You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रतीक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. प्रतीक्षा बागडी ठरली 'महिला महाराष्ट्र केसरी'
महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या सामन्यात सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने बाजी मारली आहे.
सांगलीच्या प्रतीक्षाने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला अस्मान दाखवत पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आणि चांदीची गदा पटकावली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
प्रतीक्षा बागडीच्या या विजयानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या हरियाणाच्या इसारमध्ये जवळपास 5-6 ते महिने रूमपार्टनर होत्या. दोघींना एकमेकींच्या डावपेचांबद्दल अंदाज होता. तथापि बाजी मारण्यात प्रतीक्षा यशस्वी झाली.
सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत्या.
अंतिम सामन्यात तुंग (जि.सांगली) येथील बागडे आणि कोल्हापूरची पाटील यांच्यात लढत झाली. सायंकाळी ही अंतिम लढत सुरू झाली.
या अंतिम सामन्यात बागडे आणि पाटील मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र मध्यंतरानंतर बागडींने पाटीलला चितपट करीत 4 विरुद्ध 10 गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली.
2. आरटीई प्रवेश अर्जांसाठी आज शेवटचा दिवस
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत शनिवारी (25 मार्च) संपणार आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत 3 लाख 53 हजार 672 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये 25% जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.
शैक्षणिक वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 17 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काही पालकांना अर्ज करता न आल्याने, कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने अर्ज करता आला नाही. त्यामुळे पालक आणि संघटनांच्या मागणीमुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.
3. कोरोनाचे एका दिवसात 1,249 नवे रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी (23 मार्च) भारतात 1,249 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7,927 झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे कोरोना मृतांची संख्या 5 लाख 30 हजार 818 वर पोहोचली आहे, असंही आकडेवारीत म्हटलं आहे.
कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4 कोटी 41 लाख 61 हजार 922 वर पोहोचली आहे, तर मृत्यूदर 1.19 % इतका आहे.
4. सरकारनं महाभाई भत्त्यात केली 4 % वाढ
मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. जानेवारी 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआरमध्ये वाढ होणार आहे.
साम टीव्हीनं ही बातमी दिलीय.
मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता 38 टक्क्यांहून वाढून 42 टक्के करण्यात आला आहे. यासोबत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरिअर देखील मिळणार आहे. या घोषणेनंतर केंद्र सरकारवर 12,815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.
5. लेखक राहुल बनसोडे यांचं निधन
लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आयटी व्यावसायिक राहुल बनसोडे यांचं शुक्रवारी (24 मार्च) नाशिक इथं निधन झालं. ते 45 वर्षांचे होते. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
ते ऑफिसच्या पायऱ्या चढत असताना त्यांना भोवळ आल्याचं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं बातमीत म्हटलं आहे.
बनसोडे यांनी 'अनॉनिमस कंटेन्ट' आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नाटके लिहिली. अनेक दैनिके आणि नियतकालिकांसाठी त्यांनी लेखन केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)