चंद्रयान-3 च्या यशानंतर चंद्रावर भारताचा कुठल्या गोष्टीवर दावा असेल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुभज्योती घोष
- Role, बीबीसी न्यूज बांगला
- Reporting from, दिल्ली
20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी ते उतरताच म्हणाले, "मनुष्यासाठी हे एक लहान पाऊल असू शकते, परंतु मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे."
हे वाक्य जगाच्या अंतराळ इतिहासात जवळजवळ एक उक्ती बनून गेलं.
त्या घटनेच्या अर्धशतकाहून अधिक काळानंतर भारताचं चंद्रयान-3 बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं.
त्यानंतर, रोव्हर 'प्रज्ञान'नेही विक्रम लँडरच्या शिडीवरून खाली उतरून हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागावर आपला प्रवास सुरू केला आहे.
'प्रज्ञान' कदाचित फक्त प्रति सेकंद एक सेंटिमीटर पुढे जात असेल, परंतु चंद्राच्या पृष्ठभागावरील हे छोटंसं पाऊलही भू-राजकारण आणि चंद्राच्या अर्थव्यवस्थेतील (लूनर इकोनॉमी) महत्त्वाचे पाऊल असून, ती त्या अर्थानं लांब उडीच आहे, याबद्दल जाणकारांच्या मनात शंका नाही.
‘फॉरेन पॉलिसी’ आंतरराष्ट्रीय मासिकात म्हटलंय की, “भारताचे चंद्रावर उतरणं हे खरे तर एक मोठे भू-राजकीय पाऊल आहे.”
सध्या जगातील अनेक देश अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहिण्याचा प्रयत्न करतायेत आणि त्यासाठी प्रचंड पैसाही खर्च करतायेत.
भारत, रशिया, चीन आणि अमेरिका हे देशही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रयत्न करतायेत. या सगळ्यांआधी भारत तिथं पोहोचला, हे भारताचे हे अभूतपूर्व यश आहे. भारत नवीन शक्यतांची दारे उघडेल, असा विश्वास अनेकांना आहे.
भारताचं अंतराळ क्षेत्र एक ट्रिलियन डॉलरचं होईल
भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी अंदाज वर्तवलाय की, भारत येत्या काही वर्षांत अंतराळ क्षेत्रात एक ट्रिलियन (एक लाख कोटी) डॉलरची अर्थव्यवस्था बनेल.
चंद्रयान-3 च्या अभूतपूर्व यशानंतर भारताला हे अशक्य नाही, असं या क्षेत्रातील बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे.
तक्षशिला संस्थेतील अवकाश आणि भू-राजकारणाचे संशोधक आदित्य रामनाथन यांना विश्वास वाटतो की, या यशामुळे भारतातील तरुण पिढीतील मोठ्या वर्गाला अवकाश संशोधनात उत्सुकता निर्माण होईल आणि तरुणवर्ग करिअर म्हणूनही याकडे पाहू लागेल.
रामनाथन यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखात म्हटलंय की, “चंद्रयानच्या या यशाच्या आधारे भारताला आता चंद्राच्या भूराजकारणासाठीही स्वतःला तयार करावे लागेल.”

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रावर मोठ्या प्रमाणात मौल्यवान खनिजे किंवा मोठ्या प्रमाणात इंधन स्त्रोत देखील सापडू शकतात, या शक्यतेने अनेक देशांना चंद्रावर मोहीम राबविण्यास प्रेरित केले आहे.
चंद्रयान-3 या अंतराळयानाचे यश भारताला पॅनेल पोझिशनमध्ये आणेल म्हणजेच आंतरराष्ट्रीय शर्यतीत पुढे ठेवेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी स्पर्धा
पूर्वीचं सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यातील शर्यतीनंतर, जवळपास सहा दशकांनी पुन्हा एकदा चंद्रावर पोहोचण्याची नवी स्पर्धा सुरू झाली आहे.
यावेळी आकर्षणाचं केंद्र चंद्राचा दक्षिण ध्रुव आहे, जिथे शास्त्रज्ञांना पाणी किंवा बर्फाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत.
रशियाने सुमारे 47 वर्षांनंतर या महिन्यात आपली पहिली चंद्र मोहीम सुरू केली. मात्र, गेल्या रविवारी (20 ऑगस्ट) लुना-25 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरू शकला नाही. त्यानंतर तीन दिवसांनी भारताचे चांद्रयान-3 यशस्वीरित्या तेथे उतरले.
अमेरिकेने 2025 मध्ये प्रथमच त्या भागात अंतराळवीरांना उतरवण्याची योजना आखली आहे. त्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे.
चीनने या दशकाच्या अखेरीस अंतराळवीरांशिवाय आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळवीरांसह अंतराळयान उतरवण्याची योजना आखली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय इस्रायल, जपान आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या अनेक देशांनीही अलीकडेच चंद्रावरील मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातले असे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत.
दक्षिण ध्रुवाकडे या वाढत्या आकर्षणाचे मूळ कारण म्हणजे तेथे पाणी आढळल्यास ते रॉकेटमध्ये इंधन म्हणून वापरले जाऊ शकते.
अमेरिकेला चीनबद्दल शंका
शास्त्रज्ञांना वाटतंय की, चंद्रावर कायमस्वरूपी स्थानक (कायमचा तळ) बांधला जाण्यासाठी तिथे पुरेसं पाणी असं आवश्यक आहे आणि त्याचीच चाचपणी केली जातेय. किंवा मंगळावर किंवा त्यापुढील अंतराळ मोहिमेसाठी लॉन्च पॅड उभारले जाऊ शकते.
नासाचे सर्वोच्च अधिकारी बिल नेल्सन यांनीही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खरोखरच पाणी आढळल्यास भविष्यातील अंतराळवीर किंवा अंतराळ यानाला मोठी मदत होईल.
पण चीनने त्या भागात आपले कोणतेही अंतराळवीर प्रथम उतरवले, तर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हक्क सांगू शकतात, अशी भीती बिल नेल्सन यांनी व्यक्त केली.
नजीकच्या भविष्यात अशी स्पर्धा सुरू होऊ शकते, या भीतीपोटी अमेरिकेने 2020 मध्ये आर्टेमिस करार केला होता. या करारावर स्वाक्षरी केलेल्या देशांनी अवकाश संशोधनाच्या बाबतीत ठरवलेल्या धोरणांचे पालन करण्याचे आणि संसाधनांचा समानतेने वापर करण्याचे मान्य केले आहे.
जगातील अनेक देश या करारात सहभागी आहेत.
गेल्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारतानेही या करारावर स्वाक्षरी केली होती. पण रशिया आणि चीन या दोन मोठ्या अवकाश शक्तींनी त्यावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही.
चंद्रयान-3 च्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यश आल्याने चंद्राबाबतच्या या नव्या अंतराळ शर्यतीला वेग येईल आणि पहिला यश मिळवणारा देश म्हणून भारताला निश्चितच काही फायदा होईल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
भारतीय अंतराळ तंत्रज्ञान विकसित होतंय...
विल्सन सेंटरमधील दक्षिण आशिया केंद्राचे संचालक माईक कुगेलमन यांच्या मते, भारताच्या यशस्वी चंद्र मोहिमेमुळे त्यांच्यासह उर्वरित जगालाही मोठा फायदा होऊ शकतो.
त्यांनी ‘फॉरेन पॉलिसी’मध्ये लिहिले आहे की, “सध्याचे अंतराळ संशोधन हे संवाद क्षेत्रातील विकास आणि रिमोट सेन्सिंगमध्ये मदतगार ठरतंय. आता याचा आणखी विस्तर होईल.”
त्यांनी उदाहरणासह सांगितलं की, “भारताच्या आधीच्या अंतराळ संशोधनामुळे भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात आणि जगाच्या हवामानाच्या नमुन्यांचा अंदाज लावण्यात खूप मदत झाली आहे.”
ज्या देशांना हवामान बदलामुळे धोक्याचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी हे सर्व आकडे खूप उपयुक्त ठरतील, याकडे माईक कुगेलमन लक्ष वेधतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या स्ट्रॅटेजिक थिंक टँक 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन'चे संशोधक डॉ. राजी राजगोपालन यांनीही बीबीसीशी बोलताना म्हटलं की, भारताच्या या यशाचा विविध पैलूंमधून जगातील अंतराळ संशोधनावर सकारात्मक परिणाम होईल.
डॉ. राजगोपालन म्हणतात, "या मोहिमेने हे सिद्ध केले आहे की भारताचे अंतराळ तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक, विकसित आणि परिपक्व झाले आहे."
चंद्रावर हेलियम-3 चा साठा
भारताने ज्या प्रकारे अत्यंत कमी खर्चात (अंदाजे 7.5 कोटी डॉलर) यशस्वी अंतराळ मोहीम प्रक्षेपित केली आहे.
प्राइस वॉटरहाऊस कूपर्स या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीने चंद्राशी संबंधित अर्थव्यवस्थेचा अर्थ काय आहे हे एका अहवालात तपशीलवार स्पष्ट केले आहे.
या अहवालानुसार, चंद्रावर जेवढी उपलब्ध संसाधनं आहेत, त्यांचा चंद्रावर, पृथ्वीवर आणि चंद्राच्या कक्षेत यशस्वी वापर हे अर्थव्यवस्थेचे सूचक आहे.
उदाहरणार्थ, चंद्रावर हेलियमच्या आयसोटोप हेलियम-3 प्रचंड साठा आहे, जो अक्षय ऊर्जेचा एक मोठा स्रोत असू शकतो. पण हेलियम-3 पृथ्वीच्या हितासाठी कसे वापरता येईल, हा चंद्राच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
स्थावर मालमत्तेच्या मुद्द्यावरून किंवा चंद्रावरील जमिनीच्या मुद्द्यावरून एके दिवशी जगातील विविध देशांत वैर सुरू होऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की, जर हे एखाद्या दिवशी प्रत्यक्षात घडले तर दक्षिण ध्रुवावर भारताचा फर्स्ट मूव्हर' म्हणून ठोस दावा असेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








