इंत्रुज माहीत आहे का? पाहा गोव्यातल्या कार्निव्हलची धूम

फोटो स्रोत, Nihar K / BBC
- Author, मनस्विनी प्रभुणे नायक
- Role, बीबीसी मराठीसाठी
फेब्रुवारी महिना उजाडताच गोव्यात कार्निव्हलची तयारी सुरू होते. संगीत, नृत्य यांच्याबरोबरीनं वेगवेगळे आकर्षक चित्ररथ हे कार्निव्हलचं मोठं आकर्षण असतं. लहान-मोठे, वृद्ध अशा सगळ्यांना सामावून घेणारा कार्निव्हल पर्यटकांसाठी देखील उत्सुकतेचा विषय असतो.
ब्राझीलच्या रिओ दी जानिरोचा कार्निव्हल जगप्रसिद्ध आहे. आता गोव्याचा कार्निव्हलसुद्धा त्याच पद्धतीने जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरतो आहे. गोव्यातल्या कार्निव्हलला धार्मिकतेपेक्षा सामाजिक संदर्भ अधिक आहेत.
गोवा राज्य हे पर्यटनासाठी ओळखलं जाणारं राज्य आहे. त्यामुळे गोव्यात होणारं कार्निव्हल हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतं. त्यामुळे पर्यटक मुद्दाम या काळात सुट्टी काढून कार्निव्हल बघायला येतात.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
कार्निव्हलचा इतिहास
मुळात कार्निव्हलला सुरुवात झाली ती पोर्तुगीजांमुळे. पाश्चिमात्य देशांत रोमन कॅथलिक समाजात कार्निव्हल साजरा करण्याची प्रथा दिसून येते. गोव्यात आल्यावर पोर्तुगीजांनी इथेही कार्निव्हलला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
मूळ 'लेट लॅटीन' भाषेमध्ये कार्निव्हल या शब्दाचा अर्थ 'मांसाचा त्याग' असा होतो. पण यातील 'कार्नी' या शब्दाचा अर्थ 'देह किंवा कात/कातडं' असा होतो. याशिवाय आपली कात दाखवणं असाही अर्थ होतो.
पोर्तुगीजांचीच एक वसाहत असलेल्या ब्राझीलमधील रिओ दि जानिरोचा कार्निव्हल जगप्रसिद्ध आहे. रिओच्याच धर्तीवर गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलकडे बघितलं जातं.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
खास गोवन 'इंत्रुज'
गोव्यात कार्निव्हलला 'इंत्रुज' हा शब्द प्रचलित होता. पोर्तुगीजांनी जरी कार्निव्हलची सुरुवात करून दिली असली तरी गोमंतकीयांनी त्याला इथल्या मातीचा रंग दिला. हिवाळा संपताना आणि उन्हाळा सुरू होत असताना वसंत ऋतूत हा उत्सव साजरा होत असताना त्याला धार्मिकतेपेक्षा सामाजिक संदर्भ जास्त जोडले गेले.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
एकत्र येऊन 'खा-प्या-मजा करा' असा संदेश हा उत्सव देतो. गोव्यातील आंबवली भागात आजही पारंपरिक पद्धतीने इंत्रुज साजरा केला जातो. ढोल, घुमट, समेळ, कानसाळे या पारंपरिक वाद्यांचं वादन होतं. या वाद्यांच्या तालावर फेर धरून नृत्य केलं जातं. हा सगळा प्रकार बघण्यासारखा असतो.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
गोव्यात कार्निव्हलला सुरुवात झाली तेव्हा फक्त पणजीमध्येच हा उत्सव साजरा व्हायचा. तो बघायला गोव्यातील गावागावांमधून लोक जमा व्हायचे मग हळूहळू गोव्यात सर्वत्र कार्निव्हलचं आयोजन होऊ लागलं.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
कार्निव्हल म्हणजे नेमकं काय?
कार्निव्हल हा मुळात सार्वजनिक उत्सव आहे. कार्निव्हल म्हणजे रंगीबेरंगी वेशभूषा आणि विविध मुखवटे परिधान करून काढलेली मिरवणूक. आपला सामाजिक दर्जा विसरून कार्निव्हलच्या निमित्ताने सर्वजण एकच आहोत हे दाखवण्याचं निमित्त मानलं गेलं आहे.

फोटो स्रोत, Nihar K.
कार्निव्हलमध्ये चेहऱ्यावर मुखवटे लावून, आपला मूळ चेहरा लपवून, रंगीबेरंगी कपडे घालून संपूर्ण शहरभर फेरी काढली जाते.
मुखवट्यांचा उत्सव म्हणूनही कार्निव्हलला ओळखलं जातं. अनेक जण कार्निव्हलमध्ये चेहऱ्यावर मुखवटे लावून सहभागी होतात.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
कार्निव्हलकडे युरोपियन लोकसंस्कृतीचे प्रतीक म्हणून बघितले जाते. मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असलेला उत्सव म्हणून याकडे बघितलं जातं.

फोटो स्रोत, Nihar K / BBC
गोव्याच्या कार्निव्हलमध्ये पाश्चिमात्य आणि गोमंतकीय अशा दोन्ही संस्कृतीचा संगम दिसून येतो. कार्निव्हलमध्ये वाजवली जाणारी गाणी देखील पाश्चिमात्य आणि गोमंतकीय संगीताचं फ्यूजन स्वरूपात असतात.

फोटो स्रोत, Nihar K
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








