You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली
सुरतच्या एका कोर्टाने मानहानीच्या प्रकारणातली राहुल गांधींची याचिका खारिज केली आहे.
23 मार्चला सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत दिली होती.
त्यानुसार राहुल गांधी यांनी शिक्षेला आव्हान दिलं होतं. दोन वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती.
मी देशासाठी कुठलीही किंमत चुकवायला तयार - राहुल गांधी
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला होता. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करून त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली होती.
"मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं," असं राहुल गांधी यांनी लिहिलं होतं.
मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे आणि त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, असं त्याचा अर्थ आहे.
सुरत कोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
गुजरातमध्ये सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवलं आहे.
पाहिजे ते करा, आम्ही झुकणार नाही - प्रियांका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यानी एक ट्विटर थ्रेड करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल केले आहेत आणि त्यांच्यावर जहरी टीका देखील केली आहे.
प्रियांका गांधी लिहितात, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या चमच्यांनी एका शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर असं संबोधलंय. राहुल गांधींचे वडील कोण आहेत? असा प्रश्न तुमच्या एका मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
काश्मिरी पंडितांच्या प्रथेनुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा पगडी वापरतो, आपल्या कुटुंबाची परंपरा जपतो.
भर संसदेत तुम्ही संपूर्ण नेहरु-गांधी कुटुंबाचा आणि काश्मिरी पंडितांचा अपमान करत विचारलं की, ते नेहरू आडनाव का लावत नाहीत. पण यावर कोणत्याही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा सुनावली नाही. तुम्हाला संसदेतून अपात्र ठरवलं नाही.
राहुलजींनी एखाद्या सच्च्या देशभक्ताप्रमाणे अदानींच्या लुटीवर सवाल उपस्थित केले.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर प्रश्न उपस्थित केले. तुमचे मित्र गौतम अदानी देशाच्या संसदेपेक्षा आणि भारतातील महान जनतेपेक्षा मोठे आहेत का, त्यांनी केलेल्या लुटीवर प्रश्न विचारताच तुम्ही सैरभैर झालात का?
तुम्ही माझ्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करता, पण हे लक्षात असू द्या की याच कुटुंबाने भारताच्या लोकशाहीसाठी आपलं सर्वस्व दिलंय आणि हीच लोकशाही तुम्ही संपवू पाहताय.
या कुटुंबाने भारतातील लोकांचा आवाज बुलंद केलाय, पिढ्यानपिढ्या सत्यासाठी लढा दिलाय. आमच्या धमन्यांमध्ये वाहणाऱ्या रक्ताचा हा गुणच आहे. तुमच्यासारख्या भ्याड, सत्तेच्या भुकेल्या हुकूमशहापुढे आम्ही कधीही झुकणार नाही. तुम्हाला पाहिजे ते करा."
अघोषित आणीबाणी - चव्हाण
"राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते, हे जाणूनबुजून करण्यात आलं आहे, देशात अघोषित आणीबाणी आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
"भारत जोडो यात्रेत मिळालेलं यश आणि परदेशात मिळालेला प्रतिसाद यामुळेच ही कारवाई केलेली आहे," असा आरोपसुद्धा चव्हाण यांनी केला आहे.
"खरं बोलणाऱ्यांना त्यांना (भाजपला) संसदेत ठेवायचं नाहीये, म्हणून त्यांना बाहेर काढलं जात आहे. पण आम्ही खरं बोलत राहू," अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.
ओम बिर्ला यांच्या या निर्णयानंतर संसद परिसरात आलेल्या राहुल गांधी यांनी मीडियाच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणं टाळलं आहे.
मोदी घाबरले आहेत - काँग्रेस
मुख्य मुद्द्यांपासून लक्ष भटकवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
कायद्यानुसार दुसऱ्या राज्यात एखादा खटला दाखल केला जात असेल तर त्याची प्राथमिक चौकशी होणं गरजेचं असतं, पण तसं झालं नसल्याचा दावा सिंघवी यांनी केला आहे.
या प्रकरणी आम्ही कोर्टात जाऊ आणि आमची बाजू मांडू असं सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे.
भारत जोडे यात्रेमुळे भाजप खूप घाबरली आहे, त्यांची चिंता वाढली आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.
"अदानींचा महाघोटाळा राहुल गांधी यांनी खणून काढल्यामुळेच त्यांना याची किंमत चुकवावी लागली," असंही जयराम रमेश यांनी म्हटलंय.
"आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा मुद्दा घेऊन जाऊ, राहुल गांधी कुठल्याही धमकीला घाबरणार नाहीत. मोदी घाबरलेले आहेत म्हणूनच ते विरोधकांना घबरवत आहेत," असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यात ट्विटमध्ये लिहितात...
"नीरव मोदी घोटाळा - 14,000 Cr
ललित मोदी घोटाळा - 425 Cr
मेहुल चोकसी घोटाळा- 13,500 Cr
ज्या लोकांनी देशाचा पैसा लुटला त्यांचा भाजप बचाव का करते? चौकशीपासून दूर का पळत आहेत? जे लोक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांच्यावर खटले भरले जात आहेत. भाजप भ्रष्टाचार करणाऱ्यांचं समर्थन करते का?"
चोराला चोर म्हणणं गुन्हा - उद्धव ठाकरे
हे लोकशाहीचं हत्याकांड असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
"चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मतमतांतरं असली तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना घडलेली नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
"राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
"सरकारने किमान उच्च न्यायालय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असतं. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
आदेशात काय म्हटलं?
लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात काढलेल्या आदेशामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.
सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने हे पत्र राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग तसंच सर्व मंत्रालय/विभागांना पाठवण्यात आलं आहे.
या पत्रानुसार, भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. सुनावणीच्या वेळी राहुल गांधी कोर्टात उपस्थित होते.'सगळ्याच चोरांचं आडनाव मोदी कसं असू शकतं?' असं कथित वक्तव्य त्यांनी केलं होतं.
त्यानंतर भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी कर्नाटकातील कोलार येथे त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
भारतीय दंड संहितेच्या कलम 499 नुसार या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची शिक्षा प्रस्तावित आहे.राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि लगेच जामीनही मिळाला आहे.या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं.
महात्मा गांधींचा एक सुविचार त्यांनी या ट्विट मध्ये मांडला, "माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहेत. सत्य माझा देव आहे. अहिंसा ते मिळवण्याचं साधन" असं ते म्हणाले होते.
हे वृत्त सतत अपडेट होत आहे. ( अधिक माहितीसाठी पेज रिफ्रेश करत राहा. )
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)