चंद्रयान 3 : यानाभोवती सोनेरी आवरण का असतं?

फोटो स्रोत, ISRO
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही.
आतापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे. त्यात भारत, रशिया, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. या क्लबमध्ये भारताचा चंद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर समावेश झाला आहे.
यानाच्या प्रक्षेपणानंतर अवकाशशास्त्रबद्दल सगळ्यांच्याच मनात कुतूहल निर्माण झालं होतं. यातलाच एक कुतूहलचा विषय म्हणजे यानाभोवती दिसणारं सोनेरी रंगाच्या कागदासारखं आवरण.
चंद्रयान-3 बद्दल गेले काही दिवस आपण सातत्याने ऐकतो आहोत.
यानाचे बरेच फोटो एव्हाना तुमचे पाहून झाले असतील आणि कदाचित यानाच्या प्रक्षेपणानंतर तुम्ही सोशल मीडियावर, तुमच्या स्टेटसला, स्टोरी म्हणून शेअरही केले असतील.
पण, या यानाभोवती असलेलं सोन्याचं आवरण कधी तुमच्या नजरेत भरलंय का? किंवा अगदीच चॉकलेटमधल्या सोनेरी कागदाप्रमाणे दिसणारं हे सोनेरी आवरण एखाद्या यानाभोवती, उपग्रहाभोवती आणि त्यांच्यावरच्या उपकरणांवर का लावलेलं असतं? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.
यानाभोवती सोनेरी फॉईलसारखा कागद का दिसतो?
आम्ही या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मुंबईतल्या नेहरू तारांगणचे संचालक डॉ. अरविंद परांजपे यांच्याशी संवाद साधला.
परांजपे सांगतात की, “यानाभोवती दिसत असलेलं सोनेरी फॉईल पेपरसारखं आवरण हे सोनंही नाही आणि कागदही नाही. त्याला मल्टिलेयर इन्सुलेशन किंवा MLI म्हटलं जातं. म्हणजेच वजनाने अत्यंत हलक्या फिल्मचे एकावर एक असे अनेक थर लावलेले असतात."
परांजपे पुढे सांगतात की, याला बाहेरून सोनेरी आणि आतून पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाच्या फिल्म्स असतात. त्या पॉलिस्टरने बनवलेल्या फिल्म्स असतात. या फिल्म्सना अॅल्युमिनियमचा अत्यंत पातळ थर देण्यात आलेला असतो. पॉलिस्टरची फिल्म आणि अॅल्युमिनियमचा त्याच्यावरचा थर याची मिळून एक शीट बनते."

फोटो स्रोत, Facebook
"संपूर्ण यानाभोवती या शीट्स नसतात तर यानातल्या रेडिएशनमुळे खराब होऊ शकतील अशा महत्त्वाच्या भागातच असतात. आता या शीट्सचा किती आणि कसा वापर करायचा हे तो उपग्रह किंवा यान अवकाशात कुठे स्थिरावेल किंवा कुठे भ्रमण करेल यावर अवलंबून असतं,” परांजपे सांगतात.
‘उष्णता यानाचं कार्य बंद पाडू शकते’
रंगाने सोनेरी दिसणाऱ्या या MLI शीट्सचा यानाला नेमका काय उपयोग होतो?
याचं उत्तर देताना परांजपे सांगतात की, “रेडिएशन किंवा ज्याला आपण प्रारण म्हणतो त्याच्यापासून बचाव करणं हेच या शीट्सचं मुख्य कार्य असतं. म्हणजे एकप्रकारे यानाचा उष्णतेपासून बचाव या शीट्स करतात."

फोटो स्रोत, ISRO
"यानाच्या पृथ्वीवरून अंतराळातल्या प्रवासादरम्यान तापमान अत्यंत वेगाने बदलत असतं. हे बदलतं तापमान यानाच्या नाजूक उपकरणांवर मोठा परिणाम करू शकतं. अचनाक वाढलेली उष्णता उपकरणाचं काम बंद पाडू शकते. उष्णतेपासून या शीट्स यानाचा बचाव करतात.”
तापमानातला बदल नेमका किती?
यान किंवा उपग्रहांभोवतीच्या या आवरणाबद्दल अमेरिकन सरकारच्या नॅशनल एनव्हायर्मेंटल सॅटेलाईट, डेटा अँड इन्फोर्मेशन सर्व्हिसच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आलीय.
या माहितीनुसार, उपग्रह किंवा यानाला अवकाशात स्थिरावण्याच्या ठिकाणी थेट येणारा सूर्यप्रकाश किती असेल यावरूनच MLI शीट्सची निर्मिती करावी लागते. म्हणजे एखादा उपग्रह पृथ्वीजवळच्या कक्षेत स्थिरावतो. तर, चांद्रमोहिमेवरचं एखादं यान काही लाख किलोमीटर प्रवास करणार असतं.

फोटो स्रोत, ISRO
या काळात उणे 200°F ते 300°F इतका जबरदस्त फरक तापमानात होतो. पृथ्वीजवळून मार्गक्रमणा करताना अत्यंत थंड वातावरण असू शकतं. त्यावेळी यानाच्या उपकरणांतून निर्माण झालेली उष्णता या शीट्स बाहेर पडू देत नाहीत. तर, अवकाशात थेट सूर्यप्रकाशामुळे आलेलं सोलार रेडिएशन, इन्फ्रारेड रेज (अतिनील किरणं) या शीट्स परावर्तित करतात आणि पुन्हा अंतराळात फेकतात. त्याचा यानाला धोका होत नाही.
अवकाशातल्या धुलिकणांपासूनही संरक्षण
नॅशनल एनव्हायर्मेंटल सॅटेलाईट, डेटा अँड इन्फोर्मेशन सर्व्हिसच्या वेबसाईटवर याबद्दल अजून माहिती दिली गेलीय. त्यानुसार, MLI शीट्स या फक्त रेडिएशन, उष्णता यांच्यापासूनच नव्हे तर अवकाशातल्या धुलिकणांपासूनही यानाला संरक्षण पुरवतात.
यानाच्या उपकरणांवरचे सेन्सर्स या धुलिकणांमुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे उपकरणांकडून नोंदवली जाणारी निरिक्षणं थांबूही शकतात. हे रोखण्याचं काम या शीट्स करतात.
म्हणूनच, यान, उपग्रह, स्पेस स्टेशन यांच्यामध्ये दिसणारा सोनेरी रंगासारखं आवरण हे त्यांची उपयुक्तता कायम राखण्यासाठीचं सर्वोत्तम साधन आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









