You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑलिम्पिक : फोगट बहिणींना जे जमलं नाही ते कुस्तीत साक्षी मलिकने करून दाखवलं होतं
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
साक्षी मलिकला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी पहिली महिला कुस्तीपटू म्हणून आपण ओळखतो.
2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल कमावत ही किमया तिने करून दाखवली. पण तिच्या ब्राँझ मेडलचा प्रवास अगदीच अनपेक्षित घटनांनी भरलेला होता.
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणं आणि तिथं मेडल मिळवणं हे तर प्रत्येकच खेळाडूचं स्वप्न असतं. पण तरीही साक्षी मलिकला 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत ब्राँझ मेडल जिंकलं तेव्हा तिचा स्वत:चाच त्यावर विश्वास बसत नव्हता.
आधी ती डोळे मोठ्ठे करून आपल्या कोचना शोधत राहिली आणि मग अविश्वासाने तिला रडूच फुटलं.
सुशील कुमारने बीजिंगमध्ये ब्राँझ आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर जिंकून भारतीय कुस्तीला वेगळ्याच उंचीवर पोहोचवलं होतं.
योगेश्वर दत्तलाही लंडनमध्ये ब्राँझ मिळालं आणि रिओनंतर साक्षी मलिक बनली कुस्तीचा महिला चेहरा. ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. पण, तिचा ऑलिम्पिक मेडलचा हा प्रवास भरपूर अनपेक्षित घटनांनी भरलेला आहे.
साक्षी मलिकचं कुस्तीतलं ब्राँझ मेडल
जेव्हा जगातले सर्वोत्तम वीस खेळाडू एकमेकांशी खेळणार असतात तेव्हा जिंकण्यासाठी तुम्हाला काय लागतं? मेहनत वगैरे तर आहेच. पण, त्याचबरोबर नशिबाची साथही लागते. तुमचं उत्तरही नशीबाची साथ हे असेल तर साक्षी मलिकही तुमच्याशी सहमत असेल.
सगळ्यात आधी 2016च्या ऑलिम्पिकसाठी साक्षी भारताची सर्वोत्तम दावेदार नव्हती. 58 किलो फ्रीस्टाईल गटात तिचा मुकाबला ऑलिम्पिक पात्रतेसाठी गीता फोगटशी होता. गीता कॉमनवेल्थ, एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडलमुळे चर्चेत होती.
पण, मंगोलियातल्या एका ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत गीताचा पहिल्या राऊंडमध्येच पराभव झाला. आणि नंतरच्या रेपिचाझ राऊंडमधूनही गीताने माघार घेतली.
ही गोष्ट कुस्ती फेडरेशनला रुचली नाही. तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. आणि म्हणून पुढच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी गीता ऐवजी साक्षी मलिकला देण्यात आली. ही संधी साक्षीने दोन्ही हातांनी उचलली. तिचं रिओचं तिकीट नक्की झालं.
रिओमध्येही विनेश फोगाटवर सगळ्यांची नजर, पण...
आता रिओ ऑलिम्पिकमध्येही साक्षी पेक्षा अनुभवी विनेश फोगाटच मेडलची दावेदार मानली जात होती. पण, क्वार्टर फायनलमध्ये दुर्दैवाने मॅच दरम्यानच तिला दुखापत झाली. म्हणजे विनेशला तिच्या नशिबाने दगा दिला.
तोपर्यंत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर एकही मेडल लागलेलं नव्हतं. सगळे घायकुतीला आले होते. बॅडमिंटनमध्ये सिंधू काय ती आगेकूच करत होती.
23 वर्षांच्या साक्षीने सुरुवातीच्या राऊंडमध्ये तर विजय मिळवले. पण, क्वार्टर फायनलमध्ये रशियाच्या वॅलेरिया कोबलोवाने तिचा 9-2 असा दारुण पराभव केला. पण इथंही साक्षीचं नशीब जोरदार होतं.
कारण कोबलोवा फायनलपर्यंत पोहोचली. त्यामुळे साक्षीला रेपिचाझचा फायदा मिळाला. रेपिचाझबद्दल सुशील कुमारच्या पदकाविषयी सांगताना सविस्तर लिहिलंय. तुम्ही ते इथं वाचू शकता- एकाच दिवशी कुस्तीचे तीन सामने जिंकत सुशील कुमारने मिळवलं होतं बीजिंगमध्ये ब्राँझ
रेपिचाझच्या दोन राऊंडमध्ये मात्र साक्षीने आपलं सर्वस्व पणाला लावलं.
0-5 पिछाडीवरून मारली बाजी
रेपिचाझच्या दोन्ही राऊंड साक्षीसाठी कठीण होत्या. पण, आतापर्यंत साक्षीचा उत्साह वाढलेला होता. मेडल तिच्या नजरेच्या टप्प्यात आलं असावं. त्यामुळे मॅटवर एक वेगळीच साक्षी दिसू लागली.
पहिल्या मॅचमध्ये मंगोलियाच्या ओरखॉनला तिने सर्व ताकदीनिशी हरवलं. नंतरच्या ब्राँझ मेडल मॅचसाठी तिचा मुकाबला किरगिझस्तानच्या तिनिबेकोवाशी होता. साक्षीचा निर्धार आता पक्का होता. पण नेमकी पहिल्या काही मिनिटातच तिला प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज न आल्यामुळे ती चक्क 0-5 अशी मागे पडली.
पण, साक्षी त्या दिवशी हार मानणार नव्हती. 'इरादा पक्का, तो दे धक्का' असं तिचं झालं होतं. आणि तिने शेवटी 8-5 असा विजय मिळवला. म्हणजे शेवटचे आठ पॉइंट तिने सलग जिंकले.
साक्षीला तो दिवस आजही आठवतो,
'मी 0-5 अशी मागे होते. पण, स्वत:ला बजावत राहिले की, अजून मॅचचा वेळ हातात आहे. जर आता नाही करून दाखवलं तर चार वर्षं थांबावं लागेल. आणि मी ते करून दाखवलं.'
साक्षीचा मॅचनंतरचा चेहराच सगळं काही सांगून जात होता. आधी तिचा विश्वासच बसत नव्हता आणि मग कोचनी खांद्यावर उचलून धरलं तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटला. आताही तिच्या बरोबरच्या कुस्तीपटूंना तिचं एकच सांगणं आहे, 'जर साक्षी करू शकते, तर तुम्हीही करू शकता!'
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)