळी समोर आली आहे.
आपल्या शेतात विषारी औषध घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं.
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून ते लढत होते.
गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी 10 दिवस अन्नत्याग आंदोलनही केलं होतं.
मात्र तरीही शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी आत्महत्येपुर्वी एका चारपानी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं आहे.
त्यांच्या आत्महत्येनं होळीच्या सणाच्या दिवशी त्यांच्या कुटुंबावर आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
मात्र त्यांनी चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलंय? त्यांच्या मागण्या काय होत्या? हे जाणून घेऊयात.


चिठ्ठीत काय लिहिलं?
कैलास नागरे यांच्या मृतदेहाजवळ त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी शेतीसाठी पाणी किती गरजेचं आहे आणि ते नाही मिळालं, तर शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट होते याबाबत लिहिलं आहे.
त्यांनी चिठ्ठीत लिहिलं, "आमच्या पंचक्रोशीत पाणी आलं, तर शेतकरी भरकटणार नाही. माझ्या परिसरातील शेतकरी खुप प्रयोगशील आहेत. आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, फक्त शेतीला पाणी नाही."
"त्यामुळे आमच्याकडील शेतकऱ्यांचा आर्थिक समतोल बिघडतो. त्यामुळे तो कर्जबाजारी होतो अन् वैफल्य येऊन नैराश्याच्या गर्तेत जातो, त्याला अस्थिर जीवन जगणं असह्य होते."
"तो एवढा वैफल्यग्रस्त होतो की, त्याला स्वतःच्या मुक्तीशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. असा शेतीसाठी कोणाचाच बळी जायला नको."
"शेती कसणाऱ्यासाठी बारमाही पाणी भेटले, तर सर्व गाडा सुरळीत चालतो, नाहीतर शेतकरी सैरभैर होऊन भरकटतो, कर्जबाजारी होतो आणि मग चुकीच्या दिशेने वाटचाल करतो."
"माझ्या केळी, पपईच्या शेतात माझे अंत्यसंस्कार करा आणि राख आमच्या आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचं पालकत्व स्वीकारावं."
"आमच्या शेतीचा वाद सर्व समाजातील प्रतिष्ठित लोकांनी एकत्र बसून तात्काळ मिटवावा," असं त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या, अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते झटत होते.
सुरुवातीला डिसेंबर महिन्यात त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारीमध्ये त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं उपोषण देखील झालं होतं. अंढेरा मंडळात दुष्काळाचं सावट असून शेतकऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागतात.
म्हणून खडकपूर्णा प्रकल्पातून कालव्याद्वारे अंढेरा मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं, अशी आर्त मागणी त्यांनी लावून धरली होती.
त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिलं गेलं. मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं तेथील शेतकरी वर्गातून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला.
यातूनच कैलास नागरे यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून आणि गावकऱ्यांकडून होत आहेत.
'मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही'
दरम्यान, कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवनी आरमाळ येथील शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
जोपर्यंत शासन कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका शिवणी आरमाळ येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
कैलास नागरे यांच्या कुटुंबियांनी बीबीसी मराठीला याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, "पंचक्रोशीतील पाणी प्रश्नामुळे आणि 40 वर्षांपासूनचा आमचा जो शेतीचा वाद सुरू आहे त्यामुळे ते मागच्या काही दिवसांपासून खुप चिंतेत होते."
"मात्र ते असं काही करतील हे आमच्या ध्यानीमनीही नव्हतं. मी तर माहेरी गेले होते. परत आल्यानंतर ते सापडेना म्हणून आम्ही शोधाशोध सुरू केली, तेव्हा त्यांचा मृतदेह आम्हाला सापडला."
"आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आमच्या घरातील कर्ता पुरूष गेलाय. आमच्या घरात आता कोणीच कमवतं नाही. आमच्या मुलांच्या भविष्याचं आता पुढं काय होणार?"
"शासनानं आमच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या शेतीचा कोर्टातील वाद लवकरात लवकर मिटला पाहिजे."

दरम्यान, शिवणी आरमाळ येथील सर्व ग्रामस्थांच्यावतीनं गावातील एका शेतकऱ्यांनं माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी शासन आणि प्रशासन कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला.
त्यांनी म्हटलं, "शासनाची जी कमकुवत यंत्रणा आहे तिच्यामुळं, काळ्या मातीचा धनी म्हणून प्रसिद्ध असलेला आणि पंचक्रोशीसाठी अहोरात्र झटणारा आमचा जिवलग मित्र आम्हाला सोडून गेला. पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मायबाप जलमय व्हावेत म्हणून आमच्या मित्रानं हा त्याग केला आहे."
"आम्ही त्याचं हे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे."
ते म्हणाले, "त्यानं ही आहुती कुटुंबासाठी नाही, तर पंचक्रोशीतील सर्व लोकांसाठी दिली आहे. त्यामुळं ती वाया जायला नको, त्याला न्याय मिळावा हीच आमची सगळ्यांची मागणी आहे. त्याचं स्वप्नं पूर्ण करण्याची शासन आम्हाला लेखी स्वरूपात हमी देत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कारासाठी आम्ही त्याचा मृतदेह इथून हलू देणार नाही."
अशा शब्दांत गावकऱ्यांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडली.
पाणी आणि शेती हे त्याचं स्वप्नं आणि ध्येय होतं. वेळोवेळी या मागणीचा पाठपुरावा करून देखील ते ध्येय या मायबाप सरकारकडून पूर्ण झालं नाही. ही बाब छोटीशी नव्हती. म्हणून त्यानं आज हे पाऊल उचललं असल्याचं गावकऱ्यांनी सांगतलं.
प्रशासनाचं म्हणणं काय?
दरम्यान, शासन आणि प्रशासन कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याची भूमिका कैलास नागरे यांच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी घेतली आहे.
याबाबत बीबीसी मराठीनं बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी म्हटलं, "त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यातील धरणाकडेच्या झाडंझुडपांची कामं करून दिली आहेत."
"बंधारा दुरूस्तीची जी मागणी होती, तर त्याच्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधी जानेवारी महिन्यामध्येच उपलब्ध करून दिला होता. शिवाय त्याच्या पुढील कामासाठी टेंडर देखील काढण्यात आलेलं."
"त्यांची अजून एक मागणी होती की, खडकपूर्णा धरणावरून त्यांच्या गावाजवळच्या धरणाला एक स्वतंत्र कालवा करावा, तर त्याला काही कालावधी लागणार होता. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती आणि त्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केलं होतं."

"त्यामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या उदासीन भूमिकांमुळे त्यांनी हे पाऊल उचललं असं म्हणणं योग्य नाही. कारण एक धरण दुसऱ्या धरणाला इतक्या कमी कालावधीत कधी जोडलं जात नाही. त्याला काही कालावधी लागतोच, हे त्यांनाही माहिती होतं."
"आम्ही अगदी आत्तापर्यंत खडकपूर्णा धरणावरून पाणी सोडलेलं आहे. ज्या भागात ते पाणी पोहचलं, त्या भागात अनेक लोकांनी उन्हाळी पिकंही घेतली आहेत."
कैलास नागरे यांच्या या निर्णयामागे त्यांची काही वैयक्तिक कारणंही असू शकतात असं म्हणत, किरण पाटील यांनी शासन आणि प्रशासनानं कैलास नागरे यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
राजकीय प्रतिक्रिया
दरम्यान, कैलास नागरे यांच्या आत्महत्येबद्दल बोलताना मंत्री संजय शिरसाट आणि विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "ही आत्महत्या सगळ्यांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. आदर्श शेतकरी म्हणून तो गणला जातो, त्याला पुरस्कार मिळतो. परंतु निसर्गाच्या कोपामुळे किंवा पाणी न मिळाल्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागते हे दुर्दैवी आहे."
"मात्र निसर्गावर अवलंबून असलो तरीही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शासनाला द्यावी लागतात. म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं आहे."
तर विजय वडेट्टीवार यांनी सरकार शेतकऱ्यांना अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यात अपयशी ठरल्याचे आरोप केले आहेत.
वडेट्टीवार म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, त्याला गौरवताय आणि तो शेतकरी पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो. म्हणजे त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला. या सरकारला शेतकऱ्यांप्रती अजिबात दयामया नाही."
कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही दु:ख व्यक्त केले.

रवीकांत तुपकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणाबाबत त्यांची भूमिका मांडली.
तुपकर म्हणाले, "कैलास नागरे यांनी काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवून टाकलं. त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर डिसेंबर महिन्यात जे उपोषण केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांना भेटायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो."
"त्यांचं म्हणणं असं होतं की, खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. हे पाणी आमच्या 10-15 गावांतल्या शेतकऱ्यांना मिळालं, तर आम्हाला त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते."
पुढं ते म्हणाले, "धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्याही काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फारशी दखल न घेता थातूरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली."
"कैलास नागरे एक आदर्श शेतकरी होते. ते कायम शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलत होते. त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं लिहिलं आहे ती गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे."
कैलास नागरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकार गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी रवीकांत तुपकर यांनी केली.
हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करत आहेत. असं असूनही अधिवेशानात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते, असा आरोप तुपकरांनी केला. तसेच आपण स्वतः कैलास नागरे यांच्या घरी जाणार असून हा लढा तीव्र करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












