'इंडियाज गॉट लेटेंट' सारख्या वादावर भारतीय कायदा काय सांगतो?

रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना

फोटो स्रोत, @BeerBicepsGuy/maisamayhoon

फोटो कॅप्शन, रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना
    • Author, अभिनव गोयल
    • Role, बीबीसी

युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' कार्यक्रमावरील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं केलेलं एक वक्तव्य वादाचं केंद्र बनलं आहे.

शो दरम्यान त्यानं एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या वैयक्तिक नात्याबद्दल अश्लील भाषेत एक प्रश्न विचारला होता ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

रणवीर अलाहाबादिया आणि त्या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमविरुद्ध अनेक राज्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला नोटीस पाठवल्यानंतर कार्यक्रमाचा 'तो' भाग काढून टाकण्यात आला आहे.

वाद वाढताना पाहून 12 फेब्रुवारीला समय रैनानं इंस्टाग्राम आणि एक्स वर पोस्ट लिहिली.

ज्यामध्ये त्यानं लिहिलं आहे की, "या प्रकरणात जे काही घडत आहे ते हाताळणं माझ्यासाठी कठीण होत चाललं आहे. मी माझ्या चॅनेलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत.

माझा उद्देश फक्त लोकांना हसवणं आणि त्यांचं मनोरंजन करणं हा होता. निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मी सर्व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार आहे."

याआधी रणवीर अलाहाबादिया यानंही या प्रकरणावर माफी मागितली आहे. तो म्हटलं होतं, "माझी टिप्पणी बरोबर नव्हती आणि ती मजेदारही नव्हती. विनोद हे माझं क्षेत्र नाही.

मी याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही. मला फक्त सर्वांची माफी मागायची आहे."

यूट्यूब किंवा सोशल मीडियावर अश्लीलता आणि अश्लीलता पसरवण्याचा आरोप केवळ 'इंडियाज गॉट लेटेंट'वरच नाही.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

अलिकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे.

मात्र अशा प्रकारचा कंटेंट तयार करण्यामागचं कारण काय आहे? त्याचा समाजावर काय परिणाम होतो? अशा प्रकरणासंदर्भात काय नियम आणि कायदे काय आहेत?

या क्षेत्रातले लोक काय म्हणतात?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्टँड अप कॉमेडियन संजय राजौरा सांगतात ते रणवीर अलाहाबादियाच्या टिप्पण्या आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमधील कंटेंटला विनोदी मानत नाहीत.

बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "जे चाललंय ते अगदीच डार्क ह्युमर नाहीये. जर तुम्ही जातीबद्दल बोलताना ब्राह्मणवादावर विनोद करत असाल किंवा होलोकॉस्टचा उल्लेख करताना पीडितांच्या समर्थनार्थ उभं राहत असाल तर त्याला नक्कीच डार्क ह्युमर म्हणता येईल. मात्र त्या शोमध्ये जे घडलं ते डार्क ह्युमरही नाहीये."

पुढं ते म्हणतात, "या प्रकारच्या कंटेंटमुळे मोठ्या प्रमाणावर असलेल्या एका लोकसंख्येचा बौद्धिक स्तर खालावत चालला आहे.

ती लोकसंख्या देखील या प्रकारच्या कंटेंटनं आनंदी असल्याची दिसते. असे शो पाहिल्यानंतर लोक मोठ्यानं हसतात याचं मला आश्चर्य वाटतं."

परंतु तरीही राजोरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विरोध करतात. त्यांना वाटतं की अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा अशा प्रकारची अश्लीलता दाखवली जात आहे परंतु असा निषेध तिथं दिसत नाही.

तर दुसरीकडं 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या सीझनचे विजेते सुनील पाल यांनी असा कंटेट तयार करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना

फोटो स्रोत, @SamayRainaOfficial

फोटो कॅप्शन, रणवीर इलाहाबादिया 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये दिसला होता.

बीबीसीशी बोलताना सुनील पाल म्हणतात, "जे शिवीगाळ करत आहेत ते कलाकार किंवा विनोदी कलाकार नाहीत. हास्य हे जगातील सर्वात मोठं औषध असल्याचं मानलं जातं, परंतु इथे हे लोक आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद असलेल्या इतक्या वाईट गोष्टी बोलत आहेत."

ते म्हणतात, "चार शिव्या देऊन अशा प्रकारचे लोक मोठमोठ्या व्यासपीठांवर पोहोचतात. ते व्ह्यूज आणि पैशासाठी नग्नतेकडे झुकत चालले आहेत."

"त्यांच्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांवर खूप दबाव वाढला आहे. आमचे कॉमेडी शो कमी झाले आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला खूप मोठं वैयक्तिक नुकसान सहन करावं लागत आहे."

व्यंगचित्रकार आलोक पुराणिकही असंच काहीसं म्हणतात. जास्त पैसे आणि व्ह्यूज मिळवण्याच्या लोभात असे शो बनवले जात आहेत असं त्यांचं मत आहे.

ते म्हणतात, "ही समस्या खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षांत स्टँड-अप कॉमेडीचं एक वर्तुळ तयार झालं आहे. ज्या प्रकारची भाषा त्यात वापरली जाते ती त्या वर्तुळातच स्वीकार्य आहे.

परंतु जेव्हा ती मोठ्या सार्वजनिक व्यासपीठावर येते तेव्हा लोकांना त्याचा धक्का बसतो."

पुराणिक म्हणतात, "सगळ्यात कठीण वाटणाऱ्या गोष्टी सभ्य भाषेत बोलता येतात. लोकांना हसवणं आणि व्यंग्य किंवा विनोद करणं हे एखाद्या शस्त्रक्रियेसारखं असतं. एक इंच कट जरी इकडं तिकडं झाला तरी परिस्थिती बदलून जाते."

मात्र स्टँड अप कॉमेडियन विशाल जादौन यांचं मत आलोक पुराणिक यांच्या मतापेक्षा वेगळं आहे.

ते म्हणतात, "देशातील राजकीय पक्षांशी संबंधित अनेक लोक सार्वजनिकरित्या शिवीगाळ करतात आणि द्वेष पसरवतात परंतु त्यांच्याविरुद्ध काहीही घडत नाही."

जदौन म्हणतात, "समय रैना शोमधील वादग्रस्त कंटेंट हा फक्त पैसे देऊन पाहता येतो. याचा अर्थ लोक तिथं स्वेच्छेनं जातात. मी सुद्धा स्टँड-अप करताना अपशब्द वापरतो. सेक्स, महिला, मासिक पाळी आणि पालकांबद्दल बोलतो."

पुढं तो म्हणतो, "ओटीटी हे एक मोठं व्यासपीठ आहे. त्यांना लक्ष्य करणं कठीण आहे. आमच्यासारख्या स्टँड-अप कॉमेडियनना कोणीही काहीही बोलू शकतं.

मी घाणेरड्या आणि गडद दोन्ही प्रकारच्या गोष्टी बोलतो, पण जर लोक तुमच्या कंटेंटवर हसत असतील तर ते दुखावले जात नाहीत."

जादौन असंही म्हणतात की लोक अशा कंटेंटला जास्त लाईक्स मिळवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.

ओजी क्रू यूट्यूब चॅनेलवर प्रसारित झालेल्या एका भागातील दोन व्यक्ती

फोटो स्रोत, OG Crew

फोटो कॅप्शन, ज्या प्रश्नावर रणवीर अलाहाबादियाचा प्रश्न विचारला जात आहे तोच प्रश्न या भागात विचारण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणात एफआयआर दाखल करणं म्हणजे आवाज दाबण्यासारखं आहे, असं मत 'भगत राम' नावाचा यूट्यूब चॅनल चालवणारे रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केल आहे.

ते म्हणतात, "हा कंटेट अश्लीलतेच्या श्रेणीत येतो, मात्र याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही गुन्हा दाखल करावा. आजकाल दुखावलं जाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. जे लोक स्वतः अपशब्द वापरतात ते ही दुखावले जात आहेत."

रवींद्र चौधरी हे ओजी क्रू यूट्यूब चॅनेलवर प्रसारित झालेल्या एका भागाचा संदर्भ देतात . ते म्हणतात की रणवीर इलाहाबादियाच्या ज्या प्रश्नावर इतका वाद आहे, तो याच भागातून घेतला गेला आहे.

ते म्हणतात, "या भागात 9.48 मिनिटांनी सॅम हा अॅलनला तोच प्रश्न विचारतो जो रणवीरनं इंडियाज गॉट टॅलेंटमधील स्पर्धकाला विचारला आहे."

रवींद्र म्हणतात, "बहुतेक स्टँड अप कॉमेडियन इतरांच्या कंटेंटची नक्कल करतात, जो की भारतात चालतच नाही उलट कधीकधी मोठ्या वादाचं कारणही बनतात."

याउलट दोन वर्षांपासून स्टँड-अप कॉमेडी करणारा अक्षत कैन म्हणतो, " शिव्या आणि अपशब्द हे आशयामध्ये नसतात ते समाजात असतात. म्हणून ते आशयाचा एक भाग बनतात."

तो म्हणतो, "प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. कलाकाराचं जसं जसं वय वाढत जातं, तसं तसं त्याला स्थिरता मिळत जाते. जी त्याच्या आशयामध्येही दिसून येते."

या प्रकरणात भारतीय कायदा का सांगतो?

वेळोवेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालय अश्लील सामग्री तयार करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि ते प्रसारित करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करत असते.

मार्च 2024 मध्ये मंत्रालयानं अश्लील सामग्री तयार आणि प्रसारित केल्याबद्दल 18 ओटीटी प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक केले होते. सोशल मीडिया अकाउंट्सपैकी 12 चॅनेल यूट्यूबचे होते.

ही कारवाई करताना तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले होते की, 'सर्जनशील अभिव्यक्तीच्या' नावाखाली अश्लीलता पसरवता येणार नाही.

त्यावेळी हा निर्णय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या तरतुदींनुसार घेण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील दिनेश जोतवानी म्हणतात, "फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नियमांचं पालन करावं लागतं. मंत्रालय वेळोवेळी या प्लॅटफॉर्मना समन्स जारी करत असतात जे त्यांना भारतात पाळावे लागतात."

प्रातिनिधीक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अश्लील साहित्य तयार करणे आणि पसरवणे यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे

जोतवानी पुढं म्हणतात, "भारतीय दंड संहितेच्या कलम 294 आणि 296 अंतर्गत अश्लीलता निर्माण करणं आणि पसरवणं हा गुन्हा आहे.

कलम 294 मध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंत आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. कलम 296 मध्ये तीन महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. दोन्ही कलमांखाली दंड देखील आकारला जातो."

जोतवानी सांगतात, आक्षेपार्ह टिप्पण्या देणारे रणवीर इलाहाबादिया, समय रैना तसेच शोची निर्मिती करणारे इतर कलाकार यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यांच्याविरुद्ध अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहेत.

ते म्हणतात, "त्यांना या कलमांखाली जामीन मिळेल, पण त्यांना खटल्याला उपस्थित राहावं लागेल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल केलेल्या एफआयआर एकत्रित करून एकच एफआयआर दाखल करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. अन्यथा त्यांना जामीन मिळवण्यासाठी प्रत्येक राज्यात जावं लागेल."

जोतवानी म्हणतात की जर कोणी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित केली तर त्याच्यावर आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

या कलमाअंतर्गत पाच लाख रुपये दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

अशा प्रकारच्या वादाचे सामाजिक परिणाम

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक सुरिंद्र सिंग जोधका म्हणतात की अशा परिस्थितीत नैतिक भूमिका घेणं इतकं सोपं नाही.

ते म्हणतात, "या प्रकारचा कंटेंट आपल्या समाजाचं सत्य सांगत असतो. लाखो लोक त्यांना ऐकत आहेत त्यामुळे असं दिसून येतं की लोक अशा प्रकारचं बोलतात. फरक इतकाच आहे की आता ते सार्वजनिक ठिकाणी घडू लागलं आहे."

जोधका म्हणतात, "सोशल मीडियानं समाजाला बदलला आहे. पूर्वी लोक एकमेकांना भेटायचे आणि बोलायचे. आता नवउदारमतवादी भांडवलशाही आली आहे.

प्रत्येकाला स्वतःच्या हिताची काळजी आहे. मध्यमवर्गाची चिंता वाढत आहे. त्यांच्याकडं राजकीय आंदोलनं आणि अशा गोष्टींसाठी वेळ नाही."

ते म्हणतात, "यामुळे जी जागा रिकामी झाली आहे ती अशा प्रकारच्या कंटेंटनं व्यापली आहे. प्रत्येकजण मोबाईल घेऊन बसला आहे, त्यामुळे त्याचा खपही वाढत आहे."

प्रातिनिधीक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अलिकडच्या काळात स्टँड अप कॉमेडीचा ट्रेंड वाढला आहे.

या वादाच्या दरम्यान त्यांनी एक मोठी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना वाटतं की "या प्रकारच्या वादानंतर सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचा मतप्रवाह समाजात निर्माण होतो.

ज्यामुळे सरकारला कायदे करण्याची संधी मिळते. या प्रक्रियेत बहुमत असलेल्यांची नैतिकता वर्चस्व गाजवते आणि समाजाच्या लोकशाहीवादी मतासाठी कोणतंही स्थान उरत नाही."

जोधका म्हणतात, जर हे प्रकरण या दिशेनं गेलं तर ते विशेषतः महिलांच्या विरोधात जाईल. कारण नैतिकतेमुळे त्या सोशल मीडियावर लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलू शकणार नाहीत आणि वैवाहिक बलात्कारासारख्या गोष्टी कधीही सभ्यतेच्या सीमा तोडू शकणार नाहीत.

ते म्हणतात, "या गोष्टींकडं लोक इतकं आकर्षित का होत आहेत याचं कारण काय आहे? यावर गंभीर संशोधन करण्याची गरज आहे.

ज्यामध्ये लोकांना विचारलं पाहिजे की ते असे कार्यक्रम का पाहतात आणि त्यांना त्यात काय आवडतं. त्यानंतरच आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकू."

लहान मुलांवर काय परिणाम होतो?

सर गंगा राम हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. रिचा सिंग यांचं मत आहे की अश्लील कंटेटचा 13 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांवर सर्वात जास्त विपरीत परिणाम होतो.

त्या म्हणतात, "किशोरावस्थेदरम्यान मुलांच्या शरीरात बदल होत असतात. शारीरिक बदल दिसून येतात पण मानसिक बदल तितकेसे दिसून येत नाहीत. त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो, ज्यामुळे मुलं त्यांच्या मित्रांचं अधिक ऐकू लागतात."

डॉ. रिचा म्हणतात, "वयाच्या या टप्प्यावर मुलांना वाटत असतं की ते खास आहेत. जेव्हा मुलं पाहतात की कोणीतरी शिवीगाळ करून किंवा अश्लील बोलून छान वाटत आहे आणि त्यामुळे लोक त्यांना पसंत करत आहेत, तेव्हा त्या गोष्टींची ते नक्कल करण्याचा प्रयत्न करतात.

त्याचा परिणाम असा होतो की ज्या घरांमध्ये शिवी किंवा अपशब्द वापरले जात नाहीत अशा घरांमध्येही ते पोहोचतात."

त्या म्हणतात, "अशा परिस्थितीत मुलं भरकटतात आणि त्यांची जोखीम घेण्याची वृत्ती अधिक मजबूत होते, जी कधीकधी त्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरते."

प्रातिनिधीक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञांचा असा दावा आहे की जी मुलं मोबाईल फोनवर अश्लील सामग्री पाहतात त्यांना चिंता आणि पॅनिक अटॅकचा धोका जास्त असतो.

ओडिशातील कटक येथे राहणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सम्राट कर यांनीही असंच काहीसं सांगितलं आहे. ते म्हणतात की पौगंडावस्थेत मूल जे पाहत असतं तेच ते शिकत असतं

डॉ.सम्राट कर म्हणतात, "मुलांना अश्लील कंटेंट पाहण्यासाठी गोपनीयतेची आवश्यकता असते. ज्यामुळे ते त्यांच्या पालकांपासून दूर राहू लागतात.

अशा कंटेंटचं जास्त निरीक्षण केल्यानं मूल नियोजनाच्या टप्प्यावर पोहोचू शकतं आणि मोठे गुन्हे देखील करू शकतं."

ते म्हणतात, "पालक म्हणतात की त्यांची मुलं जास्त अश्लील कंटेंट पाहतात. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला कळतं की पालक घरी मोबाईल फोन जास्त वापरतात.

त्यांना पाहून मूल त्यांचंच अनुसरण करत असतं. बऱ्याच प्रकरणांमध्ये पालक त्यांचे फोन मुलांना देत असतात आणि त्यामुळे त्यांच्या फोनवर दिसणारा कंटेंट मुलांपर्यंत पोहोचतो."

डॉ. सम्राट म्हणतात, "यामुळे मुलांचे हृदयाचे ठोके, चिंता आणि पॅनिक अटॅक वाढतात"

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.