महागडे कफ सिरप की लिंबू आणि मधाचं पाणी, खोकल्यावर काय जास्त परिणामकारक?

    • Author, ॲलेक्स टेलर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हिवाळ्यात खोकल्याचा त्रास ही सामान्य बाब आहे. या काळात अनेकांना खोकला लागतो. त्यामुळे घरात, ऑफिसमध्ये आणि बस-रेल्वेत सगळीकडे खोकला लागलेले लोक दिसतात.

खोकल्यावर लगेचच औषधांवर अवलंबून न राहता थोडा वेळ द्यावा आणि पाणी पित राहावं, हीच सर्वोत्तम पद्धत मानली जाते.

अशावेळी महागडे कफ सिरप घेण्यापेक्षा मध-लिंबूपाणी सारखे घरगुती उपायही तितकाच आराम देऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बऱ्याचदा लोक खोकला झाला की, लगेच कफ सिरप घेतात. पण हे खरंच उपयोगी ठरतं का? की घरगुती उपाय, जसं की मध आणि लिंबू, हे उपायही तितकेच चांगले असतात?

मँचेस्टर विद्यापीठातील श्वसनरोग तज्ज्ञ प्राध्यापिका जॅकी स्मिथ यांनी याविषयी रेडिओ 4 च्या स्लाइस्ड ब्रेड या कार्यक्रमात याविषयी आपलं मत मांडलं आहे.

ब्रँडची गरज नाही

खोकला सहसा थंडी, सर्दीमुळे लागतो. सर्दीचा विषाणू किंवा व्हायरस आपल्यातून आपोआप जातो.

कफ सिरप विषाणूंवर उपचार करत नाही, पण ते घशाला आराम देतात आणि खोकला आणणारी खाज किंवा संवेदना कमी करतात.

खोकला कोरडा असेल, तर बॅल्सम किंवा गोड सिरप (जसं ग्लिसरॉल) घसा ओला ठेवतात आणि आराम देतात, असं प्रा. स्मिथ म्हणतात.

पण यासाठी महागड्या किंवा मोठ्या ब्रँडची औषधं घेण्याची गरज नाही. कारण स्वस्त उत्पादनंही तितकीच प्रभावी आणि फायदेशीर आहेत, असं त्या म्हणतात.

कफ सिरपच्या लेबलवरील एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे साखर. गोड सिरपमध्ये याचं प्रमाण जास्त असतं.

साखरेची चिंता असेल, तर साखर नसलेली म्हणजेच 'शुगर फ्री' खोकला थांबवणारी औषधं हा चांगला पर्याय असू शकतात.

कफ सिरपमध्ये काही 'सक्रिय घटक' असल्याचं जाहिरातीतून सांगितलं जातं. यात डेक्स्ट्रोमेथोरफान असू शकतं. ते खोकला कमी करतं, असा दावा केला जातो. पण प्रा. स्मिथ यांच्या मते, याचा प्रभाव खूपच कमी असतो.

प्रा. स्मिथ म्हणाल्या की, या औषधाचा डोस योग्य प्रमाणातच घ्यावा लागतो, कारण डेक्स्ट्रोमेथोरफान यासारख्या घटकांमुळं त्याचं व्यसन लागू शकतं.

"कफ सिरपच्या लेबलवर दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डोस घेऊ नये," असंही त्या आवर्जून सांगतात.

लेव्होमेंथॉल हा छातीतील कफ सिरफमध्ये आढळणारा एक घटक आहे. ते घशाच्या मागील भागात थंड संवेदनांची जाणीव देतं. यामुळं खाज कमी होते आणि खोकल्याची जाणीवही कमी होते.

पाणी प्या आणि थोडा वेळ द्या

छातीत कफ (श्लेष्मा) असेल, तर छाती भरलेली आणि खूप घट्ट किंवा कडक असल्यासारखी जाणीव होते.

असं बहुधा ब्राँकायटिससारख्या दुसऱ्या संसर्गांमुळे होऊ शकतं. त्यामुळं श्वसनमार्गाला सूज येते, किंवा नाक आणि सायनसमध्ये अतिरिक्त कफ जमा होतो.

सर्वसामान्यपणे दुकानात जाऊन (ओव्हर-द-काऊंटर) कफ सिरप घेणं स्वाभाविक आहे. परंतु, प्रा. स्मिथ सांगतात की, ते सिरप खूप प्रभावी ठरेल असं जास्त गृहीत धरू नये.

उदाहरणार्थ, ग्वायफेनेसिन या घटकामुळं कफ निघण्याचा दावा केला जातो. परंतु, त्याचा ठोस किंवा निर्णायक पुरावा अद्याप नाही.

डायफेनहायड्रॅमिनसारखी झोप आणणारी अँटिहिस्टामाइन्स औषधं रात्री झोप येण्यासाठी मदत करू शकतात, पण ती खोकला थांबवू शकत नाहीत.

थाइम किंवा स्क्विलसारख्या वनस्पतींच्या अर्कांमुळे खोकल्यावर परिणाम होतो याचेही कमी पुरावे आहेत.

त्याऐवजी, प्रा. स्मिथ सांगतात की, सर्वात चांगली पद्धत म्हणजे थोडा वेळ 'वाट पाहणं' किंवा 'थांबणं', पाणी पिणं आणि शरीराला हायड्रेट ठेवणं आणि लोझेंजेस (तोंडात हळूहळू विरघळणाऱ्या छोट्या, चविष्ट गोळ्या) घेणं.

लोझेंजेसमुळे घास खाण्यास किंवा गिळण्यास मदत होते आणि काही काळासाठी खोकला कमी होतो.

मध आणि लिंबाचा वापर

कोमट पाण्यात घेतलेलं घरगुती मध आणि लिंबूपाणी याचं मिश्रण कोरड्या खोकल्यावरील बाजारात मिळणाऱ्या औषधांइतकाच आराम देतं.

कॉक्रेन रिव्ह्यूमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये खोकला आणि थंडी असेल, तर मध आणि लिंबू वापरल्याने 'काही प्रमाणात फायदा' होऊ शकतो, असं प्रा. स्मिथ सांगतात.

थोडा वेळ द्या

हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे की, खोकलादेखिल आवश्यक आहे. आपल्या शरीरातून श्लेष्मा किंवा कफ बाहेर काढण्यासाठी हे गरजेचं असतं.

जर खोकला श्लेष्मा-वाय ( mucus-y) म्हणजेच कफसह असेल, तर जास्त थुंकी बाहेर टाकल्याने श्वसनमार्ग मोकळे होतात आणि आराम मिळतो.

प्रा. स्मिथ म्हणतात, "मी जेवढा कफ खोकून बाहेर काढायचं आहे तेवढा काढेन. खोकला दाबून ठेवणार नाही," तुम्हीही असं करत असाल, तर टिश्यूचा वापर करा.

पण ते गिळलं तरी त्यामुळं काही नुकसान होत नाही. आपलं पोट ते सहज पचवू शकतं.

खोकल्यानंतर जो श्लेष्मा बाहेर येत आहे, त्याचा रंग गडद तपकिरी असेल तरच तुम्हाला चिंता करावी लागेल, "कारण त्यात रक्त असण्याची शक्यता जास्त असते."

खोकला काही आठवड्यांत आपोआप कमी होतो आणि अँटिबायोटिक्सची गरज पडत नाही. पण खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त टिकला, तर डॉक्टरांना अवश्य दाखवावं, असं प्रा. स्मिथ सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.