Freedom of Expression: 'कविता नव्हे तर शब्दांवर आक्षेप घेणारे स्वत:च्याच अभिव्यक्तीची कबर खणतायत'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जयंत पवार
- Role, ज्येष्ठ लेखक
कवी हे कायम समाजाच्या चिंतेचा विषय राहिलेले आहेत, असं मानायला बक्कळ पुरावे आहेत. समाज कवींना जोजवतो, मोठं करतो, त्यांच्या शब्दांवर डोलतो, पण कवी त्याच्या वर्मावर घाव घालत नाही तोवर.
समाजाने बाळगलेली नीतिमत्ता जोवर कवी गोंडस हळव्या शब्दांच्या फुलोऱ्यात नजाकतीने मांडतो, समाजाच्या भावना आणि सुप्त अहंकाराला हुळहुळं करतो, तोवर तो समाजाच्या लेखी प्रतिभेचा लखलखता तारा ठरतो.
पण त्याचं नख लागताच त्याला ठेचायला वा त्याचा बंदोबस्त करायला समाज कमी करत नाही.
अर्थात सगळा समाज असा नसतो. किंबहुना समाज एकसंध नसतोच. ज्यांच्या हातात संस्कृतीच्या नाड्या आहेत, असा समाजातला स्वयंघोषित ठेकेदार वर्ग असे निर्णय घेतो.
ज्ञानेश्वर-तुकारामापासून ही परंपरा चालत आली आहे ती थेट आताच्या काळातल्या वसंत दत्तात्रय गुर्जर, विष्णू सूर्या वाघ, दिनकर मनवर या कवींपर्यंत. त्यात आता गोव्यातले कोंकणी कवी निलबा खांडेकर यांचीही गणना करायला हरकत नाही.
तीन वर्षांपूर्वी गोव्यातच जी परिस्थिती विष्णू सूर्या वाघ यांच्या 'सुदिरसुक्त' या कोंकणी कवितासंग्रहाच्या बाबतीत उद्भवली होती, काहिशी तशीच ती निलबा खांडेकर यांच्या 'द वर्ड्स' या साहित्य अकादमी विजेत्या काव्यसंग्रहावर ओढवलेली आहे.
गोवा कोंकणी अकादमी या गोवा राज्य सरकारच्या छत्राखाली चालणाऱ्या संस्थेने दोन वर्षांपूर्वी कोंकणी साहित्याला उत्तेजन मिळावं म्हणून कोंकणी लेखक-कवींच्या पुस्तक खरेदीची योजना आखली व त्यासाठी एक उपसमिती नेमली.
'प्रकाशन पालव योजना' असं या योजनेचं नाव. या योजनेमुळे दर्जेदार साहित्याचा प्रसार होईल आणि त्याच्या विक्रीला चालना मिळेल, असा यामागचा हेतू.
या समितीने या योजनेअंतर्गत 64 पुस्तकांची निवड केली, ज्यात निलबा खांडेकर यांच्या 'द वर्डस' या काव्यसंग्रहाचा समावेश होता. पण कालांतराने अकादमीच्या उपसमितीच्या असं लक्षात आलं की, या काव्यसंग्रहातल्या 'गॅंगरेप' या कवितेतले 'थान' (स्तन) आणि 'योनी' हे शब्द "भयंकर अश्लील आणि आक्षेपार्ह" आहेत.
असे शब्द असलेल्या कवितेचं पुस्तक आपण मुलांच्या हातात कसं द्यायचं? त्यांच्यावर कोणते संस्कार होतील? स्त्रियांच्या अवयवांचे असे उल्लेख करणं हे तर स्त्रियांसाठी केवळ अपमानास्पद आहे, असं पुस्तक निषेधार्हच नव्हे तर त्याज्य आहे.
अकादमीच्या तत्कालीन अध्यक्ष स्नेहा मोरजकर यांनी तर बाहेरच्या अनेक लोकांचा या कवितेवर आक्षेप असल्याचं पत्र दाखवलं. बराच खल झाला. समितीतल्या फक्त भूषण भावे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आणि राजू नायक यांनी म्हटलं की, किमान अकादमीच्या वाचनालयासाठी तरी मोजक्या प्रती घ्याव्यात.
पण या दोघांव्यतिरिक्त अन्य सर्व सदस्यांनी पुस्तकाच्या खरेदीला विरोध केला. शेवटी 'द वर्ड्स' या काव्यसंग्रहाच्या प्रतींच्या खरेदीची ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय अकादमीच्या त्रिसदस्यीय कार्यकारिणी समितीने घेतला.
या समितीतले एक सदस्य, साहित्यिक प्रकाश पेर्येकर असं म्हणत होते की "मला काही या कवितेत अश्लील वा आक्षेपार्ह आढळलं नाही. मी या बंदीच्या विरोधात आहे. हा निर्णय स्नेहा मोरजकर यांचा आहे."
पण निलबा खांडेकर यांनी माहिती अधिकाराखाली समितीच्या बैठकीचा वृत्तांत मागवला, तेव्हा त्यात प्रतींची ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्याबद्दल प्रकाश पेर्येकर, कार्यकारी समितीचे काशिनाथ नायक आणि विन्सी काद्रुश या अन्य दोन सदस्यांचंही एकमत झालं होतं, अशी नोंद असल्याचं दिसतं.
शिवाय स्नेहा मोरजकर यांनी ज्या बाहेरच्यांच्या पत्राचा उल्लेख केला होता, तशी कुठलीही पत्र राजभाषा संचलनालयाकडे आलेली नसल्याचा खुलासा करणारं पत्र संचलनालयाच्या माहिती अधिकाऱ्यांनी दिलं आहे. पुस्तकाची खरेदी न करण्याचा निर्णय उपसमिती आणि कार्यकारी समिती आणि अध्यक्षांनी एकमताने घेतलेला आहे.
ज्या समितीमध्ये लेखक-कवी आणि भाषा अभ्यासक यांचा बहुसंख्येने समावेश आहे, त्यांनी एका कवीच्या कवितांना अश्लील-आक्षेपार्ह ठरवून, त्या समाजातल्या सर्व लोकांना वाचायच्या लायकीच्या नाहीत, असा निर्णय का घेतला असावा?
'द वर्डस'ची पुस्तक खरेदी योजनेसाठी निवड ते त्याची रद्दबातलता, यादरम्यान या कवितासंग्रहाला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार, हे तर यामागचं कारण नाही ना?

फोटो स्रोत, Nilaba Kahndekar
गोव्यातल्या साहित्य जगताचा कानोसा घेतल्यावर असं म्हणणारे बरेच जण आढळतात की साहित्य अकादमी पुरस्कारावर डोळा ठेवून इथे हेव्यादाव्याचं राजकारण चालतं, आणि मग ज्याला पुरस्कार मिळतो त्याच्यावर कुरघोडी करण्यासाठी, त्याला अडवण्यासाठी वाट्टेल त्या थराला लेखक-कवी जातात.
निलबा खांडेकर यांचं पुस्तक खरेदीपासून रोखण्यासाठी साहित्य अकादमी पुरस्काराचे इच्छुक असलेले एक कोंकणी कवी सूत्र हलवीत होते, अशी एक कुजबूज गोव्यातील साहित्य वर्तुळात आहे. याच कवीचं नाव विष्णू सूर्या वाघ यांच्या 'सुदिरसुक्त' कविता संग्रहाबाबत जातीय वाद उठवून त्याला पुरस्कार मिळू न देण्याच्या राजकीय मोहिमेचे सूत्रधार म्हणून घेतलं जात होतं.
काही का असेना, एका कवीच्या विरोधात सगळे लेखक-कवी सरसावले आणि ते देखील कवीच्या पुस्तकातल्या 43 कवितांपैकी एकाच 'गॅंगरेप' नावाच्या कवितेत 'थान' आणि 'योनी' हे शब्द आल्याने समाजाच्या नैतिक चिंतेने कासाविस होऊन एकवटले. ही तीच कविता आहे, जिची साहित्य अकादमी पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी विशेष प्रशंसा केली आहे.
तसं पाहिलं तर एखाद्या सरकारी संस्थेच्या समितीतील लोकांनी एका विशिष्ट पुस्तकाच्या 90 प्रती विकत घेण्याचा निर्णय रद्दबतल ठरवणं, ही काही तशी मोठी गोष्ट नाही. सरकार धार्जिण्या संस्थांमधले मुखंड स्वत:कडे शहाणपणाचा मक्ता घेऊन अशी मनमानी करतच असतात, यातही काही नवं नाही. आणि यामुळे पुस्तकाचा लेखक-कवी आणि प्रकाशक यांचं फार मोठं नुकसान होणार आहे, असंही काही नाही.
मग या तुलनेत किरकोळ भासणाऱ्या घटनेची दखल कशासाठी घ्यायची? कशासाठी तिला इतकं महत्त्व तरी द्यायचं?
याचं उत्तर असं आहे की, अशा घटनेत विशिष्ट कवीचं काही नुकसान नाही तर सगळ्या लेखक-कवींचं नुकसान आहे आणि कुणाचीही जीभ छाटण्याच्या मूठभरांना मिळणाऱ्या अधिकाराची भीती यात अधिक आहे. अशा घटनेविरोधात न बोलणं म्हणजे अशा अधिकारांसमोर मान तुकवणं, त्यांना मूक संमती देणं. म्हणून तिची दखल घ्यायची.

फोटो स्रोत, Manswini Prabhune
कवींच्या बंदीवरच्या सगळ्या प्रकरणांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे, अनेकांना कवीच्या शब्दांची भीती वाटते. चिंता वाटते. घृणा वाटते. असे हे बंदीयोग्य कवी त्यांना आपल्यावरची आफत वाटते.
कारण आपल्या कल्पनेतल्या संस्कारी समाजाला त्यांचे शब्द धोका पोचवतात. त्याच्या धारणांना छेद देतात. त्याच्या मनात नको त्या प्रतिमा निर्माण करतात. त्याला प्रक्षुब्ध करतात.
कदाचित त्यामुळे तो समाजच धोकादायक वळणावर जाईल, असा काल्पनिक भयगंड या मंडळींना सतावत असतो. संत तुकारामांच्या अभंगातल्या 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी' या ओळीचं 'भले तरी देऊ कासेची लंगोटी', असं तथाकथित शुद्धीकरण करणारे आचार्य प्र. के. अत्रे यांच्या मनात असाच भयगंड नव्हता ना, असा प्रश्न पडतो.
मर्ढेकरांच्या 'माझे लिंग शिवलिंग' या ओळीतली लिंगवाचक तुलना संस्कृतीरक्षकांना झोंबली आणि मर्ढेकरांना अश्लीलताविरोधी खटल्याला सामोरं जावं लागलं तर वसंत गुर्जरांच्या 'गांधी मला भेटला' कवितेतली शब्दवर्णनं वाचून (ज्यांनी हयातभर गांधीजींना पाण्यात पाहिलं असे) पतित पावन संघटनेचे सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी गुर्जरांना कोर्टात खेचलं.
पोलिसांनीही कवीवरच्या या कारवाईत 'न भुतो' अशी तत्परता दाखवली. विष्णू सूर्या यांच्या 'सुदिरसुक्त' मधल्या 63 कवितांमधल्या चार ओळी विशिष्ट समाजगटातल्या लेखक-कवी-राजकारण्यांना जातीयद्वेषाने भारलेल्या, निरर्गल आणि आत्यंतिक आक्षेपार्ह वाटल्या, तर दिनकर मनवरच्या 'पाणी कसं असतं' या कवितेतल्या 'अदिवासी मुलींच्या स्तनासारखं जांभळं' या एका ओळीवर समाजातल्या सगळ्या आदिवासी-बिगर आदिवासी संघटना पेटून उठल्या आणि कवीला तुरुंगात टाकण्याची भाषा करू लागल्या.
ज्यांनी आयुष्यात आपल्या शालेय वर्षांतला किरकोळ भाग सोडला तर कविता कधी वाचलेली नसते, ज्यांना कविता म्हणजे काय हे माहीत नसतं, ज्यांना कवी आणि कवितेशी काहीही देणं घेणं नसतं असे लोक मूठभर 'अकवितिक' लोकांच्या बहकाव्याला बळी पडून कवींच्या विरोधात गोळा होतात.
त्या मूठभर लोकांना आपले उपद्रवकारी हितसंबंध शाबूत ठेवायचे असतात अथवा निर्माण करायचे असतात, हे अशा मोहिमांच्या मागचं प्रमुख कारण आहे. त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो आणि त्यांच्या गुडघ्यात राजकारणाच्या वाट्या बसवलेल्या असतात.
त्यांच्या सहाय्याने ते लेखक-कवींवर दहशत निर्माण करतात, कारण लेखक-कवी निरुपद्रवी असतात आणि त्यांच्या मागे तसलेच निरुपद्रवी लेखक-कवी सोडून कोणी उभं राहाणार नाही, याची त्यांना खात्री असते.
असा समाजातला उपद्रवकारी मुखियागट भयावह असतो. पण हा लेख गोव्यातल्या ज्या घटनेच्या निमित्ताने लिहिला जातो आहे, त्यात गुंतलेली उपद्रवकारी शक्ती जास्त भयावह आहे.
कारण ही शक्ती समाजातल्या 'अ-साहित्यिक' लोकांची नाही, तर खुद्द साहित्यिकांची आहे. निलबा खांडेकरांची 'गॅंगरेप' ही कविता त्यातल्या 'थान' आणि 'योनी' या दोन शब्दांच्या वापराने अश्लील, आक्षेपार्ह आणि वाचकांसाठी अहितकारक असल्याचा निर्णय घेणारे लोक हे साहित्यिक आहेत, लेखक आणि कवी आहेत.
त्यांनी कविता नव्हे तर शब्द अश्लील ठरवले आहेत. त्यांना हे समजायला हवं की, कोणताही शब्द अश्लील नसतो. तो नाम, सर्वनाम, क्रिया, क्रियापद, विशेषण यांचं सूचन करत असतो. त्याला विशिष्ट अर्थ जरूर असतो. अनेकदा एका शब्दाला अनेक अर्थही असतात.
पण हा शब्द जेव्हा कवितेत येतो अथवा साहित्यात येतो तेव्हा त्याचा अर्थ बदलतो. तो केवळ अभिधेने घ्यायचा अर्थ उरत नाही तर अनेकदा त्यात लक्षणा आणि व्यंजनाही उतरते. कवितेतले शब्द कवितेला अर्थबहुलता देतात. या अर्थानुसार साहित्याची परिमाणं बदलतात.

फोटो स्रोत, Getty Images
साहित्य श्लील किंवा अश्लील नसतं तर त्याच्यामुळे वाचकाच्या मनात जी प्रतिमा निर्माण होते तिची स्वत:च्या पूर्वसंस्कारांशी सांगड घालत तो श्लील-अश्लीलतेची भानगड निर्माण करतो.
वाचक जितका खुला असेल तितका तो अशा भानगडींपासून मुक्त असतो. मात्र तो सोवळ्यातला असेल, संस्कारांनी स्वत:ची झाकपाक करणारा असेल तर गडबडून जातो. अशा सोवळ्या वाचकांच्या हितसंबंधासाठी मुखंड शिमगा करतात.
निलबा खांडेकरांच्या प्रकरणात असा शिमगा स्वत: साहित्यिकच करू लागले आहेत. ते शब्दांचाच बाऊ करू लागले आहेत. कुठले शब्द कवितेत वापरावेत, कुठले वापरू नयेत याची उठाठेव करू लागले आहेत.
अकादमीच्या उपसमितीत म्हणे कुठल्या गोष्टी आक्षेपार्ह ठरू शकतील याची नोंदसूची तयार करण्याची सूचना काही साहित्यिकांनी केली. छान, म्हणजे जिथे स्वीकारशीलता हवी तिथे वगळण्याला प्राथमिकता. नाकारायचं काय ते आधी ठरवू, मग काय काय घ्यायचं ते बघू.
आता काही महाभाग असंही विचारणारे निघतील की, 'थान' आणि 'योनी' हे शब्द वाचल्यावर वाचकाच्या डोळ्यासमोर कोणती प्रतिमा उभी राहील? यात समितीतल्या स्त्री-साहित्यिकही असतील. त्यांनी आणि पुरुष साहित्यिकांनीही आधी या प्रश्नाचं उत्तर द्यावं, की 'स्तन' आणि 'योनी' हे स्त्रीचे अवयव आहेत की नाही?
आपल्याला हे अवयव असल्याची कुठल्या स्त्रीला लाज वाटते का? मग त्यांचं शब्दरूप वाचताना का लाज वाटेल? लिंगवाचक विविध शब्द प्रत्येक भाषेमध्ये आहेत आणि प्रत्येक भाषिक गटा-पोटगटात ते सर्रास सहज उच्चारले जातात. या शब्दांना कसली आली आहे अश्लीलता?
ती असलीच तर तुमच्या मनात आहे आणि ती देखील तुमच्यात तुमच्या विकृत झाकपाक संस्कृतीने निर्माण केलेली आहे. तेव्हा प्रथम तुमच्या मनातल्या सोवळ्या-ओवळ्या कल्पनांना मुक्ती द्या किंवा त्यांना गाडून टाका, तरच साहित्य मुक्त होईल.
आपल्याला अदिवासी स्त्रीच्या लैंगिक शोषणाविषयी काही म्हणायचं नसतं, पण तिच्या स्तनाचा उल्लेख येताच आम्हाला ती कवीची लैंगिक विकृती वाटते. गॅंगरेप होत असताना आमच्या संवेदनशील मनावर ओरखडा उठत नाही वा त्याविरोधात आम्ही संतापून उठत नाही, पण त्याच्या वर्णनाने मात्र स्त्रीदेहाचा अपमान झाल्यासारखा वाटतो. यालाच दांभिकता म्हणतात. साहित्यिकही याच दांभिकतेचे झगे चढवतात आणि शब्दांना अश्लील ठरवत आपली लाज उघडी करतात.

फोटो स्रोत, Manswini Prabhune
शब्द हेच लेखक-कवींचं अस्त्र असतं. 'अम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू' असं सांगणाऱ्या तुकारामाचे आम्ही वंशज आहोत. शब्दांना घाबरणारे आणि त्यांचं अवडंबर माजवून दुसऱ्या लेखक-कवींच्या उच्चारस्वातंत्र्यावर टाच आणणारे साहित्यिक हे साहित्यिक नव्हेतच.
ते अंतिमत: स्वत:च्याच अभिव्यक्तीची कबर खणत असतात आणि शब्द वापरण्याचं आपलं स्वातंत्र्य गमावत असतात. लेखकपणाच्या मुळावर येणारी त्यांची ही वृत्ती क्षुद्र राजकारणातून जन्माला आलेली असली तरी ती धिक्कारार्ह आहे आणि अस्सल अनुभूतीसाठी शब्द पणाला लावणाऱ्या लेखक-कवींसाठी लाजिरवाणी आहे!
(लेखक मराठीतील महत्त्वाचे नाटककार, कथाकार, नाट्य समीक्षक आहेत. ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आहेत. या लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








