'श्वास घ्यायला त्रास, घराबाहेर पडायलाही भीती वाटते'; मुंबईकरांवर प्रदूषणामुळे काय परिणाम होतायेत?

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"पूर्वी आम्ही मोकळा श्वास घेऊ शकत होतो, आता तो घेता येत नाही."

मुंबईच्या दादरमध्ये राहणाऱ्या सुप्रिया रेगे शहरातल्या प्रदूषणाविषयी सांगतात. त्या 46 वर्षांच्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात राहतात.

सुप्रिया पुढे सांगतात, "मुंबईतील या प्रदूषणामुळे मला आता श्वसनाचा त्रास होतोय. मला पूर्वी काहीही नव्हतं. आता नेहमी डॉक्टरकडे जावं लागतं. दिवसातून दोनदा इन्हेलर घ्यावा लागतो. औषधं सुरू आहेत."

गेले काही आठवडे मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढताना दिसली. अनेक ठिकाणी AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक 200 च्यावर गेला.

वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईत आरोग्याच्या तक्रारी आणि रुग्णांमध्येही वाढ होऊ लागल्याचं शहरातले डॉक्टर्स सांगतात.

त्याच पार्श्वभूमीवर वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने 28 मुद्द्यांची मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. GRAP नावाची ही प्रदूषण नियंत्रण योजना AQI 200 पेक्षा अधिक कायम राहिल्यास टप्प्याटप्प्यानं लागू केली जाईल असं पालिकेनं सांगितलं आहे.

मुंबईत प्रदूषण का वाढलं आहे?

मुंबईतल्या हवेचा दर्जा खालावण्यासाठी बदलतं हवामान आणि शहरात वाढलेली बांधकामं जबाबदार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

हवामान आणि प्रदूषण तज्ञ डॉ. गुफरान बेग यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 2025 पासून मुंबईची हवा अचानक खूपच खराब झाली.

"शहरावर धूसरपणा वाढला आणि अनेक ठिकाणी धुरकं दिसू लागले. माझगाव, कोलाबा, अंधेरी या भागांतील एअर क्वालिटी 'पुअर' ते 'व्हेरी पुअर' या पातळ्यांवर गेली.

"मुंबईत हवामान झपाट्याने बदलत असल्याने एका भागात हवा खराब तर दुसऱ्या भागात थोडी चांगली असे चित्र दिसते," असं ते नमूद करतात.

सप्टेंबर 2025 पासून वारे मंदावले, आर्द्रता वाढली आणि हवा स्थिर राहू लागली, की प्रदूषित हवा वातावरणाच्या खालच्या थरात अडकून राहते, याकडेही ते लक्ष वेधतात.

"वाहनांच्या धुरापासून ते औद्योगिक प्रदूषण, बायोफ्युएल जळणे आणि धुळीपर्यंत सर्व स्थानिक स्रोतांमुळे मुंबईत हवा आधीच दूषित होत होती."

अगदी 24 आणि 23 तारखेलादेखील हवा खराब होती, पण ती इतकी बिघडली नव्हती असं ते नमूद करतात. त्यामुळे 25नोव्हेंबरला अचानक वाढलेल्या प्रदूषणामागे एखादा अतिरिक्त स्रोत सक्रिय झाला असावा, असं त्यांना वाटतं.

"इथिओपियात झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर सॅटेलाइट प्रतिमांमध्ये खालच्या स्तरातही राखेचा थर दिसला. साधारणपणे ज्वालामुखीचा परिणाम वरच्या वातावरणातच होतो. पण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे यातली धूळ मुंबईकडे वळली असावी आणि मुंबईत आधीच हवा स्थिर असल्याने हे कण खाली साचले असावेत. हा संबंध पूर्णपणे निश्चित नसला तरी तो एक संभाव्य घटक आहे."

मुंबई शहर आणि उपनगर दोन्हीकडे यावर्षी हवेची गुणवत्ता खालावल्याचं दिसून येतं.

'प्रदूषणामुळे घराबाहेर पडायला भीती वाटते'

विक्रोळी उपनगरात राहणारे 36 वर्षाचे अशोक आढाव प्रदूषणामुळे समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचं सांगतात.

"दिवसभर आमच्या परिसरामध्ये धुक्यासारखं असतं. इमारतींचे बांधकाम, वाहणं, बदलते वातावरण आणि अनेक कारणांनी असं होतंय. कोणी ना कोणी आजारी पडत आहे. सकाळी आणि रात्री आम्ही चालायला जात होतो, मात्र काही दिवस बंद केले आहे. आता घराबाहेर पडायला भीती वाटते."

तर दादरला राहणाऱ्या सुप्रिया रेगे यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यांनाही श्वसनास त्रास होतो आहे आणि उपचार सुरू आहेत.

सुप्रिया सांगतात, "प्रदूषण युक्त हवा आम्ही रोज शरीरात घेतो आणि त्यामुळे आम्हाला आजाराला सामोरे जावे लागत आहे. पालिका लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही मुंबईमध्ये मोकळा श्वास घेऊ शकत नाही. दुर्दैवाने माझ्या सासऱ्यांचा गेल्या वर्षी COPD या विकाराने मृत्यू झाला."

COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. अर्थात श्वसनात अडथळे आल्यानं होणारा फुप्फुसांचा विकार. थंडीच्या दिवसांत आणि हवेतलं प्रदूषण वाढलं की या आजाराचं प्रमाणही वाढतं असं वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.

पण असे विकार नसलेल्या व्यक्तींनाही आता वायू प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, अशी माहिती श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. लान्सलॉट मार्क पिंटो यांनी दिली आहे.

रुग्णसंख्येत मोठी वाढ

डॉ. पिंटो म्हणाले की, "प्रदूषण एवढं वाढलंय की ज्या लोकांना दमा नाही, त्यांनाही त्रास होतोय. इन्हेलर घ्यायची गरज वाढतेय. काही लोकांना स्टेरॉईड द्यावे लागत आहे. लहान मुलांना बाहेर गेल्यानंतर श्वसनाचा त्रास वाढतो आहे.

"ज्यांना पूर्वीपासून फुफ्फुसाचे कुठले आजार आहेत, त्यांना तर अधिक त्रास होत आहे. औषधांनी आधी त्यांच्या आजारावर नियंत्रण ठेवता यायचं, पण आता परिस्थिती गंभीर होते आहे."

"अशी हवा घेतल्यानंतर खोकला होतो, दम लागतो, खोकून इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. ताप, शिंका येतात आणि डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो."

त्यामुळे गरज असेल तरच अशा वातावरणात बाहेर पडा, असा सल्ला डॉ.पिंटो देतात.

"बाहेर जायचंच असेल तर सुरक्षित मास्क परिधान करा, अधिक वाहने आणि बांधकाम सुरू असलेल्या जागांपासून दूर राहा. श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि आपलं औषधं नियमितपणे घ्यावीत," असंही ते सांगतात.

सहा वर्षांत प्रदूषणात मोठी वाढ

रेस्पिरर लिविंग सायन्सच्या अहवालानुसार, मुंबईत 2019 ते 2024 दरम्यान हवेतील प्रदूषण वाढले आहे.

PM2.5 म्हणून ओळखले जाणारे अतीसूक्ष्म कण यासाठी कारणीभूत ठरतात. 2019 मध्ये मुंबईत या कणांचं प्रमाण 35.2एवढं होतं, ते 2024 मध्ये 36.1, म्हणजे सुमारे 2.6% वाढलं.

अहवालानुसार एकीकडे हवा चांगली असणाऱ्या दिवसांमध्ये 2021 मध्ये 164 वरून 2024 मध्ये 184 अशी वाढ झाली आहे. पण त्याचवेळी मध्यम आणि कमी दर्जाची हवा असलेल्या दिवसांमध्ये मात्र घट झालेली नाही.

विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांमधलं प्रदूषण कमी न होता वाढत आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 2025 च्या फेब्रुवारीमध्येच मुंबईकत लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांवर बंदी घालण्यात आली होती.

पण तरीही यंदा प्रदूषणात घट झालेली नाही. याचं मुख्य कारण आहे बांधकामादरम्यान उडणारी धूळ.

मुंबईत बऱ्याच बांधकाम साइट्सवर AQI सेन्सर्सही नाहीत आणि नियमांचे पालन न केल्यामुळे प्रदूषण अजूनही नियंत्रणाखाली नाही, याकडे तज्ज्ञांनी वारंवार लक्ष वेधलं आहे.

मुंबईत किती AQI मॉनिटर्स आहेत?

मुंबई परिसरात एकूण 30 अधिकृत AQI मॉनिटर स्टेशन्स आहेत. त्यात MPCB च्या 16, IITM/SAFAR च्या 9 आणि महापालिकेच्या 5 AQI मॉनिटर्सचा समावेश आहे.

या सर्व स्टेशनद्वारे सतत डेटा गोळा करून CPCB चं SAMEER अ‍ॅप तसंच AIRWISE अ‍ॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारा लोकांपर्यंत पोहोचवला जातो. यातले काही स्टेशन तात्पुरते ऑफलाइन असले तरी इतर सक्रिय स्टेशनचा डेटा वापरून शहर किंवा विशिष्ट भागाचा AQI मोजला जातो, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

खरंतर कुठल्याही इमारत बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सेन्सर आधारित AQI मोजणारी संयंत्रे बसवणे बंधनकारक आहे. कारण त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब असल्यास बांधकाम थांबवता येईल किंवा उपाययोजना करता येतील. मात्र अनेक ठिकाणी याचे पालन होत नसल्याचे आकडेवारीतून दिसते.

मुंबईतील एकूण 3,100 बांधकाम स्थळांपैकी केवळ 662 स्थळीच हवेच्या गुणवत्तेचे सेन्सर लावले गेले आहेत. तर 251 ठिकाणी बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तसंच, 117 ठिकाणी संयंत्रे बंद असल्याचे आढळून आले आहे. संयंत्रे बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

सध्या ग्रॅडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) स्टेज-4 मुंबईसाठी लागू नाही. मात्र, वायू प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत, असं महानगर पालिकेनं एक डिसेंबरला प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं.

मात्र, 20 नोव्हेंबरच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबईत AQI सातत्याने 200 पेक्षा अधिक राहिल्यास ग्रेट रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅननुसार विशेष लक्ष देण्याचा आणि त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्याचेही पालिकेने म्हटले आहे.

मुंबईतही GRAP लावण्याची वेळ

GRAP म्हणजे ग्रेडेड रिस्पॉन्स अक्शन प्लॅन. म्हणजे टप्प्याटप्प्यानं लागू होणारी नियंत्रण योजना. दिल्लीत अनेकदा ही योजना लागू केली जाते. यात AQI वाढल्यास म्हणजे हवेचा दर्जा घसरल्यास, कोणती कारवाई करायची हे स्पष्टपणे ठरवले जाते.

GRAP-1 मध्ये पाणी फवारणी, रस्ते स्वच्छता यांसारखे प्राथमिक उपाय केले जातात. GRAP-2 मध्ये मोठ्या वाहनांवर नियंत्रण आणलं जातं.

GRAP-3 मध्ये बांधकाम स्थळांवर कठोर निर्बंध लागू केले जाता. GRAP-4 लागू झाल्यास प्रदूषण वाढीस कारणीभूत असणारी सर्व बांधकामे व उद्योग तातडीने बंद करण्याचे अधिकार प्रशासनाला मिळतात.

आता मुंबईत AQI सातत्याने 200 च्यावर गेल्यास GRAP-4 ची कठोर अंमलबजावणी होऊ शकते, असा इशारा मुंबई महापालिकेनं दिला आहे.

त्यासाठी महापालिकेने 28 मुद्द्यांची मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. तसंच शहरात वायू प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या 53 बांधकामांना नोटीसा बजावल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.

बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळ रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपड्याचे आच्छादन करणे, पाणी फवारणी करणे, राडारोड्याची शास्त्रशुद्ध साठवण आणि ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणे, धूरशोषक यंत्र बसवणे आदी उपाययोजनां राबवण्याचा आदेश महापालिकेनं दिला आहे.

या आदेशांचं पालन होतंय की नाही, हे पाहण्यासाठी 94 पथके प्रदूषण नियंत्रण पथकं तैनात करण्यात आल्याचं महापालिकेनं सांगितलं आहे. या पथकामध्ये विभाग स्तरावरील दोन अभियंता आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश असेल. तसंच ही पथकं योग्य ठिकाणी जाऊन पाहणी करतायत की नाही, याचीपडताळणी जीपीएसद्वारा केली जाईल.

कचरा जाळण्यास आळा किंवा इंधनाच्या स्वरुपात लाकूड जाळण्यावर प्रतिबंध घालणे, तसंच मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे अशा गोष्टींचा अधिकार या पथकाकडे असेल.

दीर्घकालीन उपाय गरजेचे

2017 पासून दिल्लीत हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असताना GRAP आराखडा लागू करण्यात आला.

त्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात आलं आणि सार्वजनिक आरोग्यावरचा तात्काळ धोका घटला असं जेएनयूच्या संशोधकांनी केलेल्या पाहणीतून दिसून आलं होतं.

पण एखादी घटना झाल्यावर मलमपट्टीसारखे उपाय करण्याऐवजी मुंबईने दीर्घकालीन आराखडा तयार करावा आणि सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या स्रोतांवर नियंत्रण ठेवायला हवं अशं तज्ज्ञांना वाटतं.

गुफरान बेग सांगतात, "PM 2.5 हा अतिशय घातक प्रदूषक असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. वाहतूक क्षेत्राचे प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वेहिकल्सचा वापर वाढवणे, जळणासाठी जैविक इंधनाचा वापर टाळणे आणि एकूणच उत्सर्जन कमी करणे ही अत्यावश्यक पावले आहेत.

मुंबईला समुद्राकाठी असल्याने मिळणारा नैसर्गिक फायदा हवामान बदलामुळे हळूहळू कमी होतो आहे. असं ते नमूद करतात आणि योग्य उपाययोजना न केल्यास मुंबईची हवा पुढील काही वर्षांत आणखी बिघडू शकते असा इशारा देतात.

"दिल्लीइतकी वाईट स्थिती पटकन येणार नसली तरी मुंबईही त्याच दिशेने जाण्याचा धोका कायम आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)